Sunday 8 May 2022

मातृदिन !

दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत पिठोरी अमावस्या अर्थात पोळा हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. उत्सवप्रिय समाजाला नेहमीच काही ना काही निमित्त पाहिजे असतं. त्यानिमित्ताने एकत्र येणं, कृतज्ञता व्यक्त करणं, सौहार्द वृद्धिंगत होणं, समाज माध्यमातून लेख वा कविता रूपाने आपल्या भावना व्यक्त करणे यासारख्या सकारात्मक गोष्टी नक्कीच घडतात. असो...

"निर्मिती"ची दैवी देणगी प्राप्त असलेली भूतलावरील एकमेव व्यक्ती जिला आपण आई, माय, माता, जननी, जन्मदात्री, माऊली, मातोश्री, मा, माडी (ग्रामीण भागात)  म्हणतो. अलीकडे मॉम आणि मम्मी म्हणायचे एक फॅड निघाले आहे. जन्म देणाऱ्या माते सोबतच आपण कुलस्वामिनीलाही आई म्हणतो, ज्या भागात आपण जन्माला आलो त्या भूमीलाही मातृभूमी वा भूमाता म्हणतो. ज्या देशात जन्माला आलो त्या देशाला भारत माता किंवा मा भारती म्हणतो. आजच्या या लेखाद्वारे समाजातील मातेच्या महतीची जाणीव समृद्ध करु या ! 

सध्या अनुभूती शाळेच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे, सुदैवाने "आई"ला समजून घेण्याची ती एक संधी आहे. समाजातील उपेक्षित, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे चांगले  शिक्षण मिळावे या हेतूने श्रद्धेय मोठ्या भाऊंच्या अर्थात पद्मश्री भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून हि शाळा सुरु करण्यात आली आहे. मागील आठवड्यात सुमारे १६० विद्यार्थ्यांच्या माता-पित्यांशी बोलण्याची संधी मिळाली आणि आजच्या मातृदिनाच्या निमित्ताने त्यातील एकल मातांबद्दल (Single Mother) काही...

मुलाखती घेतलेल्या बालकांमधील सुमारे १० टक्के माता एकल माता होत्या. विधवा, घटस्फोटित वा विभक्त राहणाऱ्या या माता ! हृदय पिळवटणारी व डोळ्यात सहज आसवे आणणारी प्रत्येकीची कहाणी... मात्र आपल्या लेकराला घेऊन जगण्याची दुर्दम्य अशी इच्छाशक्ती... नियती इतकी क्रूर असली आणि भोग मरणयातना देणारे असले तरी या मातांमध्ये जगण्याचे बळ कुठून येत असेल असा प्रश्न पडतो. समाजात स्त्रीच्या मनात पुरुषांबद्दल तिटकारा, किळस वा घृणा उत्पन्न होईल अशी माणसे आहेत हे वास्तव दुर्दैवाने स्वीकारावे लागेल आणि त्यावर मोठे काम करण्याची आवश्यकता वाटते. या माऊलींना त्यांचे बांधव म्हणून समज कशी काढावी हा सर्वात मोठा प्रश्न पडतो. 

अगोदर झालेले लग्न लपवून दुसरे लग्न करून अपत्य झाल्यावर सोडून देणारे महाभाग आणि माहेरी वडील, भाऊ यांचे व्यसन व नेहमी मिळणारे शिव्याशाप खात लेकरासाठी जगणारी  माता, केवळ मुलगी झाली म्हणून तिचं तोंडही न पाहणारा बाप व त्यामुळे पत्नीला घरी न घेऊन जाणारा पती माणूस म्हणण्याच्या योग्यतेचा आहे का ? दुर्धर आजाराने मृत्यू झालेल्या वा आत्महत्या केलेल्या पतीच्या पश्चात दोन-दोन लेकरांना सांभाळणारी माता यांना समाज स्वीकारणार कि नाही ? समाजातील अशी नकारात्मक उदाहरणे आमच्यातील माणुसकीला आव्हान देणार कि नाही ?

मुलाचा जन्म आणि पतीचा मृत्यू एकाच दिवशी पाहणारी माता दुर्दैवी म्हणता येईल मात्र तिच्या सासरच्या मंडळींनी स्वीकारुन उभं करण्यासाठी दिलेले पाठबळ दुर्लक्षून चालणार नाही. तीन मुली आणि एक मुलगा असलेल्या मातेला सोडून देणारे महाभाग आणि त्यांच्याबद्दल अजिबात दुःख व्यक्त न करता मुलांसाठी जगण्याचं बळ हसत हसत एकवटणारी माता व तिच्या माहेरची मंडळी यांना वंदन करण्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नाही. यासारखी दुर्मिळ उदाहरणे हीच खरी समाजाची आशा आहे.

"आई" हे खरोखर एक अजब रसायन आहे. "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी !" असे उगाच म्हटलेले नाही. भौतिकतेच्या आजच्या युगात आईला समजून घेणं, तिच्यामुळे हे जग पाहायला मिळालं याबद्दलची कृतज्ञ जाणं असणं, तिला तिचा सन्मान देणं, प्रत्यक्ष जन्माला येण्यापूर्वी पासून तिने आनंदाने सोसलेला त्रास, नऊ महिने पोटात घेऊन दिलेली सुदृढता, जन्माच्या वेळी लागलेल्या कळा या सर्वांची परतफेड कशी करणार याचा विचार करण्याची संधी मातृदिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने घेतली पाहिजे असे वाटते. शेवटी नैतिकता, संवेदनशीलतेचा परिपाठ देणारी व वात्सल्यमूर्ती असलेली माझी आई श्रीमती सुनंदा विष्णू कुळकर्णी हिने आज मातृदिनानिमित्ताने तिच्या आईसाठी लिहिलेली कविता...

आईची आठवण

आई, तूं जग सोडून गेलीस,

तेव्हा मी लहान होते 

मोठेपणाचं ओझं पेलत,

समजुतीने वागत होते || || 

खुप आठवण यायची तुझी, 

पण काहीच सुचत नव्हतं

मृत्युनंतर माणूस दिसत नाही, 

एवढं मात्र कळत होतं || ||

तूं पुन्हा दिसणार नाहीस, 

मन तयार नव्हतं मानायला

भिरभिरणारी नजर माझी, 

आसुसलेली तुला पहायला || ||

धडे मिळाले तुझ्याकडून, 

समाजात कसं वागायचं

तुझ्या वागण्यातुन समजलं, 

समर्थपणे कसं जगायचं || ||

तूच जवळ नव्हतीस, 

जेव्हा जगायला सुरुवात झाली

पाठीशीच आहेस समजुन, 

जगण्यासाठी हिंमत आली || ||

सुखाचा गुणाकारदु:खाचा भागाकार 

करता करता पुर्ण  जगुन झालं

कर्तव्याची बेरीज आणि स्वतःच वजा 

होत खुप काही अनुभवाला आलं || ||

तुझे आकाश पेलता, पेलता 

माझीही उलटली सत्तरी

एकच प्रार्थना प्रभुचरणाशी

(पुनर्जन्म असलाच तर)

पुढचा जन्म तुझ्याच उदरी || ||

आई, आई... तुला असंख्य नमस्कार !

2 comments: