Monday 30 May 2022

सहजीवनाची रौप्य महोत्सवी वाटचाल ! (भाग १)

सहजीवनाची सुरुवात ३१ मे १९९७ 

आज जगात भारतीय संस्कृती महान समजली जाते याचे एकमेव कारण म्हणजे कुटुंब व्यवस्था ! हि कुटुंब व्यवस्था निर्माण करण्याचे व विस्तारण्याचे काम विवाह संस्था करीत असते. पत्नी सौ. अदिती सोबतची सहजीवनाची रौप्य महोत्सवी वाटचाल समृद्ध करणारी व आनंददायी आहे. त्या निमित्ताने...

भारतीय संस्कृतीतील वेदांमध्ये मानवी जीवन चार आश्रमात मांडले आहे. आश्रम व्यवस्थेत मानवाच्या कर्माची जाणीव करून दिलेली असून ऋणमुक्तीची ती व्यवस्था आहे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ आणि देवऋण, ऋषिऋण व पितृऋण ही त्रिविध ऋणे यांचे आश्रमव्यवस्थेस अधिष्ठान आहे.  त्यातील गृहस्थाश्रम ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मानला जातो. जो माणूस मोक्ष आणि संसारातील सुखाची अभिलाषा करतो त्यानेच या आश्रमात प्रवेश करावा असेही म्हटले जाते. गृहस्थाश्रम हि एक तपश्चर्या मानली जाते. जीवनातील दुःख, हानी, पराजय, अपमान इ. सामोरे जाण्याने माणसाच्या तपश्चर्येची प्रचिती येते. गृहस्थाश्रमामुळेच नातेसंबंध निर्माण होत असतात. आई-वडील, आजी-आजोबा, सासू - सासरे यामुळे हि सर्व नाती मानवाला प्राप्त होत असतात. मानवी जीवनातील उत्तम व्यवहारांची प्राप्ती येथे होते. नैतिकतेचे प्रशिक्षण केंद्र म्हणजे गृहस्थाश्रम म्हणता येईल. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार यासारख्या मानवी विकारांची परीक्षा या आश्रमात होत असते. या आश्रमात वात्सल्याची पूर्ती होत असते. माता-पिता आपल्या मुलांप्रती प्रेम भावना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मानवाला शारीरिकतेकडून आत्मिकतेकडे नेणारा हा आश्रम आहे. हि पूर्वपीठिका समजून घेतली तर आपल्याकडील विवाह संस्था, तिची उद्दिष्ट्ये सफल होतील असे मला वाटते. असो. आमच्या विवाहाच्या रौप्य महोत्सवीपूर्तीच्या निमित्ताने मला आपल्याला काही सांगायचे आहे. खास करून जे उपवर-वधू आहेत किंवा ज्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला असून खऱ्या अर्थाने संसाराला लागले आहेत त्यांनाही...

१९९२-९६ कालखंडात धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयातील नोकरी सोडून जळगाव जनता बँकेच्या आर्थिक स्थिरतेच्या नोकरीला लागलो होतो. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची क्षमता प्राप्त झाल्यावर कुटुंबीयांनी विवाह करण्याचे ठरविले. श्री. अनिल व सौ. अंजली तारे यांच्या मध्यस्थीने अहमदनगर येथील श्री रंगनाथ कुलकर्णी यांची कन्या कु. संगीता हिचे स्थळ आले. हे चौथे स्थळ होते. पूर्वीच्या दोन ठिकाणांना माझी नापसंती होती तर एका ठिकाणी नकार मिळाला होता. श्री. तारे यांचेकडे आई-वडील व काका-काकूंसह मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पसंत असल्याचा निरोप लगेच दुसऱ्या दिवशी दिला. त्यांनीही पसंती कळविली. नगरच्या परतीच्या प्रवासात धुळे मार्गे जाऊन मोठे बंधू व वहिनींनी मुलगी पाहिली. नगरला दोन वाहने नातेवाईक घेऊन साखरपुडा झाला. तशी विवाहाची फारशी बोलणी नव्हती कारण हुंडा वा सोने-नाणे याबाबत कुठलीही अपेक्षा नव्हती. दि. ३१ मे विवाहाची तारीख ठरली. कपडा खरेदी वस्त्रांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नगरलाच झाली. त्यावेळी प्रथम मुलीचे घर पाहिले. माळी वाड्यात स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ एका वाड्यात एक खोली होती. मुलीला एक भाऊ व एक बहीण. आईला पक्षाघाताचा झटका येऊन गेलेला. 

कापड खरेदी नंतर एका आईस्क्रीमच्या दुकानात लस्सी घेतली आणि तेथून निघतांना होणाऱ्या बायकोचा हात प्रथम हातात घेतला. मनात भीती होतीच. दोन-चार वाक्यांपलीकडे फार काही बोलणे झाले नाही मात्र नजरेने खूप काही समजले होते. लग्न नेहमीप्रमाणे एका सामान्य कुटुंबातील विवाहासारखे झाले. कुठे तरी रुसवे-फुगवेही... कुलस्वामिनी कृपेने व थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने, सर्व नातेवाईक व मित्र परिवाराच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला. दोन्ही कुटुंबातील पहिलाच विवाह असल्याने नातेवाईकांची चांगली उपस्थिती होती. विवाहाच्या वेळेस माझ्या आई-वडिलांनी पूर्व अनुभवानुसार त्यांच्या शिस्तीत विवाहाची संपूर्ण आखणी केली होती. आमची बाजू सांभाळून घेण्यासाठी स्व. मोरु काळे व स्व. अंजूवहिनी (माझा मावसभाऊ व त्याची पत्नी) आवर्जून खास अकोल्याहून आले होते. लग्नातील संपूर्ण चार्म त्यांनी टिकवून ठेवला होता. श्री. सुनीलराव गोरकर (सौ.च्या आत्येबहीणींचे यजमान) यांनी मुलीकडच्या विवाहाची धुरा सांभाळली होती. त्यांच्याच घराजवळील एका घरात साखरपुडा झाला होता. सौ. क्षमा कुलकर्णी (सौं.च्या काकू) यांनी महिला आघाडी सांभाळली होती. सीमंती पूजन, वरात सर्व सोपस्कार आटोपून मंगलाष्टक सुरु झाले. "कुर्यात सदा मंगलम !" म्हणत माळ जेव्हा घातली तेव्हा आयुष्यात प्रथमच वेगळी जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. त्यानंतरचे सर्व विधी आटोपून धुळ्याचा परतीचा प्रवास सुरु झाला. 

दुसऱ्या दिवशी गावातल्या मंडळींसाठी धुळ्यातील सुप्रसिद्ध अशा नवग्रही मंगल कार्यालयात स्वागत समारंभ झाला. आयुष्य घडविणारी अनेक मंडळी याप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी आले होते. केमिस्ट्री विषयाचे स्व. प्रा. पी. डी. खैरनार यांनी "तुला हिरा मिळाला आहे" असे बायकोला सांगितले. त्यांचे शब्द आजही जसेच्या तसे कानात घुमतात. ऋतुशांती व अन्य विधी यथासांग पार पडले. मांडव परतणीसाठी एक दिवस नगरला जाऊन आलो. समवयस्क तीन मित्रांचे पंचमढी, जबलपूर, भेडाघाट असे फिरणे (हनिमून) झाले. विवाहासाठी एक महिन्याची सुट्टी काढली होती. तीन आठवड्यानंतरच कामावर हजर झालो. काही दिवस धुळ्यात राहिल्यावर आमचा संसार जळगावच्या इंडिया गॅरेज जवळील नांदेडकर वाड्याच्या दोन खोल्यांमध्ये सुरु झाला. प्रेम, रोमांच व कधी तरी जबाबदारी पार पडू शकू किंवा नाही या दृष्टीने भीतीही वाटत असे. फार वाद-विवाद किंवा भांडणे झालेली फारशी आठवत नाही. आजूबाजूच्या माताभगिनी व गावातील नातेवाईकांमुळे नेहमीच आधार वाटत असे. गाडी व्यवस्थित सुरु होती. संतती निर्मितीच्या अनुषंगाने प्लॅनिंग वगैरे अशी काही भानगड नव्हती. आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत संसारातील जबाबदारी पूर्ण व्हावी या त्यामागील उद्देश होता. (आज तो बहुतांशपणे पूर्णत्वास जातांना दिसत आहे) 

एक वर्षाच्या आत म्हणजे ११ एप्रिल ९८ (हनुमान जयंतीच्या दिवशी) प्रथमेशचा जन्म झाला. एक आनंदाची लहर या संपूर्ण काळात अनुभवत होतो. दुर्दैवाने १४ ऑगस्ट ९८ ला वडील गमावले आणि मुलांनी आपले आजोबा ! जीवनातील एका अवघड प्रसंगातून संपूर्ण कुटुंब जात होते. अर्थात श्री. विजय कुळकर्णी (काका) यानंतरच्या संपूर्ण कालखंडात व आजही सोबत आहेत याचा आनंद व अभिमान आहे. साधारण ५ वर्षानंतर १३ फेब्रुवारी २००३ रोजी मृण्मयीचा जन्म झाला आणि कुटुंबाचा चौकोन पूर्ण झाला. तिचा जन्म ति. आईसह सर्वांसाठी एक शुभशकुन ठरला. आज प्रथमेश त्याचे शिक्षण पूर्ण करुन नोकरीला लागला आहे, मृण्मयी तिच्या आवडीच्या क्षेत्रात (कथक नृत्य) शिक्षण घेत आहे. अनेक चढ-उत्तर, सुख-दुःखाचे प्रसंग जीवनात आले. सौ. आदितीची संपूर्ण साथ असते. माझ्यासारख्या एका वेगळ्या धाटणीतल्या (भावनिक, वाहवत जाणारा, भौतिक गोष्टींची फारशी अभिलाषा नसलेला, अल्पसंतुष्ट, आपल्या मस्तीत जगणारा, कुटुंब, व्यवसाय व सामाजिक काम यात कुठेही मेळ नसणारा, अव्यवहारी ) माणसाशी जुळवून घेत असतांना अनेकदा तिची कुचंबणा होते अर्थात ति माझीही होतेच. महिलांच्या वर्तनातून , बोलण्यातून त्याची जाणीव होते पुरुष ते खुलेपणाने दाखवीत नाही एव्हढेच... आमच्या सहजीवनातील माझ्या भूमिकेला गुण द्यायचे ठरल्यास १०० पैकी ७० तर सौ. आदितीच्या भूमिकेला १०० पैकी ७० गुण देईल ! हे अशा प्रकारचे मूल्यांकन कशासाठी याचे उत्तर जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा....

3 comments:

  1. Hearty Congratulations Girish on your wedding anniversary.. I was lucky to attend your marriage at Nagar with few of JJSBL colleagues... wishing you more such anniversaries in future. As usual you have written blog in nice crispy language. Keep it up.

    ReplyDelete
  2. गिरीश छान लिहिलंय. सगळेच प्रसंग अगदी छान आठवतात.. तुला 100 पैकी फक्त 50 आणि वहिनीला 100 पैकी 100.... 😃😃
    असेच आनंदी रहा 👍🏻

    ReplyDelete