Thursday 2 December 2021

गाणं मनातलं !

मन वढाय वढाय...

मानवी जीवनात गीत - संगीताचं स्थान अतूट आहे. खरं ते औषध आहे. गाणं मनातलं लिहायला सुरुवात केल्यापासून इतकी गाणी आठवतात आणि त्यावर लिहावेसे वाटते. असंच काहीसे आज झाले. पण खान्देश कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शालेय जीवनापासून मनात रुंजी घालणारं एक आशय संपन्न गीतावर लिहावे असं ठरवलं. 

मानवी जीवनात मनाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. यापूर्वीच्या दोन्ही गीतांमधून आपले मानसिक स्वास्थ्य सुदृढ होण्याचे  दृष्टीने आपण दोन गीते पाहिलीत. यावेळेचं कवयित्री बहिणाबाईंची कविता मुळात या मनाचं वर्णन करणारी घेतली आहे. अलीकडच्या कालखंडात मानवी मनाचे अनेक प्रकार आपण अनुभवले. मात्र "माझी माय सरसोती" म्हणणाऱ्या या प्रत्यक्ष शारदेने त्याचे वर्णन अतिशय चपखल पद्धतीने आपल्या प्रगल्भ जाणिवेतून फार पूर्वीच करून ठेवले आहे. मनाच्या अस्वस्थतेमुळे व परिस्थितीशी समायोजन करण्यास असमर्थ ठरणाऱ्या व्यक्तींच्या आत्महत्यांमुळे मन अनेकदा व्यथित होते व त्यासाठी काहीतरी करावे असे नेहमीच वाटते. त्यासाठी या कवितेचा अभ्यास नक्कीच लाभदायक ठरतो. पाहू या तर मग कसं आहे हे मन... मन वढाय वढाय या कवितेतून...

मन वढाय वढाय

उभ्या पीकांतलं ढोर,

किती हांकला हांकला

फिरी येतं पिकांवर.

मनाची विशेषता व लक्षणे बहिणाबाईंनी या कवितेतून मांडली आहेत. डवरलेले पीक ज्याप्रमाणे जनावराला आकर्षित करतं त्याला कितीही वेळा हाकललं तरी ते पुन्हा पुन्हा फिरून तिथेच येणार तसंच मनाचं पण आहे. एखादा विषय आपण मनातून काढून टाकायचा प्रयत्न केला तरी ते पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीकडे जातं. 

मन मोकाट मोकाट

त्याले ठायीं ठायीं वाटा,

जशा वार्‍यानं चालल्या

पान्यावर्‍हल्यारे लाटा.

मन मुक्त आहे, स्वच्छंदी आहे. त्यामुळे त्याला वाटाच वाटा आहेत. वाऱ्यामुळे ज्याप्रमाणे पाण्यावरती लाटा निर्माण होतात तसेच अनेकविध विचारांचे तरंग मनात निर्माण होतात. 

मन लहरी लहरी

त्याले हातीं धरे कोन?

उंडारल उंडारलं

जसं वारा वाहादन.

मन लहरी आहे. ते वाऱ्या वादळासारखं कुठेही फिरतं. त्याला हातात कोण धरू शकेल ? असा प्रश्न बहिणाबाई विचारतात.

मन जह्यरी जह्यरी

याचं न्यारं रे तंतर,

आरे इचू, साप बरा

त्याले उतारे मंतर !

मन जहरी(विषारी) पण असतं. त्याच तंत्र कोणालाही समजू शकलेलं नाही. विंचू किंवा सापाने चावलं तर  किमान मंत्राने विष उतरवता येत मात्र मनाचे तसे नाही. 

मन पांखरू पांखरूं

त्याची काय सांगूं मात ?

आतां व्हतं भुईवर

गेलं गेलं आभायांत.

मन अतिशय चंचल आहे. ते एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. एखाद्या पाखरासारखं ते एका क्षणात जमिनीवर तर दुसऱ्या क्षणाला आभाळात असतं. 

मन चप्पय चप्पय

त्याले नहीं जरा धीर,

तठे व्हयीसनी ईज

आलं आलं धर्तीवर.

मन चपळही आहे. त्याला धीर नाही नाही संयम नाही. आकाशात चमकणाऱ्या एखाद्या विजेसारखं वेगाने ते जमिनीवर येतं.

मन एवढं एवढं

जसा खाकसचा दाना,

मन केवढं केवढं ?

त्यांत आभाय मायेना.

मनाचा आकार सांगतांना त्याला बहिणाबाईंनी खसखस आणि आभाळाची उपमा दिली आहे. मन खसखशीच्या दाण्या एव्हढं छोटं असतं तर कधी आभाळापेक्षाही मोठं असतं.. क्षुद्र आणि उदार असे दोन्हीही रूप सांगितली आहेत.

देवा, कसं देलं मन

आसं नहीं दुनियांत !

आसा कसा रे यवगी

काय तुझी करामत !

या कडव्यात बहिणाबाई देवालाच म्हणतात देवा असं कसं मन दिल आहेस. सगळ्या दुनियेत असं काही नाही. तू असा कसा योगी आहेस आणि काय तुझी करामत आहे. 

देवा, आसं कसं मन ?

आसं कसं रे घडलं

कुठे जागेपनीं तुले

आसं सपन पडलं !

शेवटच्या कडव्यात त्या देवाला प्रश्न विचारतात देवा जागेपणी स्वप्नातच हे मन घडवलं का ? असं कसं घडवलं ? कसं बनवलस ? 

निसर्गकन्या म्हणून सर्वश्रुत असलेल्या बहिणाबाईंनी खान्देशी बोलीतून माणसाला सहज समजेल अशा पद्धतीने हि कविता साकारली आहे. सामाजिक परिस्थितीतील माणसाच्या वर्तनावरून हि कविता स्फुरली असावी असे वाटते. शालेय अभ्यासक्रमात शिकलेली हि कविता आजही मनात घर करून आहे. त्यावर नियंत्रण मिळविणे, त्याला कह्यात घेणं, यासाठी तर लिहिली नसेल ना असेही वाटून जाते. या थोर कवयित्रीला विनम्र अभिवादन ! 

2 comments:

  1. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा छान अर्थपूर्ण उलगडा केला आहे.
    - विवेक घाटे

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर!

    ReplyDelete