Monday 6 December 2021

तेथे कर माझे जुळती !


वृत्तिशून्य योगेश्वर डॉ. किशन काबरा


महाराष्ट्राला थोर अशी संत परंपरा लाभली आहे. संतांनी समाजोद्धाराचे कार्य आपल्या साहित्यातून केले आहे. या सर्वांचा उद्देश मानवी जीवनाचे कल्याण हेच होय. मानवी जीवनाचे कल्याण हे त्याच्या आत्मोन्नतीतच आहे. हि आत्मोन्नती कशी करावी याचा मार्ग दाखविणारे हे संत साहित्य. अशा परंपरेतील एक संत म्हणजे समर्थ रामदास. त्यांनी आपल्या दासबोधातून व मनाच्या श्लोकातून समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. हे कार्य कालातीत असून ते आजही मानवी जीवांच्या कल्याणासाठी मार्गदर्शक आहेत असे वाटते. समर्थांनी दासबोधात "वृत्तिशून्य योगेश्वरा"ची संकल्पना मांडली आहे. जळगावातील ज्येष्ठ उद्योजक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजकांचे आदरस्तंभ असलेले डॉ. किशन काबरा अर्थात काकाजी यांचे नुकतेच निधन झाले. काकाजींचे जीवन मला वृत्तिशून्य योगेश्वराचे प्रतीक आहे असे  वाटते. त्यासाठीच हा श्रद्धांजलीपर लेख.

समर्थांनी दासबोधात प्रपंचाच्या मर्यादा न सोडता परमार्थ करावा याचे उत्तम असे मार्गदर्शन केले आहे. काकाजींनी आपल्या जीवनात असा परमार्थ केला म्हणूनच ते म्हणू शकतात "स्वर्ग हवाय कुणाला ?". कारण जीवनात जे जे पाहिजे ते सर्व येथे भूतलावरच मिळाले आहे. हा भूतलच माझ्यासाठी स्वर्ग आहे. त्यामुळे मृत्यूपश्चात स्वर्ग मिळावा यासाठीची सामान्य माणसाची अपेक्षा त्यांच्या जिवंतपणीच पूर्ण झालेली आहे. जीवनातील प्रलोभनांपासून दूर राहून आवश्यक त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करुन जे हवे ते प्राप्त करता येते हेच त्यांच्या जीवनातून कळते. अर्थात हे साध्य झाले ते समर्थांनी मांडलेल्या प्रयत्नवादाद्वारेच शक्य झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात एका लहानशा खेड्यात जन्म झालेल्या काकाजींचे मातृछत्र फारच लवकर हरविले.  पत्नीवियोगाचे दुःख असलेल्या वडिलांचे प्रेमही फारसे मिळाले नाही. नानींनी (आईच्या आई) आईवडिलांची माया दिली आणि त्याच जीवनाच्या आदर्श ठरल्या. विपरीत परिस्थितीवर मत करीत उच्च विद्याविभूषित झाल्यानंतर आपल्या मातृभूमीतच कार्य करायचे त्यांनी ठरविले. आपल्या परिश्रमाच्या व द्रष्टेपणाच्या जोरावर बिर्ला उद्योग समूहात नोकरी मिळाली.

नोकरी करीत असतानांच आपल्यातील उपजत अशा उद्यमशील वृत्तीची त्यांना जाणीव झाली. या उद्यमशील वृत्तीला आपल्या कर्तृत्वाद्वारे फुलवीत त्यांनी आपल्यातील उद्योजक विकसित केला. तांत्रिक कौशल्य, माणसे जोडण्याची कला, व्यवसायातील गुणवत्ता व ग्राहकाचे समाधान, उद्योगासाठी लागणारी व्यावहारिक दृष्टी यामुळेच ते यशस्वी उद्योजक होऊ शकले. या सर्व प्रवासात समर्थांनी मांडलेला विवेक काकाजींच्या ठायी ओतप्रोत दिसतो. माणसातील विवेक जीवनातील दुःख उगाळत न बसता मनातल्या जाणिवा विकसित करतो. विवेकाच्या ज्ञान असते. हेच ज्ञान सामान्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी उपयोगी पडले तर लोक सन्मान करतात व त्यांच्यातल्या संतत्वाला परिणामही ! येथेच विवेक बहरतो. अशा प्रकारची ज्ञानदृष्टी संपादन करण्यासाठी श्रवण व मनन हा विवेकाचा मार्ग आहे. श्रवण आणि मनन केल्याने मिळविलेल्या ज्ञानाचे उन्मन होऊन ज्ञानाचे विज्ञान बनते. काकाजी आपल्या निवृत्तीच्या वयात हेच विज्ञान आम्हासारख्या तरुणांना सांगत होते.

जीवनातील प्रलोभनांना व आकर्षणांना समर्थांनी मूळमाया म्हटले आहे. या मूळमायेला नदीचे रुपक दिले आहे. नदी हि वृत्तीने चंचल असते. तिला फक्त प्रवाहित राहणे माहिती असते. धावणे आणि पुढे जाणे एव्हढेच तिचे उद्दिष्ट. धावत असतांना कोणता मार्ग श्रेयस्कर आहे याचे भान तिला नसते. डोंगर, पठार, वाळवंट काहीही असो वाहने हेच तिचे कार्य. वाहत असतांना काय वाहून नेते हे पण तिला माहित नसते. नदीचे हे गुण मानवी वृत्तीत आढळतात. यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे षडरिपू असतात. यामुळे माणूस स्थूलरुपाकडे अनाहूतपणे जात राहतो. मात्र काकाजींसारखे काही व्यक्ती आपल्या वृत्ती बदलतात. सूक्ष्मात जातात. अभ्यासाने, चांगल्या व्यक्तींच्या सहवासाने त्यांना जीवनाचा अर्थ कळतो आणि त्यातील आनंद ते उपभोगतात आणि तो आनंद स्वर्गसुखाचा असतो. अशी वृत्ती म्हणजे माणसाला नदीच्या उगमापलीकडे घेऊन जाणारी असते आणि त्यांना त्यापलीकडे नदीही दिसत नाही. आजच्या भौतिक जगात माणूस या नदीरूपी मूळमायेच्या मागे धावत असल्याने त्यांना जीवनाचा आनंद सापडत नाही. कायम समाधानी, आनंदी, उत्साही व चिरतरुण असलेल्या काकाजींना आपल्या जीवनाचे इप्सित कळले होते आणि त्यासाठीच जगत होते. अशा व्यक्तींना समर्थ "वृत्तिशून्य योगेश्वर" म्हणतात.

काकाजींच्या पवित्र आत्म्यास सद्गती प्राप्त होवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ परमेश्वर देवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४

3 comments:

  1. डॉ. किशनजी काबरा हे खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. त्यांनी निस्पृह कर्म केले मात्र फळाची अपेक्षा ठेवली नाही.
    खरं तर स्वर्ग आणि नर्क ह्या कवी कल्पना आहेत. वास्तवामध्ये या जगातच आपण स्वर्ग आणि नर्क अनुभवू शकतो. ज्याने सत्कर्म केली आहेत आणि ज्याच्या जीवनातल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत, त्याच्यासाठी हे जगणेच स्वर्गा सारखे आहे. तो कश्याला न पाहिलेल्या स्वर्गाचे अपेक्षा करेल. तद्वत काकाजींनी आपल्या वागण्या, बोलण्यात, कर्माने स्वर्गानुभूतीच घेतली होती असं म्हणता येईल. त्यांनी लिहलेले विचार वाचायला आनंदच होईल.
    त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रभू चरणी प्रार्थना.

    🌷🌷🌷🙏🌷🌷🌷
    प्रा.बी.एन.चौधरी.
    देवरुप, धरणगाव.

    ReplyDelete
  2. मला स्व. काकाजींचा जीवन प्रवास,त्यांचे कर्मयोगी अनुभव वाचायला नक्कीच आवडतील. "स्वर्ग हवाय कुणाला? "वाचायला मिळाले तर खूप आनंद होईल.

    ReplyDelete
  3. जीवन कसे जगावे याचे योग्य विश्लेषण आणि उदाहरण सुद्धा.. दिसायला सोपे वाटते पण अनुसरणे अवघड.. अशी माणसे समाजात आदर्श आणि दुर्मिळ.. आदरांजली... 🙏🙏

    ReplyDelete