Monday 1 November 2021

महासुखाची दिवाळी



"अहो, ऐकलंत का ?" 

"हं "

"मी काय म्हणते ? दिवाळी ८ दिवसांवर आलीय. बऱ्याच दिवसांनी पोरगं येणार आहे. यावर्षी लेक आणि जावईबापू पण येणार आहेत. साफ-सफाई तर केली आहे मी, पण खरेदी बाकी आहे आणि ती तुमच्याशिवाय पूर्ण होणार नाही. परमेश्वरी कृपेने यावर्षी सर्व व्यवस्थित आहे. बऱ्याच दिवसांनी सर्व गोतावळा एकत्र येणार आहे. यावर्षी मला सुखाची दिवाळी अनुभवायची आहे." 

"सुखाची दिवाळी ? कशी असते ती ?"

"अहो, म्हणजे सर्व एकत्र येणार. त्यामुळे मी दिवाळीचा सर्व फराळ घरीच करणार आहे. छान तीन दिवसांचे मेनूही ठरवले आहेत. सर्व घरीच करणार आहे मी. मात्र ज्याला जे पाहिजे ते तुम्ही नक्की द्या म्हणजे झाली माझी दिवाळी सुखाची..."

"अच्छा, म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग !"

"बरोबर"

"हि तुझी सुखाच्या दिवाळीची कल्पना तर"

"म्हणजे ?"

"अगं, तुझी जशी सुखाच्या दिवाळीची कल्पना तशी मुलांची पण काही तरी असेलंच कि ! मग त्यांनाही विचारायला नको का ?"

"तेही खरंच ! आणि तुमची पण असेल..."

"हे काय विचारणं झालं ?"

"त्यांचं पाहू नंतर पहिल्यांदा तुमची सुखाच्या दिवाळीची कल्पना सांगा बरं"


"तुला माहिती आहे मी वर्तमानात जगणारा माणूस ! माझ्यासाठी कालची, आजची आणि उद्याची दिवाळी सुखाचीच... मात्र त्यात एकच गोष्ट सारखी आणि ती म्हणजे आनंद ! हा आनंद फराळ, कपडे यात फार नाही. आमच्या काळी वगैरे भानगड नाही. कालाय तस्मै नमः अशी नकारात्मक भावनाही नाही. सर्वांचा आनंद हा माझा आनंद..."

"तुमची कल्पना चांगलीच आहे पण... कपडे घ्यायला नको का ? पोरगं नवीन मोबाईल मागतोय आणि कमावतोही पण तुमचा होकार मिळाल्याशिवाय घेणार नाही. मुलगी आणि जावई २ वर्षांनी येणार त्यांना काही द्यायला नको का ?"

"यामुळे त्यांना आनंद मिळणार असेल तर नक्कीच देऊ या !"

"हे कसं ठरवणार ?"

"मी करतो बरोबर... दोघांना लगेच व्हाट्सअपवर मेसेज टाकतो. आपण सर्वांनी दिवाळीचा आनंद घ्यावा यासाठी तुमची सुखाच्या दिवाळीची कल्पना सांगा ?"

"चालेल... पण मग फराळ, कपडे, मोबाईल आणि जावईबापूंच्या भेटवस्तुंचे काय ?"

"ते आपण घेऊच कारण ते तुझ्या सुखाच्या दिवाळीसाठी !"

"मग ठीक आहे, बाकी तुम्हाला काय करायचे ते करा. खरेदीसाठी मात्र आपण आजच जाऊ या ! म्हणजे मला नंतर फराळाकडे लक्ष देता येईल."

"चालेल"

उत्साह, चैतन्य आणि सुखाच्या सोहोळ्याचा सण असलेल्या दिवाळीच्या सणाची तयारी घराघरात सुरु असते. प्रकाशाचा हा उत्सव साजरा करीत असतांना आपल्या पुढच्या पिढीला भारतीय संस्कृतीचा हा वारसा सहजपणे दिला जातो. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हा प्रातिनिधिक संवाद... प्रेम, माया व आपुलकीने नात्यातील ऋणानुबंध घट्ट करण्यासाठीची, कुटुंब संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठीची हि धडपड... 

"अहो, तुम्हाला 'थँक्यू' म्हणायचे आहे."

"का ?"

"अहो अगदी मनासारखी खरेदी झाली आज. पोरगं आल्यावर त्याला त्याच्या आवडीचा मोबाईल तेव्हढा घेऊन द्या म्हणजे झाली बाई माझी सुखाची दिवाळी... अगं बाई, मी बोलत काय बसली. तुम्हाला पहिल्यांदा चहा देते..."

"नको, तू बैस. सकाळी चादरी-उशा धुणं, डब्बे घासून वाळवणं याची गडबड आणि नंतर हि खरेदी... यात दमली असशील... मी करतो चहा..." 

"अहो तुमचंही काही ना काही काम सुरु होतंच. तुमच्या मदतीशिवाय वरची कामं आणि खरेदी झालीच नसती." 

"हा मोबाईल घे आणि पोरांच्या सुखाच्या दिवाळीच्या कल्पना काय ते वाच... तोपर्यंत मी आपल्यासाठी चहा घेऊन आलोच."

"अरे हो... मी विसरलेच."

"पहा तर काय म्हणताय पोरं..."

"अहो, चहा छानच झालाय..."

"ते जाऊ दे ! पोरांची सुखाची दिवाळी काय म्हणते ?'

"अहो, मुलं मोठी झाली आणि समजदारही !"

"याच श्रेय तुझंच बरं ! त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांची काळजी घेणं, हवं-नको ते पाहणं हि काम तुझीच. मी दिवसभर नोकरीच्या निमित्ताने गावोगाव भटकलो. अगदी ठरवून कधीतरी पालक सभेला आलो. पैसे देणं तेही ओढाताण करीतच... एव्हढंच माझं काम !"

"अहो, असं काय म्हणता ? पोरांना योग्य वयात द्यावयाचे स्वातंत्र्य, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची बांधिलकी, त्यांच्यावर टाकलेला विश्वास, करियर आणि जीवनविषयक सांगितलेली स्पष्ट मते, स्नेहसंमेलनाला हजर राहणे, दोन-चार वर्षातून एकदा ट्रीपला नेणे, त्यांना कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे यामुळेच हे शक्य आहे."

"हे खरं असलं तरी तुझा वाटा माझ्यापेक्षा नक्कीच जास्त. बरं ते जाऊ दे... काय म्हणताय मुलं ?"

"तुम्हीच वाचा ! मला खूप भरुन येतंय वाचतांना... किती छान कल्पना मांडल्या आहेत दोघांनी !"

"असं ! पहिल्यांदा पोरीचे वाचतो. तुमच्यासह आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी करायला मिळणं हीच


माझ्यासाठी सुखाची दिवाळी. आम्ही यावर्षी कोणत्याही भौतिक गोष्टींवर खर्च करायचा नाही असे ठरविले आहे. कारण आईला कितीही नाही म्हटले तरी ती माझं माहेरपण करणार ! आम्ही तीन दिवस येणार आहोत. तेथे तुम्ही ठरवाल त्यात आम्ही आनंदाने सहभागी होणार आहोत. तीन दिवस घरातील टीव्ही १०० टक्के बंद ठेवावा असे मला वाटते. मी स्वयंपाकात मदत करणार आहे. संध्याकाळची रांगोळी मीच काढणार. खूप गप्पा आणि खेळ खेळणार आहे. आमच्यासोबत कोरोना काळात आई-वडील गमावलेली एक मुलगी असणार आहे. तिचे पालकत्व आम्ही स्वीकारले आहे. आमच्याकडे धुणे-भांडी करण्यासाठी येणाऱ्या मावशी, आमची भाजीवाली आजी, सफाई कामगार, बिल्डिंगचा पहारेकरी, शाळेचे रिक्षावाले काका यांना घरी केलेला दिवाळीचा फराळ आणि कपडे देणार आहोत. माझ्यासाठी हीच सुखाची दिवाळी"

"काहो, एव्हढं शहाणपण कुठून आलं असेल ताईला ?"

"अगं, एका वाक्यात सांगतो. घरात पालकांच्या उक्तीला कृतीची जोड असली कि सहज संस्कार होतात आणि परिस्थिती माणसाला खूप काही शिकविते. मागील वर्षभरात तिने मुंबईत जे अनुभवले त्यातून तिची सामाजिक जाणीव प्रगल्भ झाली असे मला वाटते."

"खरंय... आता माझ्या लेकराचं पण वाचा..."


"हो, हो तू मध्येच प्रश्न विचारला म्हणून बोललो. काय म्हणतो दादा ? हं... माझ्या मते सुखाची दिवाळी आपल्या मानण्यावर असते. आजपर्यंत दरवर्षीची माझी दिवाळी तुमच्यामुळे सुखाचीच झाली आहे. मी ८ दिवस सुट्टी घेऊन येणार आहे. फराळ मी आल्यावरच करायचा. फक्त अनारसे करून ठेवले तर चालतील. यावर्षी आईला अपेक्षित असलेली खरेदी मीच करणार आणि ती स्वदेशीच असणार. मला दिवाळी निमित्ताने कंपनीनेच नवीन मोबाईल दिला आहे. माझे दोन ड्रेस नवीन कोरे आहेत तेच वापरणार आहे. ताईशी माझे बोलणे झाले आहे. ती तीन दिवस येणार आहे. दिवाळीतील एक दिवस सकाळी आपण सर्व वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत आणि भाऊबीजेला संध्याकाळी अनाथालयात जाणार आहोत. एक दिवस माझ्या शाळेतील मुलांसाठी किल्ला बनविण्याची कार्यशाळा घेणार आहे. बाबांना माहिती असलेल्या वस्तीतील मुलांना फराळ वाटप करावा असे मला वाटते. आपल्यासोबत गरजवंतांना दिवाळीचा आनंद देणे हीच माझी सुखाची दिवाळी !"

"मला तर बाई हे पोरगं म्हणजे तुमची कॉपीच वाटते"

"हं, असेल... पण खरंच या दोन्ही मुलांच्या कल्पनांनी माझी दिवाळी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तशी महासुखाची होणार तर !"

"हे काय नवीन ?"

"अगं माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे...


तैसी होय तिये मेळी ।

मग सामरस्याचिया राऊळी ।।

महासुखाचि दिवाळी ।

जगेसि दिसे ।।


आपल्या मुलांनी सामाजिक समरसतेतून समाजाचा जो विचार केला आहे तोच सर्वत्र दिसावा अशी अपेक्षा माऊलींनी व्यक्त केली आहे."


मी अविवेकाची काजळी ।

फेडुनि विवेकदीप उजळी ।

तैं योगिया पाहे दिवाळी । निरंतर ।।


या ओवीतून संत ज्ञानेश्‍वरांनी दिवाळीचा खराखुरा आनंद मांडला आहे. सामाजिक जीवनात साजरी होणारी दिवाळी ही आनंदाचेच प्रतीक आहे मात्र ज्ञानरुपी जाणिवेतून दिवाळीचा आनंद घेतला जातो तेव्हा ती महासुखाची दिवाळी ठरते. आपणही समाजातील अज्ञानरुपी अंधःकार आपल्या सामाजिक जाणिवेरुपी ज्ञानदीपाने दूर सारु या ! शुभ दिपावली ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४

3 comments:

  1. खूप सुंदर लेख !
    अतिशय स्तुत्य व अनुकरण कराव्या अशा कल्पना !!
    👌👌👍👍

    विजय कुळकर्णी . पुणे ( वाकड )

    ReplyDelete
  2. सुरेख लेखन ,नवीन उपक्रमाला आणि दिवाळीच्या खूप शुभेच्छा

    ReplyDelete