Friday 17 April 2020

समर्थ भारताच्या उभारणीसाठी याचा विचार करताय ? भाग ४

"कोरोना" पश्चात परिस्थिती आणि व्यवसायातील संधी 


समर्थ भारताच्या उभारणीसाठी या लेखमालेतील भाग तिसरा भारतीय विचार व कोरोना पश्चात उपलब्ध संधी असा पाहिला. व्यवसाय करीत असतांना ज्या देशात आपण व्यवसायाचा विचार करतोय तेथील संस्कृती आणि कार्यपद्धतीचा विचार करणे आवश्यक असते. पैसा कमवित असतांना सेवेलाही तेव्हढेच महत्व देणारा आपला देश आहे. आज आपण संधींचा विचार करतांना कोरोना पश्चात स्थिती काय असेल त्याचाही विचार करणार आहोत. आपल्याला स्पून फिडींगची सवय असली तरी हा व्यवसाय करा यात संधी असे सांगता येणार नाही. पर्याय सांगता येतील मात्र तो आपल्या स्थळ व काळाशी सुसंगत आहे का ? याचाही विचार करावा लागणार आहे. परिस्थितीचे अवलोकन करुन यॊग्य पर्यायाची निवड हिच यशाची नांदी ठरणार आहे.

कोरोना पश्चात लॉक डाऊन उठविल्यानंतर मार्केट स्थिर होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. जरी लॉक डाऊन संपले तरी किमान वर्ष ते ६ महिने सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करावाच लागेल असे वाटते किंवा सामान्य माणसे स्वतःच्या काळजीसाठी त्याचा अवलंब करतील. या गोष्टीचा सर्वात जास्त परिणाम शैक्षणिक संस्था, हॉटेल, मंदिरे, शिबिरे, पर्यटन व्यवसाय, यात्रा, मेळा, व्याख्याने /  प्रशिक्षण / परिसंवाद /  परिषदांचे आयोजन करणारे व धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अर्थात ज्या ठिकाणी लोकांचा सहभाग असतो अशा गोष्टींवर खूप साऱ्या मर्यादा येणार आहे. त्यासाठी या  गोष्टींसाठी तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक कसा करता येईल याचा विचार करावा लागेल.


सद्यस्थितीमुळे प्रत्येकजण आपली प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत जागरुक होतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रथिनयुक्त आहार, व्यायाम, योगासने, जिम यासारख्या शारीरिक व मानसिक सबलीकरणासाठीच्या व्यवसायांना अधिकाधिक मागणी निर्माण होईल. काळाची ही चाहूल लक्षात घेऊन या क्षेत्रात काय करता येईल याचा विचार करुन त्यासाठीची पूर्व तयारी नक्कीच लाभदायक ठरेल. आपल्याकडील आजीचा बटवा किंवा त्याकाळातील विविध खाद्य पदार्थांना विशेष मागणी निर्माण करता येईल. फास्ट फूडला समर्थ पर्याय देणाऱ्या व्यवसायांसोबतच शारीरिक सामर्थ्य वाढविणाऱ्या गोष्टींना चांगले दिवस असतील.

मध्ये एक मुद्दा आवर्जून सांगितला पाहिजे आगामी काळात प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या व्यक्तींना विशेष मागणी असेल व खरं तर त्यांचे जीवन अधिक सुखकर होणार आहे. कमी श्रमात अधिकाधिक पॆसा मिळविण्याची अलीकडच्या काळातील माणसाची वृत्त्ती कमी होईल असे मला वाटते. "जिथे राबती  हात तेथे हरी" याचा प्रत्यय आगामी काळात येतील याचा अर्थ शेती व शेती पूरक व्यवसायांना चांगले दिवस येतील. लॉक डाऊनच्या या काळात सर्वात जास्त मागणी शेती व संबंधित गोष्टींनाच होती. आपल्या देशाची अर्थ व्यवस्था शेतीवर अवलंबून आहे आणि त्याकडे आपण अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे लक्षात येते. आगामी काळात श्रमाला प्रतिष्ठा मिळेल व मिळावी हिच अपेक्षा आहे.

संधींचा विचार करतांना आणखी एका गोष्टीचा विशेषत्वाने विचार करावा लागणार आहे तो म्हणजे आपण करीत असलेल्या नोकरी व्यवसायात नावीन्य व सृजनशीलतेचा अवलंब कसा करतो. इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी हे परवलीचे शब्द असतील. त्यामुळे पूर्वी ज्याप्रमाणे एका ठिकाणी नोकरीला लागलो कि तेथेच निवृत्ती ही वृत्ती अलीकडच्या काळात कमी होऊन अधिक पॅकेज देणारी त्याच क्षेत्रात नवीन संधी शोधली जात असे. आगामी काळात रोजगाराच्या व व्यवसायाच्या अनेक चांगल्या संधी सर्वांनाच उपलब्ध राहतील मात्र त्यासाठी आवश्यक कौशल्ये आपल्याजवळ असतील असे नाही. यासाठी Learn , Unlearn आणि Relearn अर्थात शिका, काम करा आणि त्या कौशल्याची गरज संपली कि विसरून जा म्हणजेच मला हे येतं मी हेच / एव्हढंच करिन असा विचार करुन चालणार नाही. समोर आलेल्या नवीन संधीचे स्वागत करा, परत शिका. एकाच कौशल्यावर नोकरी / व्यवसायात दीर्घकालीन गुंतवणुकी टाळून त्या प्रकल्पापुरता मर्यादित गुंतवणुक करणे शहाणपणाचे ठरेल.




स्वदेशीला सर्वच देशात चांगले दिवस येतील असा विश्वास वाटतो कारण देशांची इतर देशांवरील परावलंबित्व कमी करण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करणार त्यामुळे ज्या देशांमध्ये मनुष्यबळाची मर्यादा आहे त्यादेशांमध्ये भारतीयांना नक्कीच चांगल्या संधी निर्माण होतील. काही देश चीनमधील आपले प्रकल्प अन्य देशात हलविण्याचा विचार करीत आहेत. त्यांच्यासाठी भारतासारखा अन्य सक्षम पर्याय आज तरी दिसत नाही. उत्पादन निर्मितीसाठी आवश्यक वातावरणाची उपलब्धता म्हणजेच उत्पादनाला जसे हवे तसे थंड, उष्ण, समशीतोष्ण वातावरण, इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात वीज, पाणी, वाहतुकीची व्यवस्था, तरुण, सुशिक्षित मनुष्यबळ भारतात उपलब्ध आहे. सर्वात महत्वाचे भारतीयांची सहिष्णुता अन्य कुठेही  नाही. या सर्वांच्या जोडीला उत्पादनाला आवश्यक असलेले मार्केटही येथे आहे.


भारत सरकारने या गोष्टीचे महत्व लक्षात घेऊन स्किल इंडिया व मेक इन इंडिया या दोन गोष्टींना प्राधान्य दिलेले आपल्याला दिसेल. रोजगार निर्मिती हा प्रत्येक सरकारचा कळीचा मुद्दा राहिला आहे. दुर्दैवाने  सरकारी नोकऱ्यांची मर्यादा जनतेने समजून घेतली पाहिजे. सरकार आवश्यक असलेल्या संधी देईल. त्याचा लाभ घेऊन समाजाने सिद्ध होण्याची गरज आहे. सरकारच्या योजना केवळ कागदावर न राहता त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आगामी काळात अपेक्षित फलनिष्पत्ती देणारी ठरेल.

यासर्व गोष्टींचा अर्थ असा कि आगामी काळात खूप साऱ्या चांगल्या संधी भारतीयांना नक्कीच असतील मात्र त्या संधी स्वीकारण्याची शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता आपण हेतूपुरस्सर विकसित करणार आहोत कि नाही ? अलीकडच्या काळातही आपणास अनेक संधी उपलब्ध होत्याच मात्र आपल्यातील काही मर्यादा व नकारात्मक वृत्तीमुळे आपण त्या घेत नव्हतो. मेहनती, कल्पक, नाविन्याचा ध्यास घेतलेल्यांना आगामी काळ अनुकूल असेल याची शंका नाही अर्थात तेच त्रिकालाबाधित सत्य आहे असे म्हणेन. लॉक डाऊनने नक्कीच त्याची जाणीव आपल्याला करुन दिली असणार आणि म्हणूनच येणारा काळ सुवर्णकाळ ठरेल असा मला विश्वास वाटतो.

आपल्या या लेखमालेच्या पुढच्या भागात आपण भारतीय व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब आपल्याला कसे समृद्ध करेल ते समजून घेऊ. लेखाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देत असतांना वेगवेगळ्या संधींचा उल्लेख नक्कीच असेल. आपणही आपले या विषयातील विचार अवश्य मांडावे ही विनंती...

6 comments:

  1. अतीशय सुंदर लिखाण सध्याच्या कोरोनामय वातावरणाचा परिणाम ज्यांच्यावर निगेटिव्ह झालेला आहे अशांसाठी तुझे लिखाण संजीवनी ठरेल यात शंका नाही.
    लोक
    लॉक डाऊन सुरू झाल्यापासून आदरणीय राव सरांच्या मार्गदर्शनाखाली बँकेतील सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांचा एक ग्रुप तयार करण्यात आला असून सदर ग्रुप वर प्रत्येक जण आपापली मते व्यक्त करीत असतो. अर्थातच सरांचे मार्गदर्शन या ग्रुपवर मेसेजच्या माध्यमातून तसेच व्हॉइस मेसेज च्या माध्यमातून मिळत असतेगेल्या आठवड्यात सरांनी covid-19 व त्यानंतरची परिस्थिती व बँकिंग व्यवस्थेवर होणारा त्याचा परिणाम अल्प मध्यम व दीर्घ कालीन असा विषय दिला होताअतिशय चांगले विचार मंथन या विषयाच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांनी या ग्रुपवर व्यक्त केले व त्याचे विस्तृत असे विश्लेषण सुद्धा तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यात आले. तुझा आजचा लेख त्या सर्व अंगांना स्पर्श करणारा असा आहे. सदर लेखले त्या ग्रुपवर पोस्ट करण्याचा मोह मला आवरला गेला नाही.उद्देश फक्त एवढाच होता ते विचार सर्वांपर्यंत पोहोचावे.मि व्यक्त केलेले विचार खालील प्रमाणे

    इतर देशांच्या तुलनेत भारताने अगदीं योग्य वेळी उचललेली प्रतीबंधात्मक पाउले व उपाय योजना बघता कोविडवर नियंत्रण मिळवण्यात चांगले यश आले आहे. १३० करोड लोकसंख्येचा आपला देश आपल्या कडील रूग्णांची संख्या अजूनही काही हजारांवर आहे हे आपले यशच आहे.
    कोविड चा बॅंकेवर परीणाम सहा महिन्या पर्यंत जाणवु शकतो त्या नंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा भरारी घेईल यात शंका नाही.
    छोटे व्यावसायिकांच्या माध्यमातून कर्ज वाढीसाठी संधी आहेत परंतु त्यात जोखीम घ्यावी लागेल.तसेच नविन कर्ज वाढीसाठी कर्जाची परतफेडी करिता अवकाश कालावधी कमीत कमी ३ महिने दिल्याने व्यवसायांना सुधारणे साठी पुरेसा कालावधी मिळाला आहे.
    आपल्या साठी चिंतनाचा विषय थक बाकी व एन पी ए असुन त्यामधे वाढ होऊ शकते किंबहुना विलफुल डिफॉल्टर सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात त्यासाठी
    उपाययोजना करावी लागेल. हायपो सि सि कर्जांना आधीक क्लोज मॉनिटर करावे लागेल .
    मु.ठेवी च्या बाबतीत आपल्या शाखेचा कस्टमर बेस कसा आहे यावर वाढ किंवा घट अवलंबून आहे . मुळात सध्याच्या परिस्थितीचा धडा घेऊन आणीबाणीच्या प्रसंगी सहज उपलब्ध होऊ शकेल अशा बचतीकडे लोकांचा कल राहील त्यासाठी मु.ठेवीच्या चांगल्या नवीन योजना आणल्यास ठेवींमध्ये वाढ होऊ शकते.
    बॅंकेचे सध्याचे असलेल्या कर्जदार व ठेवी दार यांच्याशी सतत संपर्कात राहून व्यवसाय टिकवण्यासाठी त्यांना आवश्यक ती आर्थीक मदत केल्यास व्यवसायात निश्चितच वाढ करता येईल.
    कोविडचा आपल्यावर काय परिणाम होईल याची प्रचिती लॉकडाउन उठवल्यानंतर काही दिवसांनंतर दिसून येईल.आपण येणारया परीस्थितीस कसे सामोरे जातो यावर ते अवलंबून असणार आहे.भारत जगातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असुन संपूर्ण जग भारत कडे आशेने बघत आहे या आर्थिक वर्षात आपल्या व्यवसाय वाढीची गती कमी होईल असे वाटत असले तरी येणारया परिस्थितीस सकारात्मक दृष्टीने सामोरे गेल्यास चांगले परिणाम दिसून येऊ शकतात.
    धन्यवाद!
    तुझ्या पुढील लेखांची मी आतुरतेने वाट पाहत आहे !
    विज

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद विजय ! तुझ्या प्रतिसादामुळे लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळत आहे. काही सूचना किंवा तुझी मते सांगितल्यास त्याचाही उपयोग होईल.

      Delete
  2. खूपच प्रेरणादायी... अर्थात लिहीलेल्या सर्व गोष्टी यशस्वी होण्यासाठी कुठल्याही काळात महत्वाच्याच आहेत. पण पोस्टकरोना काळात त्या अधिक पणाला लागतील हे मात्र खरं. परिस्थितीचे एक उत्तम विश्लेषण.

    ReplyDelete
    Replies
    1. डॉक्टरसाहेब मनापासून धन्यवाद ! आपला प्रतिसाद लाखमोलाचा. काही भर घालता आल्यास जरूर सांगावे. हा प्रयत्न आहे. अपेक्षा आहे अनुभव आणि विचार काळाच्या कसोटीला नक्की उतरतील.

      Delete
  3. आपण फार मनापासून व विचारपूर्वक लिहत आहात. आपण मांडत असलेले विषय व त्यातील गंभीरता, विविध समस्या वंर समाधान देण्याची आपली भावना अनेकांना अंतर्मुख करून समाज व देश उभारणीसाठी मार्गस्थ करणारी आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सर, धन्यवाद ! आपल्या सारख्या सुहृदांच्या प्रतिसादामुळे हे सर्व घडत आहे. यातून काही व्यक्तींना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळोत हीच अपेक्षा आहे.

      Delete