Thursday 28 April 2022

जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा... प्रशांत मोराणकर !


हि दुनिया एक आगळीवेगळी गोष्ट आहे आणि त्यातील माणसे हे तर अजब रसायन आहे. वीर वामनराव जोशी यांची एक अशीच रचना ज्यात त्यांनी माणसांबद्दल फार मार्मिकतेने लिहिले आहे. प्रत्येकाचे जीवनाचे एक विशिष्ट असे ध्येय आणि त्या ध्येयासाठी वेड्या झालेल्यांचा जगभर पसारा आपल्याला दिसतो. मला या वेड्यांबद्दल नेहमीच कुतुहूल वाटत राहिले आहे. त्यात एकही अपवाद सापडत नाही. प्रत्येक व्यक्तीमधील चांगुलपणाला शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सर्वत्र वेडेच दिसतील अर्थात त्यासाठी प्रथम आपण वेडे असावे लागते. आज हे सर्व लिहिण्यामागचे कारण म्हणजे माझा शालेय जीवनापासूनचा (मागील ४३ वर्षांपासून) मित्र प्रशांत याने काल आपला ५२ वा जन्मदिवस साजरा केला. गेल्या ४-५ वर्षांपासून धुळ्याचा संपर्क कमी झाला आणि प्रशांतच्या भेटीही ! असे असले तरी काल सकाळी सकाळी त्याच्याशी बोललो आणि काल परवा तर भेटलो असेच वाटले. 

प्रशांत जगाच्या वेड्यांच्या पसाऱ्यातील एक ! एकत्र व्यावसायिक कुटुंबात वाढलेल्या व पुढे व्यावहारिक पातळीवर स्वतंत्र झाल्यानंतर अगदी तोच वसा आणि वारसा जपत... त्याला नवीन आयाम व परिमाण  देत अक्षरश: घोडदौड करीत त्याच्या समर्थ पुढाकारात आज तोच व्यवसाय मोठ्या अभिमानी स्थितीत नेतांना आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या अतिशय आव्हानात्मक अशा कालखंडात आपल्या कंपनीचा टर्नओव्हर दुप्पट झाल्याचे तो अतिशय अभिमानाने सांगत होता. आता नाशिक सारख्या महानगरातही कार्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. अतिशय आशादायी स्थितीत संपूर्ण कुटुंबाला सोबत घेत मोराणकर कुटुंबाची अभिमानी पताका उंचावत नेण्याचे वेड कुठेही कमी झालेले नाही. मी खरोखर भाग्यवान आहे माझ्या जीवनात अशी 'वेडी' माणसेच आली. 

बालविश्वात कट्टी असलेला हा मित्र व मी सायकलवर सगळीकडे मात्र सोबत जात असू तेही एकमेकांशी न बोलता ! त्याच्याशी कट्टी असली तरी त्याच्या घरी दिवसातून किमान एक चक्कर कधीही चुकली नाही. नोकरी निमित्ताने जळगावला आल्यानंतर अनेक दिवस धुळ्याला गेलो कि प्रथम प्रशांतच्या घरी नंतर माझ्या घरी. प्रशांतच्या घरून जेवण न करता कधीच आलो नाही. त्यांच्या मोठ्या परिवाराचा एक सदस्य होण्याचे भाग्य मला लाभले. आजही त्यांच्या १०० एक सदस्यांच्या पारिवारिक समूहाचा मी सदस्य आहे त्यातील सर्व तेव्हढ्याच प्रेमाने वागतात. सर्वत्र असतांना त्यात वेगळंपण असणं आणि कुठेही नसतांना दुर्मिळतेने असणं हे या परिवाराचं वैशिष्ट्य आहे. एकमेकांना ज्याची त्याची जागा (space) देत ऋणानुबंधांची जागा कायम राखणाऱ्या या परिवारातील सर्व सदस्यांना याचे श्रेय जाते. 
 

देशभक्ती व राष्ट्रप्रेमाचे संचित लाभलेल्या प्रशांतने सामाजिकतेचा मार्ग ठरवून अवलंबिला. आपली मानवी संवेदना कायम ठेवण्याची वृत्ती, निःस्वार्थ शब्दाला पर्यायी शब्द म्हणजे प्रशांत  ! आव्हानात्मक परिस्थितीत कुठेही न डगमगता, वास्तवाचे भान ठेवत व्यवहारी निर्णय घेण्याची हातोटी व त्याप्रमाणे अंमल हि प्रशांतची स्वभाव वैशिष्ट्य ! शून्यातून निर्माण केलेल्या विश्वाची जाणीव पुढच्या पिढीला देत सोबतच्यांसाठी आवश्यक ठिकाणी लागणारी कठोरता अंगीकारत भावनेच्या आहारी न जाता, आहे त्या परिस्थितीला काळ हेच उत्तर या बाण्याने पुढे जाण्याची वृत्ती कधीतरी कुणाला तरी अहंकारी वाटत असली तरी त्याचा लवलेश माझ्या या मित्रात नाही हे ठामपणे सांगू शकतो. व्यावहारिक तडजोड स्वीकारली तरी तात्त्विकतेच्या बाबतीत प्रशांत कधीही तडजोड करीत नाही. प्रसंगी दोन पावले मागे जाण्याची तयारी असते. "कर्म" हि पूजा नित्यनियमाने चौकटीतून करायची असते हे बाळकडू सात्विक व पवित्र वृत्तीच्या आपल्या वडिलांकडून त्याला मिळाली आहे. अप्रिय गोष्टींना मौनाने जिंकता येतं अशी अनेक उदाहरणे त्याच्या जीवनात स्वतः अनुभवली आहेत. 

महाविद्यालयीन जीवनात व त्यानंतरही अनेकदा आम्ही दोघे धुळ्याच्या गणपती मंदिराच्या पुलावर अनेक रात्री उशिरापर्यंत घालविल्या आहेत. खूपदा अविरत न थांबता गप्पा मारत, बडबड करीत तर कधीतरी अंतर्मुख होऊन प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी केवळ सोबत बसून एकही शब्द न बोलता !  दोन व्यक्तींना आपल्या मनातील विचारांचा न बोलताही संवाद साधता येऊ शकतो ज्याला दूरसंवेदना, परचित्तज्ञान वा मनसंवाद म्हणता येईल असे बोलणे सुरु असते. आमच्या संवादाला कधी कोणत्याही कृत्रिम माध्यमाची, गिफ्टची वा अन्य कसलीही कधीही गरज भासली नाही. कधीही फोनवर बोलल्यानंतर अरे बरेचदा मनात आला फोन करावा, बोलावं, काय चालू आहे विचारावं पण गडबडीत राहिलं असे म्हटले तरी त्याचा मला कधी राग आला नाही कारण तो म्हणतो त्यावर माझा १०० टक्के विश्वास आहे. आमच्या मैत्रीला कसलेच बंधन नाही. हि मैत्री केवळ परस्परविश्वासावर टिकून आहे व राहील.  

पुढच्या पिढीतील सर्वांनाच व्यवसायाचे पाईक होण्याचा प्रशस्त मार्ग प्रशांतने निर्माण केलेला आहे. तेही तेव्हढयाच समर्थपणे प्रशांतचा विश्वास सार्थ ठरवत मार्गक्रमण करीत आहेत. मुलगी गौरी येत्या जून महिन्यात मुबई येथील NIIMS या सुप्रसिद्ध संस्थेतून फॅमिली ओन बिझिनेस व उद्योजकता या विषयात  एमबीए करणार आहे. पुतण्या अनुराग आपल्या आत्मविश्वासावर व धाडसाने समर्थ साथ देत आहे. भाऊ विवेक आपल्या मर्यादांवर मात करीत आपली भूमिका पहिल्या दिवसापासून बजावत आहे. दुसरा पुतण्या अद्वैत आता अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मुरड घालणे, वास्तव स्वीकारणे, सर्वांच्या आनंदासाठी वैयक्तिक गोष्टींना बाजूला ठेवणे यासारख्या गोष्टी प्रत्येकाने केल्या आहेत. या कुटुंबातील मातृशक्ती आपली अगत्यशीलता , उदारता व सात्विकतेने प्रत्येकाला कुटुंबाशी जोडून ठेवण्याचे काम करीत आहे. परमेश्वररूपी मात्या-पित्यांचा आशीर्वाद या सगळ्यांसाठी लागणारं बळ भरभरून देत आहे. एक माणूस एका आयुष्यात किती गोष्टी करू शकतो हे माझ्या मित्राकडून शिकले पाहिजे. त्याला जन्मदिनाच्या शुभेच्छा देत असतांना सकाळी साधलेला संवाद लवकर भेट घडवून आणणारा ठरेल. मित्रा, तुझे कार्य असेच सुरु राहू देत... पवित्र अंतःस्थ हेतू कायम तुला माणूस म्हणून मोठं करेल या शुभेच्छांसह थांबतो.... माझ्या या मित्राबद्दल, त्याच्या परिवाराबद्दल व परिवारातील सदस्यांबद्दल खूप काही लिहिण्यासारखं व बोलण्यासारखं आहे पुन्हा कधीतरी... 

4 comments:

  1. गिरीश जी, लेख छानच आहे. नेमक्या शब्दात व्यक्त कसे व्हायचे हे तर तुमच्या कडुनच शिकावं. !

    ReplyDelete