Sunday, 16 April 2023

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा : आत्मिक समाधान देणारा अनुभव !

नर्मदे हर हर |

त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे,,,

शनिवार, दि. ८ एप्रिल २०२३ ! या दिवशी नर्मदा मैय्याने उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करवून घेतली. जानेवारी महिन्यात सौ. आदितीने १५ दिवसांची बसने नर्मदा परिक्रमा केली. तेव्हापासून मनात इच्छा होती आपणही नर्मदा परिक्रमा करावी. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ऐकून होतो. त्याबद्दलची माहिती गोळा केली आणि सहकारी डॉ. अश्विन झाला, डॉ. निर्मला झाला व नीर झाला या झाला परिवारासह दि. ८ एप्रिल रोजी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्याचे निश्चित झाले. हभप दादा महाराज जोशी व हभप मंगेश महाराज जोशी यांच्या आशीर्वादाने योजल्याप्रमाणे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली आणि पुढील वर्षीही करण्याचे मनात ठरविले. 

शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता तयारी करून प्रथम चोपडा तालुक्यातील खाऱ्यापाडाव या आदिवासी पाड्यावर गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित मुलींसाठीच्या व्यक्तिमत्व शिबिराचे उदघाटन केले, मूल्यशिक्षण विषयावरील एक सत्र घेतले. त्यानंतर भोजन आटोपून दुपारी ३ वाजेच्या सुमारास उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी गुजराथेतील तिलकवाडाकडे मार्गस्थ झालो. मध्यप्रदेशातील बडवानी मार्गे रात्री १० वाजता तिलकवाडा येथील वासुदेव कुटीर आश्रमात पोहोचलो. महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही अनेक भाविक आलेले असल्याने निवासासाठी सोय होणे शक्य होणार नाही याची जाणीव असल्याने सोबत आणलेला तंबू नर्मदा मैय्याच्या किनारी ठोकला आणि त्यात राहिलो. साधारण तासाभरानंतर आकाशात ढग गोळा झाले. त्यांचा गडगडाट सुरु झाला आणि मागोमाग पाऊसही...
एका बाजूला मनात भीती आणि दुसऱ्या बाजूला नर्मदा मैय्या सर्व व्यवस्थित करेल हि आशा ! पाऊस केव्हा थांबला आणि झोप केव्हा लागली काही कळले नाही. सकाळी उठून परत वासुदेव कुटीर आश्रमात आलो. सकाळचे विधी व आंघोळ वगैरे आटोपले. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतीचे दर्शन घेतले. वासुदेवानंद टेंबे स्वामींनी ज्या ठिकाणी परिक्रमेदरम्यान दोन वेळेस ज्या ठिकाणी चातुर्मास पाळला त्या आश्रमाला भेट दिली. तेथे जळगावातील सेवाव्रती श्री. योगेश्वर जोशी यांची भेट झाली. त्यांनी परिक्रमेचा संकल्प सांगितला तसेच माहिती दिली. सकाळी ७.३० वाजता सुरु केलेली परिक्रमा दुपारी ३.३० वाजता संपन्न झाली.मार्गावरील प्रत्येक महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मारुती व श्री गणेशाच्या मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. त्यानंतर आम्ही गरुडेश्वर येथे पोहोचलो. तेथे पुन्हा एकदा नर्मदा स्नान केले. त्यानंतर दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. वासुदेवानंद टेंबे स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले. तेथे आलेल्या भाविकांसोबत दत्ताची भजने व आरती म्हटली. त्यानंतर प्रसाद घेतला. पुन्हा एकदा मंदिर परिसरात नर्मदेच्या बाजूच्या भागात तंबू टाकला आणि झोपी गेलो. सकाळी लवकर उठून सर्व आवरुन अल्पोपहार वगैरे करून ९ च्या सुमारास राजपिपला येथून परतीचा प्रवास सुरु झाला. डेडियापाडा, अक्कलकुवा, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा व अमळनेर मार्गे सायंकाळी ५.४० वाजता सुखरूप घरी पोहोचलो. 

संपूर्ण प्रवासात अनेक गोष्टींचा अनुभव आला. आत्मिकदृष्ट्या समाधान देणारी हि परिक्रमा अनेक गोष्टी शिकवून गेली. रात्री वासुदेव कुटीर आश्रमात मराठी बोलणारी एक व्यक्ती भेटली. चौकशी केली असता जळगावातील भुसावळ जवळील खंडाळा-मोंढाळा येथील असल्याचे कळले. आमच्या धानोरा या गावाजवळील सुमारे ३५ माताभगिनींना उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी ते घेऊन आले होते. महाराष्ट्रातील भाविकांची संख्या लक्षणीय होती. संपूर्ण रात्रभर दक्षिण तटावरून उत्तर तटावर येण्यासाठीची बोट सुरु होती. परिक्रमावासी अखंडपणे चालत होते. ज्यांच्या परिक्रमा पूर्ण झाली त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आमचा उत्साह वाढविणारे होते. मार्गात प्रत्येक ठिकाणी चहा, अल्पोपहार, प्रसाद, ताक, फळे यांची व्यवस्था होती. हि सेवा स्थानिकांकडून निःशुल्क व आग्रहाने पुरविली जात होती. नर्मदे हर हरचा जयघोष अखंडपणे सुरु होता. परिक्रमावासीयांचे वयाचे बंधन नव्हते. अगदी ३-४ वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या आजी-आजोबांचा यात सहभाग होता. कोणी विना चपलेने परिक्रमा करीत होते तर कोणाचे सलग १५ वे वर्ष होते. कोणी सलग ३ दिवस परिक्रमा करण्याचा संकल्प केला होता. मानवी जीवनात श्रद्धेला किती महत्त्व आहे याचा अनुभव पदोपदी येत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे समाधान दिसत होते. संपूर्ण नर्मदा परिक्रमेत खटकणारी एकमेव गोष्ट म्हणजे वाढता प्लास्टिकचा वापर आणि त्यामुळे सर्वत्र असलेला कचरा अगदी नर्मदा मैय्याच्या किनारीही ! अनेकदा सांगूनही मंडळी त्याला टाळू शकत नव्हते हि दुर्दैवाने शोकांतिका म्हणावी लागेल. 

सकाळी साडेसात वाजता वासुदेव कुटीर आश्रम येथून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेस सुरुवात केली.  तेथून पुढे गेल्यावर नर्मदा माता मंदिरात जाऊन नर्मदा मातेचे दर्शन घेतले. नर्मदे हरचा गजर करीत मार्गक्रमण सुरू केले जवळच रामेश्वर महादेव मंदिर, गौतमेश्वर महादेव मंदिर, तिळकेश्वर महादेव मंदिरांमध्ये दर्शन करून पुढील प्रवास सुरु झाला. काही अंतरावर आल्यावर मणीनागेश्वर मंदिर लागले येथे सर्व परिक्रमावासी साठी श्रमपरिहारार्थ थंड पाणी, चहा या अल्पोपहार यांची सेवा चालू होती. काही भक्त मंडळी गीतांवर ठेका धरून नाचत होती. नागेश्वर मंदिर खूपच सुंदर पुरातन आहे येथे दर्शन घेऊन पुन्हा मार्गक्रमण सुरू झाले. सकाळचे रम्य वातावरण परिक्रमेची ओढ या सर्वांमध्ये उत्साहाने मार्गक्रमण सुरू होते. वाटेत कपिलेश्वर मंदिरात दर्शन घेऊन नर्मदा मैयाच्या अगदी जवळ पात्रात उतरून रामपुरा येथे जाण्यासाठी वाटचाल सुरू केली. एका बाजूने वाहणारी नर्मदा मैया , दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी केळी व कापसाचे शेती काही ठिकाणी पुढे गेल्यावर घनदाट झाडी आणि त्याच्या मधून जाणारा अरुंद खडकाळ रस्ता अशी आमची मार्गक्रमणा चालू होती. मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे लागली जागोजागी नर्मदे हर नर्मदे हर असे म्हणून परिक्रमावासींचे स्वागत होत होते त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत बघून आनंदाने प्रसन्न वाटत होते तसेच त्यांची परिक्रमावासींसाठीची सेवा बघून मन भारावून जात होते. नर्मदा मैंयेच्या पात्रातून जात असताना अनेक छोटी छोटी मुले , मुली नर्मदे हर म्हणून आपल्याला प्रोत्साहन देतच असतात त्या छोट्या मुलांना खाऊ किंवा पैसे दिल्यास ते आणखी उत्साहाने नर्मदे हर चा गजर करतात. तेथे बसलेल्या मुलींना दान देण्याची प्रथा आहे. छोट्या मुली या नर्मदेचे स्वरूप मानल्या जातात.

या सर्वांचा आनंद घेत आम्ही पुढे पुढे जात होतो .वाटेत नंदीची दगडी भव्य मूर्ती पहावयास मिळाली. या प्रतिकृती चे पितळी नंदी मध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्यासाठी 51 हजार किलो पितळेचा वापर करण्यात येणार आहे. पुढे रामपुरा येथे जाण्यासाठी होडीतून नर्मदा ओलांडून रामपुरा घाटावर गेलो. रामपुरा घाट स्वच्छ असून तेथे स्नानासाठी नदीमध्ये दोरी बांधून व्यवस्था केली आहे. येथे आम्ही सर्वांनी नर्मदा मैयाला नमस्कार करून तिच्या स्वच्छ पाण्यात स्नान करण्याचा आनंद घेतला , सर्वजण आनंदाने  डुंबत होते . काही वेळानंतर स्नान आटोपून आम्ही पुढे निघालो. रामपुरा घाटावर तीर्थेश्वर महादेव मंदिर तसेच श्रीकृष्ण मंदिर व हरसिद्धी माता मंदिर येथे दर्शन घेतले. दुपारचा महाप्रसाद येथेच घेतला, थोडी विश्रांती घेतली. नंतर दक्षिण  तटाचा प्रवास सुरू झाला. दक्षिण तट मार्ग बहुतांश डांबरी सडक आहे. वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागले. गावातील लोकानी मिळून  मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी खुर्च्या व गाद्यांची व्यवस्था केली होती.  येथे देखील महादेवाचे सुंदर मंदिर आहे. तिथून पुढे आम्ही नर्मदे हर चा गजर वाटचाल करत होतो. येथे तपोवन आश्रम लागला या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी अत्यंत मधुर थंडगार ताक सेवा देतात. येथे पोहोचेपर्यंत ऊन्हाची सुरुवात झाली असल्यामुळे ही सेवा घेताना खूप चांगले वाटत होते. तपोवन आश्रमाचा परिसर अत्यंत सुंदर रमणीय असा आहे येथून नर्मदा मैयाचे खूप छान दर्शन झाले. येथून पुढे वाटचाल करत असताना सर्वात शेवटी लागल तो श्रीसिताराम बाबांचा आश्रम. या आश्रमाचा परिसर देखील फार सुंदर व रमणीय आहे. येथे देखील प्रसाद घेण्याचा खूप आग्रह चालू होता. प्रसाद म्हणून तेथे देण्यात आलेले ताक घेऊन नदीच्या पात्रात उतरून पुढील वाटचाल सुरू केली. परिक्रमेस सुरुवात केल्यापासून रामपूरा पर्यंत सहज वाटणारी परिक्रमा आता खडतर वाटेवरून सुरू होते. नदीच्या पात्रातील गोटे , मैयाचा कमी झालेला प्रवाह आणि वरून तापणारे ऊन यासह आम्ही पुढील वाटचाल सुरू केली. दुपारचे अडीच वाजले असून देखील रणरणतं उन जाणवत होते.  

सीताराम बाबांच्या आश्रमापासून मैयेच्या पात्रात उतरून वासुदेव कुटीर पर्यंत जाणारा हा छोटा प्रवास मोठी परिक्रमा करतात ती किती खडतर असेल याचा अनुभव देऊन गेला. नर्मदे हर म्हणत, मैयाचे नाव घेत घेत हा खडतर प्रवास करत आम्ही नदीचे पात्र ओलांडून पुढे एका छोट्या डोंगराजवळ पोहोचलो. डोंगराचा मार्ग हा उंच खड्या पायऱ्या असलेला होता हा डोंगर चढणे ही एक परीक्षा होती. ही परीक्षा पास झाल्यावर मात्र आम्ही आनंदाच्या परमोच्च शिखरावर पोहोचलो. आम्ही वासुदेव कुटीर येथे पोहोचलो होतो याचाच अर्थ नर्मदा मैय्येने आमची परिक्रमा पूर्ण करून घेतली होती. अशी ही साधारण २१ किलोमीटरची परिक्रमा आहे.  काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता आम्ही परिक्रमा पूर्ण
केली. परिक्रमा मार्गात प्रत्येक ठिकाणी सेवाधारी "नर्मदे हर बाबाजी चाय पिओ, माताजी भोजनप्रसादी पाओ' असे आग्रहपूर्वक विनंती करतात. परिक्रमावासीबद्दलचा आदर पाहून आपण आश्‍चर्यचकित होतो. किनाऱ्यावरून सकाळी परिक्रमेला जाताना मंदिरात होणारा घंटानाद, जागोजागी आश्रमात होणारे स्वागत, छोट्या गावांतून जाताना तटावरची संस्कृती पाहता नर्मदामैयाच्या सान्निध्यात आपली परिक्रमा कधी पूर्ण झाली समजलेच नाही. या परिक्रमेत पवित्र नर्मदामैयाचे स्नान घडले. 

चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केल्यास आपल्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे पुण्य लाभते असे म्हणतात. हे खरे असेलही परंत मला या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेमुळे एकदा आपण संपूर्ण नर्मदा परिक्रमा पायी करावी अशी इच्छा झाली. आता हि इच्छाही नर्मदा मैय्या पूर्ण करेल अशी खात्री वाटते. नर्मदा काठावरील परिसर अतिशय समृद्ध असून येथील लोकांना त्याची कृतज्ञतापूर्वक जाणीव असल्याचे लक्षात येते. अनेक गोष्टी सहजपणाने येथे शिकावयास मिळाल्या याचा मनापासून आनंद आहे. 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Tuesday, 11 April 2023

प्रभू रे खेळ तुझा न्यारा !


मागील शुक्रवारी ( दि. ७ एप्रिल ) सकाळी ५.१५ ला बाबांचा (सुनील) फोन आला होता. मी उठल्यावर पाहिला आणि त्यांना फोन लावला. "काय म्हणता बाबा ?" 

"... गिरीशभाऊ भेट राहून गेली !" 

"कोणाची ?"

"भाऊ... दादा गेले !"

मी मोठ्याने ओरडलोच "काय ?"

"रात्री दादांना अडीच वाजता सीव्हीयर हार्ट अटॅक आला... आणि संपलं."

पुढे काहीही न बोलता फोन कट केला. घरात आई व सौ. आदितीला सांगितले. त्यांनाही धक्काच बसला. आदल्या दिवशी पौर्णिमेच्या कुळधर्माच्या निमित्ताने सौ. ना याज्ञीकांकडे सवाष्ण म्हणून बोलावले होते. छान बोलणे झालेलं. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीच चि. प्रथमेशचा वाढदिवस असल्याने त्याची आठवणही याज्ञीक दादांनी काढली. फोन लावला मात्र बोलणे झाले नाही. जे नंतर रात्री झाले होते. दादांनी सौंना निरोप दिला होता संक्रांतीपासून गिरीशभाऊंची भेट नाही. बोलवले आहे सांगशील. त्याच दिवशी रात्री उशिरापर्यंत बाबांच्या घरी आम्ही बसलो होतो. तेथेही सर्व गप्पा झाल्या. आणि सकाळी असा निरोप... बलीयसी केवलमीश्वरेच्छा॥ अर्थात प्रभू रे खेळ तुझा न्यारा...

... ती भेट राहिली !

तशी माझी आणि दादांची वरचेवर भेट होत असे. फोनवर बोलणेही होत असे. दसरा आणि संक्रांतीचा नमस्कार चुकला नाही. दादांचा रात्री उशिरा आशीर्वाद घेणारा मी आणि माझी वाट पाहणारे दादा !  कधी वाट पाहून दादा त्यांच्या खोलीत गेलेले असायचे. यावेळी संक्रांतीनंतर दादांचे दोन वेळा फोन आलेला... २२ मार्चचा शेवटचा फोन... विषय तसे सामान्यच पण आपलेपणाचे... परिवार, करिअर, व्यवसाय चौकशी... केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक... कधी वारीचे प्रकाशित केलेले पुस्तक तर कधी रोटरीचे इतिहास सांगणारे पुस्तक... आई, घर, गाव, शेती, मुले, बंधू, धुळे येथील हालहवाल इ. यांची चौकशी... कधी ऋषीच्या करिअरबद्दल तर कधी त्याच्या अल्लडपणाबद्दल... मनमोकळ्या गप्पा... त्यातून काही मार्गदर्शन तर काही जाणून घेण्याची इच्छा ! 

मोकळं होण्याची हमखास जागा म्हणजे दादा... वैयक्तिक, सार्वजनिक सर्वच विषय सहज बोलले जात. एका बाजूला काळजी तर दुसऱ्या बाजूला अभिमान ! तास - दीड तास कुठे निघून जायचा कळायचे नाही. आता केवळ आठवणी आणि राहिलेल्या त्या भेटीबद्दलची मनातील खंत. मला, माझ्या कामाच्या स्वरुपाला समजून घेणारे दादा... यावेळी समजून घेतील का ? मनातील घालमेल आणि तळमळ कशी शांत करावी हा माझा मलाच पडलेला प्रश्न... उत्तर नसलेला ! 

नातेसंबंधापलीकडील नाते जपणारे दादा ! 

अलीकडे कुटुंबाशिवाय अन्य ठिकाणी फारसे बाहेर न जाणाऱ्या दादांनी आपला गोतावळा आणि त्यांचे संबंध इतक्या अफलातून आणि पवित्र अश्या नात्याने बांधून ठेवले होते कि त्याला कोणतीही उपमा वा अलंकार देता येणार नाही. कुटुंब, परिवार आणि समाजामधील स्नेहीजनांसाठीचा एक सेतुबंध त्यांनी निर्माण केला होता. त्याला त्यांनी कधी तडा जाऊ दिला नाही वा ओरखडाही पडू दिला नाही. शुभेच्छारुपी आशीर्वादाच्या धाग्याने त्यांनी ऋणानुबंधाचे वस्त्र घट्ट विणले होते. ते कधी जीर्ण होऊ दिले नाही वा फाटूही दिले नाही. त्यामुळे दादांच्या संपर्कात आलेला प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्नेहबंधनात अडकल्याशिवाय राहिला नाही. 

आधारवड दादा ! 

याच शीर्षकाचा एक लेख ११ सप्टेम्बर २०२२ रोजी लिहिला होता. त्याची लिंक येथे देत आहे. https://rb.gy/u7jmc विषयाची पुनरावृत्ती टाळून ते कसे आधारवड ठरले हे समजून घेऊ. दादांचा अमृत महोत्सव, सहस्रचंद्र दर्शन व अंतिम यात्रा मानवी श्रीमंतीचा आदर्श नमुनाच ! माणसे त्यांच्या भेटीसाठी आतुर असायचे. ७५ वर्षांचे मैत्रीसंबंध त्यांनी जपले. यासर्वांच्या मुळाशी असलेली संवेदना समजून घेतली पाहिजे. निर्हेतुक, निर्व्याज, निरपेक्ष, निरलस प्रेम कसं करावं याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या कृतिशील जीवनातून घालून दिला. हि सर्व आपली माणसे आहेत, आपण त्यांचे पालकत्व स्वीकारले पाहिजे, आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना समजावलं पाहिजे, आपण त्यांना मार्ग दाखवला पाहिजे हि नैतिक जबाबदारी त्यांनी स्वतःहून स्वीकारली होती आणि ती आयुष्यभर जपली. कधी कोणावर रागावले नाही, चिडले नाही, ओरडले नाही, अबोला नाही... जीवनाचा एकच उद्देश बंधुत्वाचा फिरवित चरखा, एकत्वाचे सूत्र धरु या, धागा धागा अखंड विणूया... या उक्ती सार्थ करणारा स्वभाव त्यांनी शेवटपर्यंत जोपासला. स्वाभाविकपणे त्यांनी जोडलेल्या या माणसांसाठी ते आधारवड ठरले. 

कर्तव्याने घडतो माणूस...

प्रत्येक माणसामध्ये उपजत अशी सेवावृत्ती असते. इतरांच्या विकासात आपलाही हातभार लागावा, त्यासाठी आवश्यक असलेली मदत मग ती आर्थिक असो अथवा नसो, समस्याग्रस्त व्यक्तीला दिलेला मानसिक, बौद्धिक व भावनिक आधार हि देखील सेवाच होय. याज्ञीक दादांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजातील विविध घटकांची सेवा केली असे आपल्याला नक्की म्हणता येईल. नोकरी मध्ये नोकरदारांची संघटना असो वा ब्राह्मण सभा, दादांनी समर्थ असे नेतृत्व दिले. इतरांना आपलेसे करून त्याला सेवेसाठी प्रवृत्त करण्यात त्यांचा हातखंडा होता. अगदी समाजातील बांधवांना त्यांच्या कुटुंबातील विवाह जुळवत असतांना अनेकदा धोका पत्करत त्यांनी आश्वासक शब्द दिला आणि अनेकांच्या घरात मंगल कार्ये घडवून आणली. आमच्या परिवारातही (आमच्या चुलत बहिणीच्या विवाहासाठी) असेच मंगल कार्यात त्यांनी घेतलेला पुढाकार कधीही विसरता येणार नाही. नेतृत्वाची / मानाची पदे भूषवित असतांना त्याचा लोभ न करता कुठे थांबायचे याची त्यांना जाणीव होती. ब्राह्मण सभेतील पदाधिकाऱ्यांच्या व सहकाऱ्यांच्या आग्रहाला बळी न पडत त्यांनी दुसरी टर्म न घेता इतरांनाही संधी दिली पाहिजे असा आग्रह धरला. त्यामुळेच दादांना अनेक सन्मित्र लाभलेले व त्यांच्या सोबत अनेक कार्ये पूर्णत्वास नेलीत. कर्तृत्वाला कृतज्ञतेची जोड देत केलेले कार्य माणसाला कृतार्थतेचा अनुभव देतात आणि त्यातूनच माणूस समाधानी व आनंदी होत असतो. याज्ञीक दादांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात असे समाधान लाभल्याचे आपण अनुभवले असेल.  

याज्ञीक दादा असो वा आमचे पिताश्री दादा असो... ते पुण्यात्माच होते असे मला वाटते. त्यांना आलेलं मरण हे शोक करण्यासाठी नाही तर त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन कार्य करण्याचा संदेश देणारे आहे. असं चटकन आलेलं मरण धक्का देणारं असतं मात्र त्याला स्वीकारणं हे आपलं काम आहे. कारण प्रत्येकाला एक दिवस जायचे आहे हे नक्की... वेळ हि नक्की... माहिती नसलेली ! दवाखाना नाही, अंथरुणात खिळून पडणं नाही, इतरांना आपल्यामुळे त्रास नाही, इतरांवर अवलंबून राहणं नाही यासारखं दुसरं चांगलं मरण असू शकत नाही. याज्ञीक दादांच्या निधनातून आपण एक संदेश नक्की घेतला पाहिजे. आजचा दिवस आनंदाने जगा. त्यासाठी भौतिक साधनांपेक्षाही माणूस अधिक महत्वाचा ठरतो. माणसे जोडली पाहिजेत, सांभाळली पाहिजेत, उभी केली पाहिजेत आणि असं करुनही आपल्या बोलण्यात "मी केलं" येऊ देऊ नये. ज्यांना जोडलं, सांभाळलं वा उभं केलं त्यांनी ते म्हटलं तर म्हणू दे... नाही तर नाही ! कारण हि सर्व त्या जगनियंत्याची रचना आहे. मीच घडवितो मीच मोडितो उमज आता परमार्था... कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था !

ति. याज्ञीक दादांच्या पवित्र आत्म्यास परमेश्वर सद्गती देईलच, त्यानेच हे दुःख सहन करण्याचे बळ याज्ञीक परिवारासह दादांच्या गोतावळ्यातील स्नेहीजनांना देवो हीच प्रार्थना ! ति. याज्ञीक दादांचा समृद्ध असा वारसा आपण पुढे नेऊ या हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.  ॐ शांती, शांती, शांती !


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Tuesday, 21 March 2023

हे जीवन सुंदर आहे ! जीवनाचा आनंद घेऊ या...



मित्रांनो, आपणा सर्वांना नूतन संवत्सराच्या मनापासून शुभेच्छा ! हे नवीन वर्ष आपणा सर्वांना व आपल्या परिवारजनांना सुखसमृद्धीचे, भरभराटीचे, आरोग्यसंपन्न जावो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना...

हे जीवन खूप सुंदर आहे. आपण सर्वजण त्याचा आनंद घेऊ या. नवीन वर्षाची सुरुवात आपण मनोमन एखादा संकल्प घेऊन करीत असतो. आज आपण जीवनाचा आनंद घेण्याचा संकल्प करु या. त्यासाठी काही गोष्टी नक्की करता येतील. जीवनात चढ-उतार, सुख-दुःख असतात हे वास्तव स्वीकारु या. प्रत्येक गोष्ट नेहमी आपल्या मनासारखी घडतेच असे नाही. आपल्या गत आयुष्याच्या अनुभवातून आपण या दोनही गोष्टींचा अनुभव घेतला असणार. आपली कर्मे आपल्याला फळ देत असतात. चांगली कर्मे चांगली फळे देतात. त्यामुळे सत्कर्माचा मार्ग स्वीकारु या. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याकडेही लक्ष देऊ या.

भारतीय संस्कृती व परंपरा आपल्याला मनःशांतीचे महत्व सांगते. ती मिळविण्यासाठी निसर्गपूरक जीवनशैलीचा स्वीकार केला पाहिजे. जीवन जगतांना मिळलेले ज्ञान व अनुभवातून आलेले शहाणपण या दोघांचा सुयोग्य पद्धतीने वापर करु या. कोणतीही गोष्ट करीत असतांना आपल्या अंतर्मनाचा कौल घेऊ या म्हणजे त्यात नक्कीच सात्विकता येईल जी समाधान देऊन जाईल. तंत्रज्ञानाचा वापर करीत असतांना त्याच्या मर्यादा आखून घेऊ या. तंत्रज्ञान व त्यावर आधारित माध्यमे माणसासाठीच आहेत त्यामुळे त्यांचा किती, कसा व केव्हा वापर करायचा हे संपूर्णतः आपल्या हातात आहे. मानवी जीवनातील शांती हरविण्याचे मुख्य कारण संपलेला संवाद, आत्मकेंद्रित वृत्ती, भौतिकतेचा 'अतिरेक' आहे असे मला वाटते. 

समाधानी राहणं, सकारात्मक बोलणं, दुसऱ्याच्या उपयोगी पडणं, आपल्याजवळील गोष्टी इतरांसोबत वाटून घेणं, इतरांची काळजी घेणं, आपली जबाबदारी पूर्ण करणं, आपल्या प्रगतीचा आलेख तपासणं, स्वतः केलेल्या चांगल्या गोष्टींचं स्वतःच कौतुक करणं या गोष्टी आपल्याला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे जे आहे ते आपले नसून 'नियतीने' ते आपल्याला सांभाळण्यासाठी व त्याचा योग्य वापर करण्यासाठी दिलं आहे. आपण कुणाच्या उपयोगी पडलं तर ते 'मी' केलं असं नव्हे तर 'जगन्नियंत्याने' ते करण्यासाठी आपली निवड केली वा आपल्याकडून करवून घेतलं असे म्हटले तर अहंकाराचा भाव कमी होईल. त्यातून आत्मिक समाधान मिळेल. 

ज्या गोष्टी केल्याने आपल्याला आनंद मिळतो त्याची यादी करा व या वर्षभरात त्या गोष्टी अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी वेळ काढा. दिवसातून किमान अर्धा तास स्वतःशी बोला. चांगलं वाचन करा. असामान्य कर्तृत्वाचे धनी असलेल्या सामान्यांच्या गोष्टी वाचा. त्यातून आपणास प्रेरणा मिळेल. आवडीची गाणी वेळ काढून ऐका. तल्लीन-एकरुप होणं, तादात्म्य पावणं, देहभान विसरणं, याची अनुभूती घ्या, शांती मिळेल. हलका व्यायाम करा. संवाद साधा. सहकारी, मित्र, कुटुंबीय, समाजातील घटक यांच्याशी बोला. संवाद साधतांना परस्परांना आनंद होईल असे विषय निवडा. महिना दोन महिन्यातून एकदा एकत्र या. घरातील कामे सर्वांनी मिळून करा. एकत्रित भोजनाचा व भजनाचा आनंद घ्या. विश्व कल्याणाची प्रार्थना करा.

आव्हाने व संकटे हा जीवनाचा भाग आहे. त्यामुळे त्याला आपल्या क्षमतेनुसार सामोरे जाणे एव्हढंच आपल्या हातात आहे. काळ हेच त्याला योग्य उत्तर आहे. श्रद्धा ठेवा, परमेश्वराची व सद्गुरुंची कृपा, कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद, आपली पुण्यकर्मे या सर्वातून मार्ग दाखवतील. कोणत्याही गोष्टींची चिंता न करता आपले कार्य करीत राहा. आव्हानांचा सर्व बाजूने विचार करा. मदत घ्या. पर्यायांचा विचार करा व आपल्याला वाटणाऱ्या योग्य पर्यायावर कार्यरत राहा. गुणवत्ता पूर्ण काम करा, यश, आनंद व समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. या विषयावर आपण बोलत राहू. आपणही मला सांगत राहा. आनंद घेऊ या, आनंद वाटू या ! पटतंय ना ?

पुन्हा एकदा सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Sunday, 19 March 2023

आनंदाचे डोही आनंद तरंग...

निमित्त जागतिक आनंदी दिवसाचे ! 



२० मार्च हा दिवस जागतिक आनंदी दिवस अर्थात International Day of Happiness म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब जळगावच्या साप्ताहिक सभेत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांनी "आनंदाचे डोही आनंद तरंग..." या विषयाची मांडणी केली. सारांश स्वरुपात भाषणाचा गोषवारा आपल्या सर्वांसाठी देत आहे.

आनंदाचे डोही आनंद तरंग । 

आनंदची अंग आनंदाचें ॥१॥

काय सांगो जाले काहीचियाबाही । 

पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । 

तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । 

अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥

संत तुकारामांचा हा अभंग अवीट अशा आनंदाचा अनुभूती सांगणारा आहे. हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही आणि केला तरी ज्याला अनुभवाची जाण नाही त्याला समजणारही नाही. आता आयुष्यात यापुढे मिळवायचे काहीही उरले नाही. तुकाराम महाराज यांनी अशी स्थिती गाठली आहे कि ज्या करिता योगी अनेक आयुष्ये तप करीत आले आहेत. अनेक ज्ञानी अथक प्रयत्न करून थकले आहेत.  त्यामुळे त्यांना झालेला आनंद हा परमानंद आहे. 

आनंद म्हणजे काय असा आपण विचार केला तर मानसशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट क्षणी चांगली गोष्ट घडल्यावर होतो तो किंवा अधिक व्यापकपणे विचार केल्यास एखाद्याच्या जीवनाचे किंवा कर्तृत्वाचे सकारात्मक मूल्यमापन करून जे मिळते ते म्हणजे आनंद. अर्थात हा आनंद व्यक्ती सापेक्ष असतो. तो कधी बक्षिसाने होतो तर कधी आवडीचा पदार्थ मिळाल्याने होतो तर कधी शारीरिक भूक भागविल्याने होतो. आनंदाचा मानवी मनाशी व मेंदूशी संबंध आहे. मुळात हि एक भावना आहे.  मास्लो या शास्त्रज्ञाने मांडलेल्या पिरॅमिडनुसार हि मानवी मनाची मूलभूत गरज आहे. भौतिक प्रगतीनुसार हा आनंद अधिक उच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न करीत असतो. 

माणूस जेव्हा आनंदी होतो तेव्हा त्याच्या मेंदूचा फ्रंटल लॉबीची डावी बाजू ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असे म्हणतात तो अधिक सक्रिय होतो. मानवी जीवनात घडणाऱ्या चांगल्या - वाईट घटनेमुळे वा परिस्थितीमुळे त्याचा मुड प्रभावित होत असतो. हा मुड मेंदूमध्ये घडणाऱ्या विविध रासायनिक क्रियांचे प्रतिबिंब असतो. मेंदूला आपण काय अनुभवत आहोत याची जाणीव करून देण्याचे व त्या प्रमाणे प्रतिसाद देण्याचे काम शरीरातील रसायने करीत असतात. (न्यूरोट्रान्समीटर आणि हार्मोन्स) या हार्मोन्सची काही विशिष्ट कार्ये असतात, ती विशिष्ट प्रकारे सक्रिय केली जातात, ते विशिष्ट भावनांचे संकेत देतात व मेंदूच्या काही भागांना उत्तेजीतही करतात. जेव्हा आपण आनंदाचा विचार करतो त्यावेळी प्रामुख्याने ज्या रसायनांचा समावेश असतो ती म्हणजे एंडोर्फिन, डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन. आनंदी मनुष्य निरोगी व दीर्घायुषी असतो. 

संत तुकाराम महाराजांनी अभंगातून मांडलेला आनंद कसा झाला असेल ? त्यांच्या आयुष्यात अनेक विपरीत व आव्हानात्मक घटना पाहावयास मिळतात. दुकानाचे दिवाळे निघालेले, बायकोचा स्वभाव, समाजाकडून त्रास इ. शहीद भगतसिंग आनंदाने व हसत हसत देशासाठी शहीद झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या कोठडीत सहन केलेले अत्याचार यासर्व गोष्टींमध्ये त्यांना आनंद कसा झाला असेल याचा आपण विचार केल्यास काही गोष्टी आपल्या लक्षात येतील. आपल्याला आवडणारी गोष्ट करणे, आपण करीत असलेल्या कामात आपल्याला रस असणे आणि त्यासाठी इतरांशी संपर्कात राहणे, आपण जे करतो त्याद्वारे आपल्याला ओळख मिळणे, आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होणे.  

माणसाला आनंद ३ प्रकारे होतो. १. मेंदूतील रसायनांमुळे २. मेंदूतील प्रीफ्रंटल कोर्टेक्समुळे - यात लहानपणापासूनच्या शिकवणीचा समावेश असतो. तसेच भावनिक जाण व अनुभवही महत्त्वाचा ठरतो. ३. सामाजिक वातावरण - आपण ज्यांच्या सोबत राहतो त्या माणसांची सकारात्मक व आनंदी वृत्ती मनाला आनंद राहण्यासाठी सहाय्य्यभुत ठरते. 

आज जगातील सर्वात आनंदी देश फिनलँड मानला जातो. सलग ५ वर्षे या देशाला आनंदी देश होण्याचा बहुमान मिळाला आहे. वर्षातील ४ महिने प्रचंड थंडी असूनही हा देश आनंदी असतो याची आकाराने आपण नक्कीच जाणून घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील निसर्ग समृद्ध आहे. त्यामुळे पर्यावरणाची गुणवत्ता अधिक आहे. कौटुंबिक व व्यावसायिक कामाचा योग्य समतोल सांभाळला गेला आहे, सामाजिक सौहार्द, निवडीचे व निर्णयाचे स्वातंत्र्य आहे, समाज कल्याणकारी पद्धती विकसित आहेत, स्वातंत्र्यासोबतच येथे समानता आहे, नागरी सेवा विनामूल्य उपलब्ध आहेत मात्र येथील करही सर्वात जास्त आहे. सामाजिक स्तरावर असलेले परस्पर सहकार्य व पाठबळ हि या देशाची जमेची बाजू म्हणता येईल. 

समारोपाकडे जात असतांना डॉ. प्रदीप जोशी यांनी २ धक्कादायक गोष्टी सांगितल्या. त्यातील एक म्हणजे आज जगातील ३० कोटी लोक नैराश्यग्रस्त वा वैफल्यग्रस्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशात हि संख्या सुमारे ९ कोटी आहे. या मागील कारणे अनेक आहेत. आपण या समस्यचे बाली ठरू नये व आनंदी राहावे यासाठी खालील गोष्टी कराव्यात.

- नातेसंबंध समृद्ध करा 

- काहीतरी स्वप्न ठेवा , उद्दिष्ट ठेवा

- इतरांना केलेले सहाय्य तुम्हाला सर्वात जास्त आनंद देतील. 

- शरीर प्रकृती उत्तम ठेवा.

- योग्य आर्थिक नियोजन करा.

- कुटुंबात आनंद ठेवा व मित्रांचा जास्तीत जास्त सहवास ठेवा.

- कामाचा आनंद घ्या

या गोष्टी करीत असतांना जीवनातील ताणतणावांचे नियंत्रण करा. त्याकडेही लक्ष असू द्या. त्यासाठी हसा, खेळ खेळ, योग्य व्यायाम व आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. व्यसनांपासून दूर राहा. निसर्गाचा आनंद घ्या. योगा, प्राणायाम करा. सुटीचा आनंद घ्या. त्यादिवशी आराम करा. प्राणी पाळा. ताण ओळख व त्यावर नियंत्रण मिळावा. रात्री  झोपायला जाण्यापूर्वी दिवसभरात केलेल्या ३ चांगल्या गोष्टी आठवा. 

आईन्स्टाईन यांनी सांगितल्याप्रमाणे जीवन २ प्रकारे जगा

१. जणू काही चमत्कार नाही (as though nothing is miracle)

२. सर्व काही चमत्कार आहे (as though everything is miracle)


यावर्षीच्या जागतिक आनंदी दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे Be mindful (सजग राहा), Be grateful (कृतज्ञ राहा) Be kind (दया करा)

समारोप करतांना आनंदी राहण्यासाठी 

Sing like no one listening कोणी ऐकत नाही असे समजून गा 

Love like you've never been hurt आपल्याला कोणी दुखावले नाही असे समजून प्रेम करा 

Dance like nobody is watching आपल्याला कोणी पाहात नाही असे समजून नाचा 

Live like its heaven on earth पृथ्वीला स्वर्ग समजून जगा 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Wednesday, 15 March 2023

हृद्य संस्कार सोहोळा विवाहाचा... आप्तस्वकीयांच्या स्नेहबंधाचा !

मागच्या आठवड्यात आमच्या धानोरकर परिवारातील एका बहिणीचा पुणे येथे विवाह झाला. खरं तर मोठ्या कुटुंबातील विवाह सोहोळा हि तशी फार मोठी गोष्ट नाही मात्र एका खडतर आव्हानानंतरचा हा विवाह संस्कार काका-काकूंसह आम्हा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट होती. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एका मोठ्या कालावधीनंतर पुतण्याचा विवाह झाला. तोही असाच सर्वांच्या लक्षात राहील असाच झाला. त्यामुळे उत्सवप्रिय पिढीला एकत्र कुटुंबाचा 'नजारा' आणि 'मजा' अनुभवता आली. हा विवाह सोहोळा हि एक संधी होती. हा विवाह सोहोळा म्हणजे धानोरकर व देशपांडे या दोन परिवाराचे मिलन आणि त्यासोबतच दोन्ही परिवारांतर्गत स्नेहमंडळींचे आनंददायी पुनर्मिलन होते. अलीकडे निमित्ताने होणाऱ्या भेटीही कमी झाल्या तरी 'आपलेपण' असले कि सर्व कारणे बाजूला पडतात व  'आपली' माणसे आवर्जून उपस्थिती देतात व सहभागी होतात याचे उदाहरण म्हणजे हा विवाह संस्कार  सोहोळा होय.


विवाह पुण्यात म्हटल्यानंतर त्याचे योग्य नियोजन केले होते. अगदी आदल्या दिवशी सीमंती पासून ते झाली पर्यंतची सर्व व्यवस्था उत्तमप्रकारे लावली होती. तत्पूर्वीचे विधी व अन्य कार्यक्रम घरी पार पडले. त्यासाठी मुलीची आजी, मावशी आजी, काका-काकू आशीर्वादासाठी तर सख्खा, चुलत व मावस भाऊ-बहीण, वहिनी अगदी कंबर कसून सर्व गोष्टींसाठी तयार होते. ज्येष्ठांना आवश्यक असणारी एक आश्वासकता त्यातून निर्माण झाली होती त्यामुळेच सर्वांसाठी हा संस्कार सोहोळा संस्मरणीय ठरला असे नक्की म्हणता येईल. विवाहासाठी असलेले उपाध्ये खांडेकर व त्यांचे सहकारीही संस्कारांना महत्व देणारे त्यामुळे प्रत्येक गोष्टीमागचा अर्थ समजावून सांगणारे होते. वेळ मिळेल तेव्हा अलीकडच्या काळातील विवाहामधील आधुनिकता स्वीकारत असतांना संस्कारांचा वारसा जपण्याची आवश्यकता उभय पक्षांना सांगत होते. दोन्ही दिवसांचे भोजन व अल्पोपहार चविष्ट व रुचकर होते. प्रसंगी पैसे मोजूनही अपेक्षित सेवा मिळत नाही मात्र येथे आलेला अनुभव खूप चांगला व वेगळा होता. 

धानोरकर परिवारातील काकांच्या कुटुंबाचा आणि आमच्या कुटुंबाचा भावबंध अनेक वर्षांचा आणि तितकाच एकमेकांच्या हक्काचा व अधिकाराचा. कारण काका लहानपणापासूनच आमच्या आई-वडिलांसोबत राहत होते. ते अगदी लग्न झाल्यानंतरही अनेक वर्षे. दोघं भावांनी धुळ्यात प्लॉट घेऊन आपले स्वतःचे हक्काचे घर बांधले. अनेक सोहोळे, संस्कार, जीवनातील सुख-दुःखाच्या घडामोडी दोन्ही परिवारातील सदस्यांनी सोबत अनुभवलेल्या होत्या. स्वाभाविकपणे आम्हा भावा-बहिणींमध्ये सख्खा - चुलत असा भाव नव्हता आणि नाही. त्यामुळे लग्नाच्या ६-७ दिवस अगोदरच आमच्या कुटुंबातील सदस्य तयारीसाठी गेले होते अर्थात त्यांना हक्काने बोलवलेही होते.  एकत्र कुटुंबाच्या अनेक चांगल्या बाजूंचा अनुभव गेली सुमारे ६ दशकांहून अधिक काळ आम्ही सर्वच अनुभवत आहोत. काळ कितीही बदलला तरी नात्याच्या या स्नेहबंधात फारसा फरक पडला नाही. विवाह सोहोळ्याला कुळकर्णी-देशपांडे परिवारांनी संख्येचे बंधन घालून घेतल्याने स्वाभाविकपणे काही मर्यादा आल्यात मात्र त्या सोहोळ्यात अडचण ठरल्या नाहीत अर्थात तेव्हढी समज अलीकडे विकसित झाली आहे. 

या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास ६० वर्षांची मैत्री असलेली काकांची दोस्त मंडळी व आमच्या बहिणींच्या मैत्रिणींची आवर्जून विवाह सोहोळ्याला उपस्थिती ! त्यातील एका मित्रानेच मुलीच्या मामांची भूमिका पार पाडली. या मित्रांमध्ये आमच्या सर्वांचे काका-मामा होते. ऐनवेळी तब्येतीच्या कारणामुळे एका काकांना येता आले नाही मात्र ग्रहमुखाच्या दिवशीची भोजनाची व्यवस्था त्यांनी करुन दिली होती. आमच्या काकांना त्यांची अनुपस्थिती पचविणे अवघड गेले अर्थात ते कुणाच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते.

 त्यातील एका वरिष्ठ सहकाऱ्याची पत्नी म्हणजे आमच्या आईची जिवलग मैत्रीण ! आज ती मावशी नसली तरी काका, त्यांची कन्या आणि जावईबुवा यांची भेट डोळ्यांच्या कडा ओलावणारी होती. अनेक हृद्य भेटींचा आनंद शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. काकांचे मामेभाऊ आपल्या घरी पाहुणे मंडळी असतांनाही पत्नीसह आले होते आणि वेळ काढून प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी करीत होते. अनेक वर्षांनी भेटल्यामुळे नवीन पिढीतील अनेकांना ते प्रथमच पाहत होते मात्र त्यांचा व्यवहार अनेक वर्षांच्या सहवासाचा होता. बोलता बोलता सहज म्हणून गेले मला एकदा धानोरा येथे यावयाचे आहे. अलीकडे दुर्मिळ होत चाललेला गोतावळा त्यात अपेक्षित असलेला प्रेमभाव पुढच्या पिढीकडे नक्कीच यानिमित्ताने पोहोचला असे म्हणता येईल. 

आदल्या दिवशी अर्थात ८ मार्चला जागतिक महिला दिन होता. दोन्ही कुटुंबांनी आपापल्या घरी तो साजरा केलाच पण मंगल कार्यालयातही केक भरवून साजरा करण्याची व्यवस्था केली होती. विधी आणि भोजने आटोपली. त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या एका खास शैलीत परिवारातील माता-भगिनी-पत्नी यांना तो भरविला अर्थात त्याची आठवण कॅमेऱ्यात बंद केली हे सांगणे नको. कन्या सध्या पुण्यात असते आणि तिला गुरुंनी लग्नाच्या दिवशी सुट्टी दिली याचा आनंद तिने सर्वांसोबत नृत्याविष्काराने साजरा केला. शास्त्रीय नृत्य बाजूला ठेवून नाचण्याचा मनसोक्त आनंद घेतला आणि इतरांनाही त्यात सामावून घेतले. झोपलेली मंडळी उठून त्यात सहभागी झाली. नवरीही त्यात मागे नव्हती. मात्र मग आग्रहाखातर दोन गाण्यांवर कथक नृत्यही सादर करीत वाहवा मिळविली. अचानकपणे karaoke वर गाणे गाण्याचा सिलसिला सुरु झाला आणि सर्व जुन्या-नव्या पिढीतील मंडळींना आपल्या काळात घेऊन गेला. दोन तासांचा वेळ कुठे निघून गेला लक्षातच आले नाही. त्यानंतर वेळेवर आलेल्या मंडळींचा मेहेंदी कार्यक्रम झाला. काही मंडळी झोपण्यासाठी इतरत्र निघून गेल्याने त्यांना याचा आनंद घेता आला नाही. 

अलीकडच्या स्मार्टफोनच्या युगात फोटोचं वाढलेले महत्व असले तरी एक हृद्य व कायमस्वरूपी लागणारी आठवण म्हणजे वधू-वरांसोबतचा तो क्षण ! प्रयत्नपूर्वक प्रत्येकाचा फोटो यावा यासाठी जो-तो काळजी वाहत होता आणि छायाचित्रकारासह मोबाईलचे फ्लॅशही चमकत होते. लग्न समारंभासाठी पाहुणे मंडळींसह सर्वांची योग्य खातिरदारी व व्यवस्था व्हावी यासाठीची सर्व व्यवस्था वधू-वर पक्षाच्या ज्येष्ठांनी समर्थपणे सांभाळली होती. त्यांना परिवार सदस्यांची तेव्हढीच मोलाची साथ होती. ऋणानुबंध घट्ट करणारा हा सोहोळा सर्वार्थाने पुढच्या पिढीसाठी 'संस्कार' सोहोळा ठरला. वधू-वरांच्या आनंदी व समृद्ध सहजीवनाची कामना करीत असतांनाच त्यांच्या माता-पित्यांची एक जबाबदारी समर्थपणे पूर्ण केल्याबद्दल मनापासून अभिनंदन ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 


Monday, 27 February 2023

अनुभूतीची स्वरानुभूती अन दादाजींना श्रद्धावंदन !

अनुभूती इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रिय दादाजींच्या श्रद्धावंदन दिनी स्वरानुभूती अर्थात भक्ती संगीत संध्या कार्यक्रमाचे भाऊंच्या उद्यानात आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय अशोकभाऊ जैन, पद्मश्री ना. धो. महानोर दादा, अनुभूती इंटरनॅशनलचे चेअरमन श्री. अतुलभाऊ जैन, संचालक सौ. निशाभाभी जैन व प्राचार्य श्री. देबसिस दास यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली आणि लगेचच भक्ती संगीताचा कार्यक्रम सुरु झाला. 

श्रद्ध्येय मोठ्या भाऊंना गुरु आणि पालकांप्रती विशेष आदर होता. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतांना ते हि गोष्ट आवर्जून अधोरेखित करीत असत. जीवनात आपण प्राप्त केलेल्या प्रत्येक गोष्टींमागचे कारण असतात गुरु आणि पालक. आपल्या जीवनाचा मूलभूत पाया असलेल्या, परम आदरणीय गुरु आणि पालकांसाठी प्रार्थना सादर करण्यात आली... राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील या सामुदायिक प्रार्थनेतील ३ कडवी विद्यार्थ्यांनी सादर केलीत. प्रार्थनेचा अर्थ आहे आमचे आचार-विचार अत्यंत शुद्ध असावे यासाठी सद्बुद्धी दे, सत्कर्म करायची प्रवृत्ती दे, सत्याचा अभ्यास दे, सत्यस्वरूपाचे ज्ञान दे...

है प्रार्थना गुरुदेव से ,यह स्वर्गसम संसार हो ।

 अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो ॥

ना हम रहे अपने लिये, हमको सभी से गर्ज है ।

 गुरुदेव ! यह आशीष दे ,जो सोचने का फर्ज है ॥ १॥


हम हो पुजरी तत्व के , गुरुदेव के आदेश के ।

 सच प्रेम के , नीत नेम के , सध्दर्म के ॥

हो चीड झुठी राह कि अन्याय कि अभीमान की।

 सेवा करनने को दास की ,पर्वा नही हो के जान की ॥२॥


छोटे न हो हम बुध्दी से , हो विश्वमयसे ईशमय।

 हो राममय अरु कृष्णमय , जगदेवमय जगदीशमय ॥

हर इंद्रियों ताब कर , हम वीर हो अति धीर हो ।

 उज्ज्वल रहे सरसे सदा , निहधर्मरत खंबीर हो ॥ ३॥


अति शुध्द हो आचारसे , तन मन हमारा सर्वदा ।

 अध्यात्म की शक्ती हमे , पलभी नहि कर दे जुदा॥

इस अमर आत्मा क हमें, हर श्वासभरमें गम रहे ।

 गर मौतभी हो आगयी, सुख दुःख हम से सम रहे ॥५॥


मनुष्य प्राण्याचा एकच धर्म आणि तो म्हणजे सर्वांप्रती प्रेमभावना, बंधुत्वाची भावना. आम्ही सर्व त्या प्रभूची लेकरे असल्याने आपला सर्वांशी असलेला व्यवहार प्रेमाचा व समानतेचा असला पाहिजे तर आपण या भूतलावरच स्वर्गाची अनुभूती घेऊ शकू असे दादाजी नेहमी सांगत. कधीही कुणाला तुच्छ मनू नये. प्रेम आणि माणुसकीची भावना जनसामान्यांपर्यंत पोहोचविणारे साने गुरुजी यांचे गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. खरा तो एकचि धर्म...

खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे ।।


जगी जे हीन अति पतित

जगी जे दीन पद दलित

तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे ।।


सदा जे आर्त ‍अति विकल

जयांना गांजती सकल

तया जाऊन हसवावे। जगाला प्रेम अर्पावे ।।


कुणा ना व्यर्थ शिणवावे

कुणा ना व्यर्थ हिणवावे

समस्ता बंधु मानावे। जगाला प्रेम अर्पावे ।।


प्रभूची लेकरे सारी

तयाला सर्वही प्यारी

कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे ।।


असे हे सार धर्माचे

असे हे सार सत्याचे

परार्था प्राणही द्यावे। जगाला प्रेम अर्पावे ।।

श्रद्ध्येय मोठे भाऊ हे गांधी विचारांचे पाईक होते. गांधीजींचा साधेपणा, नम्रता, सत्यता, अहिंसा आणि इतर दैवी गुणांचा अंगीकार दादाजींनी आपल्या जीवनात केला होता. विपरीत परिस्थितीतही त्यांनी या मूल्यांशी तडजोड केली नाही. गांधीजींच्या तत्त्व आणि जीवनशैली सोबतच गांधीजींना प्रिय असलेली भजनेही दादाजींना विशेष आवडत असत. १५ व्या शतकात संत नरसी मेहता यांनी रचलेले भजन  वैष्णव जन तो तेणे कहीए... त्यांना विशेष आवडत असे. खरा वैष्णव तोच जो दुसऱ्यांच्या दुःखाला समजून घेतो, इतरांना केलेली सहाय्याबद्दल कधीही अहंकार बाळगत नाही, जो सर्वांचा सन्मान करतो अन कोणाचीही निंदा करीत नाही. हेच भजन मुलांनी सादर केले. 

वैष्णव जन तो तेने कहिये,

जे पीड परायी जाणे रे ।

पर दुःखे उपकार करे तो ये,

मन अभिमान न आणे रे ॥


सकल लोकमां सहुने वंदे,

निंदा न करे केनी रे ।

वाच काछ मन निश्चळ राखे,

धन धन जननी तेनी रे ॥


समदृष्टि ने तृष्णा त्यागी,

परस्त्री जेने मात रे ।

जिह्वा थकी असत्य न बोले,

परधन नव झाले हाथ रे ॥


मोह माया व्यापे नहि जेने,

दृढ़ वैराग्य जेना मनमां रे ।

रामनाम शुं ताली रे लागी,

सकल तीरथ तेना तनमां रे ॥


वणलोभी ने कपटरहित छे,

काम क्रोध निवार्या रे ।

भणे नरसैयॊ तेनुं दरसन करतां,

कुल एकोतेर तार्या रे ॥


वैष्णव जन तो तेने कहिये,

जे पीड परायी जाणे रे ।

पर दुःखे उपकार करे तो ये,

मन अभिमान न आणे रे ॥

यानंतर मनुष्याचे जीवन अनमोल असून यासाठी मनुष्य कर्माने, वचनाने, शरीराने पवित्र असला पाहिजे आणि असा माणूसच खऱ्या अर्थाने महान असतो. वाणीतील मधुरता, सरलता, डोळ्यातील विमलता हीच माणसाची शान आहे, या अर्थाचे भजन विद्यार्थ्याने सादर केले. पवित्र मन रखो...

पवित्र मन रखो पवित्र तन रखो,

पवित्रता मनुष्यता की शान है,

जो मन कर्म वचन से पवित्र  है,

वो चरित्र बाण नहीं यहाँ महान है,

बड़ा ही मुलये वाण है तुम्हरा ये जनम,

जगत की कर्म भूमि में करो भले कर्म.

अच्छे रखो विजार उत्तम करो वेहवार

आदर्श व्यक्ति की ये पहचान है,

जो मन कर्म वचन से पवित्र  है,

वो चरित्र बाण नहीं यहाँ महान है,

तुम अपनी आंख में अमृत रखो विमल विमल सदा विमल विमल,

तुम्हरो वाणी में माधुर हो सदा सरल सरल,

तुम को के नीर विकार सबका करो सत्कार,

ये जन्म तुम्हारा इम्तेहान है,

जो मन कर्म वचन से पवित्र  है,

वो चरित्र बाण नहीं यहाँ महान है,

'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते...' या भारतीय परंपरेचे कट्टर समर्थक असलेल्या दादाजींना स्त्रीच्या दैवी शक्तीबद्दल कायम आदर वाटत असे. त्यांच्या उक्ती, कृती आणि विचारात स्त्रीबद्दल आदर व उच्च सन्मान होता. स्त्रीच्या दैवी शक्तीची संस्कृतमधील देवी स्तुती दादाजींना प्रिय होती. तीच स्तुती विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सादर केली. 

कमलां कमलासनमुख 

कमलां कमलासनमुख - दिविज - सुनतपद - युगलाम 

विमलां मतिमनिशं यदि वाच्छसी जगदीसे संस्मर ||

इन्दूगणसु - समवदनाम - इंन्दीवरनिभ - नायनाम 

मन्दस्मित - रुचिराधर - पल्लव - द्वंद्वविनुत - सुंदरहरि - लीलाम ||

क्षीरशरधिरवर तनयां नीरज गण कृतं निलयाम |

चारु नयनकृत - नीराजनद्युति - पुरित श्रीहरिप्रिय - जायाम    

श्रीलक्ष्मीस्तुती  



दादाजी स्वतःला शेतकरी समजत असत व तीच ओळख प्रथम देत असत. एक उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करीत असतांना ते सदैव आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडित राहिले. भारतीय कला, संस्कृती व साहित्याबद्दलच्या प्रेमाबद्दल आपण त्यांना ओळखतोच. ते केवळ व्यावसायिक नव्हते तर त्यांना कलेबद्दल विशेष जाण होती. त्यांना वेगवेगळ्या राज्यातील गाण्यांचीही विशेष गोडी होती. त्यातीलच उत्तर प्रदेशातील एक आवडते गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. बरसन लागी बदरिया...  

बरसन लागी बदरिया झूम झूम के...

बोलन लागी कोयलिया झूम झूम के

आयो सावन अति भावन

रूम झूम रूम झूम के

सखिया गावें कजरिया झूम झूम के...।  


लाग रही तेरी सावन की झड़ी ए री 

ए मैं भीजत तुम बिन कबसे खड़ी..

सपने में आए पिया मोरा मन ले गयो... 

दे गए असुअन की झड़ी...। 


गरजत बरसत भीजत आई हो तुम्हरे मिलन को 

अपने प्रेमी पियरवा लो गरवा लगाय...।

आपल्या देशात भक्त कवींमध्ये संत कबीर दास का यांचे स्थान खूप वरचे आहे. जीवनातील अतिशय कठीण प्रसंगांचे वर्णन त्यांनी सध्या, सोप्या, सरळ शब्दात केले आहे. असेच एक संत कबीर यांचे भजन सादर करण्यात आले. या भजनात धनाचा तू अहंकार करू नकोस, आपल्या शरीराचा गर्व करू नकोस,  पाण्याच्या एका थेंबाप्रमाणे ते नाजूक असते. हवेच्या एका झोक्याने तो मातीत मिसळून जातो. 'मत कर माया का अहंकार,,,'

मत कर माया को अहंकार

मत कर काया को अभिमान

काया गार से काची

मत कर माया को अहंकार

मत कर काया को अभिमान


काया गार से काची

हो काया गार से काची

जैसे ओस रा मोती

झोंका पवन का लग जाए

झपका पवन का लग जाए

काया धूल हो जासी

काया तेरी धूल हो जासी

ऐसा सख्त था महाराज

जिनका मुल्कों में राज

जिन घर झूलता हाथ

जिन घर झूलता हाथी

हो जिन घर झूलता हाथी

उन घर दिया ना बाती

झोंका पवन का लग जाए

झपका पवन का लग जाए

काया धूल हो जासी

काया तेरी धूल हो जासी

खूट गया सिन्दड़ा रो तेल

बिखर गया सब निज खेल

बुझ गयी दिया की बाती

हो बुझ गयी दिया की बाती

रे जैसे ओस रा मोती

झोंका पवन का लग जाए

झपका पवन का लग जाए

काया धूल हो जासी

काया तेरी धूल हो जासी

झूठा माई थारो बाप

झूठो सकल परिवार

झूठी कूटता छाती

झूठी कूटता छाती

हो झूठी कूटता छाती

जैसे ओस रा मोती

बोल्या भवानी हो नाथ

गुरुजी ने सर पे धरया हाथ

दादाजींचा मूळ गाव राजस्थानातील ! काही दशकांपूर्वी त्यांचे पूर्वज जळगावात आले आणि येथेच स्थायिक झाले. त्यांच्या मातृभूमीच्या प्रेमाचे प्रतीक असलेले उदाहरण म्हणजे संत मीराबाईंचे भजन. परमेश्वराला संपूर्ण शरण व समर्पणाने भरलेले हे भजन. थोडा खोलवर विचार केला तर आपल्या भ्रम आणि इगो पासून बाहेर यावे असा संदेश देणारे हे भजन होय.असीम भक्ती आणि समर्पणाचा भाव असलेलले भजन विद्यार्थ्यांनी सादर केले. मने चाकर राखो जी...

 

श्याम मने चाकर राखो जी

श्याम मने चाकर राखो जी

चाकर रहसूं बाग लगासूं,

नित उठ दरसण पासूं।

वृन्दावन की कुंजगलिन में

तेरी लीला गासूं॥


श्याम मने चाकर राखो जी


चाकरी में दरसण पाऊं,

सुमिरण पाऊं खरची।

भाव भगति जागीरी पाऊं,

तीनूं बाता सरसी॥


श्याम मने चाकर राखो जी


मोर मुकुट पीतांबर सोहै,

गल बैजंती माला।

वृन्दावन में धेनु चरावे

मोहन मुरलीवाला॥

मीरा के प्रभु गहिर गंभीरा,

सदा रहो जी धीरा।

आधी रात प्रभु दरसन दीन्हें,

आधी रात प्रभु दरसन दीन्हें,

प्रेमनदी के तीरा॥


श्याम मने चाकर राखो जी


चाकर रहसूं बाग लगासूं,

नित उठ दरसण पासूं।

वृन्दावन की कुंजगलिन में

तेरी लीला गासूं॥


श्याम मने चाकर राखो जी

श्याम मने चाकर राखो जी

श्याम मने चाकर राखो

श्याम मने चाकर राखो

श्याम मने, श्याम मने,

श्याम मने चाकर राखो जी 

भारतात विविधतेत एकता आढळते. दादाजी याचे उत्साही समर्थक होते. अशा विविधतेतून लोकांना एकत्र एका व्यासपीठावर आणून त्यांना एका विशिष्ट ध्येयासाठी प्रवृत्त करणे हे त्यांचे वैशिष्ट्यच होय. असेच एकतेचा सार सांगणारे गीत "आकाशगंगा" जे दादाजींच्या कायम ओठावर असे ते सादर करण्यात आले. गुजराती भाषेतील हे देशभक्तीपर गीत ज्यात पृथ्वी, तारे, आकाश, नदी, सूर्य, चंद्र आणि हे विश्व ज्यात आपण राहतो ते कोणाचे ? अर्थात ते आपले सर्वांचेच. शब्द, भाषा वेगवेगळी असेल, जागा वेगवेगळी असेल मात्र सर्वांच्या भावना एकच ! गडद अशा ढगांमध्ये ज्या प्रमाणे इंद्रधनुष्य आपण पाहतो  तसेच आपण सर्व आपले रंग, पंथ सोडून एकजुटीने राहू या ! 


आकाश गंगा सूर्य चन्द्र तारा , 

संध्या उषा कोई ना नथि । 

कोनि भूमि , कोनि नदी ,

कोनि सागर धारा , 

भेद केवल शब्द आमारा ने तमारा । 


एज हास्य एज रुदन , आश ए निराशा , 

एज मानव उर्मि , पण भिन्न भाषा । 

मेघधनु अन्दर ना होय कदी जंगो , 

सुन्दरता काज वन्या विविध रंगो ॥

भक्ती संगीत संध्या कार्यक्रमाची सांगता दादाजींच्या आवडत्या प्रार्थनेने झाली. भूतलावरील सर्वांच्या कल्याणाची हि प्रार्थना. तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे...


तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे सबका मंगल,

सबका मंगल, सबका मंगल होय रे

जिस गुरुदेव ने धरम दिया है, उनका मंगल होय रे,

जिस जननी ने जनम दिया है, उसका मंगल होय रे

पाला-पोसा और बढ़ाया, उस पिता का मंगल होय रे

इस जगत के सब दुखियारे प्राणी का मंगल होय रे

जल में, थल में और गगन में सबका मंगल होय रे

अन्तरमन के गाँठें टूटे, अन्तर निर्मल होय रे

राग, द्वेष और मोह मिट जाये, शील समाधि होय रे

शुद्ध धर्म धरती पर जागे, पाप पराजित होय रे

इस धरती के तर तिन में, कण-कण में धर्म समोय रे

शुद्ध धर्म जन-जन में जागे, घर-घर शांति समोय रे

तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे 

अनुभूतीच्या क्वायर (Choir) समूहाने कार्यक्रमाची प्रस्तुती केली. भजने व गीत सादर करणारे विद्यार्थी होते. वीरा महाकाल , स्तुती गर्ग , ऋत्वा शाह , प्राप्ती गुगळे , शर्वरी मोरे , सात्विका सुरतवाला , गीतिका  पुतचकायला , श्लोक कवळी 

कि बोर्डवर साथ दिली ती आत्मन छाजेड , ढोलकीवर तनिश सिंघवी , ड्रम राधे पटेल , तबला - आदर्श  पाटील , मेहेर लाडके , घुंगरू - वेदांत माहेश्वरी कार्यक्रमाचे संचालन केले विरती बाँठिया व वेदिका  कलंत्री 

संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले होते शिक्षिका कविता उपासनी यांनी तसेच तबल्यावर साथ दिली ती भूषण गुरव तर हार्मोनियमवर साथ देण्यासाठी होते अंकित कुमार सर सर्वांचे मनापासून अभिनंदन ! 


Sunday, 19 February 2023

जन्मभूमी, शिवजयंती, रोटरी, सेवा आणि मावळे !


शीर्षक जरा गमतीशीर वाटेल पण आहे वास्तव ! अर्थात यात गटात न बसणारा शब्द कोणाही सामान्य माणसाला विचारला तर स्वाभाविक उत्तर असणार 'रोटरी' ! पण मित्रहो मला अभिमान वाटतो कि आज हा योग जुळून आलाय तो केवळ आणि केवळ 'रोटरी' मुळे... कसे ? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी पूर्ण वाचा...

लहानपणापासून वारंवार ऐकलेले, म्हटलेले वा त्यानेच वाढलेली काही गीते... जननी-जन्मभूमि स्वर्ग से महान है । इसके वास्ते ये तन है मन है और प्राण है ॥, देश हमें देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे।, उठो जवान देश की वसुंधरा पुकारती, ये देश है पुकारता, पुकारती माँ भारती आणि अलीकडे ज्यामुळे प्रभावित झालो ते गीत म्हणजे हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे... आयुष्यात अनेकदा ऐकलेला सुविचार अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी... या सर्वांचा आयुष्यावर इतका प्रभाव आहे कि  माझे जन्मगाव अर्थात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा याबद्दल मला विशेष अभिमान आहे. खेड्याकडून गावाकडे आणि गावाकडून शहराकडे वाटचाल करणारे हे गाव. या गावासाठी काही तरी करावं, माझ्या बांधवांसाठी काही करावं. लहान-सहान प्रमाणात ते करतही असतो. आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी मोठं काम करावं असे नेहमीच वाटत असते आणि ते आज करु शकलो याचा आनंद आणि समाधानही आहे. त्यासाठी कारणीभूत ठरली ती 'रोटरी' !  

शिवजयंती - हृदयस्थ असलेल्या आमच्या राजांचा जन्मोत्सव ! आजच्या परिस्थितीत जात-पात, धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन देशातील प्रत्येक राष्ट्रीय नेत्याचा अभिमान बाळगून त्यांनी आपल्या आचरणातून दिलेली शिकवण अंगिकारणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करणे असे मी मानतो. समाजात काम करीत असतांना उपदेश  करणारे, सल्ले देणारे, काय झालं पाहिजे आणि काय नाही झाले पाहिजे, हि संस्था अशी आणि ती संस्था तशी याबाबत बोलणारे अनेक भेटतात मात्र त्यासाठी प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची (महाराजांच्या मावळ्यांची) सर्वत्र चणचण दिसते. आपल्या हातून नेहमीच असे काम व्हावे ज्यातून कोणालातरी हात दिल्याचे, आनंद मिळाल्याचे समाधान आपल्याला मिळत राहो. कुठेही, कधीही अहंकाराचा / "मी"पणाचा लवलेश लागणार नाही यासाठी सद्बुद्धी महाराजांकडे मागणारा, आज ते करु शकलो केवळ 'रोटरी'मुळेच ! 


रोटरी - संपूर्ण जगभरात पसरलेली. जगातून पोलिओ घालविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणारी, सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेली सदस्य संस्था (Membership Organisation), दरवर्षी पदरचे करोडो रुपये खर्च करुन समाज आणि सदस्यांचे हित जोपासणारी, मैत्री, साहचर्य व एकोप्याद्वारे समाजबंध घट्ट करणारी संस्था, आपल्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये जोपासणारी संस्था म्हणजे रोटरी ! मागील १५ वर्षांपासून या संस्थेचा मी एक सक्रिय सदस्य आहे. ज्येष्ठ सदस्यांच्या प्रोत्साहनाने यावर्षी रोटरी क्लब जळगावच्या मानद सचिवाची जबाबदारी घेऊन तिला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. दरवर्षी क्लबतर्फे समाजातील उपेक्षित, वंचित व आदिवासी घटकांसाठी विनामूल्य वैद्यकीय तपासणी शिबीर त्यांच्या गावी आयोजित केले जाते. तसेच तेथील बांधवांना नवीन व जुने कपडे देत असते. यापूर्वी जामन्या-गाडऱ्या व पद्मालय येथे अशा शिबिराचे आयोजन होत असे. कोरोना पश्चात पुन्हा यावर्षी हा समाजोपयोगी उपक्रम घ्यावा असा विषय निघाला आणि आपल्या जन्मभूमीत तो व्हावा अशी इच्छा बोलून दाखविली आणि सर्वांनी एकमताने त्यास मान्यता दिली, आज ती प्रत्यक्षात साकारली, यशस्वी झाली याचा मनस्वी आनंद आहे. त्याच्या मुळाशी आहे 'रोटरी' ! 

सेवा - आयुष्यात रा. स्व. संघ, विद्यार्थी परिषद, जयहिंद परिवार, जनता बँक परिवार, आशा फाऊंडेशन, रोटरी परिवार, जैन उद्योग समूह परिवार, गांधी रिसर्च फाऊंडेशन यासह अनेकांनी सेवेचे संस्कार दिले व संधीही ! या सर्व संस्थांच्या मुळाशी आहे तो भारतीय संस्कृतीचा संस्कार 'सेवा परमो धर्म:'... अशी सेवा आपण कुठेही करु शकतो आणि त्याला आवश्यकता असते केवळ संवेदनशील मनाची... ते असेल तर अशा सेवेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपोआप घडून येतात. रोटरीचे ध्येय वाक्य आहे Service  Above Self अर्थात सेवा सर्वोपरी !  वैद्यकीय तपासणी शिबिरात सर्वांसाठी जनरल, डोळे, दात, हाडे यांची तपासणी होती. महिला व बालकांच्या तपासणीसाठी विशेष व्यवस्था होती. ९०० पुरुष, महिला व बालकांची नोंदणी तर जवळपास १२०० रुग्णांची तपासणी या शिबिरात झाली. अनेक वयस्कर मंडळींनी सर्वच तपासणींचा लाभ घेतला. १४० व्यक्तींना विनामूल्य चष्मे देण्यात आले तर आगामी काळात ५३ नेत्ररुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जवळपास ६५० रुग्णांना औषधींचे वाटप करण्यात आले. (तेव्हढेच रुग्ण येतील अशी अपेक्षा होती) शिबिराला प्रतिसाद इतका चांगला होता कि डॉक्टर शिबिरस्थळी आल्यापासून रुग्णच तपासत राहिले. ना त्यांचा , आयोजन करण्यात सहभाग देणाऱ्या झि. तो. महाजन माध्यमिक विद्यालय व ना. भा. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांचा , शिक्षकांचा वा रोटरी सदस्यांचा सन्मान झाला अर्थात उदघाटनाच्या वा कोणत्याही औपचारिक समारंभाशिवाय हे शिबीर झाले. असेही 'रोटरी'त घडू शकते याचेच हे उदाहरण !

मावळे - आजच्या शिवजयंती दिनी जन्मभूमी धानोरा व परिसरातील ग्रामस्थांसाठी रोटरीने आपल्या मावळ्यांद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराच्या सेवेचा कुंभ भरविला होता. त्याला जोड होती बडवानी या आदिवासी पाड्यावर बांधवांसाठी नवीन-चांगल्या जुन्या कपड्यांचे वाटपाची ! ज्याप्रमाणे "हिंदवी स्वराज्याची स्थापना" करण्यात महाराजांच्या सोबत मावळे होते त्याचप्रमाणे आजच्या या आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वितेमागे अनेक मावळे होते. या मावळ्यांमध्ये स्थानिकांसह रोटरी सदस्यांचा मोठा सहभाग होता. काही दृश्य-अदृश्य हात होते तर काही ज्ञात-अज्ञात व्यक्ती व संस्थाही ! या सर्वांप्रती  रोटरी क्लब जळगाव तसेच जन्मभूमी धानोरा व परिसरातील ग्रामस्थ व रुग्णांच्यावतीने प्रथम कृतज्ञतापूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष राजेश वेद, सर्व संचालक मंडळ सदस्य, मेडिकल कमिटी चेअरमन डॉ. काजल फिरके, नॉन-मेडिकल कमिटी चेअरमन कॅप्टन मोहन कुलकर्णी, वैद्य जयंत जहागिरदार, योगेश गांधी, मनोज जोशी, डॉ. तुषार फिरके, संदीप शर्मा, सुबोध सराफ कार्यक्रम निश्चितीसाठी व पूर्व तयारीसाठी प्रत्यक्ष भेट दिली. ज्येष्ठ मार्गदर्शक छबिलकाका, सौ. पूनम मानुधने यांनी शर्ट व सोलापुरी चादरींचे प्रायोजकत्व स्वीकारले. शिबीर नक्की झाल्यानंतर झि. तो. महाजन माध्यमिक विद्यालय व ना. भा. पाटील ज्युनिअर कॉलेजचे पदाधिकारी प्रदीप महाजन, आदरणीय बी. एस. महाजन, वामन महाजन, योगेश पाटील,बाजीराव सर, जगदीश पाटील, सागर चौधरी, प्राचार्य जमादार, देविदास महाजन सर, वासुदेव महाजन सर सर्व शिक्षक वृंद, देवाभाऊ, नारायणभाऊ व सर्व शिक्षकेतर कर्मचारी बांधव कामाला लागले व ५०० च्यावर तपासणी होईल असा विश्वासही दिला. त्यांच्या प्रयत्नांनी व सहकार्यानेच धानोरा सह परिसरातील ग्रामस्थ आले व  शिबिराचा लाभ घेऊ शकले. अशोक महाजन, संदीप गुजर, नवल महाजन यासह अनेकांचे सहकार्य लाभले. 

शिबिरासाठी जळगावहून खास डॉक्टरांचे पथक तपासणीसाठी आले होते. यात रोटरीचे माजी प्रांतपाल बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर सिकची, डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. दीपक पाटील, डॉ.तुषार फिरके, डॉ. हेमंत बाविस्कर, डॉ. पराग जहागिरदार, डॉ. पवन बजाज, डॉ. आदित्य जहागिरदार, डॉ. रोहन बोरोले, डॉ. सौ. माधुरी कासट, डॉ. सौ. साधना पाटील यांचेसह डॉ. सुमन लोढा, डॉ. तेजस पाटील, वैद्य जयंत जहागिरदार, डॉ. काजल फिरके, डॉ. महेश पाटील, चि. सूर्यवंशी यांचा समावेश होता. नोंदणी, नियोजन औषधी वाटप तसेच शिबिराच्या यशस्वीतेसाठीच्या सर्व व्यवस्था पाहण्यासाठी म्हणून अध्यक्ष राजेश वेद यांचेसह ज्येष्ठ रोटरी सदस्य जगदीशजी जाखेटे, प्रेम कोगटा, कॅप्टन मोहन कुलकर्णी, योगेश गांधी, मनोज जोशी, विजय जोशी, उदय पोतदार, मुकेश महाजन, सुबोध सराफ, सुभाष अमळनेरकर, किशोर तलरेजा, ऍड. हेमंत भंगाळे, पराग अग्रवाल, चंदन महाजन, रितेश जैन, पंकज व्यवहारे, योगेश चौधरी, मकरंद डबीर, हेमिन काळे, विश्वजित बऱ्हाटे तसेच सौ. माधुरी जहागिरदार, सौ. विनया जोशी, उल्हास सुतार, उमाकांत पाटील, विजय जोशी यांचे चिरंजीव व सहकारी यासह अनेकांचे सहकार्य लाभले. 

अशी शिवजयंती... अशी जन्मभूमी... अशी रोटरी... अशी सेवा आणि असे मावळे !  


गिरीश कुळकर्णी

मानद सचिव 

रोटरी क्लब जळगाव