Saturday 13 May 2023

रत्नांच्या खाणीचा निर्माता : 'रत्नाकर' !

शालेय जीवनातील एका शिक्षकाचं जाणं परिवारातील एका सदस्याच्या जाण्यासारखं भावनिक असतं याचा अनुभव रात्रभर घेतोय. पुस्तकी ज्ञानापेक्षाही विद्यार्थ्याला संवेदनशील माणूस म्हणून घडविणाऱ्या, धुळे शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या आमच्या रत्नाकर गोविंद रानडे अर्थात र. गो. रानडे सरांचे दुःखद निधन झाल्याची बातमी रात्री उशिराने कळाली. अन एक चित्रपट डोळ्यासमोरून गेला अर्थात त्याला जोड समाज माध्यमाची होती. आपल्या जीवनात मिळालेल्या आठ दशके आयुष्य लाभलेल्या सरांनी धुळे शहरात एक आगळावेगळा ठसा उमटवीत आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन दिला आणि कसं जगावं याचा कृतीरुप वस्तुपाठ आपल्या जीवनातून दिला. बा. भ. बोरकरांच्या 'असे देखणे होऊ या !' या कवितेतील देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे या उक्ती सारखेच सरांचे जीवन उजळून निघाले होते. याच कवितेतील देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती | वाळवंटातूनी स्वस्तिपद्मे रेखिती || असे त्यांचे जीवन होते. आपल्या शिक्षकी पेशात त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांनी आपल्या नावाप्रमाणेच रत्नांच्या खाणीचा समुद्र निर्माण केला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 

आमची शाळा - न्यू सिटी हायस्कुल, धुळे

जुन १९७९ मध्ये धुळ्याच्या न्यू सिटी हायस्कुलमध्ये इ. ५ वीला प्रवेश घेतला. धुळे एज्युकेशन सोसायटी या ध्येयवेड्या संस्थेच्या शाळेत शिकायला मिळणं हे मागच्या जन्मीचे पुण्य असे आज म्हणता येईल.   सहा वर्षाच्या कालखंडात या शाळेने एका समृद्ध करणाऱ्या जीवनाची बीजे रोवली गेली. ५ वीला बी. एन. जोशी, ६ वीला एस. एस. मुसळे, ७ वीला ह. म. भंडारी, ८ वीला नं. ना. शहा, ९ वीला आर. एस. जहागीरदार आणि १० वीला शा. रा. नाईक या वर्गशिक्षकांच्या तालमीत त्यांना सहकार्य करणाऱ्या रत्नाकर रानडे, व्ही. वाय. दाबके, आर. एस. पाटील, ग. स. पाठक, सु. र. राव, सौ. पाठक-शुक्ल बाई, यु. आर. कुळकर्णी, एस. आर. धामणे आदी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना माणूस  म्हणून घडविण्याचे प्रामाणिक काम केले. या सर्वांचे नेतृत्व करणारे शाळेचे मुख्याध्यापक होते मुकुंद कृष्णाजी पाध्ये सर...

आमच्या शाळेचे वैभव - गुरुजनवर्ग


श्री. रानडे सरांच्या निधनाची बातमी कळली आणि मन भर्र्कन त्या सुवर्ण काळात गेले. सर्व कसे कालच घडले इतके ते आजही ताजे वाटते. जीवन घडविण्यात आई-वडील व शिक्षकांची भूमिका नक्कीच महत्वपूर्ण असते. संस्कार देणारी आई आणि शिस्त लावणारे वडील याप्रमाणेच शिक्षकांचेही होते. काही शिक्षक मातृहृदयी तर काही पितृहृदयी होते. आदरणीय रानडे सर तसे कोमल हृदयाचे... कलेचा उपासक असलेला माणूस संवेदनशील असतोच मात्र साधनेच्या बाबतीत तडजोड कुठेही चालत नाही. समूहगान स्पर्धेत शाळेचा सहभाग आणि त्यातील 'मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा...' हे महाराष्ट्र गीताची तयारी करुन घेणारे रानडे सर डोळ्यासमोरुन हालत नाही. गाण्यातील लय, सूर आणि ताल सांभाळत असतांना एका विद्यार्थ्यांची चूक त्यांच्या सहज लक्षात येत असे. शिस्त हा शाळेचाच स्वभाव असल्याने खेळ, अभ्यास, गाणं, नाटक सर्व ठिकाणी त्याला विशेष महत्व होते. 

विक्षिप्तपूरची चित्तरसेना नाटकातील कलाकार 


विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अशा शिक्षकांचे असणे किती महत्वाचे असते हे आजच्या शैक्षणिक जीवनाकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते. अशा या महत्वाच्या वर्षांतील सुवर्ण काळाची नेहमीच अलीकडच्या काळाशी स्वाभाविकपणे तुलना होते. मी ती करणार नाही पण रानडे सरांसारख्या गुरुजनांनी अनेक पिढ्या आपल्या कर्तव्य कठोरतेने घडविल्या असे नक्की म्हणता येईल. कधी शिक्षाही केली असेल मात्र तक्रार नाही कारण त्या काळातील शाळेचा विद्यार्थी आज जो काही आहे त्यामागे या सर्व गुरुजनांचा वाटा महत्वाचा आहे. शाळेच्या प्रत्येक घटकावर त्यांचे  नेहमीच नियंत्रण होते. शाळेतील विद्यार्थ्याला आपल्या पोटाच्या मुलांप्रमाणे वाढविणारी हि पिढी होती आणि म्हणूनच त्यांनी शिक्षा केली तरी पालकांची कधीही तक्रार नव्हती. आम्ही सर्व भाग्यवान आहोत, आम्ही न्यू सिटीचे विद्यार्थी आहोत, अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभिमान असणे हीच खऱ्या अर्थाने शिक्षणाची पावती म्हटली पाहिजे.

आमची १९८५ ची बॅच

सेवानिवृत्ती नंतरही सर कार्यरत होते. संस्थेचे काही काळ सचिव म्हणून त्यांनी दायित्व सांभाळले. संस्कार भारतीसारख्या कलासाधकांच्या संस्थेचे ते प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते. नाट्य लेखन, दिग्दर्शन हे त्यांचे विशेष आवडीचे विषय होते. इ. ८ वी मध्ये असतांना श्री. रानडे सर, नित्सुरे सर व यु. आर. कुलकर्णी सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे नाटक बसविले. कोकणासारख्या दूरवर प्रदेशात बाल नाट्य स्पर्धेत शाळेचा सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक पटकविण्याची कामगिरी सरांनी केलेली आजही आठवते. गीता पठाण स्पर्धा, मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा यासारख्या उपक्रमातही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी ते प्रोत्साहन देत असत. वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन स्वतःचा वैयक्तिक वेळ देऊन सर्व शिक्षक मंडळी करीत असत त्यात श्री. रानडे सरांचा वाटा मोलाचा होता. विद्यार्थ्यांकडून मेहनत करुन घेत असतांना वेळ आणि पदरचे पैसे खर्च करतांना हे शिक्षक कधीही मागेपुढे पाहत नसत.

अलीकडे धुळ्याचा संपर्क कमी झाला असला तरी अधूनमधून सरांची भेट होत असे. एकदा तर सरांच्या घराजवळच भेट झालेली आठवते. शिष्य फाउंडेशनच्या माध्यमातून २०११ मध्ये झालेल्या स्नेहमेळाव्याप्रसंगी सर्व शिक्षकांची झालेली भेट आजही स्मरणात आहे. श्री. दाबके सरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमातही रानडे सरांची भेट झाली होती. अजिबात थकलेले वाटले नाही. तीच शरीर यष्टी, चेहऱ्यावरील तेज, जिवंतपणा बोलण्यातील सहज मिश्कीलता. सरांकडे पाहिल्यावर ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तजींची आठवण येत असे. शिक्षकांमधील परस्पर संवाद - संबंध व विद्यार्थ्यांची त्याच्या प्रति असलेली निष्ठा कृतार्थतेचा आनंद देणारे होते. अशा संस्थेच्या व तेथील शिक्षक वृंदांच्या ऋणातून उतराई होणे केवळ अशक्य मात्र त्यांना जीवन जगण्याचे धडे आत्मसात करुन त्याप्रमाणे जगणे हीच त्या महानुभावांनी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे मला वाटते.

र. गो. रानडे सरांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभेलच व त्यांच्या परिवाराला त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो. ॐ शांती शांती शांती !!


1 comment:

  1. गिरीषजी आपण व्यक्त केलेल्या भावना व त्या काळातील शिक्षकांचे छायाचित्र पाहून त्या कालावधीस जिवंत केलेत आपण. आपली शब्द शैली छान आहे.
    सरांसोबत जवळून शिक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव घेता आला हे भाग्य समजतो.

    ReplyDelete