Wednesday 2 September 2020

"कृतज्ञता उत्सवा"ची उपलब्धी !


यावर्षीच्या गणेशोत्सवात गणपती बाप्पाकडे काहीही न मागता त्याने आपल्याला जीवनात भरभरुन दिलेल्या गोष्टींबद्दल धन्यवाद देण्यासाठी आशा फाऊंडेशनच्या माध्यमातून  'कृतज्ञता उत्सव' साजरा करावा अशी कल्पना दि. २१ ऑगस्टच्या मध्यरात्री डोक्यात आली व आपल्या सर्वांच्या सहकार्याने व सक्रिय सहभागाने यशस्वी झाली. मागे वळून पाहतांना व या उपक्रमाचे सिंहावलोकन करतांना व्यक्तिगत लक्षात आलेल्या काही उपलब्धी व ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन प्रपंच...  आपणही या 'कृतज्ञता उत्सवात' सक्रिय सहभागी होतात. काहींनी लेखन केले, काहींनी वाचन केले. आपण या उपक्रमाकडे कसे पाहता ? आपल्याला काय मिळाले ? आपल्याला या उपक्रमाबद्दल काय वाटते ? आपण या उपक्रमाची यशस्विता कशात पाहता ? मोकळेपणाने जरुर लिहा...

उपक्रमाची उपलब्धी सांगण्यापूर्वी उपक्रम काळातील तीन प्रमुख 'योगायोग' सांगितले पाहिजे. 

१. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सुदैवाने त्या दिवशी ऋषी पंचमी होती. आपल्या तपोबलाने मानवावर अनंत उपकार करणाऱ्या व दिशा दर्शन करणाऱ्या सप्तर्षींबाबत कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा दिवस. 

२. उत्सवाच्या पाचव्या दिवशी आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. दुर्दैवाने त्याच दिवशी सकाळी आमचा जवळचा मित्र (लंगोटी यार) नरेंद्र कुळकर्णी याच्या दुःखद निधनाची बातमी कळली.

३. उत्सवाच्या नवव्या दिवशी निसर्गाप्रतीची कृतज्ञता करण्यात आली. त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून प्रकृती वंदन दिवस साजरा करण्यात आला. ज्यात वृक्षांची पूजा करण्यात येऊन निसर्गाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली व पर्यावरण रक्षणाबाबतचा संदेश देण्यात आला. 

कृतज्ञता उत्सवाची उपलब्धी...

१. कृतज्ञता या सर्वश्रेष्ठ जीवनमूल्याची जाण निर्माण झाली. आपल्यासाठी अनेकांनी अनेक गोष्टी केलेल्या असतात याची जाणीव झाली व त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची भावना निर्माण करता आली. यामुळे परस्पर सदभाव व सकारात्मकता वाढीस लागेल.  

२. सहभागींचा (लेखन, वाचन व प्रसार) दिवसभरातील बहुतेक वेळ भूतकाळातील चांगल्या आठवणींमध्ये गेला. त्यातून लेखन झाले, वाचन झाले, चिंतन झाले, काही जणांशी बोलणे झाले. महत्वाचे 'कोरोना'च्या नकारात्मकतेतून मंडळी काही काळ बाहेर पडली. 

३. समाज माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता त्यात सकारात्मक लिखाण करणाऱ्यांची आवश्यकता आहे. अशी क्षमता असलेल्यांना आत्मविश्वास देता आला. आपल्याला चांगले लिहिता येते, लोक वाचतात हा विश्वास निर्माण झाला. तरुणांचा सहभाग विशेष...

४. एकाच विषयावर किती वैविध्यतेने लिहिता येते. प्रत्येक माणूस किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात, व्यक्त होतात याची जाणीव झाली. लेखन शैली, अनुभव संपन्नता, भाषा समृद्धी झाली. थोडक्यात वैचारिक प्रगल्भता वाढली. 

५. सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने अनेक गावांची व तेथील विशेष गोष्टींची माहिती झाली. शैक्षणिक संस्थांची व तेथील शिक्षकांनी केलेल्या कार्याची माहिती झाली. देशाच्या विविध छटा लक्षात आल्या. काही विशेष व्यक्तींचा परिचय झाला. या सर्वांबद्दलचा अभिमान बळावला. 

६. माणसांचे स्वभाव, त्यांनी इतरांसाठी केलेल्या गोष्टींची व त्याचा किती दूरगामी परिणाम होतो याची जाणीव निर्माण झाली. मानवाचा परस्परातील व्यवहार कळला. अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन देतो ते कळले.

७. गणेशोत्सव अशा पद्धतीने साजरा करता येतो व त्यातून अपेक्षित समाज प्रबोधन साध्य करता येते हे शिकलो.

८. संस्थेशी नवीन मंडळी जोडली गेली. त्यांची परस्परात मैत्री झाली. 

जाहीर कृतज्ञता व दिलगिरी 

'कृतज्ञता उत्सव' या सार्वजनिक उपक्रमात समाजाचा सहभाग महत्वाचा. सर्वप्रथम या उपक्रमात सहभागी सर्व समाज बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांनी व्यक्त केलेल्या भावना दुसऱ्या दिवशी इ-स्वरूपात संकलित करुन प्रकाशित केल्या जात होत्या. यासाठी पूजा ग्राफिक्सचे श्री. निलेश कोळी यांचे अनमोल असे सहकार्य लाभले. कोणत्या प्रकारच्या आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता हे काम त्यांनी पूर्ण केले  शेवटच्या दिवशीच्या प्रतिक्रिया रात्री उशिरापर्यंत काम करुन आकर्षक पद्धतीने त्याची मांडणी. एका पानापासून सुरु झालेला हा प्रवास शेवटच्या दिवशी १२ पानांपर्यंत पोहोचला. दररोज ठरलेल्या वेळी त्याचे काम पूर्ण करुन दिले याबद्दल निलेशचे मनापासून धन्यवाद व जाहीर आभार. दररोज आपल्या भावना लिहून पाठविणारे मित्रवर्य व ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, धरणगाव येथील प्रा. बी. एन. चौधरी, सौ. विंदाताई नाईक, जळगावची विद्यार्थिनी कु. मानसी कुळकर्णी, चोपड्याची कु. अर्चना अग्निहोत्री, चाळीसगावचा अक्षय पाटे, श्रीमती सुनंदा कुळकर्णी, माझ्या सहकारी सुजाता बोरकर यांचेही कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो. तसेच श्रीमती शशिकला खाडिलकर, वास्तवातील संध्याकिशोर, रेवती ठिपसे, डॉ. उषा शर्मा, सोलापूर येथील हरिप्रसाद बंडी, पुणे येथील नागेश पाटील, सौ. अपर्णा पाटील-महाशब्दे, सौ. मेधा इनामदार,  चिंचवड (पुणे) येथील सौ. प्रणाली महाशब्दे, मुंबई येथील डॉ. मधुबाला जोशी, सौ. नीलिमा देशपांडे, सौ. वासंती काळे, सौ. गायत्री कुळकर्णी, भुसावळ येथील वैशाली पाटील, सौ, रेवती शेंदुर्णीकर, वैदेही नाखरे, वृषाली कुळकर्णी, सौ. शैला नेवे, जितेंद्र ढाके, अनिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात याबाबद्दल त्यांचेही मनापासून आभार. समारोपाच्या दिवशी देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या जळगाव नगरीच्या प्रथम नागरिक सौ. भारतीताई सोनवणे , जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. अशोकभाऊ जैन, विश्वस्त व माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील, माजी कुलगुरु डॉ. आर. एस. माळी, ग्रामदैवत श्रीराम महाराज संस्थांचे विद्यमान गादीपती  हभप मंगेश महाराज जोशी, प्र-कुलगुरु डॉ. पी. पी. माहुलीकर, प्राचार्य अनिल राव, दिलीपदादा पाटील, सौ. स्नेहल लोंढे, प्रभात चौधरी, अनिल अभ्यंकर, कप्तान मोहन कुळकर्णी, नाशिक येथील दीपक करंजीकर, मुंबई येथील विसुभाऊ बापट, अनंत भोळे, प्रा. डॉ. राजेंद्र खडायते, प्रा. नितीन बारी, पुणे येथील. ऍड. हेमंत मेंडकी, गिरीप्रेमी उमेश झिरपे,  बंगलोर येथील विजय कुळकर्णी, यजुर्वेंद्र महाजन, डॉ. अपर्णा भट-कासार, अपूर्वा वाणी, धुळे येथील मेधा उज्जैनकर, मनीष कासोदेकर, अकोल्याच्या सौ. मोहिनी मोडक, मंजुषा भिडे, अपूर्वा चौधरी, किरण बोरसे, जालना येथील लताताई देशपांडे युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे चिन्मय संत, वैभवी कुळकर्णी, कीर्ती शर्मा, कल्याणी कुळकर्णी, ऐश्वर्या परशुरामे  यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या सहकारी सुजाता बोरकर यांनी प्रकृती अस्वास्थ्य असतांनाही दररोज या नाकाचे मुद्रितशोधनाचे काम केले, त्यांचेही विशेष धन्यवाद ! ज्यांनी मातीतून, रांगोळीतून, चित्रकलेतून, पानाफुलातून विविध रूपातील श्रगणेश साकारले त्यांचेही मनापासून धन्यवाद ! ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी हा उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य केले त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. 

दिलगिरी 

श्री. प्रदीप रस्से यांनी खास लेखाचे सादरीकरण उत्कृष्ट होण्यासाठी दिलेले छायाचित्र तसेच अक्षय पाटे, वास्तवातील संध्याकिशोर व माझी आई श्रीमती सुनंदा कुळकर्णी यांच्या एका दिवसाच्या कृतज्ञता भावना   माझ्या चुकीमुळे प्रकाशित करण्याचे राहिले मी त्यांची जाहीर माफी मागतो. वरील श्रेयनामावलीत कोणाचा चुकून उल्लेख राहिला असेल त्यांचीही दिलगिरी व्यक्त करतो. 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

4 comments:

  1. आदरणीय गिरीशजी,आपला मी नेहमी ऋणात राहणे पसंत करेन.आपल्या कल्पक विचाराने मला अनाहूतपणे अनेक घटकांबद्दल लिहिता आले ,त्यांच्याप्रति माझ्या मनातील कोपऱ्यात जपून ठेवलेल्या भावना व्यक्त करता आल्या हे मी माझे भाग्य समजतो.
    आपल्या स्तुत्य अश्या सामाजिक कार्यात माझ्या परीने मी आपणास निश्चितच साथ देईन अशी ग्वाही देतो आणि यापुढेही आपला स्नेह असाच राहील अशी आशा व्यक्त करतो. आपला कृतभिलाषी-हरि-प्र-सद्

    ReplyDelete
  2. नमस्कार,सर.यावर्षाच्या गणेशोत्सववावर 'कोरोना'चे सावट असतानाही आशा फाउंडेशनच्या 'कृतज्ञता महोत्सवा'द्वारे खरोखरच आगळा-वेगळा गणेशोत्सव साजरा केल्याचे समाधान तर मिळालेच शिवाय मनस्वी आनंदही झाला.विशेष म्हणजे माझ्यावर आलेल्या जीवघेण्या बिकट प्रसंगाचा या काळात मला विसर पडून माझी मानसिकता एवढी सुदृढ झाली की,गजाननाच्या कृपाशीर्वादामुळे १४ दिवसांऐवजी ७व्याच दिवशी मी सुखरुप घरी जाऊ शकलो.सर्वांप्रति मी कायम कृतज्ञ राहील.जय गजानन.
    -अनिल रामभाऊ पाटील

    ReplyDelete
  3. गिरीषजी.....
    सर्वप्रथम या सकारात्मक आणि उर्जादायी उपक्रमासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.
    ही कल्पना आपल्याला सूचणं हीच आपल्यालाला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. गणेशोत्सव म्हणजे मोठी आरास, मोठा आवाज, गोंगाट, उत्सव हा सयज खोडून काढत आपण लिहत्या हातांना एक विधायक व्यासपिठ उपलब्ध करुन दिले. खरंय या काळात दिवसभर मी माझ्या भूतकाळात डोकावून आला. मला घडवणाऱ्या अनेकांना मला आठवता आले. त्यांचे बदल ऋण व्यक्त करता आले. या व्यापात आपल्या हातून झालेल्या काही दुर्लक्षित घटकांबाबत आपण व्यक्त केलेली दिलगीरी आपल्या मनाच्या मोठेपणाचीच ग्वाही आहे. हा स्नेह जपू या !

    ReplyDelete
  4. खूप चांगला व वेगळा उपक्रम .
    विविध नावीन्यपूर्ण व नवीन कल्पनांबद्दल अभिनंदन !!
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

    विजय कुळकर्णी . बंगलोर .

    ReplyDelete