Tuesday, 13 October 2026

नवरात्र : मानवतेचा जागर

घटस्थापनेपासून गुणस्थापनेपर्यंत…

बुद्धिरूपेण संस्थिता : उपासना बुद्धीची, जागर विवेकाचा!

नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा उत्सव आणि तिच्या विविध रूपांच्या आराधनेचा सोहळा! ‘या देवी सर्वभूतेषु…’ हा मंत्र देवीच्या सर्वव्यापी स्वरूपाची जाणीव करून देतो. देवीची ही रूपे केवळ पूजेपुरती मर्यादित नसून, ती मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या गुणांचे प्रतीक आहेत. या नवरात्रीत देवीच्या रूपांचे स्मरण करताना, तिच्यातील गुणांचा आपल्या जगण्यातही जागर करूया. घटस्थापनेबरोबरच मनात सद्गुणांची स्थापना करून, विचारांतून आणि कृतींतून मानवतेची उपासना करूया.

“या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः॥”

नवरात्रीत आपण आदिशक्तीच्या विविध रूपांची आराधना करतो. या मंत्रातून आपण सर्व प्राणिमात्रांमध्ये बुद्धिरूपाने स्थित असलेल्या देवीला वंदन करतो. पण या वंदनेचा अर्थ केवळ मंत्र म्हणणे एवढाच आहे का? ज्या बुद्धिरूप शक्तीला आपण वंदन करतो, तिचा उपयोग आपल्या विचारांत आणि आचरणात दिसतो का? हा प्रश्न स्वतःला विचारणे, हीच उपासनेला जीवनाशी जोडण्याची पहिली पायरी आहे.

बुद्धी म्हणजे योग्य-अयोग्य ओळखण्याची आणि योग्य ते आचरणात आणण्याची क्षमता. एखादी समस्या सोडवणे ही हुशारी; पण आपल्या कृतींचे परिणाम समजून योग्य निर्णय घेणे, हा बुद्धीचा खरा कस आहे.

आपल्या आजूबाजूला अनेकदा काही गोष्टी पाहून प्रश्न पडतो, “एवढंही समजत नाही का? कॉमन सेन्स आहे की नाही?” रस्त्यावर कचरा टाकणे, पाण्याचा अपव्यय करणे किंवा स्वतःच्या सोयीसाठी इतरांना त्रास देणे—या गोष्टींचे परिणाम समजण्यासाठी फार मोठ्या ज्ञानाची गरज नसते. तरीही आपण असे वागत असू, तर योग्य-अयोग्य समजणे आणि त्यानुसार वागणे यांत अंतर आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

याचे एक गंभीर उदाहरण म्हणजे पाण्याची परिस्थिती. बालपणी सुमारे १३० फुटांवर विहिरीचे पाणी मिळत असे; आज अनेक ठिकाणी ५०० ते ७०० फुटांपर्यंत बोअर घ्यावे लागतात. हा बदल आपल्याला अंतर्मुख करायला हवा. पाण्याचे महत्त्व माहीत असूनही त्याचा अपव्यय होत असेल, तर आपल्या बुद्धीचा योग्य वापर कुठे कमी पडतो आहे, याचा विचार करायला नको का?

भोगवादी जीवनशैलीत ‘मला काय हवे?’ याला महत्त्व मिळते; पण ‘माझ्या गरजांचा निसर्गावर काय परिणाम होतो?’ हा प्रश्न मागे पडतो. आजच्या सोयीसाठी आपण उद्याच्या पिढ्यांचे नुकसान तर करत नाही ना? पाणी जपणे, वीज वाचवणे, कचरा कमी करणे आणि पर्यावरणपूरक सवयी स्वीकारणे, हे केवळ सामाजिक कर्तव्य नाही; आपल्या बुद्धीला विवेकाची जोड देऊन केलेली कृती आहे.

नवरात्र आपल्याला देवीच्या शक्तीचे स्मरण करून देते. त्या शक्तीचे खरे सामर्थ्य आपल्या जीवनात उतरवायचे असेल, तर प्रत्येक दिवस हा आत्मपरीक्षणाची संधी मानूया. रागाच्या भरात बोलण्याआधी थांबणे, ऐकीव माहितीची खात्री करणे, मतभेद असतानाही दुसऱ्याचे म्हणणे ऐकणे, चूक मान्य करणे आणि आपल्या कृतींचा इतरांवर होणारा परिणाम लक्षात घेणे—या छोट्या कृतींतून बुद्धीचा विवेकपूर्ण वापर घडतो.

या नवरात्रीत घटस्थापनेबरोबरच मनात एक संकल्पही रुजवूया—केवळ देवीसमोर नतमस्तक व्हायचे नाही, तर तिच्या बुद्धिरूपातून प्रेरणा घेऊन आपल्या वागण्यातही सकारात्मक बदल घडवायचा. रोज पाणी वाचवायचे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखायची, गरजेपुरताच उपभोग घ्यायचा आणि स्वतःच्या निर्णयांत इतरांचे व निसर्गाचे हितही जपायचे.

माता भगवतीच्या चरणी हीच प्रार्थना करूया—हे माते, आम्हाला योग्य-अयोग्य ओळखण्याची दृष्टी दे, योग्य ते आचरणात आणण्याचे बळ दे आणि आमच्या बुद्धीला विवेकाची जोड दे. आमची उपासना केवळ पूजेपुरती न राहता, ती मानवतेची सेवा, निसर्गाचे संवर्धन आणि जबाबदार जीवनशैली यातून व्यक्त होऊ दे.

कारण ‘या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता’ या मंत्राला खरे वंदन तेव्हाच घडते, जेव्हा देवीच्या बुद्धिरूपाचे स्मरण आपल्या विचारांत उतरते, विवेक आपल्या कृतींना दिशा देतो आणि आपल्या जीवनशैलीतून मानवतेचे व निसर्गाचे रक्षण होते. हाच नवरात्रीचा खरा जागर—देवीच्या उपासनेतून स्वतःमध्ये सद्गुणांची स्थापना करण्याचा!

गिरीश कुळकर्णी

No comments:

Post a Comment