Tuesday 1 September 2020

मी कृतज्ञ पुण्यभू भारत मातेचा !


आशा फौंडेशनच्या गणेशोत्सवांतर्गत "कृतज्ञता उत्सवा"चा आजचा शेवटचा दिवस ! आम्हास सांगतांना विशेष आनंद होतो कि आपल्या परम पवित्र भारत मातेबद्दल सुमारे ६० जणांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. जळगावच्या प्रथम नागरिकापासून ७ हजार कोटींचा उद्योग समूहाच्या प्रमुखापर्यंत, कुलगुरुंपासून शिक्षण तज्ज्ञांपर्यंत, बंगलोरपासून चोपड्यापर्यंत, ज्येष्ठांपासून ते अलीकडच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांपर्यंत, संस्कृतपासून इंग्रजीपर्यंत म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्या या पुण्यभू भारतमातेच्या विविधतेचा परिचय देणाऱ्या सुपुत्रांचा यात सहभाग आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, विचारांनी व आचरणाने या पवित्र देशाचे मांगल्य सांगितले आहे. सोबत तीचे उतराई होण्यासाठी काय करत आहे आणि काय केला पाहिजे याचा सुंदर उहापोह केला आहे. धर्म, जाती, पंथ, संप्रदाय, भाषा, प्रांत या विविधतेची आपणास अनुभूती होईल. देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराबद्दल येथील इतिहासाबद्दल, क्रांतिकारकांबद्दल, लोकशाहीबद्दल, स्वातंत्र्याबद्दल, ऋषी मुनी, योगा, आयुर्वेद, थोर विचारवंत, उद्योजक, समाज सुधारक आदींबद्दल आपल्या मर्यादेत सर्वांनी व्यक्त होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या देशबांधवांच्या मनोभूमिका साकारणाऱ्या या परमपवित्र भारत मातेला कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. 

मला आपल्या देशाचा अभिमान आहे. कारण हा माझा देश आहे. हि माझी जन्मभूमी आहे. मी तिला माता मानतो. तीचे पावित्र्य आणि महत्व जाणतो. मला ती सजीव वाटते व वंदनीय वाटते. मोठ्या अभिमानाने मला माझ्या या मातेला वंदन करतांना वंदे मातरम ! म्हणायला आवडते. आपल्या देशाचा जो इतिहास आहे. तो वाचतांना, ऐकतांना व जाणून घेतांना माझ्या अंगावर रोमांच उठतात. हा इतिहास मला आपला वाटतो. येथील संस्कृती मला माझी संस्कृती वाटते. येथील थोर माहात्म्यांना मी माझे आदर्श मानतो. येथील चांगल्या गोष्टींचा मला अभिमान वाटतो. यासाठीच हि कृतज्ञता ! 

शालेय जीवनात दररोज भारत मातेचे महन्मंगल स्तोत्र ऐकले. कालांतराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी परिषद यांच्या तत्त्वज्ञानाने राष्ट्राबद्दलचे प्रेम, भक्ती शिकलो. सामाजिक जीवनातील आपले आचरण त्याअनुरुप करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून या साऱ्या गोष्टी करता येतात याचा अनुभव घेतो. प्रामाणिकपणाला कष्टाची जोड देत आपल्यामुळे कोणालाही आपली मान खाली घालावी लागणार नाही याची काळजी घेतो. आज पर्यंत या उत्सवात त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली त्या सर्वांच्या संस्कारातून देशाचा एक चांगला नागरिक म्हणून आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडीत आहे. याची रुजुवात मात्र "जयोस्तुते.." या स्तोत्रातूनच झाली. "तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण" हे कायमस्वरुपी हृदयात कोरलं गेलं. ९० च्या दशकाच्या सुरवातीला संगणकशास्त्र विषयाची पदवी घेऊन सुद्धा आपल्या देशाबाहेर जायचे नाही हे ठरविले. ऐन उमेदीच्या काळात कायमस्वरुपाची बँकेतील नोकरी सोडून सामाजिक कामाची एक वेगळी वाट चोखाळू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याद्वारे या देशाची, देशातील जनतेची सेवा करु शकतोय याचा मला विशेष आनंद आहे. अनैतिक गोष्टी कधीही करायच्या नाही असे ठरविले आणि त्यासाठी कटिबद्ध आहे. 

हुंडा व भ्रष्टाचारासारख्या अनिष्ट रुढी थांबविण्यासाठी स्वतःपासून सुरवात केली. आपण सारे या भारत मातेची लेकरे असल्याने प्रत्येकाला कायम मदतीचा हात देतो. माझ्या सर्व बांधवांमध्ये असलेल्या सद्गुणांकडे पाहतो. त्याच्या प्रगतीत आपला सहभाग असावा यासाठी प्रयत्न करतो. प्रकृती, विकृती व संस्कृतीचा अर्थ समजून घेत त्या प्रमाणे आचरण ठेवतो. "Life is for one generation but Good Name is forever " या उक्तीनुसार आपल्या देशासाठी जे जे काही चांगलं करता येईल याचाच कायम विचार करतो. मला या देशाने जे भारतीय तत्वज्ञान दिलं आहे त्याचा अभ्यास करतो. जीवनात भारतीय जीवनशैली अंगिकारण्याचा प्रयत्न करतो. 

मला समज आल्यापासून कधीही १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचे झेंडावंदन चुकविलेले नाही. सकाळ थोडी गडबडीची, कुठे भारत माता पूजन, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम कधीतरी मित्र परिवारासह सहल असा काहीसा दिवस जात असे, वर्तमानपत्रात जाहिरातदारांनी या दिवसाला कसे महत्व दिले वा वृत्तपत्रांनी काय वेगळे वाचकांना दिले हे पाहणे हि एक आवडीची गोष्ट असे. सायंकाळी देशाच्या पंतप्रधानांनी देशाला कोणत्या मार्गावर नेण्याचे ठरविले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे. कधी तरी आपल्या तिरंग्याचा सन्मान वाढावा यासाठी प्लास्टिक वा अन्य स्वरुपातील प्रतीकात्मक झेंड्याच्या विक्रीवर बंदीची मागणी, कधी तरी लोकांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या बाजूला, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अगदी गटारीत पडलेले झेंडे गोळा करुन ते प्रशासनाला नेऊन देणे यासारखे उपद्व्यापही केले. विद्यार्थी दशेत न चुकता स्वातंत्र्य दिवस १४ ऑगस्टच्या रात्री मशाल यात्रा काढून १२ वाजता राष्ट्रगीत म्हणून साजरा केला आहे. 

भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित ठेवणारा, आपणास स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनामवीरांना , क्रांतीकारकांना आणि ते अबाधित ठेवणाऱ्या भारतीय सशस्त्रदलांच्या जवानांना, आपल्या देशाच्या तिरंग्याला अभिमानाने अभिवादन करतांना मला प्रचंड अभिमान आणि आनंद होतो. आपल्या देशाची महान संस्कृती व येथील अस्मितांबद्दल स्वाभिमान बाळगण्याचा प्रयत्न करतो. देशातील बलाढ्य लोकशाही असलेल्या या देशाचा कारभार पाहून सर्व जग अनेकदा स्तंभित व अचंबित होते हेच माझ्या भारत मातेचे वैशिष्ट्य आहे. "हे विश्वची माझे घर !" आणि "जो जे वांछील तो ते लाहो !" अशी संकसृती असलेल्या देशाला परमवैभवाला नेण्यासाठी कटिबद्ध होऊ या ! भारतीय चिंतनातून विश्वकल्याण होऊ हिच त्या बा गणरायाचरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

4 comments:

  1. छान लेख .

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!

    👍👍

    ReplyDelete
  2. गिरीषजी....
    भारत हा एकमेव असा देश आहे ज्याला माता असं म्हटलं जातं. म्हणून प्रत्येकाच्या मनात देश हा मातेसमानच उभा राहतो. आणि जन्म देणाऱ्या आई इतकाच तो पूजनीय, वंदनीय वाटतो. इतर देशांबाबत अस मातृत्वाचा भाव ऐकीवात नाही. या निमित्ताने दहा दिवसात सर्वात जास्त लोकांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली हेच आपल्या उपक्रमाचं यश आहे. ही भावना अधिकाधीक लोकांपर्यंत पोहचावी हीच प्रार्थना. यासाठी मी माझ्या स्तरावर मला शक्य ते सारे करण्याचा संकल्प या निमित्ताने करतो. आपण या उपक्रमात मला गुंतवूध ठेवले. लिहतं केलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे.
    अस म्हणतात की व्यक्त होणं म्हणजे मुक्त होणं. त्या अर्थाने मी माझ्या जीवनात ज्यांनी माझ्या जीवनावर प्रभाव पाडला त्यांना आठवू शकलो. त्यांचे ऋण मान्य करु शकलो. याचं समाधान खूप मोठं आहे.
    आपण हे स्वप्न पाहिलं. त्यासाठी नियोजन केलं. प्रयत्नपूर्वक सातत्य ठेवलं. उपक्रमाचा दर्जा उंचावत नेला. स्वतः समन्वय साधत तुमचीही भुमिका मांडली त्याबद्दल आपण अभिनंदनास पात्र आहात.
    धन्यवाद !

    ReplyDelete
  3. बहोत बढिया सर,इसीलिये तो 'भारत हमको जानसे प्यारा है,सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है। सदियोंसे भारतभूमी दुनियाकी शान है,भारतमाँकी रक्षामें जीवन कुर्बान है। हिंदुस्तानी नाम हमारा है,सबसे प्यारा देश हमारा है।'
    जय हिन्द !!! -अनिल रामभाऊ पाटील

    ReplyDelete
  4. नमस्ते सदा वस्थ्ले मात्रूभूमि... या संकल्पनेला सर्वांनीच नित्य उजाळा द्यावा व क्रुतीशील व्हावे असे सुन्दर बोधप्रद लेखन खूप छान.

    ReplyDelete