Tuesday 31 May 2022

सहजीवनाची रौप्य महोत्सवी वाटचाल (भाग २)


मानवी आयुष्य हे अनुभव आणि त्या अनुभवातून शिक्षण घेऊन विकसित होण्याची निरंतर चालणारी प्रक्रिया असते. हे मिळालेले शिक्षण मानवी जीवनात कोणताही अभ्यास न करता पूर्णतः उतरते. थिअरी (पुस्तकी) आणि प्रॅक्टिकल (व्यावहारिक) शिक्षणात ज्या प्रमाणे फरक आढळतो त्याचप्रमाणे वास्तव आणि आभासी व काल्पनिक जगातही आढळतो. विवाहातून निर्माण झालेल्या संबंधांमध्ये याची जाणीव पदोपदी होत असते. विवाहापूर्वीचे जीवन हे नाही म्हटले तरी कल्पना विलासी व बहुतांश वेळेस आभासी असते. विवाहानंतरचे मात्र पूर्णतः वास्तव असते. माझ्या बाबतीतही हे लागू पडते. मात्र व्यावसायिक  आयुष्यातील अनेक प्रशिक्षणांनी, थोरा-मोठ्यांच्या सहवासाने, समविचारी व्यक्तींच्या चर्चेने यातील मेळ घालणे खूप सोपे झाले. एका बाजूला येणारी वैचारिक प्रगल्भता व दुसऱ्या बाजूला संसारातून घ्यावयाची वा येत असलेली निवृत्ती यामुळेही हे काम अधिक सोपे होते. अर्थात यासाठी आपली एक वैचारिक बैठक आपणच तयार करावयाची असते. त्यासाठी अध्यात्मिक गुरु लाभणे अधिक फायद्याचे ठरते. प्रसंगी जीवन जगणे म्हणजे नक्की काय हे शिकणे अगत्याचे ठरते मार्ग ज्याचा त्याच्या सोयीचा असतो. 

लग्नापूर्वी माझ्या आयुष्याच्या जोडीदाराच्या निश्चित अशा काही कल्पना होत्या, त्या कालसुसंगत होत्या. मात्र आजच्या सारख्या खूप स्पष्ट व आग्रही नव्हत्या. "तडजोड" हे यशस्वी वैवाहिक जीवनाचे मूल तत्त्व आहे, हे पक्क माहिती होतं व त्यामुळे तशी मानसिक, भावनिक व शारीरिक पातळीवर तयारीही होती. लग्नापूर्वी जोडीदार एकत्रित कुटुंबात सहज मिळून मिसळून वागणारी असावी, त्यातही आपल्या जातीची व पोट जातीचीही असावी अशी अपेक्षा होती. एका कर्मठ व कर्मकांड करणाऱ्या परंपरावादी ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेला असल्याने त्याचा पगडा नक्की होता त्यामुळे हि अपेक्षा सहजी होती. तसेच जोडीदार शक्यतो विज्ञान शाखेचा पदवीधर असावा अशीही अपेक्षा होती. कारण विज्ञानाचे विद्यार्थी सृजनशील, काळाबरोबर चालणारी असतात असा एक समज होता. वाणिज्य शाखेचे पदवीधर व्यावहारिक असतात तर कला शाखेचे विद्यार्थी इतिहासात रमणारी थोडी वैचारिकदृष्ट्या मागास असा काही तरी समज होता. (कुठून आला सांगता येणार नाही) आज अशा प्रकारचे कोणतेही समज नाही कारण अनुभवातून त्याचे शिक्षण मिळाले. धारणा बदलल्या. माझी पत्नी वाणिज्य शाखेची पदवीधर आहे. (त्यावेळी हि तडजोड होतीच) 

घरात पंजाबी ड्रेस , गाऊन इथपर्यंत पुढारलेली मात्र प्रसंगानुरूप साडीच नेसणारी असावी अशीही अपेक्षा होती आणि आजही आहे. मात्र जीन्स वा तत्सम कपडे कधीही घालू नये असेच वाटते कारण तो आपल्याकडील वातावरणासाठीचा पोशाख नाही व शारीरिक दृष्टीने योग्य नाही अशी धारणा होती व आजही आहे. अर्थात या सर्व बाबतीत मी आज फारसा आग्रही नाही. शेवटी ज्याला त्याला ज्याचे त्याचे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे असे वाटते मात्र माझे मत म्हणून मला विचारले असो वा नसो मी ते मोकळेपणाने सौ. आदितीशी व इतरांशीही बोलतो. गाण्याची आवड असावी हि अपेक्षा होती सौ. गाण्याच्या चार परीक्षा उत्तीर्ण आहे. लग्नापूर्वी सार्वजनिक अपेक्षा एव्हढ्याच होत्या. मात्र मनातून पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेला असल्याने व तेव्हढी वैचारिक प्रगल्भता नसल्याने आपल्याला सहन करणारी, विरुद्ध मत व्यक्त न करणारी, सांगेल तेच ऐकणारी, माझं वर्चस्व मानणारी अशा काही खुळचट वेडसर कल्पनाही होत्या. आज तर तशा त्या अजिबात नाही. "सोनं", साडी, कपडे, गाडी वगैरे भौतिक साधनांबद्दल मला फार कधी आकर्षण वाटले नाही व आजही नाही. मात्र एक स्त्री म्हणून "सोनं" व "साडी" हे पत्नीचे कच्चे दुवे आहेत. मी आयुष्यात अंगावर कधीही सोनं घालणार नाही यावर ठाम मात्र सौ.नी खरेदी करण्यास माझी कधीही ना नाही. साडे तीन मुहूर्ताला व विशेष प्रसंगी एखादा ग्रॅम हा तिचा आग्रह अपवादानेच मोडला असेल. असो.

आणखी एक गोष्ट एका चाकोरीबद्ध कुटुंबात वाढलेले आम्ही दोघेही असलो व कुटुंब हेच प्राधान्य मानणाऱ्या कुटुंबातून आलेलो असलो तरी त्याच पद्धतीने जगावे असे मला कधी वाटले नाही. मात्र सौंची ति कायम अपेक्षा असते. त्यामुळे तुम्ही लग्न का केले ? त्या ऐवजी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे ब्रह्मचारी राहिला असतात अशा शेरा अनेकदा ऐकायला मिळतो. बँकेत नोकरी करणारा नवरा म्हणजे संध्याकाळी ६ वाजता घरी... टीव्ही, एक चक्कर, कुटुंबातील अनावश्यक गोष्टींवर चर्चा, एक मध्यमवर्गीय जगणे मला फारसे न मानवणारे ! खरं यातील काही आवश्यक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे होते असे मला आज वाटते मात्र त्यामुळे फारसे नुकसान झाले असे मला वाटत नाही. एक जबाबदार पती व पिता यासाठी न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असला तरी कधी तरी त्यात कमी राहिली हे स्वीकारले पाहिजे त्यासाठीच स्व-मूल्यांकनात स्वतःला १०० पैकी ७० गुण देतो. स्वतः स्वाभिमानी असल्याने आपलं म्हणणं बरोबर आहे त्यासाठीचा तिचा अट्टाहास आणि समोरच्याने झोपेचं सोंग घेतलेलं असल्याने फारसा भानगडीत न पडता तू मोठ्या बापाचा असं मानणारा मी !  

लग्नापूर्वी पत्रिका जुळली पाहिजे अशी अपेक्षा होती त्यामुळे पत्रिका पाहिली आणि सौ. आदितीचे व माझे ३६ गुण पत्रिकेत जुळले मात्र रौप्य महोत्सवी वर्षाचे सिंहावलोकन करतांना आयुष्यात वास्तवात फारसे जुळत नाहीत असे लक्षात येऊ शकेल. माझ्यादृष्टीने एकाच बाबतीत आमचे ३६ गुण जुळतात आणि ती गोष्ट म्हणजे माझ्याशिवाय ती आणि तिच्याशिवाय मी पूर्ण होऊ शकत नाही. तसे हे चांगले आहेत व तशी हि पण चांगलीच आहे. त्यामुळेच रौप्य महोत्सवी प्रवासात आम्ही केवळ समाधानी नव्हे तर आनंदी  आहोत. अनेकदा वैचारिक मतभेदांमुळे वाद-विवाद होतात मात्र आता एक दुजे के लिए असल्याने ते विषय बाजूला ठेवणे मी पसंत करतो मात्र सौ त्यांचे म्हणणे ठासून खरे ठरविण्याचा नेहमी प्रयत्न करतात. आपल्याकडे इतरांपेक्षा भरपूर असल्याने आपण न्यून असलेल्यांसाठी काही केले पाहिजे मात्र त्यात वाहवत न जाता व्यावहारिक विचार करुन आपलंही पाहिले पाहिजे हि सौ. अदितीची माफक अपेक्षा असते. मी माणसे ओळखू शकतो असे जरी मला वाटत असले तरी लोकं माझा वापर करुन घेतात हे तिला लवकर समजते, ती त्याची जाणीवही करुन देते मात्र पुरुषी अहंकारी मनुष्यस्वभावानुसार मला अनुभवातून ते कळते. अर्थात त्याबाबतीतही मी जरा बेफिकीरच आहे. 

मुलांचे शिक्षण, काही तरी करुन पैसे कमविण्याची इच्छा, कुटुंबातील नातेवाईकांची वास्तपुस्त, देवाणघेवाण यासारख्या गोष्टी मी फारशा पाहत नाही मला त्यात फारसा रस वा स्वारस्य नाही. त्याबाबतीत सौ. आदितीला १०० पैकी १०० गुण दिले पाहिजे. व्यावहारिक जगात या गोष्टींना महत्व असले तरी ऋणानुबंध परस्पर सहकार्यावर व विशेषतः आपण थोडी तोशिष पत्करून इतरांसाठी काही केले पाहिजे हि माझी मनोभूमिका ! जीवनातील अनेक प्रसंगामध्ये आम्ही आमच्या ठिकाणी बरोबरच असतो असे मला वाटते. त्यामुळे "हम नही सुधरेंगे !" या उक्तीप्रमाणे आम्ही एक दुसऱ्याला स्वीकारले आहे असे मला वाटते. प्रसंगांची शृंखला खूप वाढविता येईल कारण २५ वर्षांचा कालावधी सोबत घालविला आहे.   वैवाहिक व खाजगी जीवनातील असे अनेक प्रसंग मला याठिकाणी सांगावेसे वाटतात याचे एकमेव कारण नवीन पिढीने हे आयुष्य आहे हे समजून घेतले पाहिजे. जीवनाचा आनंद घेता व देता आला पाहिजे. त्यासाठी पैसे लागत नाही तर वृत्ती लागते. हि वृत्ती व संसारीक जीवन जगण्याची कला याबाबतीत प्रकाश टाकण्यासाठी आणखी एक भाग लिहीन. पहिला भाग अनेकांनी वाचून त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया नक्कीच उत्साहवर्धक होत्या त्यामुळेच लिहिण्याचे धारिष्ट्य केले. आजचा दुसरा भाग वाचून त्यावर आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहे. येणाऱ्या पिढ्यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी किमान असेही असते हे समजण्यासाठी तरी आपण लिहावे, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे, त्यांचे विचार जाणून घ्यावे आपण समृद्ध व्हावे व त्यांनाही समृद्ध करावे हीच अपेक्षा ! 



2 comments:

  1. प्रियवर्ती गिरीषजी आणि सौ. आदितीताई....
    रौप्य महोत्सवी सहजीवनाच्या आभाळभर शुभेच्छा.!
    🌷🌷👍😀👍🌷🌷

    पंचवीस वर्षांचा सहजीवनाचा आलेख आपण खूप सजग आणि डोळसपणे मांडला आहे. जोडीदार मनासारखा निवडला तरी अनेक बाबतीत आपण दोघं १००% जुळत नाहीत, हे वास्तव ज्याने स्विकारले ते युगल संसारात समाधानी होतात. काही बाबतीत स्वतःला कमी गुण देवून जोडीदाराला १००% गुण देण्याची आपली सकारात्मकता मनभावन आहे. आनंद हा विकत आणता येत नाही. त्यासाठी वृत्ती लागते आणि संसार ही तडजोड असली तरी ती कलात्मक पद्धतीने केली तर जगणं सुंदर होवू शकतं, हा आपला विचार अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे. जगण्याच्या आरश्यात ज्याला स्वतःला बघता आलं, त्याला जीवन जगता आलं, असं मला वाटतं. ते तुम्ही सहज साधलं आहे. हवं ते सर्व पदरात पडलं आहे. आता समाजाचं देणं देत आहात. हेच यश आहे.

    एकमेकांची काळजी घ्या. आनंदी रहा. शतायुषी व्हा.
    🌷🌷👍😀👍🌷🌷
    देवरुप परिवार, धरणगाव

    ReplyDelete
  2. फार सुंदर आणि प्रांजल लेखन. खूप आवडले.

    ReplyDelete