घटस्थापनेपासून गुणस्थापनेपर्यंत…
क्षमारूपेण संस्थिता : क्षमेचा स्वीकार, मनाचा मोठेपणा!
नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या विविध रूपांची आराधना! देवीची ही रूपे मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या गुणांचे प्रतीक आहेत. या नवरात्रीत देवीच्या उपासनेसह तिच्यातील गुणांचाही आपल्या आचरणात जागर करूया.
“या देवी सर्वभूतेषु क्षमारूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”
अर्थ : सर्व प्राणिमात्रांच्या ठायी क्षमेच्या रूपाने स्थित असलेल्या देवीला वारंवार नमस्कार!
क्षमा : दुर्बलतेचे नव्हे, सामर्थ्याचे प्रतीक!
चूक कोणाकडून होत नाही? कधी आपण चुकतो, तर कधी दुसरे. एखादा शब्द मनाला लागतो, एखादी कृती विश्वासाला तडा देते किंवा जवळची व्यक्तीच आपल्याला दुखावते. अशा प्रसंगी मनात राग साचतो, कटुता वाढते आणि नात्यांमध्ये अंतर निर्माण होते. मग क्षमा करावी की नाही, हा प्रश्न स्वाभाविकपणे उभा राहतो.
अनेकदा क्षमा केली तर आपण कमी पडू किंवा समोरच्यापुढे झुकल्यासारखे होईल, असे वाटते. मात्र रागाच्या भरात प्रत्युत्तर देणे सोपे असते; दुखावलेले मन शांत करून सूडाची भावना सोडणे कठीण असते.
क्षमा करणे म्हणजे पराभव स्वीकारणे नव्हे, तर राग आणि अहंकार यांच्यावर विजय मिळवणे होय.
भगवद्गीतेत दैवी गुणांचे वर्णन करताना श्रीकृष्णाने “तेजः क्षमा धृतिः शौचम्…” असे म्हटले आहे. क्षमेचा समावेश दैवी संपत्तीमध्ये करून तिचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे क्षमा ही केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून व्यक्तिमत्त्वाला उंची देणारी वृत्ती आहे, हे स्पष्ट होते.
क्षमा म्हणजे विसरणे नव्हे, मनाला मुक्त करणे!
कुणीतरी आपल्याला दुखावले, तर त्या घटनेची आठवण सहज पुसता येत नाही. मात्र त्या आठवणीसोबत राग आणि द्वेष बाळगायचा की त्यातून शिकून पुढे जायचे, हा निर्णय आपल्या हातात असतो.
उदाहरणार्थ, व्हॉट्सअपच्या एखाद्या समूहात आपली खिल्ली उडवली जाते. आपण दुखावतो, प्रत्युत्तर देतो, संदेशांचे स्क्रीनशॉट इतरांना पाठवतो आणि वाद वाढत जातो. मूळ घटना काही क्षणांची असते; पण तिचा परिणाम अनेक दिवस मनात राहतो. अशा वेळी थोडे थांबून परिस्थिती समजून घेणे आणि गरज असल्यास शांतपणे आपली भूमिका मांडणे अधिक योग्य ठरते. सोशल मीडियावरील ट्रोलिंग तसेच एखाद्या चुकीसाठी व्यक्तीला कायमचे नाकारण्याच्या प्रवृत्तीच्या काळात हा दृष्टिकोन विशेष महत्त्वाचा आहे.
क्षमा म्हणजे चुकीला समर्थन देणे नव्हे; तर त्या चुकीला आपल्या मनःशांतीवर कायमचे राज्य करू न देणे.
क्षमा आणि न्याय : दोन्ही महत्त्वाचे!
क्षमा करण्याचा अर्थ अन्याय सहन करणे असा अजिबात नाही. एखाद्याची चूक क्षमा केली, तरी तिचे परिणाम नाहीसे होत नाहीत. चुकीला विरोध करणे, योग्य ती कारवाई करणे आणि स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करणे आवश्यक असू शकते.
उदाहरणार्थ, कामाच्या ठिकाणी एखाद्याने आपल्या कामाचे श्रेय घेतले, तर सूडभावना बाळगण्याऐवजी वस्तुस्थिती स्पष्ट करून योग्य तो न्याय मागणे गरजेचे आहे. त्याच वेळी त्या व्यक्तीविषयी द्वेष वाढवत राहणे टाळता येते. नात्यांमध्येही हेच लागू होते. क्षमा केल्याने विश्वास लगेच पूर्ववत होईलच असे नाही. तो पुन्हा निर्माण होण्यासाठी वेळ, प्रामाणिकपणा आणि वर्तनातील बदल आवश्यक असतात.
क्षमा मनातील द्वेष कमी करते; विवेक आपल्याला योग्य भूमिका घ्यायला शिकवतो.
दुसऱ्यांना क्षमा करताना स्वतःलाही समजून घेऊ या!
दुसऱ्यांच्या चुका आपण सहज लक्षात ठेवतो; पण स्वतःच्या चुका स्वीकारताना मात्र अनेकदा अडखळतो. एखाद्या परीक्षेत अपयश आले, चुकीचा निर्णय घेतला किंवा आपल्या वागण्यामुळे जवळच्या व्यक्तीचे मन दुखावले, तर अपराधीपणा निर्माण होतो. तीच घटना पुन्हा पुन्हा आठवून आपण स्वतःलाच दोष देत राहतो.
स्वतःला क्षमा करणे म्हणजे चूक झाकणे किंवा जबाबदारी टाळणे नव्हे. चूक मान्य करणे, शक्य असेल तिथे नुकसान भरून काढणे, माफी मागणे आणि त्यातून शिकून पुढे जाणे, हा त्याचा खरा अर्थ आहे.
क्षमेचा जागर, नात्यांचा सन्मान!
नवरात्रीत क्षमारूपिणी देवीचे स्मरण करताना स्वतःला तीन प्रश्न विचारूया—
- मी एखाद्या जुन्या चुकीचा राग आजही मनात धरून ठेवला आहे का?
- माझ्याकडून चूक झाली, तर ती मान्य करून माफी मागण्याचे धैर्य माझ्यात आहे का?
- क्षमा करताना दुसऱ्याचा सन्मान आणि स्वतःचा स्वाभिमान यांचा समतोल राखतो का?
या प्रश्नांची उत्तरे शोधताना एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो, एखाद्या नात्याला नवी संधी मिळू शकते किंवा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. क्षमा मागणे, क्षमा करणे आणि चुकीतून शिकणे—या तिन्ही गोष्टींसाठी मनाचा मोठेपणा लागतो. त्यातून घरात, कामाच्या ठिकाणी आणि समाजात अधिक समंजस वातावरण निर्माण होऊ शकते.
हाच नवरात्रीचा खरा जागर—मनातील कटुता सोडण्याचा, स्वतःच्या चुका स्वीकारण्याचा, अन्यायाविरुद्ध विवेकाने उभे राहण्याचा आणि क्षमेतून नात्यांना नवी संधी देण्याचा!
देवीच्या चरणी प्रार्थना—
“हे क्षमारूपिणी माते, दुसऱ्यांच्या चुका समजून घेण्याची उदारता, स्वतःच्या चुका मान्य करण्याचे धैर्य आणि अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहण्याची विवेकबुद्धी आम्हाला दे. आमच्या मनातील कटुता दूर करून नात्यांत समजूतदारपणा आणि जीवनात शांतता निर्माण करण्याची शक्ती दे!”
॥ जय माता दी! ॥
गिरीश कुळकर्णी
No comments:
Post a Comment