भक्ती : मन जोडण्याची शक्ती
नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा उत्सव आणि तिच्या विविध रूपांच्या आराधनेचा सोहळा! “या देवी सर्वभूतेषु…” हा मंत्र देवीच्या सर्वव्यापी स्वरूपाची जाणीव करून देतो. देवीची ही रूपे केवळ पूजेपुरती मर्यादित नसून, ती मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या गुणांचे प्रतीक आहेत. या नवरात्रीत देवीच्या रूपांचे स्मरण करताना, तिच्यातील गुणांचा आपल्या जगण्यातही जागर करू या. घटस्थापनेबरोबरच मनात सद्गुणांची स्थापना करून, विचारांतून आणि कृतींतून मानवतेची उपासना करू या.
आज आपण देवीच्या भक्तिरूपातून प्रकट होणारी भक्ती आणि तिचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व जाणून घेणार आहोत. भक्ती म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर मंदिर, पूजा, आरती आणि जप येतो. पण भक्तीचा अर्थ एवढाच आहे का? भक्ती म्हणजे मनापासून जोडले जाणे. आपल्या श्रद्धेशी, आपल्या कर्तव्याशी आणि आपल्या माणसांशी प्रामाणिक राहणे, हेदेखील भक्तीचेच रूप आहे.
आई आपल्या मुलाची काळजी घेते, तेव्हा ती केवळ कर्तव्य पार पाडत नसते; तिच्या कृतीत प्रेम आणि समर्पण असते. एखादा शिक्षक विद्यार्थ्याला पुन्हा पुन्हा समजावून सांगतो, कारण त्याला त्या मुलाने शिकावे असे मनापासून वाटते. एखादी व्यक्ती कोणतीही प्रसिद्धी किंवा परतावा न मागता गरजू माणसाला मदत करते, तेव्हाही भक्तीच व्यक्त होत असते.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
“जे का रंजले गांजले।
त्यासी म्हणे जो आपुले॥”
दुःखी माणसाला आपले मानणे, त्याच्या वेदना समजून घेणे आणि त्याला आधार देणे, ही भक्तीचीच अनुभूती आहे. वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीची वाट चालतात; त्या प्रवासात एकमेकांना मदत करणे, अनोळखी व्यक्तीशीही आपुलकीने वागणे आणि सर्वांना समान मानणे, यांतूनही भक्ती प्रकट होते.
देवापुढे दिवा लावणे सुंदर आहेच; पण आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा दिवा लागणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपण देवाची पूजा करतो, पण आपल्या घरातील ज्येष्ठांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो का? देवाला फुले वाहतो, पण दुःखी माणसाचे अश्रू पुसण्यासाठी थांबतो का? हे प्रश्न स्वतःला विचारणे म्हणजेच भक्तीच्या खऱ्या अर्थाकडे वाटचाल करणे.
या नवरात्रीत एक छोटासा संकल्प करू या—आपल्या कृतीतून कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू फुलवू या, कोणाचे तरी दुःख हलके करू या आणि आपले कर्तव्य अधिक प्रेमाने पार पाडूया. कारण खरी भक्ती देवापुढे नतमस्तक होण्यात आहेच; पण माणसाने माणसाशी माणसासम वागण्यातही आहे.
बोला अंबा माता की जय !
गिरीश कुळकर्णी
छान. भक्ती व देव पूजा याचा खरा अर्थ जो धर्माला अपेक्षित आहे.
ReplyDelete