Sunday 3 April 2022

पुस्तक परिचय - राजबंदिनी

ब्रह्मदेशाच्या स्वातंत्र्याचा, लोकशाही प्रस्थापनेसाठीचा लढा व त्यात ऑंग सान स्यू ची व तिचे वडील ऑंग सान यांच्या योगदानाची माहिती असलेले हे ऐतिहासिक पुस्तक प्रेरणादायी ठरणारे आहे. २८६ पानांच्या या पुस्तकात सन १८२३ पासून ते २०१० पर्यंत ब्रह्मदेशातील अंतर्गत घडामोडी वाचावयास मिळतात. एकूण २५ प्रकरणातून हा इतिहास व विशेषतः ऑंग सान स्यू ची च्या अहिंसक लढाईचा परामर्श लेखिकेने उत्तमरीत्या घेतला आहे. ज्याला इतिहास विषयाची आवड आहे, ज्याला प्रेरणादायी पुस्तके वाचनाची आवड आहे, ज्यांना हुकूमशहा व त्यांची कार्यपद्धती, लोकशाहीचे फायदे व हुकूमशाहीच्या मर्यादा  समजून घ्यावयाची इच्छा आहे, अशा सर्वांसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणारे आहे.

शतकांपासून हिसेंचीच परंपरा असलेल्या ब्रह्मदेशात राजांनी, सत्ताधाऱ्यांनी, हुकूमशहांनी सर्व संभाव्य शत्रूंचा अतिशय निर्दयपणे नायनाट केला आहे असे आपल्या लक्ष येईल.  २ एप्रिल १९८८ रोजी आपल्या आईच्या खिन चीच्या आजारपणात सेवा सुश्रुषेनिमित्ताने मायदेशी अर्थात ब्रह्मदेशात परत आलेल्या स्यू चीला देशातील परिस्थिती आपल्या पित्याप्रमाणे देशसेवेसाठी सक्रिय करणारी ठरली. ने विन या हुकूमशहाच्या अन्याय, अत्याचार व नरसंहाराच्या कुकर्मांच्या कथा मानवतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. २६ वर्षे अनन्वित अत्याचाराची बळी ठरलेल्या जनतेसाठी आपण राजकारणात सक्रिय झाले पाहिजे असे ते इच्छा नसतानाही ठरविते. देशातील हिंसाचाराला ऑंग सान स्यू चीला एकच मार्ग व एकच उत्तर दिसत होते. तो म्हणजे भारतात महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढयासाठी अनुसरलेला अहिंसेचा मार्ग. त्यांची निर्भयता, सत्याग्रह आणि अहिंसा हि तत्त्वे तिला मायदेशातील स्वातंत्र्यलढा लढायला नैतिक, आत्मिक आणि आध्यात्मिक बळ देईल असा विश्वास होता. अहिंसा हेच हिसेंवरचं उत्तर असून त्याद्वारेच आपण जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवू शकू असा तिला विश्वास होता.

राष्ट्रपिता म्हणून ब्रह्मी लोकांच्या मनात अतिशय आदराचे स्थान मिळविलेल्या तिच्या वडिलांनाही काही काळ अहिंसेच्या मार्गाचं आकर्षण वाटलं होत. याच मार्गाने स्वातंत्र्यलढा नेण्याची त्यांची इच्छा होती. मात्र प्रत्यक्षात त्याने साया सानच्याच सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरलेला होता. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांती करून, दोन युद्ध लढूनच त्याने देशाचं स्वातंत्र्य मिळविलं होतं. सशस्त्र क्रांतीतून किंवा हिंसाचारातून झटपट मिळणाऱ्या यशाचं तरुणांना आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे मात्र हे यश चिरंतन नाही, हिंसाचारातून हिंसाचाराचाच जन्म होतो. देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचाराला अहिंसेनं जिंकता येतं आणि अहिंसेने मिळणारं यश शाश्वत असतं, हा विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा व त्यांना अहिंसेच्या मार्गानेच हा लढा लढायला उद्युक्त करायचं हे आपले नियत कार्य स्यू चीनं ठरवलं. त्याप्रमाणे कार्यरत राहिली.

स्यु चीचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. उणीपुरी ३२ वर्षे वय लाभलेल्या तिच्या वडिलांनी २० व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला आणि वयाच्या ३२ व्या वर्षी ब्रह्मदेशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदी विराजमान असतांना तिच्या वडिलांची १९४७ साली हत्त्या झाली. त्यावेळी स्यू ची अवघ्या दोन वर्षांची होती. आपल्या वडिलांचा फारसा सहवास न लाभलेल्या स्यू चीने मात्र त्यांचा देशभक्तीचा वारसा समर्थपणे चालवला त्यासाठी मध्यंतरीचा जवळपास ४० वर्षांचा कालखंड जावा लागला. त्यानंतर १९४८ मध्ये देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला. स्वतंत्र ब्रह्मदेशाचे पहिले पंतप्रधान नू नं आपला मित्र व सहकारी असलेल्या 'बोज्योक' (सरसेनापती) ऑंग सानला कधीही विसरला नाही. त्याच्या कुटुंबियांना योग्य आदरसन्मान दिला. त्याची पत्नी खिन चीला १९६० मध्ये भारतात राजदूत म्हणून नियुक्ती दिली. त्यामुळे स्यू ची चे दोन वर्षाचे शालेय व त्यानंतरचे पदवीपर्यंतचे शिक्षण दिल्लीत झाले. भारतीय संस्कृती, महात्मा गांधी व अन्य महानुभावांची ओळख तिला तेव्हाच झाली.

त्यानंतर शिक्षण घेण्यासाठी ती इंग्लंडमध्ये गेली. तेथील स्थानिक पालकांचा व मित्र मंडळींचा अतिशय अगत्यपूर्ण उल्लेख भावणारा आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असतांना तेथील संस्कृती व तरुणाईला आकर्षित करणाऱ्या अन्य गोष्टींचा स्यू चीवर प्रभाव पडला नाही. त्याउलट  तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल तिच्यासोबतच्या अनेकांना आकर्षण होते. इतरांना मदत करण्याची तिची संवेदनशील वृत्ती आईने दिलेला संस्कार याचा खूप मोठा पगडा तिच्या आयुष्यात दिसतो. ब्रह्मदेशातील जनता आपल्या मुलांकडे राष्ट्रपित्यांची मुलं म्हणून पाहणार याची आईला जाणीव होती. पित्याच्या गौरवाला साजेशी कामगिरी मुलं करून दाखवतील अशा रीतीनं तिने मुलांना वाढविले. शिक्षण दिले, संस्कार  केलेत. राष्ट्रपित्याच्या मुलांना वाढवण्याची जबाबदारी पार पाडणं हे त्यांच्या आयुष्याचं मुख्य उद्दिष्ट होतं.

तरुण वयात महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना प्रेमाचे विशेष आकर्षण असते. इंग्लंड मध्ये शिकत असतांना आधुनिक इतिहासाचा अभ्यासक मायकेलला स्यू ची आवडली होती व तो तिच्या प्रेमात पडला होता. मात्र स्यू चीने प्रेमास नकार देत आपली चांगली मैत्री कायमसाठी राहील असे सांगितले. कालांतराने तिच्या नकाराचं होकारात मत परिवर्तन होण्यासाठी तीन वर्षांचा कालखंड जावा लागला. मायकल या ब्रिटीश माणसाशी लग्न करण्यात पुष्कळ अडचणी होत्या. ज्या ब्रिटीश सत्तेविरूद्ध आपले वडील लढले, त्याच्या नागरिकाशी लग्न केलं आईला काय वाटेल ? लोक काय म्हणतील ? ते मला व माझ्या जोडीदाराला स्वीकारतील का ? या विवाहामुळे माझे स्वदेशी परतण्याचे दरवाजे तर कायमचे बंद होणार नाही ना ? अन देशाला तिची गरज कधी लागली तर? तिच्या वडिलांचा देशकार्याचा वारसा असा तिला सोडून देता येणार नव्हता. तीन वर्षांच्या या वैचारिक संघर्षानंतर आईचा विरोध पत्करून मायकेलशी लग्न केलं आणि ती संसारात रमली. त्यानेही स्यू चीला उत्तम अशी साथ देत तिला दिलेले वचन आयुष्यभर पाळले.

पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने न्यूयॉर्कला जावयाचे ठरविले. साहित्य विषयात विशेष रुची असली तरी  आपल्या आईच्या आग्रहाखातर राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी हे विषय तिने अभ्यासासाठी निवडले.  तेथे शारीरिक मर्यादांमुळे बसचा प्रवास झेपेनासा झाला. त्यासाठी तिने संयुक्त राष्ट्रसंघात सहाय्यक सचिवाची नोकरी मिळविली. विवाहानंतर आपल्या दोन मुलांचे संगोपन करीत असतांना आपले वडील ऑंग सान यांचे संक्षिप्त चरित्र तिने लिहिले. आपल्या वडिलांचा तिच्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव पडला. त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने तिला समजून घेता आले. त्यासाठी खूप खोलवर जाऊन तिने अभ्यास केला. आपल्या देशाचा इतिहास, ब्रिटिश राजवट, देशवासीयांच्या स्वातंत्र्य लढा या सर्वच गोष्टींचे आकलन तिला झाले. इंग्रजांच्या "फोडा आणि झोडा" या नीतीचा दूरगामी परिणाम देश स्वातंत्र्योत्तर काळातही भोगत होता. स्वातंत्र्या नंतरही तिच्या मातृभूमीला यादवीने ग्रासले होते. तेथील लष्कराने हर प्रकारे प्रयत्न करूनही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

४ जानेवारी १९४८ ला स्वतंत्र झालेल्या ब्रह्मदेशात १९५८ साली लष्करी राजवट सुरु झाली. त्यानंतर १९६० ते ६२ या दोन वर्षाच्या कालखंडात लोकनियुक्त सरकार आले मात्र पुन्हा एकदा लष्कराने देशाची सूत्रे आपल्या हाती घेतली ती अलीकडच्या कालखंडापर्यंत. "ने विन" या लष्करी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील लष्करी राजवटीने प्रदीर्घ काळ आपल्याच स्वकीयांवर अत्त्याचार केले. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी यांना अक्षरश: गोळ्या घालून ठार केले. या लष्करी राजवटीची सामान्यजनांवर इतकी प्रचंड दहशत होती ते परस्परांशी संवादही करू शकत नव्हते. देश आर्थिक दिवाळखोरीत निघाला होता. अन्नधान्याचा तुटवडा, बेरोजगारी या सारखे प्रश्न हाताळणे त्यांना शक्य होतं नव्हते. मात्र सतत उपभोगायचा उद्देशाने लोकशाही मार्गाचा अवलंब न करण्याचे धोरण कायम ठेवले. ऑंग सान व तात्कालिक जनतेने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी घेतलेल्या कष्टांची त्यांना जाणीव नव्हती. आपल्या वडिलांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य न मिळाल्याने ती उद्विग्न झाली.

१९८८ मध्ये आईच्या आजारपणामुळे ती मायदेशात परतली. लष्कराच्या विरोधात चालू असलेल्या जनतेच्या लढाईत तिने सामील व्हावे अशी स्थानिक जनतेची व वडिलांसोबतच्या सहकाऱ्यांची अपेक्षा होती. विचारांती तिने ते आपलं कर्तव्य म्हणून स्वीकारलं. अहिंसक मार्गाने लोकशाही प्रस्थापित करण्याचे कार्य तिने सुरु केले. नवा इतिहास निर्माण करीत असतांना तिच्या नेतृत्वाखाली एक नवीन पर्व सुरु झाले. त्यासाठीच ती कधीही मायदेशाबाहेर गेली नाही. कारण त्यानंतर लष्करी राजवटीने तिला देशात येण्यास बंदी घालण्याचा धोका ती जाणून होती. आपला पती मायकल मृत्युशय्येवर झुंजत असतांनाही त्याच्या भेटीसाठी स्यू चीने आपला देश सोडला नाही. अन्याय-अत्याचाराच्या भयानक संकटात असलेल्या आपल्या देशाचा विध्वंस तिला टाळायचा होता. १९९०च्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होण्यासाठी तिच्या नेतृत्वात राजकीय पक्षाची स्थापना केली. तिच्या पक्षाला ८० टक्के मते मिळूनही हुकूमशाही सत्तेवरून खाली उतरलीच नाही. अटकसत्र, गोळीबार, जाळपोळ, लुटालूट व स्थानबद्धता हि हुकूमशाहीची अस्त्रे होती. तिच्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सुमारे १४ वर्षे स्थानबद्धतेत (गृहकैदेत) काढली. अर्थात ती राजबंदी होती आणि त्यामुळे राजबंदिनी हे लेखिकेने दिलेले नाव चपखल वाटते.

एका मोठ्या अग्निदिव्यातून जाणाऱ्या या देशातील जनतेच्या पाठीशी ती मोठ्या हिमतीने उभी राहिली. जागतिक समुदायाच्या "लोकशाही पुनर्स्थापनेच्या" आवाहनाकडे लष्कर राजवटीने कायम दुर्लक्षच केले. तिच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करीत १९९१ चा नोबेल पुरस्कार तिला मिळाला आणि जगाला तिच्या देशातील जनतेच्या हालअपेष्टांची माहिती मिळाली. माझ्या नावावर हा पुरस्कार असला तरी यावर खरा हक्क या लढ्यात बळी गेलेल्या, हालअपेष्टा, छळ सोसणाऱ्या ब्रह्मी जनतेचा आहे, माझा नाही. नोबेल पुरस्कारामुळेच आमचा हा लढा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला याचा आनंद व समाधान असल्याचा तिने म्हटले. त्यानंतर तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मात्र ती स्थानबद्धतेतच होती. 

प्रभा नवांगुळ यांच्या ‘राजबंदिनी’ या स्यू चीच्या चरित्रामुळे आपल्या शेजारी असलेल्या, सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमुळे माहिती असलेल्या ब्रह्मदेशाची, तेथील राजकारणाची माहिती मिळाली. ब्रह्मदेशात आजही सर्वाधिक काळाची लष्करी राजवट चालू आहे. स्थानिकांचा तिथे लोकशाही यावी यासाठीचा लढा आजही सुरूच आहे. लष्करी राजवट किती निर्दयी व क्रूर असते आणि त्या पार्श्वभूमीवर आपण जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात राहतो याचा नक्कीच अभिमान वाटतो. एखादा बदल, परिवर्तन व क्रांती घडवून आणण्यासाठी आयुष्येची आयुष्य खर्च होतात. राष्ट्रप्रेमाने वेडी  झालेली माणसेच इतिहास घडवितात आणि त्यांचाच इतिहास लिहिला जातो असे या पुस्तकावरून नक्की म्हणता येईल. एखाद्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारणं आणि त्यासाठी आपलं सर्वस्व बहाल कारण खरोखर अवघड आहे. वर्षानुवर्षांची स्थानबद्धता, पती व मुलांची ताटातूट, पतीचं आजारपण व त्याच अंत्यदर्शन यातील एकही गोष्ट तिला तिच्या लोकशाहीसाठीच्या लढ्यापासून दूर नेऊ शकलं नाही. ऑंग सान स्यू ची हिचं राजबंदिनी हे चरित्र आपण सर्वांनी नक्की वाचावे असेच आहे.

पुस्तकाचे नाव : राजबंदिनी ऑंग सान स्यू ची हिचं चरित्र

लेखिकेचे नाव : प्रभा नवांगुळ

प्रकाशकाचे नाव : राजहंस प्रकाशन प्रा. लि

5 comments:

  1. पुस्तकाचा परिचय चांगला करून दिला .
    शेजारच्या देशातील नोबेल पुरस्कार विजेत्या गांधीवादी नेत्याचा परिचय झाला.
    थोडक्यात जीवनपट उभा केला .
    छान!

    विजय कुळकर्णी. वाकड, पुणे

    ReplyDelete
  2. आंग सान स्यु ची म्हणजे महात्मा गांधी यांचे आजच्या काळातील अहिंसावादी अस्त्र होय. हिंसेचा कोणताही परिणाम लगेच मिळतो परंतु अहिंसेचा मार्ग खूप लांब पल्ल्याचा असलातरी त्याचा परिणाम हा सर्वांना अपेक्षित असाच चांगला असतो. आंग सांन स्यू की यांचा अहिंसेच्या मार्गावरील लढा कधीच वाया जाणार नाही. म्यानमारमध्ये भारतासारखी निकोप आणि भक्कम लोकशाही येणारच.

    ReplyDelete
  3. पुस्तकाचे अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे. यातून पुस्तक वाचण्याची प्रेरणा मिळते. आज जगात जी युद्ध जन्य स्थिती आहे त्यातून बाहेर पडावयाचे असेल तर अहिंसावादी मार्गाने च जावे लागेल हे पुन्हा सिद्ध होते.

    ReplyDelete
  4. असे पुस्तकांचे विश्लेषण हा सुरेख उपक्रम आहे ...

    ReplyDelete
  5. फारच छान 👌👌
    अतिशय माहितीप्रद आणि ओघवत्या भाषेत आपण पुस्तकाचे विश्लेषण केलेले आहे .आपले भाषेवरील प्रभुत्व अतिशय छान आहे आणि त्यामुळे पुस्तकाचा परिचय अतिशय चांगल्या पद्धतीने करून दिलेला आहे .

    ReplyDelete