Wednesday 15 March 2023

हृद्य संस्कार सोहोळा विवाहाचा... आप्तस्वकीयांच्या स्नेहबंधाचा !

मागच्या आठवड्यात आमच्या धानोरकर परिवारातील एका बहिणीचा पुणे येथे विवाह झाला. खरं तर मोठ्या कुटुंबातील विवाह सोहोळा हि तशी फार मोठी गोष्ट नाही मात्र एका खडतर आव्हानानंतरचा हा विवाह संस्कार काका-काकूंसह आम्हा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट होती. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एका मोठ्या कालावधीनंतर पुतण्याचा विवाह झाला. तोही असाच सर्वांच्या लक्षात राहील असाच झाला. त्यामुळे उत्सवप्रिय पिढीला एकत्र कुटुंबाचा 'नजारा' आणि 'मजा' अनुभवता आली. हा विवाह सोहोळा हि एक संधी होती. हा विवाह सोहोळा म्हणजे धानोरकर व देशपांडे या दोन परिवाराचे मिलन आणि त्यासोबतच दोन्ही परिवारांतर्गत स्नेहमंडळींचे आनंददायी पुनर्मिलन होते. अलीकडे निमित्ताने होणाऱ्या भेटीही कमी झाल्या तरी 'आपलेपण' असले कि सर्व कारणे बाजूला पडतात व  'आपली' माणसे आवर्जून उपस्थिती देतात व सहभागी होतात याचे उदाहरण म्हणजे हा विवाह संस्कार  सोहोळा होय.


विवाह पुण्यात म्हटल्यानंतर त्याचे योग्य नियोजन केले होते. अगदी आदल्या दिवशी सीमंती पासून ते झाली पर्यंतची सर्व व्यवस्था उत्तमप्रकारे लावली होती. तत्पूर्वीचे विधी व अन्य कार्यक्रम घरी पार पडले. त्यासाठी मुलीची आजी, मावशी आजी, काका-काकू आशीर्वादासाठी तर सख्खा, चुलत व मावस भाऊ-बहीण, वहिनी अगदी कंबर कसून सर्व गोष्टींसाठी तयार होते. ज्येष्ठांना आवश्यक असणारी एक आश्वासकता त्यातून निर्माण झाली होती त्यामुळेच सर्वांसाठी हा संस्कार सोहोळा संस्मरणीय ठरला असे नक्की म्हणता येईल. विवाहासाठी असलेले उपाध्ये खांडेकर व त्यांचे सहकारीही संस्कारांना महत्व देणारे त्यामुळे प्रत्येक गोष्टीमागचा अर्थ समजावून सांगणारे होते. वेळ मिळेल तेव्हा अलीकडच्या काळातील विवाहामधील आधुनिकता स्वीकारत असतांना संस्कारांचा वारसा जपण्याची आवश्यकता उभय पक्षांना सांगत होते. दोन्ही दिवसांचे भोजन व अल्पोपहार चविष्ट व रुचकर होते. प्रसंगी पैसे मोजूनही अपेक्षित सेवा मिळत नाही मात्र येथे आलेला अनुभव खूप चांगला व वेगळा होता. 

धानोरकर परिवारातील काकांच्या कुटुंबाचा आणि आमच्या कुटुंबाचा भावबंध अनेक वर्षांचा आणि तितकाच एकमेकांच्या हक्काचा व अधिकाराचा. कारण काका लहानपणापासूनच आमच्या आई-वडिलांसोबत राहत होते. ते अगदी लग्न झाल्यानंतरही अनेक वर्षे. दोघं भावांनी धुळ्यात प्लॉट घेऊन आपले स्वतःचे हक्काचे घर बांधले. अनेक सोहोळे, संस्कार, जीवनातील सुख-दुःखाच्या घडामोडी दोन्ही परिवारातील सदस्यांनी सोबत अनुभवलेल्या होत्या. स्वाभाविकपणे आम्हा भावा-बहिणींमध्ये सख्खा - चुलत असा भाव नव्हता आणि नाही. त्यामुळे लग्नाच्या ६-७ दिवस अगोदरच आमच्या कुटुंबातील सदस्य तयारीसाठी गेले होते अर्थात त्यांना हक्काने बोलवलेही होते.  एकत्र कुटुंबाच्या अनेक चांगल्या बाजूंचा अनुभव गेली सुमारे ६ दशकांहून अधिक काळ आम्ही सर्वच अनुभवत आहोत. काळ कितीही बदलला तरी नात्याच्या या स्नेहबंधात फारसा फरक पडला नाही. विवाह सोहोळ्याला कुळकर्णी-देशपांडे परिवारांनी संख्येचे बंधन घालून घेतल्याने स्वाभाविकपणे काही मर्यादा आल्यात मात्र त्या सोहोळ्यात अडचण ठरल्या नाहीत अर्थात तेव्हढी समज अलीकडे विकसित झाली आहे. 

या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास ६० वर्षांची मैत्री असलेली काकांची दोस्त मंडळी व आमच्या बहिणींच्या मैत्रिणींची आवर्जून विवाह सोहोळ्याला उपस्थिती ! त्यातील एका मित्रानेच मुलीच्या मामांची भूमिका पार पाडली. या मित्रांमध्ये आमच्या सर्वांचे काका-मामा होते. ऐनवेळी तब्येतीच्या कारणामुळे एका काकांना येता आले नाही मात्र ग्रहमुखाच्या दिवशीची भोजनाची व्यवस्था त्यांनी करुन दिली होती. आमच्या काकांना त्यांची अनुपस्थिती पचविणे अवघड गेले अर्थात ते कुणाच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते.

 त्यातील एका वरिष्ठ सहकाऱ्याची पत्नी म्हणजे आमच्या आईची जिवलग मैत्रीण ! आज ती मावशी नसली तरी काका, त्यांची कन्या आणि जावईबुवा यांची भेट डोळ्यांच्या कडा ओलावणारी होती. अनेक हृद्य भेटींचा आनंद शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. काकांचे मामेभाऊ आपल्या घरी पाहुणे मंडळी असतांनाही पत्नीसह आले होते आणि वेळ काढून प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी करीत होते. अनेक वर्षांनी भेटल्यामुळे नवीन पिढीतील अनेकांना ते प्रथमच पाहत होते मात्र त्यांचा व्यवहार अनेक वर्षांच्या सहवासाचा होता. बोलता बोलता सहज म्हणून गेले मला एकदा धानोरा येथे यावयाचे आहे. अलीकडे दुर्मिळ होत चाललेला गोतावळा त्यात अपेक्षित असलेला प्रेमभाव पुढच्या पिढीकडे नक्कीच यानिमित्ताने पोहोचला असे म्हणता येईल. 

आदल्या दिवशी अर्थात ८ मार्चला जागतिक महिला दिन होता. दोन्ही कुटुंबांनी आपापल्या घरी तो साजरा केलाच पण मंगल कार्यालयातही केक भरवून साजरा करण्याची व्यवस्था केली होती. विधी आणि भोजने आटोपली. त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या एका खास शैलीत परिवारातील माता-भगिनी-पत्नी यांना तो भरविला अर्थात त्याची आठवण कॅमेऱ्यात बंद केली हे सांगणे नको. कन्या सध्या पुण्यात असते आणि तिला गुरुंनी लग्नाच्या दिवशी सुट्टी दिली याचा आनंद तिने सर्वांसोबत नृत्याविष्काराने साजरा केला. शास्त्रीय नृत्य बाजूला ठेवून नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतला आणि इतरांनाही त्यात सामावून घेतले. झोपलेली मंडळी उठून त्यात सहभागी झाली. नवरीही त्यात मागे नव्हती. मात्र मग आग्रहाखातर दोन गाण्यांवर कथक नृत्यही सादर करीत वाहवा मिळविली. अचानकपणे karaoke वर गाणे गाण्याचा सिलसिला सुरु झाला आणि सर्व जुन्या-नव्या पिढीतील मंडळींना आपल्या काळात घेऊन गेला. दोन तासांचा वेळ कुठे निघून गेला लक्षातच आले नाही. त्यानंतर वेळेवर आलेल्या मंडळींचा मेहेंदी कार्यक्रम झाला. काही मंडळी झोपण्यासाठी इतरत्र निघून गेल्याने त्यांना याचा आनंद घेता आला नाही. 

अलीकडच्या स्मार्टफोनच्या युगात फोटोचं वाढलेले महत्व असले तरी एक हृद्य व कायमस्वरूपी लागणारी आठवण म्हणजे वधू-वरांसोबतचा तो क्षण ! प्रयत्नपूर्वक प्रत्येकाचा फोटो यावा यासाठी जो-तो काळजी वाहत होता आणि छायाचित्रकारासह मोबाईलचे फ्लॅशही चमकत होते. लग्न समारंभासाठी पाहुणे मंडळींसह सर्वांची योग्य खातिरदारी व व्यवस्था व्हावी यासाठीची सर्व व्यवस्था वधू-वर पक्षाच्या ज्येष्ठांनी समर्थपणे सांभाळली होती. त्यांना परिवार सदस्यांची तेव्हढीच मोलाची साथ होती. ऋणानुबंध घट्ट करणारा हा सोहोळा सर्वार्थाने पुढच्या पिढीसाठी 'संस्कार' सोहोळा ठरला. वधू-वरांच्या आनंदी व समृद्ध सहजीवनाची कामना करीत असतांनाच त्यांच्या माता-पित्यांची एक जबाबदारी समर्थपणे पूर्ण केल्याबद्दल मनापासून अभिनंदन ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 


1 comment:

  1. खूप छान लेख.
    येऊ न शकलेल्या लोकांना सोहळ्याचा आनंद अनुभवता येईल असे वर्णन.
    अभिनंदन!!!
    विजय कुळकर्णी. वाकड, पुणे .

    ReplyDelete