कणखर नेतृत्व, समर्पित निष्ठा
१५१ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख
काही व्यक्तिमत्त्वे इतिहास घडवतात, काही इतिहासाला दिशा देतात, तर काही आपल्या कर्तृत्वाने राष्ट्राच्या अस्तित्वालाच नवी ओळख देतात. सरदार वल्लभभाई पटेल हे अशाच असामान्य व्यक्तिमत्त्वांपैकी एक! भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील कणखर सेनानी, महात्मा गांधींचे विश्वासू सहकारी, कुशल संघटक, वास्तववादी राजकारणी आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या एकात्मतेचे शिल्पकार म्हणून त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या पोलादी इच्छाशक्तीमुळे आणि मुत्सद्दी नेतृत्वामुळे शेकडो संस्थानांत विभागलेला भारत एका संघराज्याच्या रूपाने उभा राहिला. म्हणूनच ते भारतीय इतिहासात 'लोहपुरुष' म्हणून अजरामर झाले.
३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नडियाद येथे एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सामान्य ग्रामीण वातावरणात वाढलेल्या वल्लभभाईंनी पुढे इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टरची पदवी संपादन केली. अहमदाबादमध्ये यशस्वी वकिली सुरू असताना महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी सुखासीन व्यावसायिक जीवनाचा त्याग करून स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेतले. त्यांच्यातील नेतृत्वगुण, संघटनकौशल्य आणि निर्णयक्षमता यांची खरी कसोटी पुढील काळात लागली.
व्यक्तिमत्त्व : कणखरपणा आणि संवेदनशीलतेचा संगम
सरदार पटेल यांचे व्यक्तिमत्त्व बाहेरून कठोर, पण आतून अत्यंत संवेदनशील होते. स्पष्टवक्तेपणा, शिस्त, धाडस, अढळ निष्ठा, साधेपणा, विनोदबुद्धी आणि कर्तव्यनिष्ठा हे त्यांच्या स्वभावाचे विशेष पैलू होते. कोणत्याही संकटाला सामोरे जाताना ते भावनेच्या भरात निर्णय घेत नसत. परिस्थितीचे वास्तव समजून घेऊन योग्य निर्णय घेणे आणि तो पूर्णत्वास नेणे ही त्यांची कार्यपद्धती होती.
त्यांच्या स्वभावातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वैयक्तिक दुःखापेक्षा कर्तव्याला दिलेले प्राधान्य. त्यांच्या पत्नीचे निधन झाले, त्यावेळी ते न्यायालयात एका खटल्यात उलटतपासणी करीत होते. पत्नीच्या निधनाची तार हातात मिळाल्यानंतरही त्यांनी ती शांतपणे बाजूला ठेवली आणि आपला युक्तिवाद पूर्ण केला. न्यायालयीन काम संपल्यानंतरच त्यांनी ही दुःखद बातमी इतरांना सांगितली. हा प्रसंग त्यांच्या मनाची कणखरता आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा स्पष्ट करतो.
त्यांच्या साधेपणाचा आणखी एक सुंदर दाखला महावीर त्यागी यांनी नोंदवला आहे. पटेल उपचारासाठी डेहराडून येथे गेले असताना महावीर त्यागी त्यांना भेटायला गेले. त्या वेळी पटेलांच्या कन्या मणिबेन ठिगळ लावलेली साडी नेसून उपस्थित होत्या. त्यागी यांनी त्यांच्याविषयी विचारणा केली असता पटेल हसून म्हणाले, "गरीब बापाची ती मुलगी आहे. तिला नवीन कपडे घेणं कसं परवडेल?" मणिबेन जुन्या कपड्यांपासून वडिलांसाठी कपडे तयार करीत असत. स्वतःच्या गरजा मर्यादित ठेवून सार्वजनिक जीवनातील साधेपणा जपणारे हे कुटुंब त्यांच्या जीवनमूल्यांची साक्ष देते.
काकासाहेब कालेलकरांनी पटेलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही गुणांचे दर्शन घडत असल्याचे नमूद केले आहे. शिवाजी महाराजांप्रमाणे लढाऊ वृत्ती आणि नेतृत्वगुण, तर टिळकांप्रमाणे कणखरपणा आणि वैचारिक ठामपणा त्यांच्यात होता. खेेडा आणि बारडोलीच्या सत्याग्रहांचे यशस्वी नेतृत्व करताना हे गुण प्रकर्षाने दिसून आले.
स्वातंत्र्यलढ्यातील कर्तृत्व : शेतकऱ्यांच्या संघर्षातून राष्ट्रीय नेतृत्वाकडे
१९१८ मधील खेेडा सत्याग्रहाने पटेलांच्या सार्वजनिक जीवनाला निर्णायक दिशा दिली. दुष्काळ आणि पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना ब्रिटिश सरकार महसूलवसुलीचा आग्रह धरत होते. गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली पटेलांनी शेतकऱ्यांना संघटित केले. अन्यायकारक महसूलवसुलीविरुद्धचा हा लढा यशस्वी झाला.
१९२८ मधील बारडोली सत्याग्रह हे त्यांच्या नेतृत्वाचे सुवर्णपान ठरले. जमीन महसुलात अन्यायकारक वाढ केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. पटेलांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांना संघटित केले आणि महसूल न भरण्याच्या निर्धारामागे एकजूट उभी केली. ब्रिटिश सरकारने जप्ती, धमक्या आणि दडपशाहीचा मार्ग अवलंबला; परंतु शेतकरी डगमगले नाहीत. अखेर सरकारला माघार घ्यावी लागली. या यशस्वी आंदोलनानंतर तेथील महिलांनी त्यांना 'सरदार' ही पदवी बहाल केली. पुढे संपूर्ण देशाने त्यांना याच नावाने गौरविले.
नागपूर ध्वज सत्याग्रह, बोरसद सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह आणि १९४२ च्या 'भारत छोडो' आंदोलनातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्वातंत्र्यलढ्यात त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला. काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीत त्यांनी बजावलेली भूमिका विशेष महत्त्वाची होती. गांधीजींनी जनतेला आंदोलनाचा कार्यक्रम दिला, तर पटेलांनी त्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संघटनशक्ती उभी केली. त्यामुळे काँग्रेस पक्ष सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकला.
गांधीजींचे समर्पित अनुयायी
सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांचे नाते हे केवळ राजकीय सहकाऱ्यांचे नव्हते, तर परस्पर विश्वास, आदर आणि निष्ठेवर आधारलेले होते. गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या विचारांवर पटेलांची दृढ श्रद्धा होती. स्वभावाने ते स्पष्टवक्ते आणि काहीसे बंडखोर होते. तरीही त्यांनी गांधीजींना आपले मार्गदर्शक मानले.
गांधीजींनीही पटेलांच्या नेतृत्वगुणांची आणि कार्यक्षमतेची वेळोवेळी प्रशंसा केली. खेेडा सत्याग्रहापासून ते देशव्यापी आंदोलनांपर्यंत गांधीजींनी सोपविलेली जबाबदारी पटेलांनी समर्थपणे पार पाडली. गांधीजींनी लाखो लोकांना प्रेरित केले; पटेलांनी त्या प्रेरणेला संघटित शक्तीचे रूप दिले.
नेहरू आणि पटेल : मतभेदांच्या पलीकडचे मैत्र
पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांचे नाते भारतीय राजकारणातील एक महत्त्वपूर्ण आणि तितकेच गुंतागुंतीचे प्रकरण आहे. दोघांचे स्वभाव, वैचारिक दृष्टिकोन आणि कार्यपद्धती वेगवेगळ्या होत्या. नेहरू भावनाप्रधान, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन असलेले आणि समाजवादी विचारांकडे झुकणारे होते; तर पटेल वास्तववादी, व्यवहारकुशल, संघटनप्रिय आणि प्रशासनाच्या बाबतीत शिस्तीला प्राधान्य देणारे होते.
नेहरूंना मोठ्या उद्योगांच्या माध्यमातून देशाची प्रगती साधावी असे वाटत होते, तर पटेलांना शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकासही तितकाच महत्त्वाचा वाटत होता. आर्थिक धोरण, पाकिस्तानशी संबंध, काश्मीर प्रश्न, देशांतर्गत परिस्थिती आणि काँग्रेसमधील नेतृत्व अशा अनेक विषयांवर त्यांच्यात मतभेद होते. हे मतभेद खरे होते; मात्र त्यांचे नाते केवळ संघर्षाचे नव्हते.
नेहरूंच्या मते, पटेल हे त्यांच्या मंत्रिमंडळाचा भक्कम आधार होते. १४ नोव्हेंबर १९४८ रोजी नेहरूंनी सार्वजनिक भाषणात पटेलांसोबतच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या सहकार्याचा गौरव केला आणि त्यांच्या प्रेम व सल्ल्यामुळेच राज्यकारभार सांभाळणे शक्य झाल्याचे नमूद केले.
३ फेब्रुवारी १९४८ रोजी नेहरूंनी पटेलांना लिहिलेल्या पत्रात परस्परांतील गैरसमज दूर करण्यासाठी मोकळेपणाने चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आणि पत्राच्या शेवटी आपले प्रेम व मैत्री व्यक्त केली. गांधीजींच्या हत्येनंतर पटेलांनीही मतभेदांपेक्षा देशासाठी एकत्र काम करण्याची आवश्यकता अधिक तीव्रतेने व्यक्त केली. त्यांनी नेहरूंना लिहिलेल्या उत्तरात परस्परांतील ऐक्य अबाधित ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
दोघांनीही अनेकदा वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले. पटेलांनी गांधीजींच्या इच्छेचा आदर करून पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आणि नेहरूंच्या नेतृत्वाला सहकार्य केले. मंत्रिमंडळातील मतभेद असूनही त्यांनी देशाच्या स्थैर्याला आणि एकात्मतेला प्राधान्य दिले. ही त्यांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा राष्ट्रहित मोठे मानण्याची वृत्ती होती.
त्यांच्या नात्याचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर — विचार वेगळे असू शकतात; पण देशासाठी काम करताना मनात परस्परांविषयी आदर आणि विश्वास असणे अधिक महत्त्वाचे आहे.
संस्थानांचे विलीनीकरण : अखंड भारताचे शिल्पकार
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला; परंतु स्वातंत्र्य मिळाले म्हणजे भारत एकसंध झाला, असे नव्हते. ब्रिटिश भारताबरोबरच देशात ५६० हून अधिक संस्थाने होती. या संस्थानांना भारतात सामील होण्याचा, पाकिस्तानात जाण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा प्रश्न भेडसावत होता. त्यामुळे नव्या भारतासमोर राजकीय एकात्मतेचे अत्यंत मोठे आव्हान उभे होते.
स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून सरदार पटेल यांच्यावर या ऐतिहासिक जबाबदारीची धुरा सोपविण्यात आली. व्ही. पी. मेनन यांच्या कुशल प्रशासकीय सहकार्याने पटेलांनी राजे-महाराजांशी संवाद साधला, त्यांना नव्या भारताच्या एकात्मतेचे महत्त्व पटवून दिले आणि बहुतेक संस्थानांचे विलीनीकरण शांततामय मार्गाने घडवून आणले.
जुनागढच्या प्रश्नावर त्यांनी ठाम भूमिका घेतली. हैदराबादच्या निजामाने स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सप्टेंबर १९४८ मध्ये पोलिस कारवाई करण्यात आली आणि हैदराबाद भारतात विलीन झाले. त्रावणकोर, भोपाळ, जोधपूर यांसारख्या संस्थानांच्या प्रश्नांवरही त्यांनी मुत्सद्देगिरी, संवाद आणि आवश्यक तेथे ठामपणा दाखविला.
ही प्रक्रिया केवळ राजकीय नकाशा बदलण्यापुरती मर्यादित नव्हती. विविध भाषा, संस्कृती, परंपरा आणि राजकीय व्यवस्था असलेल्या प्रदेशांना एका संघराज्यात आणण्याचे हे प्रचंड कार्य होते. पटेलांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रशासकीय कौशल्यामुळे भारताच्या एकात्मतेचा भक्कम पाया घातला गेला. त्यांचे हे योगदान म्हणजे आधुनिक भारताच्या निर्मितीतील सर्वांत महत्त्वाच्या उपलब्धींपैकी एक!
जळगावच्या महाराष्ट्र परिषदेत पटेल बंधूंचा गौरव आणि परखड विचार
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनप्रवासातील जळगावशी संबंधित एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक संदर्भ म्हणजे येथे भरलेली मे १९२४ मधील महाराष्ट्र परिषद. या परिषदेत त्यांचे ज्येष्ठ बंधू विठ्ठलभाई पटेल यांच्यासह त्यांचा गौरव करण्यात आला होता. परिषदेत गंगाधरराव देशपांडे अध्यक्षस्थानी होते. या सन्मानाला उत्तर देताना पटेलांनी आपल्या स्वभावाला साजेशी परखड भूमिका मांडली.
आपण कोणत्याही एका जातीचे किंवा समाजाचे प्रतिनिधी म्हणून येथे आलेलो नाही, तर प्रथम भारतीय आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या भाषणातील आशय असा होता की, आपण आधी हिंदुस्थानी, त्यानंतर हिंदू आणि मग पाटीदार आहोत. देश गुलाम असताना जातीय श्रेष्ठत्वाचा अभिमान बाळगण्यात अर्थ नाही. तीस कोटी भारतीय गुलाम असताना ब्राह्मण, क्षत्रिय किंवा पाटीदार गुलाम असे वेगवेगळे भेद करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
त्यांच्या या विचारांतून राष्ट्रीय एकात्मतेविषयीची त्यांची प्रखर बांधिलकी दिसून येते. त्यांनी केवळ जातिभेदावर टीका केली नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाने व्यापक राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. जळगावच्या या ऐतिहासिक परिषदेत व्यक्त झालेले त्यांचे विचार आजही तितकेच समर्पक आहेत. स्थानिक पातळीवरील सामाजिक एकात्मतेपासून राष्ट्रीय एकतेपर्यंतचा त्यांचा दृष्टिकोन या भाषणातून स्पष्ट होतो.
जळगावच्या इतिहासाच्या दृष्टीनेही ही घटना महत्त्वाची आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील दोन ज्येष्ठ नेत्यांचा — विठ्ठलभाई आणि वल्लभभाई पटेल यांचा — एकाच व्यासपीठावर झालेला गौरव आणि त्यानंतर मांडलेले त्यांचे विचार हा जळगावच्या सार्वजनिक जीवनातील अभिमानाचा ठेवा आहे.
राष्ट्रहित सर्वोच्च : आजच्या काळासाठी संदेश
सरदार पटेलांचे संपूर्ण जीवन एका मूलभूत तत्त्वाची शिकवण देते — व्यक्तीपेक्षा विचार मोठा, विचारापेक्षा कर्तव्य मोठे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रहित सर्वोच्च!
ते निर्णय घेताना कठोर असत; परंतु त्यामागे वैयक्तिक आकस किंवा स्वार्थ नसे. विरोधकांशी संवाद साधण्याची तयारी, योग्य वेळी तडजोड करण्याची क्षमता आणि आवश्यक तेथे ठाम भूमिका घेण्याचे धैर्य हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. मतभेद असले तरी सहकार्याची दारे बंद करायची नाहीत, हे त्यांनी नेहरूंसोबतच्या संबंधांतून दाखवून दिले.
१५ डिसेंबर १९५० रोजी या महान नेत्याचे निधन झाले. मात्र त्यांनी उभा केलेला एकात्म भारत आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत आहे. गुजरातमधील केवडिया येथे उभारलेला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वांत उंच पुतळा त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो; पण त्यांचे खरे स्मारक म्हणजे एकसंध, समर्थ आणि आत्मविश्वासपूर्ण भारत!
सरदार पटेलांची १५१ वी जयंती साजरी करताना त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा स्वीकार करणे अधिक महत्त्वाचे आहे. मतभेद असले तरी मनभेद होऊ न देणे, समाजातील भेद विसरून राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य देणे, जबाबदारी स्वीकारून ती निष्ठेने पार पाडणे आणि राष्ट्रहितासाठी आवश्यक तेव्हा वैयक्तिक भूमिका बाजूला ठेवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
ज्यांनी शेकडो संस्थानांना एकत्र आणून भारताला एकात्मतेचे सामर्थ्य दिले, त्या लोहपुरुषाच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
सरदार पटेल अमर राहोत! अखंड भारताचा संकल्प चिरायू होवो!
No comments:
Post a Comment