Thursday 18 November 2021

गाणं मनातलं !

आकाशी झेप घे रे पाखरा...



माझ्या आवडत्या गाण्यांमधील एक म्हणजे "आराम हराम आहे" चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले, मा. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी गायलेले व संगीतबद्ध केलेले आकाशी झेप घे रे पाखरा...! अतिशय अर्थपूर्ण व जीवनाला दिशा देणारे हे गीत आहे असे मला वाटते. प्रत्येकाला यशस्वी जीवनाच्यादृष्टीने मार्गदर्शन करणाऱ्या गीतातील प्रत्येक कडवे प्रेरणादायी आहे. जन्मदिनाच्या निमित्ताने त्या गाण्याबद्दल लिहिणे हा सुयोग...

प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन देत असतांना कृतार्थता अनुभवायची असते. सुख, समाधान, आनंद आणि यश यामागे तो धावत असतो. परक्षित गोष्ट साध्य झाली नाही तर अनेकदा निराश होतो. आपल्या प्रश्नांची, आव्हानांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो मात्र बहुतांश वेळेस पदरी निराशाच पडते. या गीतातील "तुज कळते परी ना वळते" हे वाख्या बरंच काही सांगते. कवी आपल्या प्रतिभेने एक वेगळाच विचार व दिशा या गीतातून देतो. थोडक्यात सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षाने ज्याप्रमाणे आपल्या पंखांच्या जोरावर भरारी घेतली पाहिजे त्याप्रमाणे प्रत्येक मानवाने आपल्या क्षमता, कर्तृत्व व श्रमाने आपले घर प्रसन्न केले पाहिजे असा संदेश या गीतातून मिळतो.

आयुष्यच सर्व तत्वज्ञान अतिशय सोप्या पद्धतीने कवी सांगतो...

आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा

माणूस स्वप्ने मोठी पाहतो मात्र त्यासाठी आपला नित्यक्रम सोडण्याची, कष्ट करण्याची, वेगळी वाट निवडण्याची तयारी नसते. आपली इप्सित साध्य करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी हवी. सध्याची वरकरणी आरामदायी व सुखकारक जीवनशैली बदलण्यासाठी तो फारसा उत्सुक नसतो. मात्र याच सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची हाक कवी आपल्याला देतो. 

तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते  खाया

सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा

युवकांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. पालकांनी निर्माण केलेल्या वैभवावर किती दिवस अवलंबून राहणार? शरीराला कोणतीही झीज पोहोचू न देता असं किती दिवस चालणार ?

घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा

मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा जैसा उंबरा

घरात सहजतेने मिळणाऱ्या गोष्टींच्या मोहात अडकू नका. अशा घरात मिळणारे अन्न हे विषसमान आहेत आ ते घर हे खऱ्या अर्थाने तुरुंग आहे असे कवी मांडतो. अशा परिस्थितीतून  बाहेर पडण्याची कास धर.

‘तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने

दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा’

माणूस अनेकदा स्वतःला कमी लेखतो. आपल्याला जमणार नाही अशीच त्याची मनस्थिती असते. निसर्गात मानवामध्ये प्रचंड सामर्थ्य असते. त्याची जाणीव झाली कि त्याला कोणीही रोखू शकत नाही. जीवनातील वास्तव व आभासी कल्पनांवर मात कर आणि त्यासाठी तुझ्याकडे सर्व काही आहे. तू केलेल्या अपेक्षांपेक्षाही अधिक करता येऊ शकेल.

कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते

हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गेले... या उक्तीप्रमाणे श्रमाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. सर्व कळूनही अपेक्षित बदल स्वतःमध्ये घडवून आणू न शकल्याने तू अस्वस्थ आहेस का ? असे कवी विचारतो. 

घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले

घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा

आपल्या क्षमतांना श्रमाची व सकारात्मक कृतीची जोड दिल्याने मिळालेले साध्य अधिक आनंददायी ठरते. जीवनाला श्रम मूल्याची जोड दिल्यास घरातील वातावरण प्रसन्न होते. अशा प्रकारची प्रसन्नता दैवी व सात्विक असते. जीवनाचं क्लिष्ट असलेलं तंत्रज्ञात सर्वांना सहज समजेल अशा सोप्या शब्दात सांगणे हि अवघड कला आहे. बाबूजींच्या स्वरांनी त्या संपूर्ण गाण्याला दिलेली चाल सोपी आहे आणि म्हणूनच आजही सामान्यजनांच्या हृदयावर हि अशी गाणे राज्य करतात. 

आपणही डोळसपणे या गीताचा अभ्यास करावा म्हणजे आपणास सर्व काही प्राप्त होईल. मंडळी आपल्याला या गीताबद्दल काय वाटते ते प्रतिसादाच्यारुपात जरूर मांडा...

गिरीश कुळकर्णी

९८२३३ ३४०८४ 


5 comments:

  1. गिरीश जी, नमस्कार.
    सर्व प्रथम जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन. आज च्या दिवसाच्या निमित्ताने जे मनोगत व्यक्त केले आहे, ते व्यक्त करत असताना बाबुजींच्या सुंदर भावगीताचा जो संदर्भ दिला आहे तो प्रत्येकाने मनन करण्यास सारखा आहे. लेख अप्रतिम आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा

    ReplyDelete
  2. गिरिषजी वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा.!
    हे गीत म्हणजे, जीवनाकडे बघण्याचा एक प्रेरणा मंत्र आहे.
    वैभवाची माया, सुख लोलूप काया, घर म्हणजे कारा आणि विषयाचा वारा या सर्वांतराहूनही त्यापासून दूर होण्याचा आकाशी झेप घेण्याचा हा मंत्र आहे.
    माया, मोह यांचा सोन्याचा पिंजरा त्यागल्या शिवास स्वतःचं अवकाश गवसत नाही. स्वतःच्या क्षमतांची शोध लागत नाही, कष्टाच्या घामाचा सुगंध अनुभवता येत नाही. हे सर्व ज्याने अनुभवलं त्याला जीवनातली कृतार्थता कळते आणि जीवन समृद्ध करता येतं.

    सकारात्मकता फक्त बोलून नव्हे, तर ती कृतीतून सिध्द करा असं सांगणारं हे गीत म्हणजे, काळावर कोरला गेलेला एक महामंत्रच आहे. अश्या रचना वारंवार होत नाहीत. शतकावर या गीताने आपली मोहर उमटवली आहे.

    प्रा. बी.एन.चौधरी.
    देवरुप, धरणगाव.

    ReplyDelete
  3. सर,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा,
    खरच प्रेरणादायी गाण आहे.हे गाण व आपले विश्लेषण वाचतांना तुमचाच प्रवास,वाटचाल डोळ्यासमोर येते.आपण निवडलेला वेगळा मार्ग,आपली जिद्द,तळमळ,सकारात्मक विचाराला कृतीची जोड हेच समोर प्रत्यक्षात दिसते.आपल्या विचारांची व प्रयत्नांची झेप अशीच निरंतर राहो हिच सदिछा.
    आपल्या सांगितलयाप्रमाणे युवा वर्गाने परत परत हे गाणे वाचुन,गाऊन प्रेरणाघ्यावी ही अपेक्षा.
    नितीन रावेरकर

    ReplyDelete
  4. गिरीशजी वाढदिवसाच्या शुभेच्छा!
    गाणं आणि त्यातील शिकवण अप्रतिम! जुनी बहुतांश गाणी ही बोधप्रद आणि दिशा देणारी आहेत. यानिमित्ताने एका छान गाण्याचा आस्वाद घेता आला.
    - विवेक घाटे

    ReplyDelete
  5. तुम्ही आणि तुमचे लेखन कौशल्य हे माणसाला प्रेरित करणारे आहेत

    ReplyDelete