Sunday, 8 May 2022

मातृदिन !

दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत पिठोरी अमावस्या अर्थात पोळा हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. उत्सवप्रिय समाजाला नेहमीच काही ना काही निमित्त पाहिजे असतं. त्यानिमित्ताने एकत्र येणं, कृतज्ञता व्यक्त करणं, सौहार्द वृद्धिंगत होणं, समाज माध्यमातून लेख वा कविता रूपाने आपल्या भावना व्यक्त करणे यासारख्या सकारात्मक गोष्टी नक्कीच घडतात. असो...

"निर्मिती"ची दैवी देणगी प्राप्त असलेली भूतलावरील एकमेव व्यक्ती जिला आपण आई, माय, माता, जननी, जन्मदात्री, माऊली, मातोश्री, मा, माडी (ग्रामीण भागात)  म्हणतो. अलीकडे मॉम आणि मम्मी म्हणायचे एक फॅड निघाले आहे. जन्म देणाऱ्या माते सोबतच आपण कुलस्वामिनीलाही आई म्हणतो, ज्या भागात आपण जन्माला आलो त्या भूमीलाही मातृभूमी वा भूमाता म्हणतो. ज्या देशात जन्माला आलो त्या देशाला भारत माता किंवा मा भारती म्हणतो. आजच्या या लेखाद्वारे समाजातील मातेच्या महतीची जाणीव समृद्ध करु या ! 

सध्या अनुभूती शाळेच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे, सुदैवाने "आई"ला समजून घेण्याची ती एक संधी आहे. समाजातील उपेक्षित, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे चांगले  शिक्षण मिळावे या हेतूने श्रद्धेय मोठ्या भाऊंच्या अर्थात पद्मश्री भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून हि शाळा सुरु करण्यात आली आहे. मागील आठवड्यात सुमारे १६० विद्यार्थ्यांच्या माता-पित्यांशी बोलण्याची संधी मिळाली आणि आजच्या मातृदिनाच्या निमित्ताने त्यातील एकल मातांबद्दल (Single Mother) काही...

मुलाखती घेतलेल्या बालकांमधील सुमारे १० टक्के माता एकल माता होत्या. विधवा, घटस्फोटित वा विभक्त राहणाऱ्या या माता ! हृदय पिळवटणारी व डोळ्यात सहज आसवे आणणारी प्रत्येकीची कहाणी... मात्र आपल्या लेकराला घेऊन जगण्याची दुर्दम्य अशी इच्छाशक्ती... नियती इतकी क्रूर असली आणि भोग मरणयातना देणारे असले तरी या मातांमध्ये जगण्याचे बळ कुठून येत असेल असा प्रश्न पडतो. समाजात स्त्रीच्या मनात पुरुषांबद्दल तिटकारा, किळस वा घृणा उत्पन्न होईल अशी माणसे आहेत हे वास्तव दुर्दैवाने स्वीकारावे लागेल आणि त्यावर मोठे काम करण्याची आवश्यकता वाटते. या माऊलींना त्यांचे बांधव म्हणून समज कशी काढावी हा सर्वात मोठा प्रश्न पडतो. 

अगोदर झालेले लग्न लपवून दुसरे लग्न करून अपत्य झाल्यावर सोडून देणारे महाभाग आणि माहेरी वडील, भाऊ यांचे व्यसन व नेहमी मिळणारे शिव्याशाप खात लेकरासाठी जगणारी  माता, केवळ मुलगी झाली म्हणून तिचं तोंडही न पाहणारा बाप व त्यामुळे पत्नीला घरी न घेऊन जाणारा पती माणूस म्हणण्याच्या योग्यतेचा आहे का ? दुर्धर आजाराने मृत्यू झालेल्या वा आत्महत्या केलेल्या पतीच्या पश्चात दोन-दोन लेकरांना सांभाळणारी माता यांना समाज स्वीकारणार कि नाही ? समाजातील अशी नकारात्मक उदाहरणे आमच्यातील माणुसकीला आव्हान देणार कि नाही ?

मुलाचा जन्म आणि पतीचा मृत्यू एकाच दिवशी पाहणारी माता दुर्दैवी म्हणता येईल मात्र तिच्या सासरच्या मंडळींनी स्वीकारुन उभं करण्यासाठी दिलेले पाठबळ दुर्लक्षून चालणार नाही. तीन मुली आणि एक मुलगा असलेल्या मातेला सोडून देणारे महाभाग आणि त्यांच्याबद्दल अजिबात दुःख व्यक्त न करता मुलांसाठी जगण्याचं बळ हसत हसत एकवटणारी माता व तिच्या माहेरची मंडळी यांना वंदन करण्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नाही. यासारखी दुर्मिळ उदाहरणे हीच खरी समाजाची आशा आहे.

"आई" हे खरोखर एक अजब रसायन आहे. "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी !" असे उगाच म्हटलेले नाही. भौतिकतेच्या आजच्या युगात आईला समजून घेणं, तिच्यामुळे हे जग पाहायला मिळालं याबद्दलची कृतज्ञ जाणं असणं, तिला तिचा सन्मान देणं, प्रत्यक्ष जन्माला येण्यापूर्वी पासून तिने आनंदाने सोसलेला त्रास, नऊ महिने पोटात घेऊन दिलेली सुदृढता, जन्माच्या वेळी लागलेल्या कळा या सर्वांची परतफेड कशी करणार याचा विचार करण्याची संधी मातृदिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने घेतली पाहिजे असे वाटते. शेवटी नैतिकता, संवेदनशीलतेचा परिपाठ देणारी व वात्सल्यमूर्ती असलेली माझी आई श्रीमती सुनंदा विष्णू कुळकर्णी हिने आज मातृदिनानिमित्ताने तिच्या आईसाठी लिहिलेली कविता...

आईची आठवण

आई, तूं जग सोडून गेलीस,

तेव्हा मी लहान होते 

मोठेपणाचं ओझं पेलत,

समजुतीने वागत होते || || 

खुप आठवण यायची तुझी, 

पण काहीच सुचत नव्हतं

मृत्युनंतर माणूस दिसत नाही, 

एवढं मात्र कळत होतं || ||

तूं पुन्हा दिसणार नाहीस, 

मन तयार नव्हतं मानायला

भिरभिरणारी नजर माझी, 

आसुसलेली तुला पहायला || ||

धडे मिळाले तुझ्याकडून, 

समाजात कसं वागायचं

तुझ्या वागण्यातुन समजलं, 

समर्थपणे कसं जगायचं || ||

तूच जवळ नव्हतीस, 

जेव्हा जगायला सुरुवात झाली

पाठीशीच आहेस समजुन, 

जगण्यासाठी हिंमत आली || ||

सुखाचा गुणाकारदु:खाचा भागाकार 

करता करता पुर्ण  जगुन झालं

कर्तव्याची बेरीज आणि स्वतःच वजा 

होत खुप काही अनुभवाला आलं || ||

तुझे आकाश पेलता, पेलता 

माझीही उलटली सत्तरी

एकच प्रार्थना प्रभुचरणाशी

(पुनर्जन्म असलाच तर)

पुढचा जन्म तुझ्याच उदरी || ||

आई, आई... तुला असंख्य नमस्कार !

Monday, 2 May 2022

खान्देशाची आखाजी : एक समृद्ध परंपरा !

भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांची परंपरा आहे. या सर्व सण-उत्सवांचे महत्व हे मानवी संबंध दृढ करणारे असून त्यामागे कुटुंब व्यवस्था बळकट करणे हा मुख्य उद्देश आहे. हे सण केवळ उत्सव नव्हे तर त्यात जीवन समृद्ध करणाऱ्या प्रत्येकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची धारणा आहे. समाजातील प्रत्येक घटकाची हे सण उत्सव गाव, भाषा, प्रांतानुसार साजरे करण्याची आगळीवेगळी परंपरा आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही या गोष्टींचे महत्व अबाधित आहे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. हळव्या व संवेदनशील मनाच्या मातृशक्तीसाठी मानसिक व भावनिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा अक्षय्य तृतीया अर्थात खान्देशातील आखाजी या सणाबद्दल जाणून घेऊ या ! 

आखाजीचा आखाजीचा 
मोलाचा सन देखा जी 
निंबावरी निंबावरी
बांधला छान झोका जी ।

खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या या गीतांमधून खान्देशातील आखाजी या सणाची महती सहजपणाने मांडली आहे. खान्देशची बोली, सण, उत्सव, चालीरीती या बाबी आपले स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्टय़ जपून आहे असे आपल्या या सणावरून नक्कीच लक्षात येईल. वैशाख शु. तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. अंगाची काहिली व जीवाची लाही लाही होत असणाऱ्या या कालखंडात हा सण स्त्रिया मोठ्या उत्साहानं साजरा करतात. खान्देशात हा सण आखाजी या नावाने विशेषत्वाने साजरा केला जातो. सासरी गेलेल्या स्त्रीया या सणाच्या निमित्ताने आपल्या माहेराला येत असतात. माहेरवाशिणीचं गाव शिवारातील प्रत्येक कुटुंबाला विशेष कौतुक असतं. पारिवारिक संबंधातील नातेवाईकांसह तिच्या शालेय जीवनातील सख्या यानिमित्ताने भेटत असतात. मानवाला आपल्या भूतकाळातील जीवनाबद्दल कायम ओढ असते. भूतकाळातील जीवन समृद्ध करणाऱ्या आठवणींमध्ये रमायला त्याला आवडते. जीवनाची आशा कायम जिवंत ठेवणाऱ्या या आठवणी असतात. बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे या सणाच्या निमित्ताने शेतात वा शिवारातील निंबाच्या झाडाला झोके बांधलेले असतात. स्त्रीच्या भावनिक आंदोलनाचे प्रतीक असलेल्या झोक्याच्या माध्यमातून बहिणाबाईंनी हा सण कसा साजरा केला जातो याचे चित्र उभे केले आहे. 
खान्देशातील ग्रामीण भागात साजरा केला जाणारा हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून समजला जातो. दूर देशी गेलेल्या मुलं-मुली आपल्या संपूर्ण परिवारासह आवर्जून या दिवशी गावाकडे येत असतात. बहुतांश वेळेस मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागलेली असल्याने सर्वच जण या सणाची मजा लुटण्यासाठी आलेले असतात. शहरी व ग्रामीण भागाची नाळ कायम जुळवून ठेवण्याची ताकद या सणांमध्ये आपल्याला दिसते. तसेच आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी "आगारी" (घास) टाकण्याची प्रथा आहे. या सणाच्या दिवशी शंकर व गौराईचे पूजन केले जाते. साधारणपणे मराठी कुटुंबामध्ये चैत्र गौरीची एक वेगळी परंपरा आहे. सुवासिनींचा असलेला हा सण आहे. ग्रामीण भागात अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने या गौरीची मांडणी केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी कोणतेही शुभ कार्य सुरु करता येते. त्याला स्वतंत्र मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. अशा या पवित्र दिवशी केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, देवांच्या आणि पितरांच्या नावाने केलेले कोणतेही कर्म अक्षय किंवा अविनाशी होते, असे मानले जाते.

आखाजीला खान्देशात घरोघरी घागर भरली जाते. एका मोठ्या माठात (केशरी रंगाची घागर) पाणी भरून त्यावर छोटेसं मातीचे (लोटा) भांडं ठेवले जाते. त्यावर खरबुज, सांजोऱ्या, दोन आंबे ठेवतात. सण झाल्यानंतर नवीन माठ घरामध्ये वापरला जातो. पितरांचे श्राद्ध/ तर्पणविधी केला जातो. पुर्वजांचं स्मरण करुन एकेकाचे नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी त्यांना घास टाकला जातो याला आगारी टाकणे असेही म्हटले जाते. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई याचा नैवेद्य दाखविला जातो तसेच पित्तर म्हणून एका व्यक्तीला जेवणासाठी आमंत्रित केले जाते त्यांच्या जेवणानंतर घरातील सर्वं लोग जेवण करतात. पितरांना आखाजीच्या दिवशी आमरसाचा नैवेद्य दिल्यानंतरच बऱ्याच परिवारामध्ये आंबे खायला सुरूवात करतात आजही अशी अनेक परिवारांमध्ये ही पद्धत सुरू आहे.  

रब्बी पिकाचा हंगाम शेतकऱ्यांच्या घरात आलेला असतो. खरिपाच्या पेरणीच्या दृष्टीने शेतं तयार करण्याची लगबग लगेचच सुरु होणार असल्याने त्याची पूर्व तयारी करण्याचा हा दिवस असतो. शेत जमीनाचा पोत चांगला रहावा म्हणून नांगरणी केलेली असते कारण उन्हामुळे जमिन चांगलीच भाजलेली असते त्यातील काडी कचरा वेचून जाळला जातो, शेतांची बांध-बंदिस्ती केली जाते. थोडक्यात शेतीची मशागतीची कामे लवकरच सुरु होणार असतात. वर्षभर घरच्या दूध-दुभत्यांसह, जनावरे व शेती कामांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सालदारांचा हिशोब या दिवशी केला जातो व नवीन वर्षासाठीच्या आगाऊ सालदाराची निश्चितीही याच दिवशी केली जाते. त्याला नवीन कपडे दिले जातात. नवीन वर्षासाठी काही आगाऊ रक्कमही दिली जाते. एक प्रकारे शेतमजुरांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणता येईल. सालदाराने आपल्या पूर्वीच्या मालकाकडे काम सुरु ठेवायचे का अन्य कोणाकडे जायचे याचे स्वातंत्र्य त्याला असते. त्यांचा वर्षभर द्यावयाचा मेहनतांना अन्य गोष्टी या दिवशीच ठरविल्या जातात. रोख रकमेसह शेतीतून येणाऱ्या शेतमालाचा काही वाटा त्याला देण्याचे यात निश्चित होत असते.या दिवशी शेतीची कामे बंद असली तरी आगामी काळातील शेती कामाच्या नियोजनाची तयारी सुरु असते. अलीकडच्या काळात खेड्यांमध्ये पत्ते व जुगार खेळण्याचे प्रमाणही वाढलेले आपल्याला दिसते. 

सण म्हटल्यानंतर खानपानाची एक विशेष रेलचेल आपल्याला अनुभवास येते. आखाजीच्या सणाच्या निमित्ताने माहेरवाशीण व पै-पाहुणे घरी येणार असल्याने दिवाळीप्रमाणेच फराळाचे पदार्थ बनविले जातात. त्यामुळे काही ठिकाणी आखाजीला खान्देशातील दिवाळी असेही म्हटले जाते. खापरावरची पुरणपोळी, सांजोरी, करंजी, आंब्याचा रस, कुरडया, पापड यांचा विशेष बेत केला जातो. सहभोजनाचा व ग्रामीण पद्धतीने घरातीलच महिला वर्गाने बनविलेल्या या पदार्थांची चव खासच असते. 

झाडाला बांधलेल्या झोक्यांसह विविध पारंपरिक खेळ आणि गाण्यांच्या माध्यमातून माहेरवाशिणी आपलं मन रिझवत असतात. प्रत्येक विवाहित स्त्री या दिवशी सणानिमित्ताने माहेरी आलेली असल्याने ती झोके खेळायला, गाणी गायला, झिम्मा-फुगडी खेळायला पूर्ण मुक्त असतात. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरु असतो. खान्देशी लहेजामध्ये विशेष गाणी गायली जातात. त्यांना विशेष असा गोडवा असतो. त्या नरम विनोद असतो, मार्मिक टिपण्णी असते. सासरचे सुखदुःख, आलेले अनुभव व पारंपारीक गाण्यांचा यात समावेश असतो. अलीकडच्या काळात या सणातील काही अनिष्ट रूढी व परंपरा बंद झालेल्या आपण पाहू शकतो. विशेषतः गौराई विसर्जनासाठी आलेल्या माता भगिनी नदीच्या पलीकडच्या तीरावरील महिलांना दगड मारतात किंवा शिव्या देतात या गोष्टी आता फारशा कुठे दिसत नाहीत. शिक्षण, यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण, संगणक, दूरदर्शन, मोबाइल यामुळे मानवी जीवन पार बदलून गेले आहे. त्यात बाराही महिने खाण्याचे सर्व पदार्थ रेडिमेड मिळत असल्याने या सर्व पदार्थांचे आकर्षण आता कमी होऊ लागले आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला आखाजी या सणात दिसून येतो मात्र अजूनही काही घरांमध्ये (विशेषत: खेडे गावात) हि परंपरा अखंडित सुरु आहे हे महत्त्वाचेच !

आनंद व उत्साहाचा हा सण झाल्यानंतर माहेरवाशिणींना सासरी जावे लागते. त्यावेळी त्यांच्या मनाची घालमेल होत असते. मात्र पुढच्या वर्षीच्या आखाजीची आताशा (प्रतिक्षा) बाळगून ती जड अंतःकरणाने सासरी जायला निघते. कवयित्री बहिणाबाई हा प्रसंग आपल्या कवितेतून फार सुंदर पद्धतीने मांडतात. 

चार दिस चार दिस
इसावल्या घरात जी
आहे पुढे आहे पुढे
शेतीची मशागत जी ।
सण सरे आस उरे
आखजी गेली व्हय जी
सांग सई सांग सई
आखजी आता कही जी?

सर्व वाचकांना आखाजीच्या (अक्षय्य तृतीये) मनापासून शुभेच्छा !

गिरीश कुळकर्णी, जळगाव 
९८२३३३४०८४

Thursday, 28 April 2022

जगी हा खास वेड्यांचा, पसारा माजला सारा... प्रशांत मोराणकर !


हि दुनिया एक आगळीवेगळी गोष्ट आहे आणि त्यातील माणसे हे तर अजब रसायन आहे. वीर वामनराव जोशी यांची एक अशीच रचना ज्यात त्यांनी माणसांबद्दल फार मार्मिकतेने लिहिले आहे. प्रत्येकाचे जीवनाचे एक विशिष्ट असे ध्येय आणि त्या ध्येयासाठी वेड्या झालेल्यांचा जगभर पसारा आपल्याला दिसतो. मला या वेड्यांबद्दल नेहमीच कुतुहूल वाटत राहिले आहे. त्यात एकही अपवाद सापडत नाही. प्रत्येक व्यक्तीमधील चांगुलपणाला शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सर्वत्र वेडेच दिसतील अर्थात त्यासाठी प्रथम आपण वेडे असावे लागते. आज हे सर्व लिहिण्यामागचे कारण म्हणजे माझा शालेय जीवनापासूनचा (मागील ४३ वर्षांपासून) मित्र प्रशांत याने काल आपला ५२ वा जन्मदिवस साजरा केला. गेल्या ४-५ वर्षांपासून धुळ्याचा संपर्क कमी झाला आणि प्रशांतच्या भेटीही ! असे असले तरी काल सकाळी सकाळी त्याच्याशी बोललो आणि काल परवा तर भेटलो असेच वाटले. 

प्रशांत जगाच्या वेड्यांच्या पसाऱ्यातील एक ! एकत्र व्यावसायिक कुटुंबात वाढलेल्या व पुढे व्यावहारिक पातळीवर स्वतंत्र झाल्यानंतर अगदी तोच वसा आणि वारसा जपत... त्याला नवीन आयाम व परिमाण  देत अक्षरश: घोडदौड करीत त्याच्या समर्थ पुढाकारात आज तोच व्यवसाय मोठ्या अभिमानी स्थितीत नेतांना आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या अतिशय आव्हानात्मक अशा कालखंडात आपल्या कंपनीचा टर्नओव्हर दुप्पट झाल्याचे तो अतिशय अभिमानाने सांगत होता. आता नाशिक सारख्या महानगरातही कार्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. अतिशय आशादायी स्थितीत संपूर्ण कुटुंबाला सोबत घेत मोराणकर कुटुंबाची अभिमानी पताका उंचावत नेण्याचे वेड कुठेही कमी झालेले नाही. मी खरोखर भाग्यवान आहे माझ्या जीवनात अशी 'वेडी' माणसेच आली. 

बालविश्वात कट्टी असलेला हा मित्र व मी सायकलवर सगळीकडे मात्र सोबत जात असू तेही एकमेकांशी न बोलता ! त्याच्याशी कट्टी असली तरी त्याच्या घरी दिवसातून किमान एक चक्कर कधीही चुकली नाही. नोकरी निमित्ताने जळगावला आल्यानंतर अनेक दिवस धुळ्याला गेलो कि प्रथम प्रशांतच्या घरी नंतर माझ्या घरी. प्रशांतच्या घरून जेवण न करता कधीच आलो नाही. त्यांच्या मोठ्या परिवाराचा एक सदस्य होण्याचे भाग्य मला लाभले. आजही त्यांच्या १०० एक सदस्यांच्या पारिवारिक समूहाचा मी सदस्य आहे त्यातील सर्व तेव्हढ्याच प्रेमाने वागतात. सर्वत्र असतांना त्यात वेगळंपण असणं आणि कुठेही नसतांना दुर्मिळतेने असणं हे या परिवाराचं वैशिष्ट्य आहे. एकमेकांना ज्याची त्याची जागा (space) देत ऋणानुबंधांची जागा कायम राखणाऱ्या या परिवारातील सर्व सदस्यांना याचे श्रेय जाते. 
 

देशभक्ती व राष्ट्रप्रेमाचे संचित लाभलेल्या प्रशांतने सामाजिकतेचा मार्ग ठरवून अवलंबिला. आपली मानवी संवेदना कायम ठेवण्याची वृत्ती, निःस्वार्थ शब्दाला पर्यायी शब्द म्हणजे प्रशांत  ! आव्हानात्मक परिस्थितीत कुठेही न डगमगता, वास्तवाचे भान ठेवत व्यवहारी निर्णय घेण्याची हातोटी व त्याप्रमाणे अंमल हि प्रशांतची स्वभाव वैशिष्ट्य ! शून्यातून निर्माण केलेल्या विश्वाची जाणीव पुढच्या पिढीला देत सोबतच्यांसाठी आवश्यक ठिकाणी लागणारी कठोरता अंगीकारत भावनेच्या आहारी न जाता, आहे त्या परिस्थितीला काळ हेच उत्तर या बाण्याने पुढे जाण्याची वृत्ती कधीतरी कुणाला तरी अहंकारी वाटत असली तरी त्याचा लवलेश माझ्या या मित्रात नाही हे ठामपणे सांगू शकतो. व्यावहारिक तडजोड स्वीकारली तरी तात्त्विकतेच्या बाबतीत प्रशांत कधीही तडजोड करीत नाही. प्रसंगी दोन पावले मागे जाण्याची तयारी असते. "कर्म" हि पूजा नित्यनियमाने चौकटीतून करायची असते हे बाळकडू सात्विक व पवित्र वृत्तीच्या आपल्या वडिलांकडून त्याला मिळाली आहे. अप्रिय गोष्टींना मौनाने जिंकता येतं अशी अनेक उदाहरणे त्याच्या जीवनात स्वतः अनुभवली आहेत. 

महाविद्यालयीन जीवनात व त्यानंतरही अनेकदा आम्ही दोघे धुळ्याच्या गणपती मंदिराच्या पुलावर अनेक रात्री उशिरापर्यंत घालविल्या आहेत. खूपदा अविरत न थांबता गप्पा मारत, बडबड करीत तर कधीतरी अंतर्मुख होऊन प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी केवळ सोबत बसून एकही शब्द न बोलता !  दोन व्यक्तींना आपल्या मनातील विचारांचा न बोलताही संवाद साधता येऊ शकतो ज्याला दूरसंवेदना, परचित्तज्ञान वा मनसंवाद म्हणता येईल असे बोलणे सुरु असते. आमच्या संवादाला कधी कोणत्याही कृत्रिम माध्यमाची, गिफ्टची वा अन्य कसलीही कधीही गरज भासली नाही. कधीही फोनवर बोलल्यानंतर अरे बरेचदा मनात आला फोन करावा, बोलावं, काय चालू आहे विचारावं पण गडबडीत राहिलं असे म्हटले तरी त्याचा मला कधी राग आला नाही कारण तो म्हणतो त्यावर माझा १०० टक्के विश्वास आहे. आमच्या मैत्रीला कसलेच बंधन नाही. हि मैत्री केवळ परस्परविश्वासावर टिकून आहे व राहील.  

पुढच्या पिढीतील सर्वांनाच व्यवसायाचे पाईक होण्याचा प्रशस्त मार्ग प्रशांतने निर्माण केलेला आहे. तेही तेव्हढयाच समर्थपणे प्रशांतचा विश्वास सार्थ ठरवत मार्गक्रमण करीत आहेत. मुलगी गौरी येत्या जून महिन्यात मुबई येथील NIIMS या सुप्रसिद्ध संस्थेतून फॅमिली ओन बिझिनेस व उद्योजकता या विषयात  एमबीए करणार आहे. पुतण्या अनुराग आपल्या आत्मविश्वासावर व धाडसाने समर्थ साथ देत आहे. भाऊ विवेक आपल्या मर्यादांवर मात करीत आपली भूमिका पहिल्या दिवसापासून बजावत आहे. दुसरा पुतण्या अद्वैत आता अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मुरड घालणे, वास्तव स्वीकारणे, सर्वांच्या आनंदासाठी वैयक्तिक गोष्टींना बाजूला ठेवणे यासारख्या गोष्टी प्रत्येकाने केल्या आहेत. या कुटुंबातील मातृशक्ती आपली अगत्यशीलता , उदारता व सात्विकतेने प्रत्येकाला कुटुंबाशी जोडून ठेवण्याचे काम करीत आहे. परमेश्वररूपी मात्या-पित्यांचा आशीर्वाद या सगळ्यांसाठी लागणारं बळ भरभरून देत आहे. एक माणूस एका आयुष्यात किती गोष्टी करू शकतो हे माझ्या मित्राकडून शिकले पाहिजे. त्याला जन्मदिनाच्या शुभेच्छा देत असतांना सकाळी साधलेला संवाद लवकर भेट घडवून आणणारा ठरेल. मित्रा, तुझे कार्य असेच सुरु राहू देत... पवित्र अंतःस्थ हेतू कायम तुला माणूस म्हणून मोठं करेल या शुभेच्छांसह थांबतो.... माझ्या या मित्राबद्दल, त्याच्या परिवाराबद्दल व परिवारातील सदस्यांबद्दल खूप काही लिहिण्यासारखं व बोलण्यासारखं आहे पुन्हा कधीतरी... 

Sunday, 3 April 2022

पुस्तक परिचय - राजबंदिनी

ब्रह्मदेशाच्या स्वातंत्र्याचा, लोकशाही प्रस्थापनेसाठीचा लढा व त्यात ऑंग सान स्यू ची व तिचे वडील ऑंग सान यांच्या योगदानाची माहिती असलेले हे ऐतिहासिक पुस्तक प्रेरणादायी ठरणारे आहे. २८६ पानांच्या या पुस्तकात सन १८२३ पासून ते २०१० पर्यंत ब्रह्मदेशातील अंतर्गत घडामोडी वाचावयास मिळतात. एकूण २५ प्रकरणातून हा इतिहास व विशेषतः ऑंग सान स्यू ची च्या अहिंसक लढाईचा परामर्श लेखिकेने उत्तमरीत्या घेतला आहे. ज्याला इतिहास विषयाची आवड आहे, ज्याला प्रेरणादायी पुस्तके वाचनाची आवड आहे, ज्यांना हुकूमशहा व त्यांची कार्यपद्धती, लोकशाहीचे फायदे व हुकूमशाहीच्या मर्यादा  समजून घ्यावयाची इच्छा आहे, अशा सर्वांसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणारे आहे.

शतकांपासून हिसेंचीच परंपरा असलेल्या ब्रह्मदेशात राजांनी, सत्ताधाऱ्यांनी, हुकूमशहांनी सर्व संभाव्य शत्रूंचा अतिशय निर्दयपणे नायनाट केला आहे असे आपल्या लक्ष येईल.  २ एप्रिल १९८८ रोजी आपल्या आईच्या खिन चीच्या आजारपणात सेवा सुश्रुषेनिमित्ताने मायदेशी अर्थात ब्रह्मदेशात परत आलेल्या स्यू चीला देशातील परिस्थिती आपल्या पित्याप्रमाणे देशसेवेसाठी सक्रिय करणारी ठरली. ने विन या हुकूमशहाच्या अन्याय, अत्याचार व नरसंहाराच्या कुकर्मांच्या कथा मानवतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. २६ वर्षे अनन्वित अत्याचाराची बळी ठरलेल्या जनतेसाठी आपण राजकारणात सक्रिय झाले पाहिजे असे ते इच्छा नसतानाही ठरविते. देशातील हिंसाचाराला ऑंग सान स्यू चीला एकच मार्ग व एकच उत्तर दिसत होते. तो म्हणजे भारतात महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढयासाठी अनुसरलेला अहिंसेचा मार्ग. त्यांची निर्भयता, सत्याग्रह आणि अहिंसा हि तत्त्वे तिला मायदेशातील स्वातंत्र्यलढा लढायला नैतिक, आत्मिक आणि आध्यात्मिक बळ देईल असा विश्वास होता. अहिंसा हेच हिसेंवरचं उत्तर असून त्याद्वारेच आपण जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवू शकू असा तिला विश्वास होता.

राष्ट्रपिता म्हणून ब्रह्मी लोकांच्या मनात अतिशय आदराचे स्थान मिळविलेल्या तिच्या वडिलांनाही काही काळ अहिंसेच्या मार्गाचं आकर्षण वाटलं होत. याच मार्गाने स्वातंत्र्यलढा नेण्याची त्यांची इच्छा होती. मात्र प्रत्यक्षात त्याने साया सानच्याच सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरलेला होता. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांती करून, दोन युद्ध लढूनच त्याने देशाचं स्वातंत्र्य मिळविलं होतं. सशस्त्र क्रांतीतून किंवा हिंसाचारातून झटपट मिळणाऱ्या यशाचं तरुणांना आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे मात्र हे यश चिरंतन नाही, हिंसाचारातून हिंसाचाराचाच जन्म होतो. देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचाराला अहिंसेनं जिंकता येतं आणि अहिंसेने मिळणारं यश शाश्वत असतं, हा विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा व त्यांना अहिंसेच्या मार्गानेच हा लढा लढायला उद्युक्त करायचं हे आपले नियत कार्य स्यू चीनं ठरवलं. त्याप्रमाणे कार्यरत राहिली.

स्यु चीचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. उणीपुरी ३२ वर्षे वय लाभलेल्या तिच्या वडिलांनी २० व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला आणि वयाच्या ३२ व्या वर्षी ब्रह्मदेशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदी विराजमान असतांना तिच्या वडिलांची १९४७ साली हत्त्या झाली. त्यावेळी स्यू ची अवघ्या दोन वर्षांची होती. आपल्या वडिलांचा फारसा सहवास न लाभलेल्या स्यू चीने मात्र त्यांचा देशभक्तीचा वारसा समर्थपणे चालवला त्यासाठी मध्यंतरीचा जवळपास ४० वर्षांचा कालखंड जावा लागला. त्यानंतर १९४८ मध्ये देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला. स्वतंत्र ब्रह्मदेशाचे पहिले पंतप्रधान नू नं आपला मित्र व सहकारी असलेल्या 'बोज्योक' (सरसेनापती) ऑंग सानला कधीही विसरला नाही. त्याच्या कुटुंबियांना योग्य आदरसन्मान दिला. त्याची पत्नी खिन चीला १९६० मध्ये भारतात राजदूत म्हणून नियुक्ती दिली. त्यामुळे स्यू ची चे दोन वर्षाचे शालेय व त्यानंतरचे पदवीपर्यंतचे शिक्षण दिल्लीत झाले. भारतीय संस्कृती, महात्मा गांधी व अन्य महानुभावांची ओळख तिला तेव्हाच झाली.

त्यानंतर शिक्षण घेण्यासाठी ती इंग्लंडमध्ये गेली. तेथील स्थानिक पालकांचा व मित्र मंडळींचा अतिशय अगत्यपूर्ण उल्लेख भावणारा आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असतांना तेथील संस्कृती व तरुणाईला आकर्षित करणाऱ्या अन्य गोष्टींचा स्यू चीवर प्रभाव पडला नाही. त्याउलट  तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल तिच्यासोबतच्या अनेकांना आकर्षण होते. इतरांना मदत करण्याची तिची संवेदनशील वृत्ती आईने दिलेला संस्कार याचा खूप मोठा पगडा तिच्या आयुष्यात दिसतो. ब्रह्मदेशातील जनता आपल्या मुलांकडे राष्ट्रपित्यांची मुलं म्हणून पाहणार याची आईला जाणीव होती. पित्याच्या गौरवाला साजेशी कामगिरी मुलं करून दाखवतील अशा रीतीनं तिने मुलांना वाढविले. शिक्षण दिले, संस्कार  केलेत. राष्ट्रपित्याच्या मुलांना वाढवण्याची जबाबदारी पार पाडणं हे त्यांच्या आयुष्याचं मुख्य उद्दिष्ट होतं.

तरुण वयात महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना प्रेमाचे विशेष आकर्षण असते. इंग्लंड मध्ये शिकत असतांना आधुनिक इतिहासाचा अभ्यासक मायकेलला स्यू ची आवडली होती व तो तिच्या प्रेमात पडला होता. मात्र स्यू चीने प्रेमास नकार देत आपली चांगली मैत्री कायमसाठी राहील असे सांगितले. कालांतराने तिच्या नकाराचं होकारात मत परिवर्तन होण्यासाठी तीन वर्षांचा कालखंड जावा लागला. मायकल या ब्रिटीश माणसाशी लग्न करण्यात पुष्कळ अडचणी होत्या. ज्या ब्रिटीश सत्तेविरूद्ध आपले वडील लढले, त्याच्या नागरिकाशी लग्न केलं आईला काय वाटेल ? लोक काय म्हणतील ? ते मला व माझ्या जोडीदाराला स्वीकारतील का ? या विवाहामुळे माझे स्वदेशी परतण्याचे दरवाजे तर कायमचे बंद होणार नाही ना ? अन देशाला तिची गरज कधी लागली तर? तिच्या वडिलांचा देशकार्याचा वारसा असा तिला सोडून देता येणार नव्हता. तीन वर्षांच्या या वैचारिक संघर्षानंतर आईचा विरोध पत्करून मायकेलशी लग्न केलं आणि ती संसारात रमली. त्यानेही स्यू चीला उत्तम अशी साथ देत तिला दिलेले वचन आयुष्यभर पाळले.

पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने न्यूयॉर्कला जावयाचे ठरविले. साहित्य विषयात विशेष रुची असली तरी  आपल्या आईच्या आग्रहाखातर राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी हे विषय तिने अभ्यासासाठी निवडले.  तेथे शारीरिक मर्यादांमुळे बसचा प्रवास झेपेनासा झाला. त्यासाठी तिने संयुक्त राष्ट्रसंघात सहाय्यक सचिवाची नोकरी मिळविली. विवाहानंतर आपल्या दोन मुलांचे संगोपन करीत असतांना आपले वडील ऑंग सान यांचे संक्षिप्त चरित्र तिने लिहिले. आपल्या वडिलांचा तिच्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव पडला. त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने तिला समजून घेता आले. त्यासाठी खूप खोलवर जाऊन तिने अभ्यास केला. आपल्या देशाचा इतिहास, ब्रिटिश राजवट, देशवासीयांच्या स्वातंत्र्य लढा या सर्वच गोष्टींचे आकलन तिला झाले. इंग्रजांच्या "फोडा आणि झोडा" या नीतीचा दूरगामी परिणाम देश स्वातंत्र्योत्तर काळातही भोगत होता. स्वातंत्र्या नंतरही तिच्या मातृभूमीला यादवीने ग्रासले होते. तेथील लष्कराने हर प्रकारे प्रयत्न करूनही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

४ जानेवारी १९४८ ला स्वतंत्र झालेल्या ब्रह्मदेशात १९५८ साली लष्करी राजवट सुरु झाली. त्यानंतर १९६० ते ६२ या दोन वर्षाच्या कालखंडात लोकनियुक्त सरकार आले मात्र पुन्हा एकदा लष्कराने देशाची सूत्रे आपल्या हाती घेतली ती अलीकडच्या कालखंडापर्यंत. "ने विन" या लष्करी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील लष्करी राजवटीने प्रदीर्घ काळ आपल्याच स्वकीयांवर अत्त्याचार केले. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी यांना अक्षरश: गोळ्या घालून ठार केले. या लष्करी राजवटीची सामान्यजनांवर इतकी प्रचंड दहशत होती ते परस्परांशी संवादही करू शकत नव्हते. देश आर्थिक दिवाळखोरीत निघाला होता. अन्नधान्याचा तुटवडा, बेरोजगारी या सारखे प्रश्न हाताळणे त्यांना शक्य होतं नव्हते. मात्र सतत उपभोगायचा उद्देशाने लोकशाही मार्गाचा अवलंब न करण्याचे धोरण कायम ठेवले. ऑंग सान व तात्कालिक जनतेने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी घेतलेल्या कष्टांची त्यांना जाणीव नव्हती. आपल्या वडिलांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य न मिळाल्याने ती उद्विग्न झाली.

१९८८ मध्ये आईच्या आजारपणामुळे ती मायदेशात परतली. लष्कराच्या विरोधात चालू असलेल्या जनतेच्या लढाईत तिने सामील व्हावे अशी स्थानिक जनतेची व वडिलांसोबतच्या सहकाऱ्यांची अपेक्षा होती. विचारांती तिने ते आपलं कर्तव्य म्हणून स्वीकारलं. अहिंसक मार्गाने लोकशाही प्रस्थापित करण्याचे कार्य तिने सुरु केले. नवा इतिहास निर्माण करीत असतांना तिच्या नेतृत्वाखाली एक नवीन पर्व सुरु झाले. त्यासाठीच ती कधीही मायदेशाबाहेर गेली नाही. कारण त्यानंतर लष्करी राजवटीने तिला देशात येण्यास बंदी घालण्याचा धोका ती जाणून होती. आपला पती मायकल मृत्युशय्येवर झुंजत असतांनाही त्याच्या भेटीसाठी स्यू चीने आपला देश सोडला नाही. अन्याय-अत्याचाराच्या भयानक संकटात असलेल्या आपल्या देशाचा विध्वंस तिला टाळायचा होता. १९९०च्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होण्यासाठी तिच्या नेतृत्वात राजकीय पक्षाची स्थापना केली. तिच्या पक्षाला ८० टक्के मते मिळूनही हुकूमशाही सत्तेवरून खाली उतरलीच नाही. अटकसत्र, गोळीबार, जाळपोळ, लुटालूट व स्थानबद्धता हि हुकूमशाहीची अस्त्रे होती. तिच्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सुमारे १४ वर्षे स्थानबद्धतेत (गृहकैदेत) काढली. अर्थात ती राजबंदी होती आणि त्यामुळे राजबंदिनी हे लेखिकेने दिलेले नाव चपखल वाटते.

एका मोठ्या अग्निदिव्यातून जाणाऱ्या या देशातील जनतेच्या पाठीशी ती मोठ्या हिमतीने उभी राहिली. जागतिक समुदायाच्या "लोकशाही पुनर्स्थापनेच्या" आवाहनाकडे लष्कर राजवटीने कायम दुर्लक्षच केले. तिच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करीत १९९१ चा नोबेल पुरस्कार तिला मिळाला आणि जगाला तिच्या देशातील जनतेच्या हालअपेष्टांची माहिती मिळाली. माझ्या नावावर हा पुरस्कार असला तरी यावर खरा हक्क या लढ्यात बळी गेलेल्या, हालअपेष्टा, छळ सोसणाऱ्या ब्रह्मी जनतेचा आहे, माझा नाही. नोबेल पुरस्कारामुळेच आमचा हा लढा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला याचा आनंद व समाधान असल्याचा तिने म्हटले. त्यानंतर तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मात्र ती स्थानबद्धतेतच होती. 

प्रभा नवांगुळ यांच्या ‘राजबंदिनी’ या स्यू चीच्या चरित्रामुळे आपल्या शेजारी असलेल्या, सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमुळे माहिती असलेल्या ब्रह्मदेशाची, तेथील राजकारणाची माहिती मिळाली. ब्रह्मदेशात आजही सर्वाधिक काळाची लष्करी राजवट चालू आहे. स्थानिकांचा तिथे लोकशाही यावी यासाठीचा लढा आजही सुरूच आहे. लष्करी राजवट किती निर्दयी व क्रूर असते आणि त्या पार्श्वभूमीवर आपण जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात राहतो याचा नक्कीच अभिमान वाटतो. एखादा बदल, परिवर्तन व क्रांती घडवून आणण्यासाठी आयुष्येची आयुष्य खर्च होतात. राष्ट्रप्रेमाने वेडी  झालेली माणसेच इतिहास घडवितात आणि त्यांचाच इतिहास लिहिला जातो असे या पुस्तकावरून नक्की म्हणता येईल. एखाद्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारणं आणि त्यासाठी आपलं सर्वस्व बहाल कारण खरोखर अवघड आहे. वर्षानुवर्षांची स्थानबद्धता, पती व मुलांची ताटातूट, पतीचं आजारपण व त्याच अंत्यदर्शन यातील एकही गोष्ट तिला तिच्या लोकशाहीसाठीच्या लढ्यापासून दूर नेऊ शकलं नाही. ऑंग सान स्यू ची हिचं राजबंदिनी हे चरित्र आपण सर्वांनी नक्की वाचावे असेच आहे.

पुस्तकाचे नाव : राजबंदिनी ऑंग सान स्यू ची हिचं चरित्र

लेखिकेचे नाव : प्रभा नवांगुळ

प्रकाशकाचे नाव : राजहंस प्रकाशन प्रा. लि

Thursday, 24 March 2022

गांधीतीर्थची दशकपूर्ती


सत्य, अहिंसा, शांततापूर्ण सह-अस्तित्व, संवर्धन आणि श्रमिकांप्रती प्रेम या गांधीजींनी जपलेल्या आणि आचरणात आणलेल्या मूल्यांवर आधारित आधुनिक जगाची स्थापना करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याच्या उद्देशाने व गांधीजींच्या जीवनाचा, विचारांचा आणि कार्याचा अद्भुत वारसा पुढच्या पिढीसाठी संक्रमित करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री भवरलाल जैन अर्थात मोठ्या भाऊंनी जगप्रसिद्ध अशा गांधीतीर्थची निर्मिती केली. दि. २५ मार्च २०१२ रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या हस्ते या भव्य अशा दूरदर्शी प्रकल्पाचा लोकार्पण सोहोळा करण्यात आला. आज या घटनेला १० वर्षे पूर्ण होत आहे. गांधीतीर्थच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने हा खास लेख आपल्यासाठी...

गांधीतीर्थची खास वैशिष्ट्ये -

१. जोधपूर येथील दगडापासून शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली ८१००० चौरस फुटांची हि शाश्वत रचना, हरित धोरणानुसार साकारण्यात आले आहे. गांधीतीर्थची वास्तू अतिशय सुंदर, रमणीय बाग, विस्तीर्ण हिरवळ (लॉन) आणि आंब्याच्या बागांच्या मध्यभागी आहे. 

२. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या संग्रहालयात गांधीजींच्या जीवनातील घटना इंटरएक्टिव्ह टच स्क्रीन, बायोस्कोप, डिजिटल बुक्स, 3-डी मॅपिंग, म्युरल्स आणि अॅनिमेशनद्वारे सादर करण्यात येतात. 

३. सध्या संग्रहालयातील माहिती इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित केली जाते.

४. वाजवी किमतीची पुस्तके, खादीचे कपडे (पुरुष, स्त्रिया आणि मुलांसाठी), आरोग्य आणि स्वच्छता उत्पादने, हस्तकला आणि विविध प्रकारच्या भेटवस्तूंची विक्री करणारे स्मरणिका दुकान (Souvenir Shop) येथे आहे. 

५. २००० चौरस फूट व्हॉल्टसह अत्याधुनिक सुविधेसह ग्रंथालय आहे. 

६. कागदपत्रांच्या जतनासाठी अत्याधुनिक डिजिटायझेशन लॅब येथे आहे. 

७."विस्तृत वर्गखोल्या, अभ्यास आणि संवादासाठी कॉन्फरन्स हॉल; सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अॅम्फिथिएटर" आहे. 

८. अतिथींसाठी खोल्या आणि उत्तम शाकाहारी जेवणाची सोय आहे. 

गांधी रिसर्च फाउंडेशन (GRF) ची स्थापना आदरणीय मोठ्या भाऊंनी २००७ मध्ये केली. गांधीजींच्या अहिंसा (अहिंसा), अपरिग्रह (अपार्जनशीलता) आणि अनेकांतवाद (अनिरपेक्षता/बहुपक्षीयता) या मूलभूत तत्त्वांचा त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकार केला होता. या शाश्वत मूल्यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांनी या गांधीवादी मूल्यांच्या महत्त्वाच्या प्रासंगिकतेवर भर दिला, विशेषत: सध्याच्या काळातील  हिंसाचार, राजकीय हुकूमशाही, भौतिकवाद आणि अनैतिकता, अध्यात्माचा अभाव यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला गांधीजींची मूल्ये हेच उत्तर आहे असा त्यांना विश्वास होता. 

GRF मध्ये, गांधीजींच्या जीवनाला आदर्श मानून गांधी तत्त्वज्ञानाचा शक्य तितक्या साध्या आणि प्रभावी पद्धतीनेप्रसार केला जातो. आजच्या पिढीला प्रेरणा देण्याचे आणि व्यक्तींच्या जीवनावर गांधी विचारांचा  प्रभाव टाकण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.  ग्रामीण भागातील बांधवांचे जीवन सशक्त व आत्मनिर्भर  करण्यातही संस्था कार्यरत आहे. 

गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या मोठ्या भाऊंनी जल व्यवस्थापन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. एक अनुकरणीय सामाजिक उद्योजक म्हणून, अहिंसा आणि सत्याच्या मूल्यांनी प्रेरित होऊन, त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी ट्रस्टीशिपमध्ये आपला व्यवसाय चालवला. ते एक परोपकारी व सामाजिक संवेदनांचे प्रतीक होते. त्यांनी जळगाव शहरात शाळा, नेत्र रुग्णालय, क्रीडा संघटना आणि धर्मादाय गृहांची निर्मिती केली. शहराबाहेरील भागात त्यांनी सार्वजनिक वापरासाठी सिंचन धरण बांधले. त्यांच्या अफाट सामाजिक योगदानामुळे, भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात पद्मश्री पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले होते. 

असे मानले जाते की, भारताच्या धार्मिक-तात्विक परंपरेनुसार, जेव्हा जेव्हा समाजात असंतुलन होते, तेव्हा तो समतोल सुधारण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारची ऊर्जा अस्तित्वात येते. आपण त्या उर्जेला देव म्हणू शकतो किंवा आपल्याला योग्य वाटेल ते नाव देऊ शकतो. जर आपण इतिहासात, विशेषत: २० व्या शतकाच्या सुरूवातीस मागे वळून पाहिले, तर आपल्याला लक्षात येते की पाश्चात्य जीवनशैलीमुळे पूर्वेकडील सांस्कृतिक, नैतिकता आणि नैतिक मूल्ये धोक्यात आली आहेत. या टप्प्यावर, जेव्हा पाश्चात्य वर्चस्वाने जगावर आपले वर्चस्व गाजवले, तेव्हा गांधी नावाच्या व्यक्तीने पौर्वात्य मूल्यांच्या सद्गुणांनी प्रेरित होऊन जगाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली.

दक्षिण आफ्रिकेतील भारतीय समाजाचे वर्णभेद, अन्याय, शोषण आणि भेदभावाविरुद्ध २१ वर्षे अथक संघर्ष करत असताना, गांधीजींनी शोषण आणि अन्यायाविरुद्ध सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांच्या बरोबरीने लढण्याचे कल्पक तंत्र विकसित केले. अन्यायाविरुद्ध प्रेमाने लढता येते आणि अनुनयाने अन्याय करणाऱ्याचे मनावर प्रभाव टाकून परिवर्तन घडवून आणता येते हा संदेश गांधीजींनी मानवतेला दिला आहे.

मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे मोठ्या भाऊंवर गांधी विचारांचा खोलवर प्रभाव होता. मुळात जैन कुटुंबात जन्माला आल्याने त्यांना लहान वयातच अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आणि अनेकांत (ईश्वराचे एकत्व) या गुणांची ओळख झाली यात होती. कालानुरूप अवलोकन करीत असतांना, स्वतःचे आत्म निरीक्षण करीत असतांना आहार-विहार, आचार-विचार यामधील अंतर कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. गांधीजींनी आपल्या जीवनात केलेल्या विविध प्रयोगांद्वारे आपल्याला जीवन विषयक दृष्टिकोन लाभला, त्यामुळेच गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन मोठ्या भाऊंनी त्यांना आदर्श म्हणून स्वीकारले.

परिणामी, गांधीजींचे जीवनकार्य आणि त्यांची दृष्टी भविष्यकाळासाठी जतन करता यावी म्हणून काही तरी भरीव निर्माण करण्याची तीव्र इच्छा त्यांनी अनेक वर्षे जोपासली आणि याच स्वप्नाने त्यांना आपल्या व्यवसायाची गणिते सोडविताना मार्गदशन लाभले. गांधीजींच्या विचारांनी त्यांना जीवनातील समस्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक धैर्य आणि दृढनिश्चय प्रदान केला. मुंबईतील मणिभवनाला भेट दिली तेव्हा त्यांना आपल्या जिव्हाळ्याच्या प्रकल्पासाठी दृष्टी लाभली. गांधीजींच्या समृद्ध अशा तत्वज्ञानाची स्वतःला ओळख करून घेण्यासाठी, त्यांनी गांधीजींच्या प्रमुख वारसा स्थळांना (साबरमती, वर्धा, दिल्ली इ.) भेट दिली आणि त्यांच्या दुर्लक्षित अवस्थेतील भौतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने (वस्तूंच्या स्वरूपात, त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्याबद्दलचे फोटो, चित्रपट, इ.) व भावी पिढ्यांच्या फायद्यासाठी या अमूल्य वारश्याचे 'उद्धार' करण्याचे त्यांनी ठरवले.

गांधीजींच्या उदाहरणावरून प्रेरणा घेऊन जीवन व्यतीत करणारे न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी गांधीतीर्थचे प्रथम अध्यक्ष म्हणून लाभले व या प्रकल्पाला वास्तवात आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याची मोठ्या भाऊंची प्रामाणिक विनंती मान्य केली हि सर्वात मोठी उपलब्धी म्हणता येईल. एखाद्या श्रीमंताने आपली संपत्ती समाजासाठी ट्रस्टीशिपमध्ये ठेवली तर संपत्ती मिळवणे हे समाजसेवा करण्यासारखे आहे. या गांधीजींच्या विचाराने प्रेरित होऊन गांधीतीर्थ बांधण्यात आले आहे. 

आपला महत्वाकांक्षी प्रकल्प मोठ्या भाऊंनी "गांधीजी" या असामान्य माणसाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. अतिशय सुंदर, रमणीय आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल अशा वातावरणातील गांधीतीर्थ उच्च क्षमतेच्या विद्वानांना, तरुण जिज्ञासू मनांना व गांधी अभ्यासकांना येथील वाचनालय, संग्रहालय आणि प्रदर्शनाला भेट देण्यास आकर्षित करीत आहे. केवळ या व्यक्तींच्या जीवनातच नव्हे तर जागतिक परिस्थिती सुधारण्यातही या जगप्रसिद्ध अशा वास्तूचे मोठे योगदान अधोरेखित होत आहे. गेल्या दहा वर्षात ६२ राष्ट्रांमधील सुमारे ५ लाख लोकांनी गांधीतीर्थला भेट दिली आहे. सर्व वाचकांना विनंती आहे कि, गांधीजींच्या मानवतेच्या दृष्टीकोनातून प्रेरित झालेल्या या उदात्त प्रयत्नात यावे आणि आपणही सहभागी व्हावे.

आपण गांधी विरोधक असालही मात्र आपण गांधीजींच्या एकादश व्रताचे वाहक आहात असे मला वाटते  कारण त्यातच माणसाच्या माणुसकीची, संवेदनशीलतेची खरी ओळख आहे. कोरोना सारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर गांधीजींच्या एकादशव्रताची कालातीतता दिसून येते. जीवनातील आव्हानांना, मानवनिर्मित संकटांना गांधी विचारांशिवाय तरणोपाय नाही असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते. आपण सर्वांनी सहकुटुंब, मित्र परिवारासह एकदा अवश्य भेट द्यावी. असामान्य, अविश्वसनीय कार्यकर्तृत्वाचा धनी असलेल्या महात्म्याला एक व्यक्ती म्हणून प्रामाणिकपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा हे दशकपूर्तीच्या निमित्ताने विनम्र जाहीर आवाहन...

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कार्याची अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण  www.gandhifoundation.net या वेबसाईटवर अवश्य भेट द्या...


गिरीश कुळकर्णी


Monday, 21 March 2022

जल संवर्धन काळाची गरज !


आज २२ मार्च ! जागतिक जल दिन... जीव सृष्टीच्या अस्तित्वासाठीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. अलीकडच्या वेगवेगळ्या सर्वेक्षणातून व संशोधनातून लक्षात आलेल्या काही गोष्टी खास आपल्या माहितीसाठी येथे देत आहे. 

केंद्रीय जल आयोगानुसार, भारताची वार्षिक पाण्याची गरज 3,000 अब्ज घनमीटर आहे, तर दरवर्षी सरासरी 4,000 अब्ज घनमीटर पाऊस पडतो. समस्या अशी आहे की 1.3 अब्ज लोकांचा देश आकाशातून मिळणाऱ्या तीन चतुर्थांश पाण्याचा वापर करू शकत नाही.

बदलत्या हवामान पद्धती आणि वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे भारतावर पाण्याचा ताण आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या (2017) आकडेवारीनुसार, 700 पैकी 256 जिल्ह्यांनी भूजल पातळी 'गंभीर' किंवा 'अति शोषित' नोंदवली आहे.

1.38 अब्ज लोकसंख्येसह भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. या लोकसंख्येपैकी 6% पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित पाणी मिळत नाही आणि भारतातील सुमारे 15% लोक उघड्यावर शौच करतात.

भारतातील जलसंकट हे अनेकदा सरकारी नियोजनाचा अभाव, वाढलेले खाजगीकरण, औद्योगिक आणि मानवी कचरा, सरकारी भ्रष्टाचार यातून निर्माण झालेले आहे. याशिवाय, भारतातील पाण्याची टंचाई आणखी तीव्र होण्याची अपेक्षा आहे कारण 2050 पर्यंत एकूण लोकसंख्या 1.6 अब्जपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

२०३० पर्यंत भारतीय लोकसंख्येपैकी किमान ४०% लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही, असे नमूद करून NITI आयोगाच्या अहवालात पाण्याची चिंता अधिक स्पष्ट केली आहे.

जागतिक पर्जन्यमानाच्या जवळपास 4 टक्के पाऊस भारतात पडतो आणि प्रति व्यक्ती प्रति वर्ष पाण्याच्या उपलब्धतेच्या बाबतीत जगात 133 वा क्रमांक लागतो. 

वनस्पती आणि पिकांच्या वाढीसाठी पाणी आवश्यक असल्याने कृषी क्षेत्रात पाण्याचे संवर्धन आवश्यक आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे कमी होत जाणारे पाण्याचे प्रमाण आणि क्षारतेचे प्रमाण वाढल्याने ही बाब गंभीर बनली आहे.

गंगा-ब्रह्मपुत्रा आणि सिंधू सर्वात मोठी जल स्रोत आहेत कारण ते जवळजवळ निम्म्या देशाचा निचरा करतात आणि 40% पेक्षा जास्त उपयुक्त पृष्ठभागाचे पाणी हिमालयाच्या पाणलोटातून महासागरात वाहून नेतात. भारतातील 70% पेक्षा जास्त नद्या बंगालच्या उपसागरात वाहून जातात, मुख्यतः गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांचा भाग म्हणून.

वरील सर्व गोष्टी वाचल्यानंतर आपण प्रत्येकाने पाण्याबाबत जागृत होण्याची आवश्यकता आहे. या गोष्टी केवळ आपल्या पुरत्या मर्यादित न ठेवता आपल्या शेजारी-पाजारी व्यक्तींनाही याबाबत जागरूक करणे आपल्या सर्वांचे काम आहे. पाण्याचा सुयोग्य वापरासह अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत ज्यामुळे पाण्याची बचतही होईल आणि त्याचे संरक्षणही ! 

पाणी या क्षेत्रात चाकोरीबाहेर जाऊन आपल्या जीवनाचे ध्येय समजून काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. आपणही य सर्व मंडळींकडून प्रेरणा घेणे अत्यावश्यक आहे. प्रचंड जलप्रदूषण, प्रदीर्घ दुष्काळाचा प्रकोप, पाण्याची पातळी, पाण्यापासून होणारे रोग आणि बरेच काही - भारतातील पाणीटंचाईवर चर्चा करताना आपण सतत ऐकतो अशा अनेक समस्यांपैकी या काही आहेत. देशाच्या ग्रामीण भागात राहणारे लोक आहेत जे दररोज प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत सुरक्षित पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी मैलो न मैल चालत जातात.  असे अनेक शहरी रहिवासी आहेत जे मर्यादित पाणीपुरवठा आणि पिण्याच्या पाण्याच्या निकृष्ट दर्जात अडकले आहेत. अहवालानुसार, भारतातील 21% संसर्गजन्य रोग असुरक्षित पाण्याशी संबंधित आहेत आणि देशातील 75% नद्या आणि तलाव इतके प्रदूषित आहेत की त्यांचा वापर पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठी केला जाऊ नये.

असे असले तरी, संपूर्ण देश पाणीटंचाईशी झुंजत असताना, देशभरात असे अनेक आहेत जे जलसंवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ते विहिरी बांधत आहेत, जलसंधारणाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करत आहेत, चेक डॅम बांधत आहेत आणि पिण्याचे शुद्ध पाणी गरजूंपर्यंत पोहोचेल याची खात्री करत आहेत. ज्या काळात 69 कोटी भारतीयांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही, अशा वेळी देशाला अशा अनेक जल योद्ध्यांची देशाच्या प्रत्येक भागात गरज आहे.

१) अमला रुईया या मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्तीने पारंपारिक पाणी साठवण तंत्राचा वापर करून आणि चेक डॅम बांधून राजस्थानमधील १०० हून अधिक गावांमध्ये अनेकांचे जीवन बदलले आहे. राजस्थानच्या दुष्काळग्रस्त भागात पाणी वाचवण्यासाठी शाश्वत आणि कायमस्वरूपी उपाय तयार करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आकार चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. आत्तापर्यंत, ट्रस्टने राजस्थानमधील १०० गावांमध्ये २०० चेकडॅम बांधण्यात मदत केली आहे आणि 2 लाखांहून अधिक लोकांना प्रभावित केले आहे. 

२) आबिद सुरती ड्रॉप डेड फाऊंडेशन नावाची स्वयंसेवी संस्था चालवतात, जी मुंबईतील घरांमध्ये पाण्याची नासाडी करणाऱ्या गळतीसारख्या प्लंबिंगच्या समस्यांची काळजी घेऊन लाखो टन पाण्याची बचत करत आहे. ८० वर्षांचे आबिद एक स्वयंसेवक आणि प्लंबरच्या टीमसह हे सर्व विनामूल्य काम विनामूल्य करतात. २००७ मध्ये, फाऊंडेशनच्या अस्तित्वाच्या पहिल्या वर्षी, आबिदने मीरा रोडवरील १६६६ घरांना भेटी दिल्या, ४१४ गळतीचे नळ मोफत दुरुस्त केले आणि सुमारे ४.१४ लाख लिटर पाण्याची बचत केली. त्यांच्या कार्याने आता देशभरातील इतर लोकांना त्यांचे उदाहरण त्यांच्या शहरांमध्ये पाणी वाचविण्यात मदत करण्यास प्रेरित करीत आहे.

३) अयप्पा मसागी यांनी हजारो लोकांचे जीवन पावसाच्या पाण्याचे संचयन आणि जलसंधारणाचा सराव करून बदलले आहे. या कर्नाटकातील रहिवासी असलेल्या अय्यप्पांनी गदग, कोरड्या प्रदेशातील एका गावात सहा एकर जमीन खरेदी केली, जिथे त्यांनी रबर आणि कॉफीची लागवड सुरू केली, हे सिद्ध करण्यासाठी की कितीही पाऊस पडला तरीही ही पिके घेता येतात. तथापि, अनेक वेळा अयशस्वी झाल्यानंतर आणि अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, त्यांना आढळले की बोअरवेल पुनर्भरण करणे आणि बिगर सिंचन पद्धतींचा सराव करणे अधिक मदत करू शकते. या पद्धतींचा वापर करून, त्यानंतरच्या दोन वर्षांत त्याने चांगले पीक घेतले आणि नंतर शेजारच्या भागात या पद्धतींबद्दल संदेश पसरवण्यास सुरुवात केली. आज, अयप्पाने 11 राज्यांमध्ये हजारो संवर्धन प्रकल्प विकसित केले आहेत आणि देशात ६०० हून अधिक तलावांची निर्मिती केली आहे.

४) 'भारताचे जलपुरुष' म्हणून प्रसिद्ध असलेले राजेंद्रसिंह, ग्रामीण भारतातील पाणी पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांसाठी सर्वत्र ओळखले गेले आणि त्यांचे कौतुक केले गेले.  जेव्हा १९७५  मध्ये राजस्थानमध्ये आरोग्य केंद्रे सुरू करण्यासाठी राजेंद्रसिंह पोहोचले तेव्हा त्यांना जाणवले की तेथील लोकांना आरोग्य सेवेपेक्षा पाण्याची जास्त गरज आहे. त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांसोबत मातीचे बंधारे बांधण्याचे काम सुरू केले. जोहाड - पावसाचे पाणी गोळा करण्याचे एक पारंपरिक तंत्र. आजराज्यात सुमारे ८,६०० जोहाड आणि इतर तत्सम संरचना आहेत जे पाणी गोळा करतात आणि राजस्थानमधील १,०००  हून अधिक गावांना पाणी पुरवतात.

५) मालगुजार हे सुमारे दोन शतकांपूर्वी पूर्व विदर्भातील स्थानिक जमीनदार होते आणि त्यांनी पाणी साठवण्यासाठी अनेक टाक्या बांधल्या होत्या आणि सिंचनासाठी पाणी पुरवले होते. 1950 पूर्वी त्यांनी या टाक्या बांधल्या, मालकी आणि देखभाल केली, परंतु जमीनदारी प्रथा रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने टाक्यांची मालकी घेतली आणि टाक्या वापरणाऱ्यांकडून पाणी कर वसूल करण्यास सुरुवात केली. मालगुजारांनी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला, त्यानंतर १००० हून अधिक टाक्या वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिल्या. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिरीष आपटे यांनी २००८ मध्ये सुमारे दोन वर्षांच्या कालावधीत अशा पहिल्या टाक्यांची पुनर्स्थापना केली. यामुळे भूजल पातळीचे पुनर्भरण झाले आणि परिसरातील कृषी उत्पादन आणि मत्स्य उत्पादनात वाढ झाली आणि यामुळे अखेर जिल्हा प्रशासनाला भंडारा येथील सुमारे २१ मालगुझारी टाक्या पूर्ववत करण्यास प्रवृत्त केले.

हि यादी तशी फार मोठी आहे. त्यातील काही निवडक "पाणीवाल्यांची" थोडक्यात  माहिती खास आपल्या सर्वांसाठी दिली आहे. आपणही थोडे चाकोरीबाहेर जाऊन या समस्येचे समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा असे वाटते....

गिरीश कुळकर्णी

Monday, 28 February 2022

आव्हान नैसर्गिकतेचा वारसा देण्याचे !

तुम्ही आम्ही पालक - मार्च २०२२ 
माणूस हा भूतलावरील इतर प्राण्यांप्रमाणेच एक सजीव प्राणी आहे. माणसाव्यतिरिक्त अन्य सजीव प्राण्यांची जीवनपद्धती बहुतांश सारखीच आहे. उदरनिर्वाह वा जगण्यासाठी खाणे आणि स्वसंरक्षण करणे हि प्रत्येक सजीवाची प्राथमिकता आहे. यासाठी लागणारी कौशल्ये त्या-त्या सजीवांमध्ये उपजत असतात. काही उन्नत सजीवांमध्ये स्वतःसाठी निवारा बनविण्याचे कौशल्यही उपजत दिसून येते. माणसामध्येही हि कौशल्ये उपजत आढळतात. मात्र माणूस हा आपल्या बुद्धी कौशल्याच्या आधारे इतरांपेक्षाही अधिक विकसित होतांना दिसतो. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या मूलभूत गरजांमध्ये वाढच झालेली आपल्याला दिसते. माणसाच्या गरजा जेव्हढ्या जास्त तेव्हढे त्याचे जीवन आधुनिक व उच्च मानले जाते. मात्र ज्या व्यक्तीच्या मूलभूत गरजा कमी त्या व्यक्तीचे जीवन अधिक साधे व नैसर्गिक असते.  

माणसाच्या मूलभूत गरजांमधील वाढ अनुकरणप्रियतेतून आणि नित्य नूतनतेच्या ध्यासातून झालेली दिसते. स्वप्नांच्या दुनियेत रमणाऱ्या माणसाला जिज्ञासा, कल्पकता याचे वरदान बुद्धीद्वारे प्राप्त झाले आहे. माणसाच्या वैयक्तिक जीवनातील अमर्याद भौतिक गरजांच्या पाठलागांमुळे जागतिक पातळीवर अनेक व्यापक परिवर्तने अनुभवास येतात. भौतिक गरजांसोबतच माणसाला अभौतिक गरजांची कायम आस राहिली आहे. यात प्रेम, आधार, सोबत  यांचा समावेश करता येईल. मानवी मनाची भावनिक तृप्ती करण्यासाठी तो अनेक मार्गाने प्रेम, भीतीच्या चिंतेतून मुक्त होण्यासाठी आधार व जीवनविषयक समस्या सोडविण्यासाठी सोबत याच्या मागे आजन्म धावत राहतो. याला स्वातंत्र्य, समता आणि सहकार्य यांचीही जोड मिळाली.

तुम्ही आम्ही पालक - मार्च २०२२ 
व्यापारी  बाजारपेठांनी मानवी स्वप्नांना व त्याच्या मूलभूत गरजांची धडपड ओळखून आपल्या नाविन्यपूर्ण मार्केटिंगच्या आधारावर त्याला अधिकाधिक भोगवादी बनविण्यास बाध्य केले आहे. आपल्या भोवताली अशा स्वप्नांच्या मार्केटिंगचा सध्या सुकाळ दिसतो. माणसाच्या या भोगवादाने माणसाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेले दिसते. त्यामुळेच या अंकासाठी हा विषय निवडला असावा असे मला वाटते. आगामी काळात माणसाला मिळालेल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करुन हि पृथ्वी येणाऱ्या पिढ्यांना व अन्य सजीवांना जगण्यासाठी उपयुक्त राहील यासाठीच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच मानवाने आपल्या गरजा मर्यादित ठेवत नैसर्गिक जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा वारसा पुढे देण्याचे मोठे आव्हान आजच्या सामाजिक स्थितीवरुन लक्षात येते,

सध्याच्या काळातही सुशिक्षित महिलेच्या सोन्याच्या बांगड्यांना पॉलिश करुन चाकाकण्याचे आमिष दाखवून लुटले अशा बातम्या वाचनात येतात. जास्तीचे व्याज मिळण्याच्या आशेने केलेल्या गुंतवणुकीची मूळ रक्कमही मिळत नाही. भांडवली बाजारात केलेल्या गुंतवणुकीने देशोधडीला लागलेली अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. नोकरी लावून देण्याचे सांगत अनेकांना गंडा यासारख्या अनेक घटना आपल्या दैनंदिन जीवनात घडत असतात. असे घडते असे माहित असूनही लोकं तो मार्ग का स्वीकारतात ? हा माझ्यासारख्या माणसाला प्रश्न पडतो. माणसाला मिळालेल्या बुद्धी या दैवी देणगीचा वापर करतो का ? असाही प्रश्न मनात येतो.

खरं तर जीवनात सुखी व आनंदी व्हावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते. अर्थात जो श्रीमंत (पैशाने) असून ज्याच्या घरात भौतिकतेच्या सर्व वस्तू आहेत, घरातील सदस्याने केलेली मागणी पूर्ण करण्याची,  पाल्यांना उत्कृष्ट शाळा (जास्त फी घेणारी), चांगला क्लास, चांगले कपडे, चांगले शैक्षणिक साहित्य, चांगले वाहन, चांगला व आधुनिक मोबाईल यासर्व गोष्टी देण्याची आर्थिक क्षमता कुटुंब प्रमुखाकडे असावी त्यासाठी लागणारा पैसा निर्माण केला पाहिजे किंवा असलेला पैसा यासाठी खर्च केला पाहिजे अशी आपल्याकडील माणसांची धारणा आहे. त्यासाठी कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त पैसे मिळविण्याच्या शोधात तो असतो. त्या आशेनेच तो अनेकदा अनेक गोष्टींना बळी पडलेला आपल्याला दिसतो. प्रसंगी स्वतःचा जीव गमावून बसतो.

शेजारच्या घरात आलेली प्रत्येक गोष्ट माझ्या घरात असली पाहिजे अशी स्पर्धा सर्वत्र निर्माण झालेली दिसते. या स्पर्धेतूनच इप्सित सध्या करण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची वा तडजोड करण्याची आजच्या माणसाची दिसून येते. समाजात रूढ व प्रस्थापित असलेल्या अनेक चुकीच्या गोष्टींना, धारणांना तसेच स्वतःच्या गृहीतकांना चिकटून राहण्याची वृत्ती माणसाला भोगवादासाठी प्रवृत्त करते. त्यात समाजाच्या प्रतिष्ठेसंदर्भातील संकल्पना भर घालतांना दिसतात. माणसाची सारासार विचार करण्याची पद्धत व विवेकवादी दृष्टिकोन कुठेतरी हरविलेला दिसतो.

समाज जीवनातील सर्वच क्षेत्रे मार्केटिंगच्या भुलभुलैयांनी ढवळून निघाली आहेत. मानवतेच्या नात्याने सुरु करण्यात आलेल्या सामाजिक संस्थांनाही याची लागण मोठ्या प्रमाणावर झालेली दिसते अन  त्यामुळेच सामाजिक संस्थांची व त्यातील कार्यरत कार्यकर्त्यांबद्दलच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दिसते. पर्यायाने या क्षेत्रातील शुद्ध, सात्विक व अस्सल कार्यकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असलेले आपणास दिसते.

व्यापारी बाजारपेठेला माणसाच्या या अपरिहार्यतेची व मानवी स्वभावाची जाण असल्याने त्यांच्या भाव-भावनांना हात घालत आपले उद्दिष्ट साध्य करण्याची कोणतीही संधी घालविली जात नाही. त्यातही गरीब-श्रीमंतामधील वाढती दरी अर्थात आर्थिक विषमता या सर्व गोष्टींना खतपाणी घालण्याचे काम इमाने इतबारे करीत असते. माणसाला स्वत्वाची ओळख होणे यानिमित्ताने अगत्याचे वाटते. तसेच आपल्या जीवनविषयक संकल्पना स्पष्ट होण्याची आवश्यकता वाटते. पालकांनी आपला भूतकाळ न विसरता त्यातील योग्य वस्तुनिष्ठ गोष्टींचा, तत्वांचा, मूल्यांचा वारसा पुढील पिढीकडे संक्रमित करण्याची आवश्यकता आहे. योग्य ठिकाणी "नाही" म्हणण्याची सवय केली पाहिजे व पाल्यांना नकार पचविण्याचीही ! बाजारपेठेतील स्वप्नांच्या मार्केटिंगचा कितीही सुकाळ झाला तरी आपल्या भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या मूलभूत तत्वांचा अवलंब करीत भौतिक गरजा मर्यादित ठेवून नैसर्गिक जीवनशैलीचा स्वीकार करीत पुढील पिढीला कृतिशील संदेश या प्रश्नाचे उत्तर ठरेल असे वाटते.

गिरीश कुळकर्णी
9823334084