गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
टीव्ही व समाज माध्यमही मानसिक गोंधळातच भर घालतांना दिसत आहे. सावधानता बाळगणे व संयमित राहणे या दोन गोष्टी आपल्याला काही बंधने घालण्यासाठी प्रवृत्त करु शकतात अर्थात त्यासाठी आपणच आपल्या जीवनाकडे डोळसपणे पाहणे अगत्याचे ठरते. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हि या निमित्ताने एक संधी आहे. आपण आनंदी असणे हे कुटुंबीय, सहकारी व मित्रपरिवार यासाठी आवश्यक आहे. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो. कोवळ्या वयातील मुलांच्या आत्महत्या असो वा इस्रायल मधील युद्ध, कार्यालयातील कामाचा ताण असो वा कुटुंबातील आव्हाने असोत या सर्वांचा परिणाम आपल्यावर होतो व स्वाभाविकपणे तो आपल्या परिघातील प्रत्येकावर जाणते-अजाणतेपणी होत असतो. आपण कितपत आनंदी आहोत हे जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न स्वतःला विचारुन पहा.
![]() |
| Courtsey: Swapneela Sethia |
१. आपल्याला आपले आयुष्य हे बक्षीस आहे असे वाटते का ?
२. आपण स्वतःमधील व इतरांमधील चांगुलपणा शोधण्यासाठी सक्षम आहोत का ?
३. आपण आपल्या भविष्याबद्दल आशादायी आहात का ?
४. आपण आपल्या रोजच्या कामातून आनंद मिळवतो का ?
५. आपणास पदोपदी व क्षणोक्षणी आनंद वाटतो का ?
६. आपणास आपल्या जीवनात काहीतरी उद्देश व अर्थ आहे असे वाटते का ?
७. आपण कायम उत्साही असतात का ?
८. आपण इतरांना काही देतो त्यावेळेस आनंद मिळतो का ?
९. विपरीत परिस्थितीतही मी चांगले शोधू शकतो का ?
१०. दिवसभरातील भावनांचा स्वीकार व स्वागत करतो का ?
११. कुटुंबियांच्या व मित्रपरिवाराच्या नियमित संपर्कात असतो का ?
१२. जेव्हा परिस्थिती गंभीर असते त्यावेळेस पुढाकार घेऊन सहाय्य्यभुत होतो का ?
१३. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ वाटते का ?
१४. भूतकाळातील निराशा व दुःख विसरु शकतो का ?
पहा... विचार करा... बदल करा... आपल्या निरामय दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
काही व्यक्ती पद, प्रतिष्ठा, अनुभव यासर्वांनी सिद्ध असूनही साधी असतात. त्यांच्या जगावेगळ्या कार्यकर्तृत्वाने ती प्रेरणादायी ठरतात. या माणसांची असामान्य चिकाटी, मेहनत, धडाडी आणि प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या वटवृक्षाप्रमाणे कडक उन्हात निश्चल उभे राहून दुसऱ्यांना मात्र सावली देण्याची उदार वृत्ती बाळगून असतात. या व्यक्ती पाहिल्या, अनुभवल्या आणि आठवल्या तरी कविवर्य बा. भ. बोरकरांच्या कवितेतील या काव्यपंक्ती सहज मनी येतात.
यज्ञी ज्यानी देउनि निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर, नाही चिरा नाही पणती ॥
हे सर्व आठविण्याचे कारण म्हणजे जीवनात अनुभवलेले आदरणीय डॉ. प्रताप जाधव ! मागच्या शुक्रवारी (दि. ७ जुलै) पंढरपूर येथे असतांना रात्री उशिरा त्यांचे निधन झाल्याचे कळले. अस्वस्थ झालो. सकाळी उठल्यापासून सोबतच्या सहकाऱ्याजवळ त्यांच्या आठवणी जागवतच दिवस घालवला. मागील ८ दिवसात एक दिवस असा गेला नाही कि डॉक्टर साहेबांची आठवण आली नाही. 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' म्हणजे काय आणि कसे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टरसाहेब. या देव माणसाशी चांगला संपर्क होता. कधीही भेट झाली कि परिवारातील एक सदस्य या नात्याने सहज भावाने बोलत. बोलणंही अघळपघळ असायचे. त्यात विषय वा अन्य कसलेही बंधन नसायचे. कायम हसतमुख. पेशंट कितीही तणावात असला तरी त्याचा ताण सहज दूर करायचे. मागील २५ वर्षात किमान १० वेळा तरी मी हा अनुभव घेतला आहे. कधी वैयक्तिक उपचारासाठी तर कधी नातेवाईकांसाठी. एका बाजूला उपचार, ऑपरेशन सुरु तर दुसऱ्या बाजूला हसतहसत बोलणे... एक शब्द सहज यायचा होईल ना ! बघू... काही विचारलं कि हा शब्द ठरलेला.
पूर्वीच्या दवाखान्यात वा आत्ताच्या दवाखान्यातील एक पाटी मला प्रचंड आवडायची. उक्ती ला कृतीची जोड दिल्यावर माणसाची प्रतिमा उजळून निघते. ती पाटी होती... 'खोटी बिले मागून सरकारी तिजोरी लुटू नये.' समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल चीड होती व त्यावर प्रखर, सडेतोड प्रतिक्रिया द्यायचे. स्पष्टवक्ता तर होतेच पण त्याला कृतिशीलतेची जोडही होती. यात कुठल्याही प्रकारचा 'अहं' भाव नसायचा. डॉक्टरांचा व्यवहार निर्व्याज होता. 'देगा उसका भी भला न देगा उसका भी भला' अशी वृत्ती होती. मानवी जीवनाचे नीतिनियम व व्यवहार इतक्या सहजपणे पाळत अर्थात त्यामागे त्यांची तपस्या होती. सकाळी एकदा दवाखान्यात आल्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत ओपीडी व ऑपरेशन्स चालत. मी कधीही त्यांना थकलेले पाहिले नाही. रात्री १०.३० वाजता पण तोच उत्साह असायचा. आपल्या आजाराबद्दल वा दुखण्याबद्दल कधीही बोलत नसत. विषय काढला तरी टाळत. आईच्या 'नी' रिप्लेसमेंट्च्या वेळी व काकूंच्या हिप जॉईन्टच्या वेळी या शस्त्रक्रिया आपण लवकरच सुरु करीत आहोत असे म्हणालेत. मात्र त्यासाठी त्यांना वेळच मिळाला नाही.
कविवर्य बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे परी जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती... आणि म्हणून मला म्हणावे वाटते ...तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
एखाद्या आपत्कालीन परिस्थितीचा शिकार झालेल्या व्यक्तीला पुनर्जीवन मिळवून देणारे हे तंत्र असल्याने त्याला बेसिक लाईफ सपोर्ट असेही म्हणतात. एखादा व्यक्तीची जर श्वसन क्रिया आणि हृदयक्रिया बंद पडून तो बेशुद्ध झाला असेल तर त्याला देण्यात येणारा अतिमहत्वाचा प्राथमिक उपचार म्हणजेच बेसिक लाईफ सपोर्ट... यालाच CPR किंवा जीवन संजीवनी क्रिया असे म्हणतात. रामायणात हनुमानाने संजीवनी वनस्पती आणून लक्ष्मणाला जीवनदान दिले होते. तशाच प्रकारची आपत्कालीन परिस्थितील व्यक्तीला जीवनदान देणारे हे तंत्र आहे. १० पैकी ३ व्यक्तींना त्याचा फायदा होतो अर्थात त्यांना जीवनदान मिळते.
CPR कोणीही करू शकतो. त्याला फारशा कौशल्याची आवश्यकता नसते. कोणीही जाणकार अर्थात CPR कसे द्यायचे हे माहित असलेला व्यक्ती छातीवर दाब व कृत्रिम श्वास देऊ शकतो. पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्या व्यक्तीची भूमिका महत्वपूर्ण ठरते. CPR केव्हा करावे ? याचे सोपे उत्तर आहे एखादी व्यक्ती बेशुद्ध आहे, तिची हृदयक्रिया व श्वसन क्रिया बंद आहे. अशा व्यक्तीला CPR करावे. जेव्हा परिस्थिती फारशी सुरक्षित न वाटल्यास किंवा माणूस प्रतिसाद देत असल्यास व शरीर थंड व कडक झाले असल्यास CPR करू नये. आपण CPR आहे त्याच जागी सुरक्षितता लक्षात घेऊन देण्यास सुरुवात करावी. जीवन संजीवनी क्रिया अर्थात CPR हि माणसाला जिवंत ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रियांची शृंखला आहे. आठ वर्षावरील स्त्री-पुरुष यांच्यासाठी आपण हि क्रिया करू शकतो.
जीवन संजीवनी क्रियेत ३ महत्वाच्या पायऱ्या आहेत. त्याला CAB म्हणतात. म्हणजे Circulation (रक्ताभिसरण), Airway (श्वसनमार्ग) आणि Breathing (श्वासोच्छवास). रक्ताभिसरणासाठी छातीवर दाब द्यावा. यासाठी व्यक्ती जमिनीवर असावी किंवा एखाद्या कडक – सपाट पृष्ठभागावर असावी. रक्ताभिसरण अखंडीत सुरु राहण्यासाठी छातीवर दाब देणे आवश्यक आहे. छातीच्या (बरगडीच्या) सर्वात खालच्या हाडाच्या दोन बोटे वरती हा दान देणे आवश्यक आहे. हाताची दोन्ही बोटे एकात एक गुंफून, कोपर सरळ ठेवून दोन्ही खांदे दाब द्यावयाच्या व्यक्तीच्या छातीवर असावेत. साधारणपणे एका मिनिटात १००-१२० वेळा दाब दिला पाहिजे. प्रत्येक ३० दाबानंतर छोटा पॉझ घेऊन CPR सुरु ठेवणे. साधारणपणे २ मिनिटात १५० वेळा दाब दिला गेला पाहिजे. छातीवरील दाबाचा भाग ५ सेंटीमीटर दाबला गेला पाहिजे. दाब सोडल्यानंतर छाती पूर्ववत झाली पाहिजे. दाब देण्याची क्रिया व्यक्ती शुद्धीवर येई पर्यंत वा तसा प्रतिसाद देईपर्यंत सुरु ठेवणे अपेक्षित आहे अन्यथा अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता कमी असते. दाब देत असतांना तो मोजला पाहिजे. आपण काही वेळात आपण थकणार असल्याने आजूबाजूच्या कोणा व्यक्तीला CPR देण्यासाठी तयार करणे. संबंधित व्यक्तीचा कोणताही प्रतिसाद मिळाल्यास त्याला एका कुशीवर करावे.
साधारणपणे CPR केव्हा दिला जातो त्याची उदाहरणे -
१. एखाद्या व्यक्तीला जर विजेचा शॉक लागत असेल तर त्याचा श्वास अडकतो. तेव्हा CPR देऊन आपण त्या व्यक्तीला कदाचित वाचवू शकतो.
२. जेवताना कधी कधी अन्न अडकल्यानंतर CPR देता येतो.
३. गोळ्यांचा आकार मोठा असेल तर ते देखील अडकण्याची शक्यता असते. तेव्हा CPR देता येतो.
४. विषबाधा झाल्यानंतर ते विष बाहेर काढण्यासाठी CPR देतात.
५. पाण्यात जर कोणी बुडत असेल तर त्याला वर काढल्यानंतर छातीवर दाब देऊन पाणी बाहेर काढल्यानंतर तोंडातून श्वास देऊन CPR दिला जातो.
६. अपघातात जास्त रक्त वाहून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.
७. एखाद्याच्या डोक्याला मार लागून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.
८. चक्कर येऊन पडल्यास CPR देता येतो.
यासह अनेक परिस्थतीत वरील तीनही लक्षणे आढळून आल्यास CPR देत येतो.
रोटरी क्लब सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, के. डी. पाटील मल्टीस्पेशॅलिटीच्या डॉ. लीना पाटील, पार्ष क्लिनिकचे डॉ. कल्पेश गांधी व भूलतज्ज्ञ डॉ. धीरज चौधरी यांनी प्रत्यक्षिकाद्वारे संपूर्ण प्रक्रिया , तसेच वेगवेगळया परिस्थितीत घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन केले. तसेच अनेकांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. एका खेळाडूला सलग ६ तास CPR देऊन त्याला जीवनदान देण्यात आले. तसेच काश्मीरमध्ये झालेल्या एका अपघातातील ४ व्यक्तींना CPR देऊन जीवदान देण्यात आळायचे अनुभव उपस्थित डॉक्टरांनी कथन केले. चला तर मग आपणही आपल्या परिसरातील डॉक्टरांकडून माहिती घेऊन जीवनरक्षक होऊ या व इतरांना त्यासाठी प्रेरित करू या !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
![]() | |
| आमची शाळा - न्यू सिटी हायस्कुल, धुळे |
![]() | |
| आमच्या शाळेचे वैभव - गुरुजनवर्ग |
![]() |
| विक्षिप्तपूरची चित्तरसेना नाटकातील कलाकार |
विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अशा शिक्षकांचे असणे किती महत्वाचे असते हे आजच्या शैक्षणिक जीवनाकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते. अशा या महत्वाच्या वर्षांतील सुवर्ण काळाची नेहमीच अलीकडच्या काळाशी स्वाभाविकपणे तुलना होते. मी ती करणार नाही पण रानडे सरांसारख्या गुरुजनांनी अनेक पिढ्या आपल्या कर्तव्य कठोरतेने घडविल्या असे नक्की म्हणता येईल. कधी शिक्षाही केली असेल मात्र तक्रार नाही कारण त्या काळातील शाळेचा विद्यार्थी आज जो काही आहे त्यामागे या सर्व गुरुजनांचा वाटा महत्वाचा आहे. शाळेच्या प्रत्येक घटकावर त्यांचे नेहमीच नियंत्रण होते. शाळेतील विद्यार्थ्याला आपल्या पोटाच्या मुलांप्रमाणे वाढविणारी हि पिढी होती आणि म्हणूनच त्यांनी शिक्षा केली तरी पालकांची कधीही तक्रार नव्हती. आम्ही सर्व भाग्यवान आहोत, आम्ही न्यू सिटीचे विद्यार्थी आहोत, अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभिमान असणे हीच खऱ्या अर्थाने शिक्षणाची पावती म्हटली पाहिजे.
![]() |
| आमची १९८५ ची बॅच |
सेवानिवृत्ती नंतरही सर कार्यरत होते. संस्थेचे काही काळ सचिव म्हणून त्यांनी दायित्व सांभाळले. संस्कार भारतीसारख्या कलासाधकांच्या संस्थेचे ते प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते. नाट्य लेखन, दिग्दर्शन हे त्यांचे विशेष आवडीचे विषय होते. इ. ८ वी मध्ये असतांना श्री. रानडे सर, नित्सुरे सर व यु. आर. कुलकर्णी सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे नाटक बसविले. कोकणासारख्या दूरवर प्रदेशात बाल नाट्य स्पर्धेत शाळेचा सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक पटकविण्याची कामगिरी सरांनी केलेली आजही आठवते. गीता पठाण स्पर्धा, मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा यासारख्या उपक्रमातही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी ते प्रोत्साहन देत असत. वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन स्वतःचा वैयक्तिक वेळ देऊन सर्व शिक्षक मंडळी करीत असत त्यात श्री. रानडे सरांचा वाटा मोलाचा होता. विद्यार्थ्यांकडून मेहनत करुन घेत असतांना वेळ आणि पदरचे पैसे खर्च करतांना हे शिक्षक कधीही मागेपुढे पाहत नसत.
अलीकडे धुळ्याचा संपर्क कमी झाला असला तरी अधूनमधून सरांची भेट होत असे. एकदा तर सरांच्या घराजवळच भेट झालेली आठवते. शिष्य फाउंडेशनच्या माध्यमातून २०११ मध्ये झालेल्या स्नेहमेळाव्याप्रसंगी सर्व शिक्षकांची झालेली भेट आजही स्मरणात आहे. श्री. दाबके सरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमातही रानडे सरांची भेट झाली होती. अजिबात थकलेले वाटले नाही. तीच शरीर यष्टी, चेहऱ्यावरील तेज, जिवंतपणा बोलण्यातील सहज मिश्कीलता. सरांकडे पाहिल्यावर ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तजींची आठवण येत असे. शिक्षकांमधील परस्पर संवाद - संबंध व विद्यार्थ्यांची त्याच्या प्रति असलेली निष्ठा कृतार्थतेचा आनंद देणारे होते. अशा संस्थेच्या व तेथील शिक्षक वृंदांच्या ऋणातून उतराई होणे केवळ अशक्य मात्र त्यांना जीवन जगण्याचे धडे आत्मसात करुन त्याप्रमाणे जगणे हीच त्या महानुभावांनी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे मला वाटते.
र. गो. रानडे सरांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभेलच व त्यांच्या परिवाराला त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो. ॐ शांती शांती शांती !!
सोहन वाचन कट्टा ( मंगळवार १४ - ३ -२०२३) विषय - माझ्या आयुष्यातील "ती"
वय वर्ष १५ ते ४५ या माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या काळात "ती" माझ्या आयुष्यात होती. याच काळात तारुण्य, करिअर, लग्न, मुलं, संसार असतो. आयुष्यातील अजुन अनेक महत्त्वाच्या सुखदुःखाच्या गोष्टी याच काळात घडतात. खुपच धावपळ व धकाधकीचा हा काळ असतो. पण माझ्या अनुभवावरून मला असे वाटते की प्रत्येकीने त्या चार दिवसात जसा जमेल तसा आराम नक्कीच केला पाहिजे. कारण आधीच्या पिढीतील स्रियांना सक्तीची विश्रांती मिळत होती. आपले पुर्वज खरोखरच खुप हुशार होते. त्यांना शास्र, आरोग्य या सगळ्यांचा सखोल अभ्यास होता असे मला वाटते. आधीच्या पिढीच्या तुलनेत आम्ही या मैत्रिणीचे महत्त्व कमी केले असे वाटतेय. त्यामुळे आम्हाला व आमच्या पुढील पिढीला "ती"चा थोडा त्रास होतोय. पण खरे तर "ती"च्याभोवतीच स्रिचे आरोग्य बांधले गेलंय. तब्येत चांगली असेल तर "ती"चे येणे नियमीत होते. आपले मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम असेल तर "ती"चे येणे कधीच वेदनादायी होत नाही. आयुर्वेदात खुप बारकाईने हिचा विचार व अभ्यास केलाय, तो पण आपण विचारात घेतला पाहिजे. पुर्वीच्या काळात आरोग्यासह इतर सर्वच गोष्टींसाठी देवधर्माच्या भीतीचा आधार घेतला जायचा पण आताच्या काळात आपल्या मुलांना सर्व सायंटिफिक गोष्टींचा पुरावा द्यावा लागतो. आपण पण सगळ्या गोष्टींमागचे शास्र स्वतः समजुन घेऊन त्यांना सांगितले पाहिजे असे मला वाटते. तरच सगळ्याचा प्रवास सुखकर व आनंददायी होईल. "ती" सगळ्याच सखींची सखी आहे फक्त तिला थोडं अटेन्शन देण्याची गरज आहे. आपण सर्वजणी ते करूया. खरंच "ती" माझ्या आयुष्यात नसती तर खुप गोष्टी मला मिळाल्या नसत्या असे मला वाटते. त्यामुळे "ती" च्या बद्दल खुप खुप कृतज्ञता व्यक्त करते.
अलीकडच्या काळात या विषयावर मोकळेपणाने बोललं जातंय हि अतिशय सुखावह गोष्ट आहे. त्यामुळे या विषयाबाबतची जागरुकता वाढत आहे. पती-पत्नी नात्यात निर्माण होणारे ताण-तणाव यामुळे सुटण्यास नक्कीच मदत होते. नाटकाच्या सुरुवातीला आयुष्यातील सर्वच प्रश्नांना गुगल उत्तर देऊ शकत नाही आणि त्यांच्या आयुष्यात शोधलेले उत्तर प्रत्येकाच्याच आयुष्यात कामी येईल असे नाही. त्यासंबंधातील धोका मोकळेपणाने सांगितला आहे. वैवाहिक जीवनातील आनंद हिरावलेल्या नवऱ्याला त्या आनंदाकडे नेण्यासाठी बायको मुलाच्या सांगण्यावरुन मानसशास्त्रावरील गिल्ट थिअरीवर आधारित नाटक घडवून आणते आणि तिला त्यात अपेक्षित परिणाम मिळतो. या रचित नाटकात कार्यालयातील एका मुलीला आपल्या बॉसची गर्लफ्रेंड बनविले जाते. त्यातील वेगवेगळे टप्पे गाठत गोष्ट 'डेट' पर्यंत जाते. मात्र सामान्य कुटुंबातील नवऱ्याला आपण काहीतरी चूक करीत आहोत असे नेहमी वाटत राहते. त्या मुलीशी केलेल्या नकली प्रेमातून त्याला आपल्या असली प्रेमाची आठवण होते. मेमरी फुल झाली आणि त्यात आणखी काही नवीन भर घालायची असल्यास जुन्या आठवणी डिलीट मारणारा (विसरणारा) हा नवरा मात्र आपल्या आयुष्यातील त्या नाजूक क्षणांना विसरू शकत नाही आणि त्याला आपली चूक उमगते आणि आनंद पुन्हा मिळतो अशी साधारण कथा आहे.
वैशाख शु. तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला या उत्सवाला सुरुवात होते. या दिवशी बोरी नदीच्या वाळवंटात श्री संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर स्तंभारोहण केले जाते व यात्रेला सुरुवात होते. वैशाख शु ११ या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. सायंकाळी ७ वाजता वाडी मंदिरापासून रथोत्सवास सुरुवात होते. दोन लाकडी घोडे व सारथ्य करणारा अर्जुन यांची लाकडी प्रतिमा असेलेले रथ उत्तम प्रकारे सजविला जातो. भरजरी पोशाखात व सुवर्ण अलंकार घातलेली, हाती चांदीचा धनुष्य धारण केलेली श्री. लालजींची मूर्ती रथात ठेवतात. पुजारी दाम्पत्याकडून रथाची विधिवत पूजा होते. रथाच्या पुढे मान्यवर मंडळी, बेलापूरकर महाराजांची दिंडी तसेच श्री गुरु महाराज व त्यांची दिंडी आल्याशिवाय रथ हालत नाही. रथास ओटी लावण्याचा मान आहे. सर्व धर्मांना व जातींना एकत्र करुन हा श्री पांडुरंगाचा रथोत्सव टाळ मृदंगाच्या गजरात, सनई चौघडे यांच्या वाद्यात मार्गक्रमण करतो. प्रदक्षिणा रस्त्यावर भाविक भक्त आरत्या घेऊन बाहेर थांबतात. रथाच्या पाठीमागे मेणा असतो. त्यामध्ये श्री संत सखाराम महाराज यांच्या पादुका असतात व त्यामागे संत श्री प्रसाद महाराज पायी असतात. हि मिरवणूक मारुती मंदिराच्यापुढे पुलावर थांबते. त्या ठिकाणी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिरणारी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. नंतर रथ पैलाड मार्गे वाळवंटातून सकाळच्या वेळी पुन्हा वाडी चौकात पोहोचतो. तेथे पांडुरंची आरती होऊन रथोत्सवाची सांगता होते.
जय हरी ! रामकृष्ण हरि !!