Sunday 16 April 2023

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा : आत्मिक समाधान देणारा अनुभव !

नर्मदे हर हर |

त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे,,,

शनिवार, दि. ८ एप्रिल २०२३ ! या दिवशी नर्मदा मैय्याने उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करवून घेतली. जानेवारी महिन्यात सौ. आदितीने १५ दिवसांची बसने नर्मदा परिक्रमा केली. तेव्हापासून मनात इच्छा होती आपणही नर्मदा परिक्रमा करावी. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ऐकून होतो. त्याबद्दलची माहिती गोळा केली आणि सहकारी डॉ. अश्विन झाला, डॉ. निर्मला झाला व नीर झाला या झाला परिवारासह दि. ८ एप्रिल रोजी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्याचे निश्चित झाले. हभप दादा महाराज जोशी व हभप मंगेश महाराज जोशी यांच्या आशीर्वादाने योजल्याप्रमाणे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली आणि पुढील वर्षीही करण्याचे मनात ठरविले. 

शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता तयारी करून प्रथम चोपडा तालुक्यातील खाऱ्यापाडाव या आदिवासी पाड्यावर गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित मुलींसाठीच्या व्यक्तिमत्व शिबिराचे उदघाटन केले, मूल्यशिक्षण विषयावरील एक सत्र घेतले. त्यानंतर भोजन आटोपून दुपारी ३ वाजेच्या सुमारास उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी गुजराथेतील तिलकवाडाकडे मार्गस्थ झालो. मध्यप्रदेशातील बडवानी मार्गे रात्री १० वाजता तिलकवाडा येथील वासुदेव कुटीर आश्रमात पोहोचलो. महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही अनेक भाविक आलेले असल्याने निवासासाठी सोय होणे शक्य होणार नाही याची जाणीव असल्याने सोबत आणलेला तंबू नर्मदा मैय्याच्या किनारी ठोकला आणि त्यात राहिलो. साधारण तासाभरानंतर आकाशात ढग गोळा झाले. त्यांचा गडगडाट सुरु झाला आणि मागोमाग पाऊसही...
एका बाजूला मनात भीती आणि दुसऱ्या बाजूला नर्मदा मैय्या सर्व व्यवस्थित करेल हि आशा ! पाऊस केव्हा थांबला आणि झोप केव्हा लागली काही कळले नाही. सकाळी उठून परत वासुदेव कुटीर आश्रमात आलो. सकाळचे विधी व आंघोळ वगैरे आटोपले. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतीचे दर्शन घेतले. वासुदेवानंद टेंबे स्वामींनी ज्या ठिकाणी परिक्रमेदरम्यान दोन वेळेस ज्या ठिकाणी चातुर्मास पाळला त्या आश्रमाला भेट दिली. तेथे जळगावातील सेवाव्रती श्री. योगेश्वर जोशी यांची भेट झाली. त्यांनी परिक्रमेचा संकल्प सांगितला तसेच माहिती दिली. सकाळी ७.३० वाजता सुरु केलेली परिक्रमा दुपारी ३.३० वाजता संपन्न झाली.मार्गावरील प्रत्येक महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मारुती व श्री गणेशाच्या मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. त्यानंतर आम्ही गरुडेश्वर येथे पोहोचलो. तेथे पुन्हा एकदा नर्मदा स्नान केले. त्यानंतर दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. वासुदेवानंद टेंबे स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले. तेथे आलेल्या भाविकांसोबत दत्ताची भजने व आरती म्हटली. त्यानंतर प्रसाद घेतला. पुन्हा एकदा मंदिर परिसरात नर्मदेच्या बाजूच्या भागात तंबू टाकला आणि झोपी गेलो. सकाळी लवकर उठून सर्व आवरुन अल्पोपहार वगैरे करून ९ च्या सुमारास राजपिपला येथून परतीचा प्रवास सुरु झाला. डेडियापाडा, अक्कलकुवा, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा व अमळनेर मार्गे सायंकाळी ५.४० वाजता सुखरूप घरी पोहोचलो. 

संपूर्ण प्रवासात अनेक गोष्टींचा अनुभव आला. आत्मिकदृष्ट्या समाधान देणारी हि परिक्रमा अनेक गोष्टी शिकवून गेली. रात्री वासुदेव कुटीर आश्रमात मराठी बोलणारी एक व्यक्ती भेटली. चौकशी केली असता जळगावातील भुसावळ जवळील खंडाळा-मोंढाळा येथील असल्याचे कळले. आमच्या धानोरा या गावाजवळील सुमारे ३५ माताभगिनींना उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी ते घेऊन आले होते. महाराष्ट्रातील भाविकांची संख्या लक्षणीय होती. संपूर्ण रात्रभर दक्षिण तटावरून उत्तर तटावर येण्यासाठीची बोट सुरु होती. परिक्रमावासी अखंडपणे चालत होते. ज्यांच्या परिक्रमा पूर्ण झाली त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आमचा उत्साह वाढविणारे होते. मार्गात प्रत्येक ठिकाणी चहा, अल्पोपहार, प्रसाद, ताक, फळे यांची व्यवस्था होती. हि सेवा स्थानिकांकडून निःशुल्क व आग्रहाने पुरविली जात होती. नर्मदे हर हरचा जयघोष अखंडपणे सुरु होता. परिक्रमावासीयांचे वयाचे बंधन नव्हते. अगदी ३-४ वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या आजी-आजोबांचा यात सहभाग होता. कोणी विना चपलेने परिक्रमा करीत होते तर कोणाचे सलग १५ वे वर्ष होते. कोणी सलग ३ दिवस परिक्रमा करण्याचा संकल्प केला होता. मानवी जीवनात श्रद्धेला किती महत्त्व आहे याचा अनुभव पदोपदी येत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे समाधान दिसत होते. संपूर्ण नर्मदा परिक्रमेत खटकणारी एकमेव गोष्ट म्हणजे वाढता प्लास्टिकचा वापर आणि त्यामुळे सर्वत्र असलेला कचरा अगदी नर्मदा मैय्याच्या किनारीही ! अनेकदा सांगूनही मंडळी त्याला टाळू शकत नव्हते हि दुर्दैवाने शोकांतिका म्हणावी लागेल. 

सकाळी साडेसात वाजता वासुदेव कुटीर आश्रम येथून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेस सुरुवात केली.  तेथून पुढे गेल्यावर नर्मदा माता मंदिरात जाऊन नर्मदा मातेचे दर्शन घेतले. नर्मदे हरचा गजर करीत मार्गक्रमण सुरू केले जवळच रामेश्वर महादेव मंदिर, गौतमेश्वर महादेव मंदिर, तिळकेश्वर महादेव मंदिरांमध्ये दर्शन करून पुढील प्रवास सुरु झाला. काही अंतरावर आल्यावर मणीनागेश्वर मंदिर लागले येथे सर्व परिक्रमावासी साठी श्रमपरिहारार्थ थंड पाणी, चहा या अल्पोपहार यांची सेवा चालू होती. काही भक्त मंडळी गीतांवर ठेका धरून नाचत होती. नागेश्वर मंदिर खूपच सुंदर पुरातन आहे येथे दर्शन घेऊन पुन्हा मार्गक्रमण सुरू झाले. सकाळचे रम्य वातावरण परिक्रमेची ओढ या सर्वांमध्ये उत्साहाने मार्गक्रमण सुरू होते. वाटेत कपिलेश्वर मंदिरात दर्शन घेऊन नर्मदा मैयाच्या अगदी जवळ पात्रात उतरून रामपुरा येथे जाण्यासाठी वाटचाल सुरू केली. एका बाजूने वाहणारी नर्मदा मैया , दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी केळी व कापसाचे शेती काही ठिकाणी पुढे गेल्यावर घनदाट झाडी आणि त्याच्या मधून जाणारा अरुंद खडकाळ रस्ता अशी आमची मार्गक्रमणा चालू होती. मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे लागली जागोजागी नर्मदे हर नर्मदे हर असे म्हणून परिक्रमावासींचे स्वागत होत होते त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत बघून आनंदाने प्रसन्न वाटत होते तसेच त्यांची परिक्रमावासींसाठीची सेवा बघून मन भारावून जात होते. नर्मदा मैंयेच्या पात्रातून जात असताना अनेक छोटी छोटी मुले , मुली नर्मदे हर म्हणून आपल्याला प्रोत्साहन देतच असतात त्या छोट्या मुलांना खाऊ किंवा पैसे दिल्यास ते आणखी उत्साहाने नर्मदे हर चा गजर करतात. तेथे बसलेल्या मुलींना दान देण्याची प्रथा आहे. छोट्या मुली या नर्मदेचे स्वरूप मानल्या जातात.

या सर्वांचा आनंद घेत आम्ही पुढे पुढे जात होतो .वाटेत नंदीची दगडी भव्य मूर्ती पहावयास मिळाली. या प्रतिकृती चे पितळी नंदी मध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्यासाठी 51 हजार किलो पितळेचा वापर करण्यात येणार आहे. पुढे रामपुरा येथे जाण्यासाठी होडीतून नर्मदा ओलांडून रामपुरा घाटावर गेलो. रामपुरा घाट स्वच्छ असून तेथे स्नानासाठी नदीमध्ये दोरी बांधून व्यवस्था केली आहे. येथे आम्ही सर्वांनी नर्मदा मैयाला नमस्कार करून तिच्या स्वच्छ पाण्यात स्नान करण्याचा आनंद घेतला , सर्वजण आनंदाने  डुंबत होते . काही वेळानंतर स्नान आटोपून आम्ही पुढे निघालो. रामपुरा घाटावर तीर्थेश्वर महादेव मंदिर तसेच श्रीकृष्ण मंदिर व हरसिद्धी माता मंदिर येथे दर्शन घेतले. दुपारचा महाप्रसाद येथेच घेतला, थोडी विश्रांती घेतली. नंतर दक्षिण  तटाचा प्रवास सुरू झाला. दक्षिण तट मार्ग बहुतांश डांबरी सडक आहे. वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागले. गावातील लोकानी मिळून  मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी खुर्च्या व गाद्यांची व्यवस्था केली होती.  येथे देखील महादेवाचे सुंदर मंदिर आहे. तिथून पुढे आम्ही नर्मदे हर चा गजर वाटचाल करत होतो. येथे तपोवन आश्रम लागला या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी अत्यंत मधुर थंडगार ताक सेवा देतात. येथे पोहोचेपर्यंत ऊन्हाची सुरुवात झाली असल्यामुळे ही सेवा घेताना खूप चांगले वाटत होते. तपोवन आश्रमाचा परिसर अत्यंत सुंदर रमणीय असा आहे येथून नर्मदा मैयाचे खूप छान दर्शन झाले. येथून पुढे वाटचाल करत असताना सर्वात शेवटी लागल तो श्रीसिताराम बाबांचा आश्रम. या आश्रमाचा परिसर देखील फार सुंदर व रमणीय आहे. येथे देखील प्रसाद घेण्याचा खूप आग्रह चालू होता. प्रसाद म्हणून तेथे देण्यात आलेले ताक घेऊन नदीच्या पात्रात उतरून पुढील वाटचाल सुरू केली. परिक्रमेस सुरुवात केल्यापासून रामपूरा पर्यंत सहज वाटणारी परिक्रमा आता खडतर वाटेवरून सुरू होते. नदीच्या पात्रातील गोटे , मैयाचा कमी झालेला प्रवाह आणि वरून तापणारे ऊन यासह आम्ही पुढील वाटचाल सुरू केली. दुपारचे अडीच वाजले असून देखील रणरणतं उन जाणवत होते.  

सीताराम बाबांच्या आश्रमापासून मैयेच्या पात्रात उतरून वासुदेव कुटीर पर्यंत जाणारा हा छोटा प्रवास मोठी परिक्रमा करतात ती किती खडतर असेल याचा अनुभव देऊन गेला. नर्मदे हर म्हणत, मैयाचे नाव घेत घेत हा खडतर प्रवास करत आम्ही नदीचे पात्र ओलांडून पुढे एका छोट्या डोंगराजवळ पोहोचलो. डोंगराचा मार्ग हा उंच खड्या पायऱ्या असलेला होता हा डोंगर चढणे ही एक परीक्षा होती. ही परीक्षा पास झाल्यावर मात्र आम्ही आनंदाच्या परमोच्च शिखरावर पोहोचलो. आम्ही वासुदेव कुटीर येथे पोहोचलो होतो याचाच अर्थ नर्मदा मैय्येने आमची परिक्रमा पूर्ण करून घेतली होती. अशी ही साधारण २१ किलोमीटरची परिक्रमा आहे.  काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता आम्ही परिक्रमा पूर्ण
केली. परिक्रमा मार्गात प्रत्येक ठिकाणी सेवाधारी "नर्मदे हर बाबाजी चाय पिओ, माताजी भोजनप्रसादी पाओ' असे आग्रहपूर्वक विनंती करतात. परिक्रमावासीबद्दलचा आदर पाहून आपण आश्‍चर्यचकित होतो. किनाऱ्यावरून सकाळी परिक्रमेला जाताना मंदिरात होणारा घंटानाद, जागोजागी आश्रमात होणारे स्वागत, छोट्या गावांतून जाताना तटावरची संस्कृती पाहता नर्मदामैयाच्या सान्निध्यात आपली परिक्रमा कधी पूर्ण झाली समजलेच नाही. या परिक्रमेत पवित्र नर्मदामैयाचे स्नान घडले. 

चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केल्यास आपल्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे पुण्य लाभते असे म्हणतात. हे खरे असेलही परंत मला या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेमुळे एकदा आपण संपूर्ण नर्मदा परिक्रमा पायी करावी अशी इच्छा झाली. आता हि इच्छाही नर्मदा मैय्या पूर्ण करेल अशी खात्री वाटते. नर्मदा काठावरील परिसर अतिशय समृद्ध असून येथील लोकांना त्याची कृतज्ञतापूर्वक जाणीव असल्याचे लक्षात येते. अनेक गोष्टी सहजपणाने येथे शिकावयास मिळाल्या याचा मनापासून आनंद आहे. 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

2 comments:

  1. खुप छान वर्णन.. वाचताना आपणही एकदा या परिक्रमेस जावं अस वाटलं

    ReplyDelete
  2. तुमच्या ब्लॉग द्वारे यात्रा अनुभवली... छानच...

    ReplyDelete