Friday, 5 February 2021

परेड कमांडरचा प्रवास "वर्दी"वर प्रेम निर्माण करणारा : समृद्धी संत

एनसीसीची कॅडेट ते प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात मुलींच्या ग्रुपची परेड कमांडर म्हणून मिळालेली संधी हा प्रवास "वर्दी"बद्दल विशेष प्रेम व आयुष्यात सैन्यदलात वेगळं काही तरी करुन दाखविण्याची जिद्द निर्माण करणारा ठरला, असे समृद्धी अतिशय अभिमानाने सांगत होती. २६ जानेवारी २०२१च्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात एनसीसीच्या मुलींच्या ग्रुपची परेड कमांडर म्हणून महाराष्ट्राला प्रथमच संधी मिळवून देणारी जळगावची सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी संत हिचेशी संवाद साधला असता ती बोलत होती. आरडी परेडमध्ये सहभागी होण्याचे माझे स्वप्न जरी पूर्ण झाले असले तरी आता मला आर्मीत कमिशन होण्याची इच्छा आहे. त्यासाठी मला एनसीसीमधील हा प्रवास खूप उपयुक्त ठरणार आहे. 

महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर एनसीसी घेऊन सलग दोन वर्षे प्रचंड मेहनत घेऊन समृद्धीने आपले स्वप्न साकारले आहे. मागील वर्षीही तिला हि संधी होती मात्र तिची निवड झाली नाही. त्यामुळे थोडीशी नाराज झाली तरी आणखी एक वर्ष आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपल्यातील कमींवर विशेषतः "ड्रिल"वर फोकस केला. त्यासाठी सकाळी लवकर व रात्री उशिरापर्यंत सराव केला. प्रत्येक वर्षी "बेस्ट कॅडेट"ला आरडी परेडसाठी संधी मिळते. तशी ती समृद्धीलाही मिळाली. प्रथम अमरावती, नंतर पुणे येथे निवड चाचणी होऊन त्यानंतर पुन्हा दिल्ली येथे निवड केली जाते. दिल्लीसाठी निवड झालेल्या सर्वांनाच आरडी परेडची संधी मिळत नाही. काहींना दि. २८ जानेवारी रोजी होणाऱ्या पीएम रॅलीत संधी मिळते. यावर्षी महाराष्ट्रातून एकूण २६ कॅडेटची (१६ मुले व १० मुली) निवड झाली होती. संपूर्ण भारतातून आलेल्या सर्व कॅडेटचा कसून सराव करुन घेतला जातो. 'ड्रिल' व 'कमांड' पाहून परेड कमांडर म्हणून निवड करण्यात आलेल्या तीन कॅडेटमध्ये समृद्धीचा समावेश होता. आपले स्वप्न साकार होत असतांना मुलींच्या पथकाचे नेतृत्वाची संधी तिला ऊर्जा देणारी ठरली. त्यातही तिने बेस्ट देऊन आपला निवडीचा मार्ग मोकळा केला. दि. २३ जानेवारीला तिला सांगण्यात आले तसे सांगण्यात आले. दि. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी आपल्या देशाच्या राष्ट्रपती व पंतप्रधानांना दिल्लीच्या राजपथावर मानवंदना देतांना आपला हा प्रवास सर्र्कन डोळ्यासमोर आला हे सांगतांना समृद्धी रोमांचित होते आणि तोच या सर्व प्रवासातला आनंदाचा क्षण सांगण्यास ती विसरत नाही.  

मित्रांनो आपल्याला वाटते तेव्हढी हि गोष्ट सोपी व छोटी नाही.यापूर्वी अनेक कॅडेट महाराष्ट्रातून आरडी परेडला जाऊन आले आहेत. मात्र समृद्धीचे विशेष कौतुक व अभिनंदन एव्हढ्यासाठीच कि तिने "परेड कमांडर' म्हणून प्रथमच महाराष्ट्राला हा बहुमान मिळवून दिला आहे. त्यातही फर्स्ट इयरला असतांना डोक्यात असा कोणताही विचार नसतांना केवळ एनसीसीतील प्रवेश तिला येथपर्यंत घेऊन जातो. यावर्षी तर  'कोरोना' महामारीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या पथसंचलनात निवड होणे विशेष म्हटले पाहिजे. पालकांनी दिलेली संमती व समृद्धीने पालकांचा विश्वास संपादन करुन आपले स्वप्न साकार करण्यासाठी एकनिष्ठेने केलेले समर्पण आजच्या तरुणांसाठी आदर्श आहे. दिल्लीच्या थंडीत मध्यरात्री १ वाजता सुरु होणार सराव सकाळी आठ वाजेपर्यंत चालायचा. त्यानंतर थोडी विश्रांती आणि पुन्हा ड्रिल व कमांडचे सराव एव्हढाच नेम... दिवसभरात केवळ ३-४ तासांची झोप, वातावरणातील बदल. खाण्यापिण्यावर मर्यादा, गरम पाण्याच्या गुळण्या, कितीही थकवा आला, पाय दुखले तरी सरावासाठी तयार, कधी तरी वैताग यायचा, स्वतःवरच चिडचिड व्हायची याचा त्रास वाटायचा... मात्र राजपथावरील पथसंचालनाने यासाठीच तर हे सर्व होते हे कळले.  

समृद्धीचे पालक हर्षल व सौ. अर्चना २६ जानेवारीच्या त्या क्षणाचे साक्षीदार आहेत. आपल्या लेकीच्या कौतुकाने त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू थांबायला तयार नव्हते. समृद्धीला "परेड कमांडर" म्हणून पाहतांना खूप अभिमान वाटला. तिने तिची जिद्द पूर्ण केली असे म्हणताना वडील हर्षल संत यांनी काही वेळेला विरोध केल्याचे प्रांजळपणे कबुल करतात. मात्र सकाळी लवकर व रात्री उशिरापर्यंत करावा लागणारा सराव या काळजीपोटी हा विरोध असायचा. आम्ही तिला कायम पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं, एक मुलगी म्हणून कधी भेदभाव केला नाही. अडचणी आल्या तर मदत केली, कधी नाउमेद झाली तर उभारी दिली. आई सौ. अर्चना म्हणतात तिचे थोडे शैक्षणिक नुकसान होईल हे आम्ही स्वीकारले आणि कायम सपोर्ट केला. प्रत्येक वेळी तिच्यावर विश्वास ठेवून तिला सर्व गोष्टींना परवानगी दिली. " तू तुझे १०० टक्के दे, शेवटी परमेश्वरी इच्छा ! आणि निवड झाली नाही तरी कधी नाउमेद होऊ नको " असा सल्ला त्या देत असत. दोघांनाही समृद्धीचे कौतुक करण्यासाठी शब्द सुचत नव्हते.

समृद्धी आणि तिचे पालक तिच्या बटालियनचे CO. कर्नल प्रवीण धीमन,सुभेदार मेजर कोमलसिंह, महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर लेफ्ट. वाय. एस बोरसे, CTO ज्योती मोरे व PI staff, पुणे येथील ब्रिगेडियर सुनील लिमये , कर्नल अनुराग सुद, काँटिंजन्ट कमांडर कर्नल प्रशांत नायर, नायक सुभेदार किरण माने, मेजर अरुषा शेटे, लेफ्ट. विवेक बाले  यांच्याप्रती वारंवार कृतज्ञता व्यक्त करतात. समृद्धीचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी असून देशाच्या सैन्यदलात प्रवेश करुन देशाची सेवा करण्याची इच्छा पूर्ण होवो यासाठी मनापासून शुभेच्छा ! आशा फाऊंडेशनच्या ६ ते १२ मे २०१३च्या क्षमता शोधन व कौशल्य विकसन या उद्देशाने आयोजित आशा बाल विकास उन्हाळी शिबिराची शिबिरार्थी असलेल्या समृद्धीने मिळविलेले यश आम्हा सर्वांसाठी आनंददायी आहे. गत १३ वर्षात संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमातील विद्यार्थी आज आपल्या व्यक्तिगत जीवनात काहीतरी वेगळं करुन दाखविण्याची जिद्द बाळगून आहेत यातच आमचे समाधान आहे. समृद्धी, तिचे पालक व तिच्या या प्रवासाचे सर्व शिल्पकार यांचे मनापासून अभिनंदन ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४

Saturday, 2 January 2021

समस्या सरत्या वर्षाची का मानवाची ?


देशदूत संवाद कट्ट्यावर "सरत्या वर्षाने काय दिलं ?" अन रोटरी क्लब जळगावच्या "नव्या वर्षाला सामोरे जाऊ या !" या दोन विषयावरील चर्चासत्रात सहभागाने सरत्या वर्षाकडे पाहण्याच्या दृष्टीला पुष्टी मिळाली. बहुतांश वेळेस आपण सर्वच एका बाजूने वा गृहितकावर विचार करतो. त्यातूनच लिहिलेला हा लेख "समस्या सरत्या वर्षाची का मानवाची ?" 

थांबा, विचार करा, कृती करा आणि आढावा घ्या ! मानवी जीवनाचे, व्यवसायाच्या प्रगतीचे हे साधे सोपे सूत्र. वर्ष इंग्रजी असो वा भारतीय, आर्थिक असो वा शैक्षणिक. साधारणपणे मागील वर्षातील घटनांचा आढावा आपण शेवटच्या महिन्यात घेतो. त्यात काय मिळविले आणि काय गमावले याचाच हिशेब प्राधान्याने मांडतो. यात जे मिळाले त्याचा आनंद कमी आणि गमावले त्याबद्दलचे दुःख अधिक दिसते. त्यामुळे पुन्हा नवीन उभारीने नव्या वर्षात मिळवायची यादी वाढते. पुन्हा संकल्प, पुन्हा ते संकल्प  सिद्धीस जाण्यासाठीची धडपड, तगमग आणि तडफड... हे जीवनाचे अव्याहत सुरु असणारे चक्र ! काही वेळेस सकारात्मक विचार करतांना अनुभवातून आलेले शहाणपण वा शिकवण हे समाधान. 

२०२० ! अकल्पित आलेली कोरोना महामारी, त्यातील मृत्यू, निर्माण होणारी अनामिक भीती, लॉकडाऊन, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टनसिंग, बेरोजगारी, उपासमारीची वेळ, जेवणाचे वांधे, उदरनिर्वाहाचा प्रश्न, जगण्याची आस, स्थलांतराचे जत्थे, मानसिक ताणतणाव, नैराश्य, वाढलेला स्क्रीन टाइम, त्यातून निर्माण झालेले डोळ्यांचे विकार, पाठदुखी, मानदुखी, लठ्ठपणा, मूळव्याध, घरगुती हिंसाचार, महिला व बालकांचे शोषण, माणसांचा परस्परांमधील संशय किती समस्या अन प्रश्न ? 

अर्थात सर्वच प्रश्न आणि समस्याच नव्हे तर संवेदना, माणुसकी, कृतज्ञता, संधी, जगण्याचे मार्ग, स्वच्छतेचे महत्व, आव्हानाला सामोरे जाण्यासाठी लागणारी एकता, निर्णय क्षमता, स्वतःसाठी व कुटुंबासाठी दिलेला वेळ, घरातील पुरुषांनी बनविलेली नवनवीन व्यंजने, दीर्घ काळापासून राहिलेली कामे पूर्ण, मिळालेली जगण्याची नवीन परिभाषा, स्वतःत घडविलेला आवश्यक बदल, स्वीकारलेली जीवनशैली, वास्तवाचे भान, तंत्रज्ञानाचा वापर, शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्व, योगा व प्राणायाम, अहोरात्र कार्यरत असलेली शासकीय, वैद्यकीय व प्रशासकीय यंत्रणा या जमेच्या बाजू आहेतच. 

लेखात मांडलेला हा जमाखर्च वा हिशेब सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित व त्याच्यावर परिणाम करणारा आहे. राज्यात, देशात व जगात या सोबतच अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत होत्या. आपणा सर्वांचा लॉक डाऊनचा बहुतांश वेळ समाज माध्यमातील त्यावरील चर्चांवर गेला आहे. कोरोनाच्या या आव्हानासमोर त्या सर्व गोष्टी कुठेतरी झाकोळल्या गेल्या म्हणून त्याचा आढावा येथे घेतलेला नाही. तसे  प्रस्तुत लेखाशी त्याचा तसा फारसा संबंधही नाही. तरी नवे शैक्षणिक धोरण, राम जन्मभूमीचा निकाल, सुशांतसिंग व समाजसेवी डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या यांचा वानगीदाखल उल्लेख करता येईल. असो.

वाचकांना नेमकेपणाने असा प्रश्न विचारायचा आहे कि, २०२० वर्षातील किती समस्या व प्रश्न निसर्गनिर्मित होते ? या समस्या त्या वर्षाच्या होत्या का मानवाच्या ? अनेकांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना मागील वर्ष अतिशय वाईट होते. माझ्या आयुष्यात असे वर्षच आले नाही असे म्हटले. मुळात जीवनात चढ-उतार, ऊन-सावली, आनंद-दुःख आहेच असे आपण नेहमी म्हणतो. तेच तर खरे जीवन ! मागील वर्षातील समस्यांची तीव्रता अधिक होती, काही हृदयस्थ व्यक्तींना आपण गमावले हे नाकारता येणार नाही. मात्र या अशा आव्हानांपासून वा संकटांपासून आपण वाचलो काय कारण असेल ? 

चर्चासत्रांमधून अधोरेखित झालेली गोष्ट म्हणजे भारतीय कुटुंबव्यवस्था, संस्कृती व अध्यात्म यांचा अंगीकार करणाऱ्या व्यक्तींना व कुटुंबांना याची झळ पोहोचली नाही किंवा त्यांना त्याला सामोरे जातांना सुसह्य झाले. या वर्षाने आपण स्वीकारलेल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करावा असा संदेश दिला आहे असे मला वाटते. भारतीय तत्वज्ञानात या गोष्टींचा अंतर्भाव आहे.  आर्थिक उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरणाचा स्वीकार करीत असतांना नकळतपणे आपण आपल्या भारतीय मूळ विचारधारेपासून दूर जाऊ लागलो होतो. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे खेडी समृद्ध होण्याऐवजी शहरीकरणाला प्राधान्य अधिक मिळाले. सुखाची कल्पना ही केवळ शारीरिक सुखाचा विचार करणारी झाली. त्यामुळे एक गरज पूर्ण झाल्यावर दुसरी उत्पन्न झाली. त्याचा हव्यास वाढला त्यातून गळेकापू व खिसेकापू स्पर्धा निर्माण झाली. पैसा आला तरी आनंदाबरोबर मानसिक ताणाची एक किनारही सोबत आली. या सर्वांचा परिणाम म्हणून सर्वत्र भोगवाद पसरला. त्यामुळे शोषण वाढले, निसर्गाचे ओरबाडणे वाढले आणि " सर्वे भवन्तु सुखिनः " चा आम्हाला विसर पडला. स्वार्थी व आत्मकेंद्रित समाज निर्माण झाला. त्यामुळे कोणीही सुखी समाधानी होऊ शकले नाही.

दै. देशदूत शब्दगंध पुरवणी. दि. ३ जानेवारी २०२१ 

ज्या स्वदेशीचा अंगीकार करीत आम्ही स्वातंत्र्य मिळविले, खुल्या अर्थव्यवस्थेमुळे आम्ही स्वतःहून त्या स्वदेशीला दूर लोटले. उत्पादनाचा दर्जा आणि किंमत याचा अधिक विचार न करता आम्ही चिनी वस्तूंकडे, ऑनलाईन शॉपिंग, मॉल यासारख्या गोष्टीकडे अधिक आकर्षित झालो. पैसे कमविणे, संपत्ती निर्माण करण्यासाठीच्या साधनांचा शोध लावणे, निर्माण केलेल्या साधनांचे संरक्षण करण्यासाठी सत्ता मिळविणे यात वावगे असे काहीही नाही. मात्र त्याचा अतिरेक झाला कि सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचा धोका निर्माण होतो. अमर्याद संपत्ती निर्मिती, तिचा उपभोग व त्यातून निर्माण झालेली सत्ता शोषितच असते. त्यामुळे सोबत असणाऱ्या समाज बांधवांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येतातच. भांडवलदारांना पूरक वर्तनाने आम्हीच पं. दीनदयाळ उपाध्यायांनी सांगितलेल्या एकात्म मानववादाला हरताळ फासला.

योगी अरविंदानी म्हटल्याप्रमाणे समाजातील प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे सुख मिळावे, त्याच्या कामाचा आनंद मिळावा, मिळविले ते उपभोगण्यासाठी फुरसतीचा वेळ मिळावा आणि साधे, सोपे , समृद्ध व सुंदर जीवन जगता यावे हे उद्दिष्ट आहे. भारतीय विचारात भौतिक सुख आवश्यक मानतांनाच ते अपुरे आहे हे अधोरेखित केले आहे. त्यातच अडकून पडणे म्हणजे संपूर्ण सुखापासून वंचित राहणे आहे. सुख वस्तुनिष्ठ नसून त्याचा माणसाच्या भावभावनांशी जवळचा संबंध आहे. माणसाच्या शरीराबरोबरच मन, बुद्धी व आत्मा याचीही भूक असते. या सर्वांच्या एकत्रित सुखातूनच माणूस विकसित होतो. "आहार निद्रा भय मैथुनं च, सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् । धर्मो हि तेषामधिको विशेष:, धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥ " अर्थात आहार, निद्रा, मैथुन आदींमुळे जी सुखानुभूती होते ती मनुष्यप्राणी व पशुपक्षी या दोहोंमध्ये सारखीच असते. मानवी जीवनातील विशेषतः आहे ती म्हणजे धर्म. धर्माशिवाय वागणारी व्यक्ती पशुसमान असते. माणूस आणि प्राणी यांच्यात मूलभूत फरक आहे तो म्हणजे माणसासमोर काही ना काही ध्येय असते. ते ध्येय साकारणे हे माणसाचे मनुष्यत्व होय.

जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही व वास्तव स्वीकारणे एव्हढेच आपल्या हातात आहे याची खूणगाठ मनाशी पक्की केली कि अशा परिस्थितीतून पुढे जाणे अधिक सुखकर होते. मर्यादीत साधनांमध्ये जगणे सहज शक्य असतांना हव्यास, भोग त्यातून होत असलेला अतिरेक यामुळे मागील वर्षातील समस्यांची तीव्रता आपल्या सर्वांना अधिक जाणवली असे मला वाटते. आपण सर्वांनी समस्यांचे मूळ काळात नसून मानवात आहे हे समजून घेतले तर येणारी सर्व वर्षे अधिक चांगली जातील असा मला विश्वास आहे. 

 "सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । 

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग्भवेत् ॥" 

सर्वजण सुखी होवोत, सर्वजण निरोगी राहो, सर्वजण मंगल व आनंददायी घटनांचे साक्षीदार होवोत आणि कोणालाही कोणतेही दुःख लाभू नये हिच नवीन वर्षासाठी शुभेच्छा ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ . 


Saturday, 5 December 2020

वॉर अँड पीस



मागील सोमवारी समाजासाठी विशेषतः:समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काही तरी विशेष, भव्य-दिव्य करु इच्छिणाऱ्या, सामाजिक कार्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या आमटे कुटुंबातील शीतलताई आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी कळली. मन सुन्न झाले. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. इतक्या टोकाचे पाऊल एक महत्वाकांक्षी, संवेदनशील, इतरांसाठी प्रेरणादायी व ध्येयनिष्ठ व्यक्ती कसा घेऊ शकते ? या एका प्रश्नाकरिता मन अस्वस्थ होते. स्व. बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी सोहोळ्याचा (२०१४) साक्षीदार असलेल्या माझ्या सारख्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्याला प्रश्न पडणे स्वाभाविकच ! मात्र याच संवेदनशीलतेमुळे विषयाचे गांभीर्य, आवाका व व्याप्ती लक्षात घेता कुठलीही घाई न करता विचारपूर्वक व जबाबदारीने व्यक्त होण्याचे ठरविले. गेले ६ दिवस या विषयावरील माध्यमातील मते मतांतरे, टीका टिप्पणी, व्हिडीओ पाहतोय. कोण चूक, कोण बरोबर, कोणावर अन्याय, पुढे काय ? हे प्रश्न आहेतच मात्र माझ्यासाठी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आत्महत्याच का ? 



गेली अनेक वर्षे हा प्रश्न अक्षरश: छळतोय. त्यात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात आमच्याच कुटुंबातील सदस्याने केलेल्या आत्महत्येमुळे याबाबत स्वामी विवेकानंद जयंतीला काही ठोस करण्याची योजना आखली होती. दुर्दैवाने महामारीमुळे तो विषय थांबला. महामारीने निर्माण केलेल्या अनेक सामाजिक समस्यांनी अनलॉकच्या काळात अनेकांना हा पर्याय निवडण्यास बाध्य केले. माध्यमातील या बातम्यांनी मन विषण्ण होते. अनेकदा माध्यमे या बातम्या का देतात असा प्रश्नही पडतो कारण या बातम्या मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तीसाठी नकारात्मक प्रेरणा ठरतात असे मला नक्की वाटते. वैयक्तिक भेटीतून स्थानिक संपादकांना सहज बोललो देखील...या बातम्या टाळता येणार नाही का ? सार्वजनिक कार्यक्रमात, प्रशिक्षणात, व्याख्यानातून या विषयावर तरुणांशी आवर्जून बोलतो हे खरे असले तरी बातमीतील त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही आणि त्याला थांबवू शकलो नाही याचे दुःख मनाला बोचणी देत राहते. असो.

शीतलताईंनी आत्महत्येच्या दिवशी ट्विटर हॅण्डलवर एक चित्र सामायिक केले होते आणि त्याला शीर्षक होते " वॉर अँड पीस ". मला हे वाक्य त्यांच्या मनाची तगमग व परिस्थितीची कल्पना देणारे वाटते. जीवनातील अनेक आव्हानांना, संघर्षांना माणूस सामोरे जातच असतो. रोज मरणाची लढाई ती हिच, अशाच पद्धतीने तो जगत असतो. हि लढाई तो लढत असतो कारण त्याला हवी असते शांतता...मानसिक शांती, आत्मिक समाधान... ताईंना हि मानसिक शांती मिळविण्यासाठी आत्महत्या हा पर्याय योग्य वाटला असेलही पण...  मग प्रश्न येथूनच सुरु होतो. अशी कोणती लढाई होती कि ज्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही ? बाह्य जगतातील लढाईबद्दल बरंच बोललं जातंय... कौटुंबिक वाद, सहकाऱ्यांशी वाद अन्य... पण त्यावर हा पर्याय नक्कीच त्या निवडणार नाही. त्यातील काय योग्य अयोग्य याच्या तपशिलात मी जाणार नाही कारण मी त्यासाठी पात्र नाही वा मला त्याबाबत माध्यमातील गोष्टींशिवाय काहीही माहिती नाही आणि त्याची सत्यता (?)...  



माझ्या मते हि लढाई बाहेरच्या जगापेक्षा अंतर्गत जगाची अधिक असावी. एव्हढा मोठा परिवार सांभाळत असतांना लागणारे आर्थिक पाठबळ... ते उभे करण्याचे आव्हान... भविष्यात करावयाच्या गोष्टींसाठी लागणारे पाठबळ, त्यासाठीचे मार्ग... आव्हानांची मालिका... जीवनात कराव्या लागणाऱ्या वैचारिक तडजोडी, जबाबदारी सांभाळत असतांना आपण कुठेतरी कमी पडतो आहोत हि भावना, एका बाजूला ७० वर्षांची विश्वासार्हता आणि दुसऱ्या बाजूला "लोक काय म्हणतील ?" याची बोचणी... त्यातून निर्माण होणारे मानसिक द्वंद्व. संवेदनशील कार्यकर्त्यांसाठी तसे हे नेहमीचेच असते. त्यामुळे एव्हढा टोकाचा निर्णय ? संस्था संचालन करीत असतांना असे मानसिक द्वंद्व नेहमीचेच असते. आमटे परिवारातील सदस्यांसाठी ते अजिबातच नवीन नाही. काम करीत असतांना समोरील आव्हानाचे उत्तर जवळ असतांनाही "करावे कि न करावे ?", "To be or Not to be..." ची परिस्थिती खूप मानसिक गोंधळ निर्माण करते. एका बाजूला व्यवहार आणि दुसऱ्या बाजूला भावना यांचा समतोल साधणे अनेकदा कार्यकर्त्याला कठीण जाते. 

शीतलताई खरं तर याबाबतीत अनेकांच्या आदर्श होत्या. त्यांनी अनेक प्रकल्प, उपक्रम ज्या पद्धतीने साकारले, चालवले त्यावरून त्यांना हे असे अनुभव नवीन नक्कीच नाही. मग असा कोणत्या विषयावरील अंतर्गत मानसिक वा वैचारिक संघर्ष त्यांना या निर्णयाकडे घेऊन गेला असेल ? आपली हरविलेली मानसिक शांती मिळविण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब करावासा का वाटला नसेल ? एका बाजूला आनंदवनात घेतलेले जीवन शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमधून घेतलेले शिक्षण काय कमी पडले ? का या दोहोंच्या ताळमेळातच गडबड झाली. सामाजिक कार्यकर्त्याची हि अशी स्थिती अनेकदा होते. अनेक चांगल्या गोष्टी करण्याची इच्छा असूनही करता न येणे ? त्याठिकाणी आपली मूल्ये, तत्वे, धोरण याबाबत आपल्याच मनात शंका निर्माण होणे हे फार कठीण असते. संस्थेचा मूळ आत्मा सांभाळून त्याला तारुण्य बहाल करण्याचे आव्हान स्वीकारण्यात काही अडचणी होत्या का ? त्यातून निराशा, हतबलता, नैराश्य येते. माणूस अनेक अंगाने, मार्गाने त्यावर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. ताईंना यावेळी मात्र तो मार्ग सापडला नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. 

आम्ही एका संवेदनशील, धडाडीच्या, स्वप्नाला कवेत घेणाऱ्या कार्यकर्तीला मुकलो हे नक्की. आमटे परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर देवो हीच प्रार्थना ! 

जाता जाता- लिओ टॉलस्टॉय यांची "वॉर अँड पीस" या विषयावरील एक प्रसिद्ध कादंबरी असल्याचे वाचनात आले. मी ती वाचलेली नाही. मात्र त्या संदर्भातील अधिक माहिती वाचली असता त्याचा संदर्भ ताईंच्या ट्विटशी असावा का असे वाटून गेले ? . 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४


Tuesday, 1 December 2020

आपले आयुष्य आपल्या हाती !



सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना आपल्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे. खरं तर  आजचीही चिंता आहेच परंतु माणूस नेहमी भविष्याचा जास्त विचार करतो. काही माणसांना काहीतरी मार्ग निघेल असे वाटते, काहींना वाटते जे सर्वांचे होईल ते आपले होईल तर काही जणांना वाटते आता काही खरं नाही संपलं सगळं ! माणसाच्या या विचार करण्याच्या पद्धतीवरुन त्यांचे आचरण ठरते. त्याप्रमाणे त्यांचे प्रकार वा स्वभाव वैशिष्ट्ये ठरतात. कोणी आशावादी, तर कोणी निराशावादी, कोणी हताश तर कोणी बिनधास्त, कोणी गंभीर तर कोणी खुशालचेंडू. मग नक्की माणसाचे भविष्य कसे ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. आपण त्याचा उत्तर शोधण्याचा या लेखातून प्रयत्न करणार आहोत. 

आपल्या भविष्याबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न माणूस वेगवेगळ्या पद्धतीने करीत असतो. काही जणांना ते वर्तमानपत्राच्या राशी भविष्यातून मिळते तर काही आपली कुंडली तपासून पाहतात तर काही हात दाखवूनही शोधतात. यातील शास्त्रावर आधारित गोष्टींबद्दल मला काही म्हणायचे नाही मात्र भंपक व लोकांना फसविणाऱ्या गोष्टींबाबत नागरिकांनी जागरुक होण्याची गरज आहे. मला असे वाटते कि, आपले आयुष्य आपल्या हातात आहे. कसे ते विस्ताराने समजून घेण्याचा प्रयत्न करु. यासाठी सर्वप्रथम प्रत्येकाने स्वतःला तीन महत्वाचे प्रश्न विचारावे असे मला वाटते. ज्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळाली त्याला त्याच्या भविष्याची दिशा मिळाली असे समजण्यास हरकत नाही. तसे म्हटले तर अतिशय सोपे प्रश्न आहेत हे. भारतीय तत्वज्ञानात या प्रश्नांची उत्तरे आहेत. हे तत्वज्ञान पुस्तकात नसून आपले आई-वडील व कुटुंबीय सहजपणे ते आपल्या मनावर बिंबवत असतात. मात्र समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा त्यावर परिणाम होतांना आपल्याला दिसतो. अर्थात त्याचे मूळ तीन प्रश्नांमध्ये आहे. काय आहेत प्रश्न ? पाहू या ! 


प्रश्न १ - का जगायचं ? 

आपण जन्माला तर आलोय पण आपल्या जीवनाचे नक्की उद्दिष्ट काय. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे.. आनंद, समाधान, सुख, यश ? पुन्हा प्रश्न नक्की आनंद म्हणजे काय ? सुखी माणूस कोण ? समाधान कशात असते ? ते कुठे मिळते ? यश कशाला म्हणतात ? यशाची आपली व्याख्या काय ? आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये या प्रश्नांची उत्तरे बदलत जातात. हि प्रश्न उलगडत जातात. यांची उत्तरे आपल्याला सापडतात. बऱ्याच वेळेस लोक काय म्हणतील म्हणून अनेक गोष्टी आपण आपल्या मनाविरुद्ध करतो आणि तेथेच गाडी आपला मार्ग बदलते.मागे वळून पहिले तर आपण कुठे होतो ? आपल्याला कुठे जायचे होते ? कशाचेही उत्तर मिळत नाही आणि माणसाची अवस्था संभ्रमाची होते. अशा वेळेस माणूस चुकीच्या मार्गाची निवड करतो आणि फसतो.


प्रश्न २- कसे जगायचे ?

जीवनाचे उद्दिष्ट एकदा निश्चित झाले कि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा ? हे ठरविणे अगत्याचे ठरते. याला आपण धोरण असेही म्हणू शकतो. जीवनाचे मूलभूत तत्व शाळेत मूल्य शिक्षणातून शिकविली जातात. मात्र आपण त्याकडे डोळसपणे पाहतो का ? हा खरा प्रश्न आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद साधला तर आपल्याला प्रश्नांची वास्तव व योग्य उत्तरे मिळतात. पण आपला स्वतःचा स्वतःशी संवादच हरवला आहे म्हटल्यानंतर उत्तर सापडणे कठीण जाते. यासाठी आदर्श जीवनपद्धती स्वीकारुन तर काही वेळेस आपली स्वतःची जीवनशैली विकसित करुन जगणारी माणसे आपल्या अवतीभोवती असतात. ती आपल्याला परग्रहावरची वाटतात,  तेथेच आपण चुकतो आणि बहुसंख्यांच्या मार्गावरुन चालतो. जीवनात काय करायचे, काय नाही करायचे हे ठरविणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी आपण आपली स्वतःची काही मूलभूत तत्वे समजून उमजून ठरविली पाहिजे व त्यानुसारच आपले आचरण असले पाहिजे.


प्रश्न ३- आनंदी कसे राहायचे ?

सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हा.जीवनात सर्व काही मिळवायचे असते त्याला कारण असते जीवनाची कृतार्थता ! आपण जे काही करतो त्यातून आनंद मिळविण्यासाठी... पण आपण आनंदी होतो का ? एखादी गोष्ट ठरविली आणि आपण ती मिळविली तर आपण संतुष्ट होतो का ? आपल्याला आनंद होतो का ? मुळात आनंदाची आपली स्वतःची संकल्पना स्पष्ट आहे का ? आनंद देण्यात असतो ना कि मिळविण्यात. पण हे समजण्यासाठी खूप मोठा काळ जाऊ द्यावा लागतो. त्याची सवय लावावी लागते. त्यासाठी आवश्यक असणारा संयम व सातत्य अंगी बाणावे लागते. तात्काळच्या (इंस्टंटच्या) या युगात या दोनही गोष्टी माणसापासून दूर जाऊ लागल्या आहेत. त्यावर खूप सारे काम करण्याची गरज आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून माणसाला अपेक्षित असलेला आनंद मिळू शकतो. दुर्दैवाने आपली परिमाणे आपल्या समाधानावर अवलंबून नसतात तर समाजातील इतर घटकांवर व खोट्या प्रतिष्ठेवर अवलंबून असतात. त्यामुळेच आपला मार्ग चुकतो आणि आपल्याला आनंद होण्याऐवजी दुःखच अधिक होते. 

मी ज्या वेळेस आपले भविष्य आपल्या हाती म्हणतो त्यावेळेस वरील संकल्पना आपल्या स्पष्ट आहेत असे गृहीत धरले आहे. तसेच सोबतीला अन्य काही गोष्टींची माहिती व कल्पना आपल्याला आहे असे गृहीत धरलेले आहे. आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी मला माझी स्वतःची ओळख आहे का ? ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य माझ्यामध्ये आहे का ? आपल्याला अपेक्षित असलेले ज्ञान आहे का ? आपण कोण आहोत ? आपल्यामध्ये काय आहे जे इतरांमध्ये दुर्मिळ आहे, हे सांगता येईल का ? वास्तव स्वीकारण्याची व अपयशाला सामोरे जाण्याची जिद्द माझ्यात आहे का ? जीवनात आव्हानांना स्वीकारायची माझी तयारी असते का ? मेहनत करण्याची व स्वतःत बदल करण्याची माझी तयारी आहे का ? जीवनात आवश्यक असणारी जोखीम स्वीकारण्याची माझी तयारी आहे का ? मिळालेल्या अपयशाची जबाबदारी मी घेतो का कि अन्य कोणावर तरी त्याचे खापर फोडून मोकळे होतो  

अतिशय छोट्या वाटणाऱ्या या गोष्टी आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन देणाऱ्या आहेत. समाजातील अनेक यशस्वी व कर्तृत्ववान लोकांना आपण आदर्श मानतो मात्र त्यांची एकतरी गोष्ट आपण आपल्या जीवनात अंगिकारतो का ?  कुठे अडचणी येतात, त्यावर मात कशी करतो ? एखाद्या गोष्टीसाठी आवश्यक असणारे बदल करण्यासाठी मी स्वतःहून पुढाकार घेतो का ? सद्यस्थितीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण या प्रश्नांचा विचार करायला सुरुवात करु या ... आणि सिद्ध करु या ! आपले आयुष्य आपल्या हातातच असते. 


गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Sunday, 25 October 2020

आपल्या सवयींचे सीमोल्लंघन...हिच जगण्याची खात्री



सध्याच्या कोविड महामारीच्या काळात माणसाला जगण्याची खात्री हवी आहे. जोपर्यंत त्यावरील उपाय बाजारात येत नाही तो पर्यंत आपल्या सवयींचे सीमोल्लंघन करण्याचा हा काळ आहे. हे सीमोल्लंघनच आपल्या जगण्याची खात्री व यशस्वी वाटचालीची नांदी ठरणार आहे. सवयींचे गुलाम असलेल्या आपल्या सर्वांना गेले सहा-सात महिन्यांच्या काळात आपण स्वतःला बदलण्याची पूर्ण संधी उपलब्ध होती. काही गोष्टींच्या बाबतीत व काही प्रमाणात आपण त्या अंगिकारला मात्र मूलभूत सवयीकडे आपण सपशेल दुर्लक्ष केलेले दिसते. त्यासाठीच हे लेखप्रपंच ! 

अनलॉकच्या या काळात बाहेर जे दिसले आणि रोज जे ऐकतोय त्यामुळे सवयीच्या सीमोल्लंघनाची आवश्यकता लक्षात आली. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी समाज प्रबोधनातून या गोष्टीकडे लक्ष वेधले. "न्यू नॉर्म" अर्थात नवीन जीवनशैली असा उल्लेख मला विशेष भावला. कालपर्यंतच्या आपल्या सवयींना बदलले तर आपण "न्यू नॉर्म" सेट करु शकू व जीवनाचा आनंद घेऊ शकू. गेल्या काही दिवसात गावाकडे गेलो असता कोणाही व्यक्तीच्या तोंडावर मास्क नसल्याचे पाहून आश्चर्य वाटले. समाज माध्यमातून येणाऱ्या सामाजिक कार्यक्रमातील व्यक्तींचे वर्तन, कालही संध्याकाळी जळगावच्या काव्य रत्नावली चौकामधील अनुभवलेले चित्र अतिशय भयावह, बेपर्वाई व बेजबाबदारीचेच होते. थोडे वाचायला कटू वाटले तरी वास्तव मांडलेच पाहिजे. गेल्या काही दिवसात अनेकांशी झालेला संवाद, नातेसंबंधातील साठीच्या उंबरठ्यावरील व्यक्तीच्या दुर्दैवी निधनाची बातमी, उच्च रक्तदाबाचा शिकार झालेला पन्नाशीतील मित्र आणि "काय बोलावं तेच सुचत नाही" म्हणणारी चाळीशीतील गृहिणी हे या लेखामागची प्रेरणा आहे. 

तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे अबोल होत जाणारी तरुणाई, भान हरपलेला समाज, मनातील सर्व प्रकारच्या भावना व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या जिवाभावाच्या आश्वासक मित्राचा अभाव, आर्थिक असुरक्षिततेमुळे निर्माण झालेली अनिश्चितता, अनाकलनीय परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीची निर्णयक्षमता, आत्ममग्नतेमुळे जीवनातील हरविलेला आनंद, समाजातील नकारात्मक घटनांचा होत असलेला विपरीत परिणाम,  यासह अनेक गोष्टी या लेखाचे व समस्यांचे मूळ आहे. काळ, वेळ व परिस्थितीनुरुप बदल अंगिकारण्याची मानसिकताच आपल्याला उपयोगी ठरणार आहे.  एका बाजूला शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची तयारी व दुसऱ्या बाजूला "स्वओळख" बदलण्याची भीती अशा विमनस्क स्थितीत समाज आहे. आपल्या पश्चात काय ? हा प्रश्न वारंवार अनेक मानसिक गोंधळ निर्माण करीत आहे. आपल्या गरज व आवश्यकता मर्यादित करण्याचे मोठे आवाहन समाजासमोर आहे. यासाठीच वर्तन परिवर्तनाची आत्यंतिक आवश्यकता आहे म्हणूनच लेखाचे शीर्षक आहे सवयींचे सीमोल्लंघन ! 

हे सर्व वाचल्यानंतर स्वाभाविक प्रश्न येतो सवयींचे सीमोल्लंघन कसे करायचे ? 

१. समाजाभिमुख व्हा... व्यक्त व्हा... बोला... काय म्हणायचे ते म्हणा...

२. वास्तव स्वीकारा. जे बदलता येणार नाही व जे बदलणे आपल्या हातात नाही ते सोडून द्या...

३. जीवनात सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत याचा वस्तुपाठ मनाला घालून द्या. 

४. कोण्तायही कामाची लाज न बाळगता आपली नवीन ओळख निर्माण करा. 

५. आनंदी राहा... सकारात्मक राहा.... 

६. आपला स्क्रीन समोरील वेळ कमी करण्याचा निश्चयी प्रयत्न करा. 

७. इतरांना द्यायला शिका. (वेळ, पैसे, मदत जे पण शक्य असेल ते)

८. मानवी जीवनाची इतिकर्तव्यता कशात आहे ते जाणून घ्या. 

९. जगण्यासाठी पैशांपेक्षाही मानसिक बळ अधिक महत्वाचे ठरते हे समजून घ्या. 

१०. ज्या गोष्टी आयुष्यात कधी केल्या नाहीत त्या करण्याची तयारी ठेवा. 

११. गर्दीपासून लांब राहा. योग्य ती काळजी घ्या. 

१२. दूरदर्शनवरील प्रेरणा, उभारी, मानसिक बळ उंचावणाऱ्या व निखळ मनोरंजनाच्या गोष्टीचं पहा. 

१३. कोरोना पासून बचाव करण्यासाठीच्या सर्व सूचना अमलात आणा. 

१४. "काही फरक पडत नाही" व "जे सर्वांचे होईल ते आपले होईल" ही वृत्ती सोडा. 

१५. "हिच आमुची प्रार्थना...", " तू बुद्धी देवा... तू तेज दे" यासारख्या प्रार्थना वारंवर ऐका. 


ही यादी तशी व्यक्ती सापेक्ष असल्याने बरीच मोठी होऊ शकेल मात्र त्यातील सर्वांसाठीच्या काही साधारण गोष्टी येथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पैकी ज्यांना कोणाला या संदर्भात काही बोलायचे असेल, संवाद साधायचा असेल, चर्चा करायची असेल त्यांनी नक्की फोन करा. माझ्यापरीने समाधान करण्याचा निश्चित प्रयत्न करीन. आपल्या सवयींचे सीमोल्लंनघन हेच जगण्याची खात्री देण्याची शक्यता आहे. 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४


Wednesday, 2 September 2020

"कृतज्ञता उत्सवा"ची उपलब्धी !


यावर्षीच्या गणेशोत्सवात गणपती बाप्पाकडे काहीही न मागता त्याने आपल्याला जीवनात भरभरुन दिलेल्या गोष्टींबद्दल धन्यवाद देण्यासाठी आशा फाऊंडेशनच्या माध्यमातून  'कृतज्ञता उत्सव' साजरा करावा अशी कल्पना दि. २१ ऑगस्टच्या मध्यरात्री डोक्यात आली व आपल्या सर्वांच्या सहकार्याने व सक्रिय सहभागाने यशस्वी झाली. मागे वळून पाहतांना व या उपक्रमाचे सिंहावलोकन करतांना व्यक्तिगत लक्षात आलेल्या काही उपलब्धी व ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन प्रपंच...  आपणही या 'कृतज्ञता उत्सवात' सक्रिय सहभागी होतात. काहींनी लेखन केले, काहींनी वाचन केले. आपण या उपक्रमाकडे कसे पाहता ? आपल्याला काय मिळाले ? आपल्याला या उपक्रमाबद्दल काय वाटते ? आपण या उपक्रमाची यशस्विता कशात पाहता ? मोकळेपणाने जरुर लिहा...

उपक्रमाची उपलब्धी सांगण्यापूर्वी उपक्रम काळातील तीन प्रमुख 'योगायोग' सांगितले पाहिजे. 

१. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सुदैवाने त्या दिवशी ऋषी पंचमी होती. आपल्या तपोबलाने मानवावर अनंत उपकार करणाऱ्या व दिशा दर्शन करणाऱ्या सप्तर्षींबाबत कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा दिवस. 

२. उत्सवाच्या पाचव्या दिवशी आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. दुर्दैवाने त्याच दिवशी सकाळी आमचा जवळचा मित्र (लंगोटी यार) नरेंद्र कुळकर्णी याच्या दुःखद निधनाची बातमी कळली.

३. उत्सवाच्या नवव्या दिवशी निसर्गाप्रतीची कृतज्ञता करण्यात आली. त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून प्रकृती वंदन दिवस साजरा करण्यात आला. ज्यात वृक्षांची पूजा करण्यात येऊन निसर्गाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली व पर्यावरण रक्षणाबाबतचा संदेश देण्यात आला. 

कृतज्ञता उत्सवाची उपलब्धी...

१. कृतज्ञता या सर्वश्रेष्ठ जीवनमूल्याची जाण निर्माण झाली. आपल्यासाठी अनेकांनी अनेक गोष्टी केलेल्या असतात याची जाणीव झाली व त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची भावना निर्माण करता आली. यामुळे परस्पर सदभाव व सकारात्मकता वाढीस लागेल.  

२. सहभागींचा (लेखन, वाचन व प्रसार) दिवसभरातील बहुतेक वेळ भूतकाळातील चांगल्या आठवणींमध्ये गेला. त्यातून लेखन झाले, वाचन झाले, चिंतन झाले, काही जणांशी बोलणे झाले. महत्वाचे 'कोरोना'च्या नकारात्मकतेतून मंडळी काही काळ बाहेर पडली. 

३. समाज माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता त्यात सकारात्मक लिखाण करणाऱ्यांची आवश्यकता आहे. अशी क्षमता असलेल्यांना आत्मविश्वास देता आला. आपल्याला चांगले लिहिता येते, लोक वाचतात हा विश्वास निर्माण झाला. तरुणांचा सहभाग विशेष...

४. एकाच विषयावर किती वैविध्यतेने लिहिता येते. प्रत्येक माणूस किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात, व्यक्त होतात याची जाणीव झाली. लेखन शैली, अनुभव संपन्नता, भाषा समृद्धी झाली. थोडक्यात वैचारिक प्रगल्भता वाढली. 

५. सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने अनेक गावांची व तेथील विशेष गोष्टींची माहिती झाली. शैक्षणिक संस्थांची व तेथील शिक्षकांनी केलेल्या कार्याची माहिती झाली. देशाच्या विविध छटा लक्षात आल्या. काही विशेष व्यक्तींचा परिचय झाला. या सर्वांबद्दलचा अभिमान बळावला. 

६. माणसांचे स्वभाव, त्यांनी इतरांसाठी केलेल्या गोष्टींची व त्याचा किती दूरगामी परिणाम होतो याची जाणीव निर्माण झाली. मानवाचा परस्परातील व्यवहार कळला. अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करुन देतो ते कळले.

७. गणेशोत्सव अशा पद्धतीने साजरा करता येतो व त्यातून अपेक्षित समाज प्रबोधन साध्य करता येते हे शिकलो.

८. संस्थेशी नवीन मंडळी जोडली गेली. त्यांची परस्परात मैत्री झाली. 

जाहीर कृतज्ञता व दिलगिरी 

'कृतज्ञता उत्सव' या सार्वजनिक उपक्रमात समाजाचा सहभाग महत्वाचा. सर्वप्रथम या उपक्रमात सहभागी सर्व समाज बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांनी व्यक्त केलेल्या भावना दुसऱ्या दिवशी इ-स्वरूपात संकलित करुन प्रकाशित केल्या जात होत्या. यासाठी पूजा ग्राफिक्सचे श्री. निलेश कोळी यांचे अनमोल असे सहकार्य लाभले. कोणत्या प्रकारच्या आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता हे काम त्यांनी पूर्ण केले  शेवटच्या दिवशीच्या प्रतिक्रिया रात्री उशिरापर्यंत काम करुन आकर्षक पद्धतीने त्याची मांडणी. एका पानापासून सुरु झालेला हा प्रवास शेवटच्या दिवशी १२ पानांपर्यंत पोहोचला. दररोज ठरलेल्या वेळी त्याचे काम पूर्ण करुन दिले याबद्दल निलेशचे मनापासून धन्यवाद व जाहीर आभार. दररोज आपल्या भावना लिहून पाठविणारे मित्रवर्य व ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, धरणगाव येथील प्रा. बी. एन. चौधरी, सौ. विंदाताई नाईक, जळगावची विद्यार्थिनी कु. मानसी कुळकर्णी, चोपड्याची कु. अर्चना अग्निहोत्री, चाळीसगावचा अक्षय पाटे, श्रीमती सुनंदा कुळकर्णी, माझ्या सहकारी सुजाता बोरकर यांचेही कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो. तसेच श्रीमती शशिकला खाडिलकर, वास्तवातील संध्याकिशोर, रेवती ठिपसे, डॉ. उषा शर्मा, सोलापूर येथील हरिप्रसाद बंडी, पुणे येथील नागेश पाटील, सौ. अपर्णा पाटील-महाशब्दे, सौ. मेधा इनामदार,  चिंचवड (पुणे) येथील सौ. प्रणाली महाशब्दे, मुंबई येथील डॉ. मधुबाला जोशी, सौ. नीलिमा देशपांडे, सौ. वासंती काळे, सौ. गायत्री कुळकर्णी, भुसावळ येथील वैशाली पाटील, सौ, रेवती शेंदुर्णीकर, वैदेही नाखरे, वृषाली कुळकर्णी, सौ. शैला नेवे, जितेंद्र ढाके, अनिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात याबाबद्दल त्यांचेही मनापासून आभार. समारोपाच्या दिवशी देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या जळगाव नगरीच्या प्रथम नागरिक सौ. भारतीताई सोनवणे , जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री. अशोकभाऊ जैन, विश्वस्त व माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील, माजी कुलगुरु डॉ. आर. एस. माळी, ग्रामदैवत श्रीराम महाराज संस्थांचे विद्यमान गादीपती  हभप मंगेश महाराज जोशी, प्र-कुलगुरु डॉ. पी. पी. माहुलीकर, प्राचार्य अनिल राव, दिलीपदादा पाटील, सौ. स्नेहल लोंढे, प्रभात चौधरी, अनिल अभ्यंकर, कप्तान मोहन कुळकर्णी, नाशिक येथील दीपक करंजीकर, मुंबई येथील विसुभाऊ बापट, अनंत भोळे, प्रा. डॉ. राजेंद्र खडायते, प्रा. नितीन बारी, पुणे येथील. ऍड. हेमंत मेंडकी, गिरीप्रेमी उमेश झिरपे,  बंगलोर येथील विजय कुळकर्णी, यजुर्वेंद्र महाजन, डॉ. अपर्णा भट-कासार, अपूर्वा वाणी, धुळे येथील मेधा उज्जैनकर, मनीष कासोदेकर, अकोल्याच्या सौ. मोहिनी मोडक, मंजुषा भिडे, अपूर्वा चौधरी, किरण बोरसे, जालना येथील लताताई देशपांडे युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे चिन्मय संत, वैभवी कुळकर्णी, कीर्ती शर्मा, कल्याणी कुळकर्णी, ऐश्वर्या परशुरामे  यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या सहकारी सुजाता बोरकर यांनी प्रकृती अस्वास्थ्य असतांनाही दररोज या नाकाचे मुद्रितशोधनाचे काम केले, त्यांचेही विशेष धन्यवाद ! ज्यांनी मातीतून, रांगोळीतून, चित्रकलेतून, पानाफुलातून विविध रूपातील श्रगणेश साकारले त्यांचेही मनापासून धन्यवाद ! ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी हा उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य केले त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. 

दिलगिरी 

श्री. प्रदीप रस्से यांनी खास लेखाचे सादरीकरण उत्कृष्ट होण्यासाठी दिलेले छायाचित्र तसेच अक्षय पाटे, वास्तवातील संध्याकिशोर व माझी आई श्रीमती सुनंदा कुळकर्णी यांच्या एका दिवसाच्या कृतज्ञता भावना   माझ्या चुकीमुळे प्रकाशित करण्याचे राहिले मी त्यांची जाहीर माफी मागतो. वरील श्रेयनामावलीत कोणाचा चुकून उल्लेख राहिला असेल त्यांचीही दिलगिरी व्यक्त करतो. 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Tuesday, 1 September 2020

मी कृतज्ञ पुण्यभू भारत मातेचा !


आशा फौंडेशनच्या गणेशोत्सवांतर्गत "कृतज्ञता उत्सवा"चा आजचा शेवटचा दिवस ! आम्हास सांगतांना विशेष आनंद होतो कि आपल्या परम पवित्र भारत मातेबद्दल सुमारे ६० जणांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. जळगावच्या प्रथम नागरिकापासून ७ हजार कोटींचा उद्योग समूहाच्या प्रमुखापर्यंत, कुलगुरुंपासून शिक्षण तज्ज्ञांपर्यंत, बंगलोरपासून चोपड्यापर्यंत, ज्येष्ठांपासून ते अलीकडच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांपर्यंत, संस्कृतपासून इंग्रजीपर्यंत म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्या या पुण्यभू भारतमातेच्या विविधतेचा परिचय देणाऱ्या सुपुत्रांचा यात सहभाग आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, विचारांनी व आचरणाने या पवित्र देशाचे मांगल्य सांगितले आहे. सोबत तीचे उतराई होण्यासाठी काय करत आहे आणि काय केला पाहिजे याचा सुंदर उहापोह केला आहे. धर्म, जाती, पंथ, संप्रदाय, भाषा, प्रांत या विविधतेची आपणास अनुभूती होईल. देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराबद्दल येथील इतिहासाबद्दल, क्रांतिकारकांबद्दल, लोकशाहीबद्दल, स्वातंत्र्याबद्दल, ऋषी मुनी, योगा, आयुर्वेद, थोर विचारवंत, उद्योजक, समाज सुधारक आदींबद्दल आपल्या मर्यादेत सर्वांनी व्यक्त होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या देशबांधवांच्या मनोभूमिका साकारणाऱ्या या परमपवित्र भारत मातेला कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. 

मला आपल्या देशाचा अभिमान आहे. कारण हा माझा देश आहे. हि माझी जन्मभूमी आहे. मी तिला माता मानतो. तीचे पावित्र्य आणि महत्व जाणतो. मला ती सजीव वाटते व वंदनीय वाटते. मोठ्या अभिमानाने मला माझ्या या मातेला वंदन करतांना वंदे मातरम ! म्हणायला आवडते. आपल्या देशाचा जो इतिहास आहे. तो वाचतांना, ऐकतांना व जाणून घेतांना माझ्या अंगावर रोमांच उठतात. हा इतिहास मला आपला वाटतो. येथील संस्कृती मला माझी संस्कृती वाटते. येथील थोर माहात्म्यांना मी माझे आदर्श मानतो. येथील चांगल्या गोष्टींचा मला अभिमान वाटतो. यासाठीच हि कृतज्ञता ! 

शालेय जीवनात दररोज भारत मातेचे महन्मंगल स्तोत्र ऐकले. कालांतराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी परिषद यांच्या तत्त्वज्ञानाने राष्ट्राबद्दलचे प्रेम, भक्ती शिकलो. सामाजिक जीवनातील आपले आचरण त्याअनुरुप करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून या साऱ्या गोष्टी करता येतात याचा अनुभव घेतो. प्रामाणिकपणाला कष्टाची जोड देत आपल्यामुळे कोणालाही आपली मान खाली घालावी लागणार नाही याची काळजी घेतो. आज पर्यंत या उत्सवात त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली त्या सर्वांच्या संस्कारातून देशाचा एक चांगला नागरिक म्हणून आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडीत आहे. याची रुजुवात मात्र "जयोस्तुते.." या स्तोत्रातूनच झाली. "तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण" हे कायमस्वरुपी हृदयात कोरलं गेलं. ९० च्या दशकाच्या सुरवातीला संगणकशास्त्र विषयाची पदवी घेऊन सुद्धा आपल्या देशाबाहेर जायचे नाही हे ठरविले. ऐन उमेदीच्या काळात कायमस्वरुपाची बँकेतील नोकरी सोडून सामाजिक कामाची एक वेगळी वाट चोखाळू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याद्वारे या देशाची, देशातील जनतेची सेवा करु शकतोय याचा मला विशेष आनंद आहे. अनैतिक गोष्टी कधीही करायच्या नाही असे ठरविले आणि त्यासाठी कटिबद्ध आहे. 

हुंडा व भ्रष्टाचारासारख्या अनिष्ट रुढी थांबविण्यासाठी स्वतःपासून सुरवात केली. आपण सारे या भारत मातेची लेकरे असल्याने प्रत्येकाला कायम मदतीचा हात देतो. माझ्या सर्व बांधवांमध्ये असलेल्या सद्गुणांकडे पाहतो. त्याच्या प्रगतीत आपला सहभाग असावा यासाठी प्रयत्न करतो. प्रकृती, विकृती व संस्कृतीचा अर्थ समजून घेत त्या प्रमाणे आचरण ठेवतो. "Life is for one generation but Good Name is forever " या उक्तीनुसार आपल्या देशासाठी जे जे काही चांगलं करता येईल याचाच कायम विचार करतो. मला या देशाने जे भारतीय तत्वज्ञान दिलं आहे त्याचा अभ्यास करतो. जीवनात भारतीय जीवनशैली अंगिकारण्याचा प्रयत्न करतो. 

मला समज आल्यापासून कधीही १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचे झेंडावंदन चुकविलेले नाही. सकाळ थोडी गडबडीची, कुठे भारत माता पूजन, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम कधीतरी मित्र परिवारासह सहल असा काहीसा दिवस जात असे, वर्तमानपत्रात जाहिरातदारांनी या दिवसाला कसे महत्व दिले वा वृत्तपत्रांनी काय वेगळे वाचकांना दिले हे पाहणे हि एक आवडीची गोष्ट असे. सायंकाळी देशाच्या पंतप्रधानांनी देशाला कोणत्या मार्गावर नेण्याचे ठरविले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे. कधी तरी आपल्या तिरंग्याचा सन्मान वाढावा यासाठी प्लास्टिक वा अन्य स्वरुपातील प्रतीकात्मक झेंड्याच्या विक्रीवर बंदीची मागणी, कधी तरी लोकांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या बाजूला, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अगदी गटारीत पडलेले झेंडे गोळा करुन ते प्रशासनाला नेऊन देणे यासारखे उपद्व्यापही केले. विद्यार्थी दशेत न चुकता स्वातंत्र्य दिवस १४ ऑगस्टच्या रात्री मशाल यात्रा काढून १२ वाजता राष्ट्रगीत म्हणून साजरा केला आहे. 

भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित ठेवणारा, आपणास स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनामवीरांना , क्रांतीकारकांना आणि ते अबाधित ठेवणाऱ्या भारतीय सशस्त्रदलांच्या जवानांना, आपल्या देशाच्या तिरंग्याला अभिमानाने अभिवादन करतांना मला प्रचंड अभिमान आणि आनंद होतो. आपल्या देशाची महान संस्कृती व येथील अस्मितांबद्दल स्वाभिमान बाळगण्याचा प्रयत्न करतो. देशातील बलाढ्य लोकशाही असलेल्या या देशाचा कारभार पाहून सर्व जग अनेकदा स्तंभित व अचंबित होते हेच माझ्या भारत मातेचे वैशिष्ट्य आहे. "हे विश्वची माझे घर !" आणि "जो जे वांछील तो ते लाहो !" अशी संकसृती असलेल्या देशाला परमवैभवाला नेण्यासाठी कटिबद्ध होऊ या ! भारतीय चिंतनातून विश्वकल्याण होऊ हिच त्या बा गणरायाचरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४