Wednesday 15 February 2023

वारी जागरणाची...

ग्राम संवाद सायकल यात्रा ! भाग - २ 


मंडळी,

आपण कालच्या भागात सर्वसाधारणपणे ग्राम संवाद सायकल यात्रेबद्दल जाणून घेतले. आजच्या भागात आपण यात्रेतील काही तांत्रिक गोष्टी जाणून घेणार आहोत. एकूण २३ यात्री पूर्णवेळ या यात्रेत सहभागी झाले होते. यातील १९ यात्रींनीं पूर्णवेळ सायकल चालवून यात्रा पूर्ण केली. जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भागातील सात तालुक्यांमधून हि सायकल यात्रा गेली. यात जळगाव, एरंडोल, पाचोरा, भडगाव, पारोळा, चाळीसगाव व जामनेर या तालुक्यांचा समावेश होता. १३ दिवसांच्या या यात्रेत एकूण १२ ठिकाणी यात्रेचा मुक्काम झाला. यात म्हसावद, एरंडोल, कासोदा, पारोळा, तामसवाडी, गुढे, मेहुणबारे, चाळीसगाव, नगरदेवळा, पाचोरा, शेंदुर्णी, विटनेर या गावांचा समावेश होता. मुक्कामाच्या ठिकाणी यात्रींची राहण्याची व रात्रीच्या भोजनाची व्यवस्था स्थानिक शैक्षणिक संस्थांनी केली होती. म्हसावद, पारोळा, चाळीसगाव, पाचोरा व शेंदुर्णी येथे झोपण्यासाठी गाद्यांची व्यवस्था होती.

दुपारचा मुक्काम वावडदा, उमरदे, खडकेसीम, मंगरूळ, देवगाव, शिंदी, ऋषिपंथा, करगाव, वाघळी, बहाळ, वरखेडी, लोहारा याठिकाणी करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी स्थानिक शाळा / महाविद्यालयांनी यात्रींची भोजनाची व्यवस्था केली होती. सकाळच्या अल्पोपहाराची व चहाची व्यवस्था बहुतांश ठिकाणी यात्रेकरुंनी केली होती. पारोळा, तामसवाडी, चाळीसगाव, व जळके येथे स्थानिकांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. या सायकल यात्रेची दिनचर्या आपण समजून घेऊ ! यात्रा प्रस्थान करण्यापूर्वी प्रथम ४ दिवसांचे कामाचे नियोजन करण्यात आले होते. पुढे त्यात काही बदल होऊन ज्या यात्रेकरुंनी स्वतः जबाबदारी घेतली होती त्यांनी ती शेवटपर्यंत सांभाळली. 

सकाळी साधारण ४ वाजता कधी ५ वाजता जागरण होत असे. सर्वांसाठी गरम पाण्याची व्यवस्था व त्यासाठी लागणारे सर्व साहित्य सोबत होते. ज्या शाळेत सकाळची शाळा भरायची तेथून आम्हाला ७ वाजता निघायचे असायचे. त्यामुळे त्यापूर्वी सर्वांचे स्नान व प्रातर्विधी आटोपले जायचे. (काही मंडळी अंघोळीच्या गोळ्याही घेत असत.) तसेच सर्वांसाठी नाश्ता व चहाही झालेला असायचा. सकाळची प्रार्थना म्हणून आम्ही पुढच्या प्रवासाला निघायचो. साधारणपणे दीड ते दोन तासात आम्ही दुपारच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेलो असायचो. बऱ्याच वेळेस शाळा उघडायची असायची. तोपर्यंत भजने / अन्य तयारी वा गप्पा व्हायच्या. शाळा उघडली कि प्रदर्शनी लावणारी टीम प्रदर्शनी लावायची. 'पपेट शो'ची टीम प्राथमिक शाळेत भेटायची व आपल्या कार्यक्रमाची लाईन लावायचे. प्रश्नमंजुषा टीम त्यांची तयारी करायचे. कार्यक्रम टीम कार्यक्रमाची तयारी करायचे. चरखा चालविणारे स्वयंसेवक आपले चरखे घेऊन सूतकताई करीत असत. 

सर्व विद्यार्थ्यांना बसविले कि सुरवातीला ईशस्तवन / स्वागत गीत होत असे. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात तीन सायकल यात्रींचे स्वागत व्हायचे आणि पुढचे दोन तास सायकल यात्रा टीम कार्यक्रम चालवायचे. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व एका महिला शिक्षिकेचा सुती हार देऊन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने सत्कार केला जात असे. शाळेला संस्थेच्यावतीने महात्मा गांधीजींच्या जीवनावरील व श्रद्ध्येय मोठे भाऊ यांचे विचारधन असलेली पुस्तके भेट दिली जात असत. त्यानंतर प्रश्नमंजुषा कार्यक्रम होत असे. विजेत्यांना सायकल यात्रींच्या हस्ते बक्षीस म्हणून गांधीजींची पुस्तके दिली जात असत. त्यानंतर सर्वांना एक प्रतिज्ञा दिली जात असे. सर्व विद्यार्थी एका तालासुरात हि प्रतिज्ञा घेत असत. त्यानंतर विद्यर्थ्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील काही निवडक प्रसंगांची प्रदर्शनी दाखविली जात असे. काही सायकल यात्री विद्यार्थ्यांना समजावून सांगत असत. जेवण झाले कि सायकल यात्रा तेथून निघत असे. 

सामान भरणे, प्रदर्शनी काढणे आदी कामे झाली कि यात्रा मार्गस्थ होई. पुन्हा दीड ते २ तासाचा प्रवास झाला कि मुक्कामाच्या ठिकाणच्या शाळेत कार्यक्रम होत असे. साधारण ५ वाजता शाळा सुटली कि आम्ही मोकळे होत असू. मग खोल्या ताब्यात घेणे, तेथे सामान उतरवणे, कपडे वाळत घालण्यासाठी दोरी बांधणे, ज्यांनी सकाळी आंघोळी केल्या नसतील त्यांनी आंघोळी, कपडे धुवायचे असतील त्यांनी कपडे धुणे अशी कामे सुरु असत. मुक्कामाच्या ठिकाणी रात्री ७.३० ते ८.३० वेळात सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. त्यासाठीची टीम जाहिरात करण्यासाठी, नाटाकाची टीम जागा निश्चितीसाठी, वीज मिळविण्यासाठी गेलेली असे. कार्यक्रमस्थळी पुस्तक विक्रीचा स्टॉल लावला जात असे. रात्रीचा कार्यक्रम आटोपून मंडळी पुन्हा निवासाच्या ठिकाणी येत असत. 

जेवण झाले कि, सर्वजण आढावा बैठकीसाठी एकत्र बसत. रात्रीचे ९.४५ ते १० वाजे दरम्यानचा हा काळ असे. सर्वजण थकलेले असल्याने फारशी उत्सुकता नसायची. कोणाला घरी बोलायचे असायचे, कोणाला झोपायचे असायचे  यावेळी एखाद्या गीताने सुरवात करीत असू. त्यानंतर सर्व यात्रेकरूंची हजेरी घेतली जात असे. कामाचा आढावा घेतला जात असे. दुसऱ्या दिवशीचे नियोजन कुठे जायचे, किती किलोमीटर चालायचे, रस्त्यात कोणती गावे आहेत, या गावात प्रभात फेरी वा संपर्क आहे का आदी गोष्टी सांगितल्या जात असत. यात्रेकरुंचे अनुभव जाणून घेत असू. त्यांच्या अडचणी समजून घेत असू. प्रत्येक यात्रीला आपले वैयक्तिक काम सांभाळून घेतलेली सार्वजनिक कामेही करावी लागत असे. रात्री साधारण ११ वाजता सर्व झोपी जात. काही मंडळी त्यानंतरही मजा मस्ती करीत असत. (क्रमशः)


गिरीश कुळकर्णी 

समन्वयक, 

ग्राम संवाद सायकल यात्रा 

2 comments:

  1. खूप छानच सर.... मनःपूर्वक शुभेच्छा...!

    ReplyDelete
  2. छान कार्यक्रम आहे

    विजय कुळकर्णी

    ReplyDelete