Sunday 12 April 2020

बाप २२ वर्षाचा होत असतांना...



११ एप्रिल १९९८ रोजी हनुमान जयंती दिनी पुत्ररत्न झाले आणि बाप झालो. अर्थात प्रथमेश २२ वर्षांचा झाला आणि मी २२ वर्षांचा बापही !  मागील २२ वर्षांचा अनुभव समृद्ध करणारा होता. आपण मुलगा म्हणून मोठे होत असतांना आणि आपला मुलगा मोठा होत असतांना पाहणं यात फार मोठे अंतर दिसते. काळ ज्या झपाट्याने बदलतो आहे त्या गतीने पालक म्हणून आपली जबाबदारी ओळखणं, तिला स्वीकारणं, त्याप्रमाणे स्वतःत बदल घडवणं हि तशी कठीण गोष्ट म्हणता येईल. आपण ज्या वातावरणात वाढलो आणि ज्याप्रमाणे आपल्याला वाढवलं ते मनाच्या एका कोपऱ्यात असू द्यावे मात्र ते साधन म्हणून वापरले तर पालक म्हणून अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे.  त्यासाठी परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आपल्या जोडीदाराची भूमिका महत्वाची ठरते. दोघांमधील सामंजस्य खूप उपयोगी ठरते. मी त्याच्याबाबतीत स्वतःला भाग्यवान समजतो.

पालकत्व हि संकल्पना स्पष्ट असली तर अडचणी येण्याची शक्यता कमी होते. आपल्या मुलाला संपन्न व्यक्तिमत्वाचा माणूस होण्यासाठी आवश्यक असलेल्या संधी व वातावरण देणं महत्वाचं ठरतं. बाप होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात हे समजून घेतले पाहिजे. मुलाची शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ होत असतांना आपल्याही शरीराची, मनाची आणि बुद्धीची नव्याने मशागत करावी लागते. बाप  'होणं' आणि बाप 'बनणं' यातला फरक समजून घेतला पाहिजे त्यासाठी आवश्यक तेथे समुपदेशन करुन घेण्यात कुठलाही कमीपणा वाटू देऊ नये. लग्न होण्यापूर्वीच गीता परिवाराचे संजय मालपाणी यांचे "दोन शब्द आईसाठी... दोन शब्द बाबांसाठी" हा कार्यक्रम ऐकला होता. त्यात एक गोष्ट शिकलो जी मुलाला वाढवताना खूप उपयुक्त ठरली. ती म्हणजे "Don't worry that children never listen you , worry that they are always watching you" इ. ४ थीत असतांना मानसोपचार तज्ज्ञाकडून करुन घेतलेले समुदेशन उपयुक्त ठरले. बाप बनण्याच्या प्रक्रियेत अनेक व्याख्यानांचा उपयोग झाला. डोळसपणे शिकलो, समजलो.


मुलगा मोठा होत असतांना त्याला विविध परीक्षांना सामोरे जावे लागते तसेच बाप बनतांनाही अनेक परीक्षा द्याव्या लागतात. अनेक तडजोडी कराव्या लागतात. मनाची घालमेल होते. आपला 'अहं' आडवा येतो. आपली गृहीतके आडवी येतात. मोकळा संवाद असणं, त्याला स्वतंत्र विचार असतो, त्याचेही काही म्हणणे असते हे सर्व समजतं ते उमजणं कठीण असतं. मला ते उमजलं असं आजही म्हणता येत नाही. त्या मार्गावरचा एक पांथस्थ नक्की होतो. अनेक वेळा आपण चुकतो अर्थात ते स्वीकारणं आणि तसे मोकळेपणाने मान्य करणं कठीण असते. हा सर्व प्रवास हुकूमशाही पालकाकडून लोकशाही पालकाकडचा होता. मुलगा मोठा होणं हे जस त्याच्या कर्तृत्वावर अवलंवून असते तसे बाप होणे हे बापाच्या कर्तृत्वावर अवलंबून असते हे मोकळेपणाने स्वीकारावे लागेल. आज प्रथमेश जो काही आहे तो त्याच्या कर्तृत्वावर आहे. मी मात्र बाप झालो का याच उत्तर मलाच देणं कठीण आहे. माझे प्रयत्न प्रामाणिक होते एव्हढेच म्हणू शकतो. कारण प्रत्येकवेळी निर्णय घेतला असे ठामपणे म्हणता येणार नाही. कधी ते त्याच्या आईवर तर कधी काळावर सोडून दिले.



प्रथमेश आज बी. टेकच्या अंतिम वर्षाला विद्यापीठात शिकत आहे. त्याने अतिशय मेहनतीने सहा महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केली आहे. रात्रपाळीतही काम केले. त्याची कॅम्पसमध्ये निवडही झाली आहे. त्याने जे मिळविले आहे त्याबाबतीत आनंद आहे. त्याचे वाचन चांगले आहे. मुलगा म्हणून त्याच्या अनेक गोष्टी सांगता येतील अर्थात त्यामागे आमच्या कुटुंबियांसह त्याचे शिक्षक, जीवनात भेटलेले मार्गदर्शक, आपल्यासारखे सुहृद यांचा वाटा मोठा आणि महत्वाचा आहे. मात्र बाप म्हणून माझ्या... टीव्ही बंद, मोबाईल योग्य वेळी, वाहन आजपर्यंत नाही, " मागणी आणि पुरवठा " याचे प्रमाण मागणीच्या गरजेवर अधिक ना की आपली पुरवठा करण्याच्या आपल्या आर्थिक क्षमतेवर !

शिकण्याचा हा प्रवास निरंतर सुरु असतो त्याप्रमाणे बाप बनण्याचाही ! त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सद्गुरुंचे आशिर्वाद आहे. त्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व आशिर्वाद ! आपल्या सर्वांचे आशिर्वाद व शुभेच्छा त्याला मिळाव्यात हीच अपेक्षा... त्याला वाढवत असतांना एक बाप म्हणून आलेला अनुभव मुलीला वाढवताना नक्कीच उपयुक्त ठरत आहे. २२ वर्षाच्या बाप बनण्याच्या प्रवासातील काही गोष्टी इतरांना उपयुक्त ठराव्यात केवळ या हेतूने लिहिला आहे.

8 comments:

  1. गिरीशभौ,
    आपण फारच भारदस्त लिहिता बुवा !
    अर्थात काही काही गोष्टी वेळच्या वेळीच व्हाव्या असे माझी आजी म्हणत असे !
    आपल्या बाबतीत ते तसे घडले आणि
    पुत्राबरोबर कन्यारत्नाचा देखील लाभ झाला
    (त्याशिवाय आयुष्यला पूर्णत्व नाही )
    मला खात्री आहे ह्या गुणाच्या पेटीविषयी देखील आपण लिहणार आहात
    असेच किंवा त्याहून भरभरून
    पण कालगतीचे हसू येते
    आज पहाटे पहाटे माझ्या मुलाच्या आजी “ बेबी आजी” ने या रंगभूमीवरून यशस्वी सुखद संपूर्ण प्रस्थान केले
    (ज्यांचे आमचे रक्ताचे नाते नसले तरी त्याहून जवळचे !)
    मी “बाप एक खवीस ते एक मित्र “अशी विविध रुपे पाहिली आहेत !
    कनिष्ठ मध्यम वर्गीयांच्या बाबतीत योग्य वेळेबरोबर जगण्यासाठीची धडपड ही देखील तितकीच ह्या भूमिकेचा पाया ठरवण्यात महत्वाची !
    आपल्या सर्व कुटुंबाच्या बाबतीत हे आशेचे नवनवीन धुमारे मी अनुभवले आहेत !
    मी एका शिक्षकाच्या मुलापेक्षा एका शिस्तशीर ग्रंथपालाचा पाल्य!
    माझ्या “बाप “ भूमिकेविषयी विचार करताना मी अनेक गोष्टी नव्याने शिकतो आहे असे जाणवते
    त्यास अर्थातच वेगवेगळी कारणे आहेत ,,जी जवळच्याना ज्ञात आहेत
    पण एका इंग्रजी वचनाचा आधार घेत म्हणावेसे वाटते
    “Child is a father of Man !”


    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! खरं तर माझ्या पहिल्याच ब्लॉग मध्ये लिहिलंय कि बुद्धी आणि विद्या या दोन्ही गोष्टी परमेश्वराच्या आहेत. मी भाग्यवान मला त्या दिल्या आणि प्रयत्न आहे त्याचा इतरांसाठी उपयोग व्हावा यासाठीच तर मदतीचा हात...

      Delete
  2. पालक होणे हे निसर्गाने आने देवाने दिलेली अतभूत देणगी पेलणे सोपे तरनक्की च नाहीय. हे मी आई या नात्याने ठाम पणे सांगू शकते.मी तर वयाच्या19 व्या आणि माझे पती 25 व्या वर्षी आई वडील 25 झालोय,आता च्या काळात हे वय कोवळे च म्हटले जाते आणि या वयात ही जबाबदारी पेलणे आम्हास आव्हान होते.मुळात माझं च वय शिक्षन घेण्याचा ,त्यात मी मुलाला शिकवू शकेन का? हे टेन्शन..त्याची आजारपणे आलीत,कांजण्या,गोवर असेअशा आजारात घरचे वरिष्ठ सोबत नाही आम्ही दूर मुंबइत..सारेच कठी.संस्कार,परंपरा,संस्कृती त्याच्यात रुजवणे..त्या सोबतच त्याचे छंद,आवडी जोपासणे,वाढत्या खर्चाचा ताळमेळ घालून त्याला आपल्याशिस्तीत वाढवणे हे सारं कठीण होते पण जोडीदारासोबत शक्य झाले याचा अभिमान वाटतो.आजतो उत्तम अभियंता आहे ,नोकरीवर रुजू झालाय...लेखन ,वाचन,चित्रकला यात तरबेज आहे,आज्ञाधारक म्हणण्यापेक्षा तो जबाबदार तरुण आहे याचा खूप गर्व आहे..आल्या अडचणी पण त्यावर उभे राहून पालकत्व पेललं गेलं..
    तुम्हा तिघांना उदंड आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा.....

    ReplyDelete
    Replies
    1. आपण केलेल्या कामाबद्दल कृतार्थता वाटणं आणि ज्याने ते आपल्याकडून करुन घेतलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ असणं हेच तर खरं जीवन... धन्यवाद वैशाली ताई !

      Delete
  3. तुम्ही सगळे खरचं 'बाप' माणूस आहात वाचून फार छान वाटल वेगळा विषय....खुप छान...

    ReplyDelete
  4. धन्यवाद ! परमेश्वराची सर्वच लेकरं खऱ्या अर्थाने मोठी असतात... ते उमगलं आणि त्याप्रमाणे जंगल तर ती बाप बनतात. मी त्यातील एक इतकंच !

    ReplyDelete
  5. खुप छान आम्हाला विचार करायला भाग पाडले अतिसुंदर

    ReplyDelete
  6. नमस्कार,
    खूप छान!
    मी सुध्दा एक २४ वर्षांचा बाप आहे, मुलाला वाढवताना त्याच्या चुकांकडे लक्ष देताना, आपल्याही बाबतीत आपण स्वतः कुठे चुकतोय ह्यावर फार लक्ष ठेवले पाहिजे, कारण तुम्ही वर जसे म्हंटले आहे की तुमचे अपत्य, तुमचे निरीक्षण करत असते,I mean तुम्हाला फॉलो करत असते, त्यामुळे आपल्याला स्वतः ला आपली दिनचर्या/वागणे बोलणे चांगलेच मर्यादित सुधारित ठेवावे लागते सगळ्याच बाबतीत.
    हा एक प्रगल्भ अनुभव आहे बाप बनण्याचा.
    धन्यवाद.

    ReplyDelete