Wednesday, 21 October 2026

नवरात्र : मानवतेचा जागर

घटस्थापनेपासून गुणस्थापनेपर्यंत 

लेखमालेचा समारोप : कृतार्थतेतून कृतज्ञतेकडे...

“देवीची आराधना केवळ पूजेतून नव्हे, तर तिच्यातील गुण आपल्या आचरणात उतरवून करूया!” हाच विचार घेऊन सुरू केलेली ‘नवरात्र : मानवतेचा जागर’ ही लेखमाला आज पूर्णत्वाला येत आहे.

भक्ती, विद्या, बुद्धी, मातृत्व, शांती, क्षुधा, क्षमा, शक्ती आणि तुष्टी या नऊ गुणांच्या माध्यमातून देवीच्या आराधनेला आचरणाची जोड देण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. प्रत्येक गुणावर लिहिताना स्वतःलाही अंतर्मुख होता आले. कारण इतरांना सांगण्यापूर्वी स्वतःच्या जगण्यात त्या गुणांचा जागर होणे अधिक महत्त्वाचे!

शब्दांना मिळालेले प्रेम...

या लेखमालेला वाचकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद मनाला भावणारा आहे. समाजमाध्यमांवरील प्रतिक्रिया, प्रत्यक्ष भेटीत अनेकांनी आवर्जून केलेले कौतुक आणि दैनिक लोकशाहीने आपल्या दैनिकातून दिलेली प्रसिद्धी—या सगळ्यांनी लेखनाचा आनंद द्विगुणित केला. काही वाचकांनी या लेखांची पुस्तिका तयार करण्याची सूचनाही केली. हे प्रेम आणि प्रोत्साहन माझ्यासाठी अनमोल आहे. सर्व वाचकांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता!

कर्तृत्वाचा आनंद क्षणिक असतो; कृतार्थतेची अनुभूती मनाला नम्र बनवते. या लेखमालेतून काही विचार मांडता आले, ते वाचकांच्या मनापर्यंत पोहोचले, याचे समाधान आहे. मात्र, हे सारे माझ्याच कर्तृत्वाचे फलित आहे, असे मला वाटत नाही.

माझ्या श्रद्धेचा भाव एकच—देवी भगवतीने माझ्याकडून ही सेवा करून घेतली! तिनेच बुद्धी दिली, विचारांना शब्दरूप दिले आणि हे कार्य पूर्ण करून घेतले. मी केवळ निमित्त झालो!

माहुरनिवासिनी माझी कुलदेवता, आदिशक्ती श्री रेणुका मातेच्या चरणी ही लेखमाला समर्पित! आई, माझ्या हातून असेच सत्कार्य घडवत राहा. सेवा करण्याची संधी दे आणि प्रत्येक कार्यानंतर कर्तृत्वाचा गर्व नव्हे, तर कृतार्थतेचा आनंद व कृतज्ञतेने भरलेले मन दे!

लेखमाला संपली, पण मानवतेचा जागर संपणार नाही. देवीसमोरचे दिवे विझतील; मात्र तिच्यातील सद्गुण आपल्या आचरणात उतरले, तर मानवतेचा दीप अखंड तेवत राहील.

शब्दांतून विचार जागो, विचारांतून कृती घडो आणि कृतीतून मानवतेचा सुगंध दरवळो!

आई रेणुका माते, तुला त्रिवार वंदन! त्रिवार नमस्कार! 🙏

॥ जय रेणुका माता ॥

गिरीश कुळकर्णी, 9823334084

No comments:

Post a Comment