Monday 26 April 2021

प्रथमेशचे अभिष्टचिंतन !



खरं तर चि. प्रथेमशचा वाढदिवस ११ एप्रिलचा ! मात्र आम्हाला तो लक्षात राहतो हनुमान जयंतीमुळेच... आपल्या मुलाचा २३ वर्षांचा प्रवास पाहून अभिमान वाटणं आणि त्यामुळे सुखावणं यासारखा दुसरा आनंद एका बापाचा असूच शकत नाही. २३ वर्षांचा हा लघुपट सहज डोळ्यासमोरून सर्र्कन पुढे सरकतो. आपल्या मुलासोबत होत असलेली आपली घडण नक्कीच त्यादृष्टीने महत्वाची ठरते. पालक-पाळ्या नात्याचं वय जसं वाढत जातं तसं मुलाच्या घडणीत पालक म्हणून आपली भूमिका क्षुल्लक वाटायला लागते आणि दुसऱ्या बाजूला मुलगा म्हणून आपल्या पालकांची भूमिका सर्वोच्च वाटते. पालक-पाल्य दोघांनी परस्परांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारले, परस्परपूरक भूमिका घेतल्या आणि वाढीच्या या कालखंडात दोघांनी एकमेकांकडून शिकायचे ठरविले तर कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्याच्यादृष्टीने त्याची अपरिहार्यता लक्षात येते. 

प्रथमेशच्या या प्रवासातील हे मर्म आपल्यासमोर मांडण्याचे औचित्य म्हणजे पुढच्या पिढीचे देणं मानतो. विद्यार्थ्यांमध्ये काम करीत असल्याने  पालक-पाल्य नात्याची वीण अधिक दृढ करण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याने यात कुठेही प्रौढी मिळविण्याचा उद्देश नाही. वर म्हटल्याप्रमाणे पालक म्हणूनची भूमिका तात्कालिकच होती. नैसर्गिक वाढ हा सृष्टीच्या नियमाचा भाग अंतर्मनात ठेवला तर अनेक गोष्टी सुलभ होतात. संवादातील मोकळेपणा येथे विशेषत्वाने उपयुक्त ठरतो. आपले मत मांडून निर्णयाचे स्वातंत्र्य पाल्याला दिले तर होणारे परिणाम अधिक मॅच्युअर्ड (प्रगल्भ) ठरतात असा माझा अनुभव आहे. खलील जिब्रान यांच्या पालकत्वासंदर्भातील भावानुवादाचा खूप उपयोग झाला. लेखाच्या शेवटी आपणास तो वाचण्यास मिळेल. गीता परिवाराचे काम करणारे संजय मालपाणी यांच्या "दोन शब्द बाबांसाठी आणि दोन शब्द आईसाठी" या व्याख्यानातील "Don't  Worry that children never listen to you, worry that they are always watching you" या मौलिक मंत्राचाही तेव्हढाच उपयोग झाला. 

जीवन अनुभवातून मिळालेली शिकवण, त्याची कालसुसंगत परिस्थितीशी जुळवणी, त्यात अपेक्षित लवचिकता, थोरामोठ्यांचा विचार, त्यांच्यासोबतची चर्चा, विषयावरील प्रबोधन, वाचन यातून आपली स्वतःची पालकत्वाची भूमिका व तत्वे अधिक सुस्पष्ट होत जातात. पाल्याच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा कायम  विचार डोक्यात ठेवून पालकत्व निभावल्यास अपराधीपणाची भावना येण्याचा धोका टळतो. पाल्याचा आनंद त्याच्या प्रतिभेतून त्याला मिळणार असून आपण त्यातच आनंद मानणे आपल्या मानसिक समाधानाचे बीज आहे. पालकत्व निभावताना अपेक्षाभंगाचे दुःख येऊ नये यासाठीची आपापली वैचारिक बैठक विकसित करीत राहणे आवश्यक वाटते. त्याच्या यशस्वी वाटचालीसाठी आपण कायम त्याच्यासोबत आहोत हा विश्वास आपल्या कृतीतून दिसल्यास मुले अधिक फुलतात नव्हे त्यांना त्यांच्या वाढीचे सूत्र लवकर सापडतात. एक सुजाण, सजग व संवेदनशील माणूस बनणे एव्हढाच पालकत्वाचा उद्देश असावा असे मला वाटते. शेवटी त्याच्या आयुष्याचे सोने कसे करावे यासाठीची वैचारिक बैठक तयार करण्यास मदत करणे एव्हढीच आपली भूमिका असते. 

प्रथमेशचे महाविद्यालयीन शिक्षण जळगावातच पूर्ण झाले असून सध्या एका चांगल्या कंपनीत प्रशिक्षणार्थी इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. नोव्हेंबर महिन्यात घरातून बाहेर पडल्यापासून त्याचे निर्णय तो स्वतः घेतो आणि तशी त्याला पूर्ण मुभा आहे. आवश्यकता वाटल्यास अपेक्षित मदत कायम उपलब्ध आहे. मागील पाच महिन्यात तीन राज्यातील तीन शहरांमध्ये त्याचे वास्तव्य राहिले. त्या त्या ठिकाणाचा प्रवास, निवास, भोजन आदी सर्व व्यवस्था त्याने त्याच्या निर्माण केल्या. अर्थात त्यासाठी त्या त्या ठिकाणच्या कंपनीतील सहकाऱ्यांनी त्याला सहकार्य केले. आज त्याच्या जन्मदिनी अभिष्टचिंतन करतांना नक्कीच अभिमान वाटतो. त्याची मेहनत, सद्गुरुंचे आशिर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा त्याची मनोकामना पूर्ण करतील अर्थात पालक म्हणून त्याचा सर्वाधिक आनंद आम्हास असेल. बाळा, खुप मोठा हो.... सुखी राहा... आनंदी राहा..!

खलील जिब्रान यांच्या मुलांवरील कवितेचा इंग्रजी भावानुवाद आपल्यासाठी ! 

तुमची लेकरं ही "तुमची" नसतात.

जीवनाच्या अतितीव्र आकांक्षेची मुलं आणि मुली असतात ती

ती तुमच्याद्वारे जन्मतात तुमच्यापासून नाही,

आणि ती तुमच्याजवळ असली तरी तुम्ही मालक नसता त्यांचे.


कदाचित तुम्ही त्यांना तुमचं प्रेम देऊ शकाल पण तुमचे विचार नाही देऊ शकत,

कारण त्यांच्याजवळ त्यांचे स्वत:चे विचार आहेत.

त्यांच्या शरीरांना तुम्ही घरकुल देऊही शकाल कदाचित पण त्यांच्या आत्म्यांना कदापी नाही,

कारण त्यांच्या अत्म्यांचा वास उद्याच्या गर्भात आहे.

त्यांच्या "उद्या"ला तुम्ही भेट देऊ शकतच नाही, अगदी स्वप्नातही नाही!

तुम्ही त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करु शकाल कदाचित

पण त्यांना तुमच्यासारखं बनवण्याचा विचारही करु नका.

आयुष्य कधीही भूतकाळात जात नाही आणि थांबूनही रहात नाही बदलाच्या प्रतीक्षेत.


तुम्ही एका धनुष्यासारखे असता ज्यावर स्वार झालेली तुमची मुलं

जणू एखाद्या जिवंत बाणासारखी भविष्याचा वेध घेणार असतात.

"तो" जगन्नियंता धनुर्धारी अनादि अनंत काळाच्या पटावर वेध घेतो एका दूरच्या लक्ष्याचा

आणि सर्वशक्तीने "तो" आकर्ण ताणतो प्रत्यंचा, तुम्ही, त्याचं धनुष्य, वाकेपर्यंत

कारण त्याचे ते बाण अतिजलद गतीने जावेत अतिशय दूरवर म्हणून.

तेव्हा आपलं ते धनुर्धार्‍याच्या हातातलं वाकणं आनंदाने स्वीकारा,

कारण "त्यालाही" जसे हे दूरवर जाणारे बाण आपलेसे वाटतात,

तशीच प्यारी असतात त्याला स्थिर असलेली धनुष्यही!


गिरीश कुळकर्णी

मित्र, समुपदेशक व संवादक

23 comments:

  1. Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

      Delete
  2. प्रथमेशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर...🙏

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

      Delete
  3. चांगले विचार आहेत व छान लिहिले आहे .
    प्रथमेशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

    विजय कुळकर्णी . पुणे .

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

      Delete
  4. वा वा दिवसाची सुरुवात सुंदर लेखाने, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रथमेश

    ReplyDelete
  5. सुंदर विचार
    Happy birthday prathmesh

    ReplyDelete
  6. प्रथमेशच्या वाढदिवसानिमित्त बापाने केलेले आत्मचिंतन इतरांसाठी नक्कीच वेगळा विचार देणारे आहे ...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दिलीपराव ! आपला प्रतिसाद लाखमोलाचा...

      Delete
  7. Replies
    1. धन्यवाद संजयजी !

      Delete
  8. मनभावन.
    एका यशस्वी मुलाच्या बापाची ही जडणघडणात्मक टिप्पणी इतर पालकांनाही अनुभव घुटी म्हणून उपयुक्त ठरेल.
    प्रथमेशला वाढदिवसानिमित्त अनेकोत्तम आशीर्वाद आणि आभाळभर शुभेच्छा.!

    ReplyDelete
    Replies
    1. चौधरी सर, मनापासून धन्यवाद ! आपला प्रतिसाद नेहमीच उत्साहवर्धक असतो.

      Delete
  9. खूपच सुंदर लेख आहे sir
    त्यातल्या त्यात कविता तुमची लेकर तुमची नसतात
    खरेच हा लेख ज्यांनी ज्यांनी वाचला किवहा अजुन वचतील
    त्यांना नकीच खुप मोठी मदद होईल
    मुलांना कस सामजंस्य दाखवून तैयार करायचे अस्त
    त्यांना मोकळ राहु दया
    प्रथमेश ला वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा व शुभ आशीर्वाद
    💐🎂🙌
    प्रत्येक वेळेस असे लेख तुम्हीटाकत असतात खुप छान वाटते वाचून
    खूपच खूपच धन्यवाद तुमचे 🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! प्रतिसादात आपले नाव लिहावे.

      Delete
  10. गिरीश जी, अतिशय उद्बोधक लेख. सर्वच पालकांसाठी आणि चि प्रथमेश च्या समवयस्क पाल्यांसाठी सुध्दा उपयुक्त ठरेल. चि. प्रथमेश ला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
    उदय भालेराव.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद उदयराव !

      Delete
  11. Well written girish . Wishing a happy birthday to him and all the success for his future.

    ReplyDelete