Monday, 24 August 2020

कृतज्ञता आयुष्यातील सुवर्णकाळ देणाऱ्या शाळेप्रतीची !


बालवाडी ते १० वी पर्यंतचे पारंपरिक शिक्षण देणारी शाळा ! खरं तर अतिशय व्यापक अर्थ असलेला शब्द म्हणजे शाळा. आयुष्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व देणारी शाळा. ती केवळ चार भिंतीत कशी ? ती सर्वत्रच.. सुरुवात घरापासून, मग शाळा, महाविद्यालय, समाज, कार्यालय, निसर्ग, संस्था / संघटना. आयुष्याला समृद्ध करणाऱ्या विविधांगी शाळा. येथे कायम सोबत असते ती दप्तराची... लहानपणापासून धरलेले हे दप्तर आयुष्याच्या संध्याकाळी हिशेब मांडतांनाही कामात येत अर्थात त्याचे स्वरुप बदललेले...मात्र निकाल सांगणारेच. त्यासाठीच शाळेप्रतीची कृतज्ञता व्यक्त करतांना श्री. प्रदीप रस्से यांनी त्याचे प्रतिक म्हणून अतिशय समर्पक असे दप्तराचे चित्र काढून दिले आहे. असो. आयुष्याचा भविष्यकाळ समर्थ व सफल करण्यासाठी अत्यावश्यक असलेले सर्व काही देते ती शाळा. म्हणूनच लेखाचे शिर्षकात त्याला सुवर्णकाळ म्हटलं आहे. त्या सुवर्णकाळासाठीच आपण सर्व आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अगदी प्रत्येकजण ! 

आशा फौंडेशन सार्वजनिक गणेशोत्सव २०२० अंतर्गत "कृतज्ञता उत्सव" आपल्या सर्वांच्या सहभागाने साजरा करतोय. त्या बाप्पाला जे जे काही त्याने भरभरुन दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय. मी सर्वांच्या भावनांना एकत्रितपणे सूत्रबद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. आज मात्र मी माझ्या शाळेच्या माध्यमातून ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक माणूस हा एका "वल्ली" आहेच पण हे अधोरेखित करण्याचे काम करते ती शाळा ! सर्वांनी मांडलेला सुवर्णकाळ खराच आहे मात्र काही तरी सुटलंय किंवा सोडलंय. लेख थोडा मोठा झाला तरी काही सुटू नये असे पाहू. 

३४ वर्षानंतर महाव्याख्यान कार्यक्रमाचे उदघाटनप्रसंगी श्रीमती हिरा खंदलकर 

माझी प्राथमिक शाळा धुळ्याची लायन्स नूतन विद्या मंदिर (समाधीची शाळा) १ ली ते ४ थी बाई एकच श्रीमती विजया कुळकर्णी आमच्या विजूबाई ! आणि दुसरी महत्वाच्या बाई म्हणजे मोठ्या बाई अर्थात श्रीमती हिरा खंदलकर. विजूबाई साध्या आणि मोठ्या बाई केवळ खतरनाक म्हणजे हातात कायम पट्टी आणि कडक शिस्त. पहिले अर्धे वर्ष तसे बऱ्यापैकी खिडकीत बसून आईची वाट पाहण्यात आणि रडण्यात गेले. पण येथील सर्व जादुई शिक्षकांनी शाळा आणि अभ्यास यांचे गोडी लावायचे काम केले. या शाळेच्या स्नेहसंमेलनात म्हटलेले गाणे आजही आठवते. "शाळेतही मी जाणार, पाटी घेऊनी, घेऊनी पुस्तक, अभ्यास मी करणार " खूप मस्ती केली, मार खाल्ला. मनाचे श्लोक ४० पर्यंत पाठ, पाढे तीस पर्यंत पाठ... आजही झोपेतून उठविले तर सांगेन ! हिच तर खरी गंमत आहे शाळेची. अभ्यास महत्त्वाचाच मात्र इतरही गोष्टी तेव्हढ्याच प्राधान्यक्रमाच्या. जीवनाचे खरे टप्पे टोणपे तेथे मिळाले. तसा घरच्यांना खूप त्रास दिला शाळेत जातांना... पालक शिक्षक युतीचा नेहमीप्रमाणे विजय झाला आणि आम्ही एकदाचे शाळकरी झालो. 

माध्यमिक शाळा त्याहून भारी धुळे एज्युकेशन सोसायटीची न्यू सिटी हायस्कुल ! ५ वीत प्रवेश झाला. वर्गशिक्षक श्री. बी. एन. जोशी सर, विषय इंग्रजी. शाळेची वेळ दररोज दुपारची मात्र शनिवारी सकाळची. त्या दिवशी आमचे सर धोतर आणि पांढरा सदरा आणि कापली मस्त गंध. शाळा केवळ मुलांची त्यामुळे दंगामस्तीला कोणतेही बंधन नाही. (असं विधान धारिष्ट्याने करतोय कारण शाळा शिस्तीचीच होती पण आम्ही ? ) जगण्याला लायक बनविणे, माणूस म्हणून घडविणे म्हणूनच तर म्हणतात ना ! शाळा सुरु व्हायची ती "जयोस्तुते जयोस्तुते..." या गीताने अर्थात त्यापूर्वी अन्यही गाणे लागायची. त्यात ऋणानुबंधाच्या आवर्जून आठवते. राष्ट्रगीत झाले कि दिनक्रम सुरु... साधारण ७ वी नंतर हे जरी सुरुच असले तरी आमची कबड्डी जोरात चालायची. पांढर शर्ट आणि खाकी अर्धी चड्डी हा गणवेश. सकाळी आईने मोठ्या कष्टाने धुतलेला पांढरा शर्ट संध्याकाळी पार वाट लागलेली. बटण तुटलेले, कुठेतरी फाटलेले, हातापायाला कायम मलमपट्टी सौभाग्याचं लेणंच ते ! ९ वी पर्यंत पीटीच्या तासाला शिवाजी व्यायामशाळेच्या मैदानावर सर्वांच्या पुढे... मात्र दहावीत काही तरी कारण सांगून वर्गातच. शनिवारी संपूर्ण शाळेची मास ड्रिल अर्थात एकत्रित पिटी ! हात करतांना काय धाक असायचा शिक्षकांचा... एव्हढ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सरांचे लक्ष कुळकर्णी हात सरळ हात सरळ. 

आदरणीय मु. कृ. पाध्ये सर 
आमच्या शाळेचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे मुख्याध्यापक मुकुंद कृष्णाजी पाध्ये ! (नुकतेच त्यांचे निधन झाले) शनिवारी सकाळची शाळा उशिरा येणाऱ्या मुलांना चढ्या क्रमाने शिक्षक... पहिल्यांदा २५ , ५० उठबशा, त्यानंतर आलेल्यांना हातावर वेताच्या छडीचे फटके ३, ५, १० त्यानंतर आल्यावर दोन्ही आणि वरुन कोंबडा करुन उभे राहा ! तास सुरु असतांना मुख्याध्यापकांचा राउंड असायचा खिडकीतून लक्ष आणि पुन्हा लक्ष नाही किंवा काही रिकामे काम करतांना दिसला कि आहेच... १०० मीटर रनिंग, लांब उडी, उंच उडी, खो खो, क्रिकेट... याच्या जोडीला नाटके, गीत गायन, वेगवेगळ्या स्पर्धा ! अभ्यास तो पण होताच कि.... या सगळ्या गोष्टींची तयारी भूतो न भविष्यती ! तुम्हाला कितीही चांगले झाले वाटले तरी गुरुजींचे समाधान कुठे ? परत सुरु... मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा... जीवनात जिद्द, मेहनत, सातत्य, वचनबद्धता, समर्पण, संयम, सातत्य हे सर्व आले येथून अर्थात तेव्हा हे शब्द गावी पण नव्हते. म्हणून तर हा सुवर्णकाळ ! एव्हढे सर्व असल्यावर कोणाला हवी सुट्टी ? जीवावर यायचे सुट्टी असली कि... हेच शाळेचं यश आणि उद्देशही आणि म्हणूनच हि दीर्घ कृतज्ञता ! 

या जोडीला अजून इतर परीक्षा असायच्या त्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी आणि गणिताच्या ४ परीक्षा दरवर्षी एक एक करीत ९ वी पर्यंत बहुतांश मुले द्यायचीच... तरखडकर इंग्रजी ग्रामर तेथे कळालं. ज्यांना चित्रकलेची आवड त्यांच्यासाठी एलिमेंटरी, इंटरमिजीएट. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गीता पठण, कणकवलीची राज्य बाल्य नाट्य स्पर्धा, मनाचे श्लोक, जोडीला लक्ष लक्ष सूर्य नमस्कारासारखे उपक्रम, एनसीसी कॅम्प... स्पोर्ट मीट / वीक वगैरे भाग नव्हता कारण तो रोजचा भाग होता. सर्वच मुले हुशार आणि प्रत्येकामुळे शाळेला एक वेगळी ओळख. अर्थात हुशार म्हणजे ज्याच्या त्याच्या विषयात म्हणजे अभ्यास, खेळ, वक्तृत्व, वादविवाद, नाटक, गाणे... काही ना काही तर प्रत्येकात आहेच नं ! तेच शोधून त्यावर काम करणे हेच शाळेचे ध्येय. 

शाळेचा शिक्षकवृंद !
मधल्या सुट्टीतही कबड्डी, क्रिकेटच्या मॅचेस चालू असतील स्कोर पाहायला बाहेर जाणार खास स्कोर लिहिले जायचे परतीला वेळ झाला कि आहेच पुन्हा... बाहेर गाडीवर मिळणाऱ्या गोळ्या, अमुन्या, वाळलेली बोर असो. शाळे शेजारीच स्वस्तिक चित्र मंदिर (थिएटर) काही वेळेस टॉकीजमधील पिक्चरचे डायलॉग गाणे स्पष्ट ऐकू यायचे. मस्ती केली तरी पाय वाकडे पडणार नाही याची काळजी... विचारांची पक्की बैठक अर्थात त्यामागे होती शाळेतील शिक्षकांची मेहनत. शाळा म्हणजे खरे तर शिक्षक ६ वीला श्री. एस. एस. मुसळे सर, ७ वीला श्री. ह. म. भंडारी, ८ वी श्री. आर. एस. जहागीरदार, ९ वीला एन. एन. शाह आणि दहावीला श्री. शा. रा. नाईक प्रत्येकाचे एक वेगळेपण , वैशिष्ट्य... असेच गणिताचे श्री. व्ही. वाय. दाबके, इतिहासाचे श्री. मदनलाल मिश्रा, संगीत कलाचे श्री. रत्नाकर रानडे आणि एनसीसीचे श्री. आर. एस. पाटील. सर्व नररत्नांची खाणच... नाही याच्यापुढे लिहिता येणार. माणूस घडणं, माणूस उभा राहणं इतकी सोपी गोष्ट नाही मात्र ते करु शकते ती समाजजीवनातील शाळा नावाची व्यवस्था ! अशा शाळा आणि अशी व्यवस्था भारतीय संस्कृतीची धरोहर आहे. त्यातूनच निर्माण होणारा वसा आणि वारसाही ! त्यासाठीच शाळेप्रतीची कृतज्ञता... विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची हि कृतज्ञता अशीच कायम संक्रमित होत राहो ज्यामुळे संस्कृती व राष्ट्र चिरकाल टिकेल... हिच बा गणराया चरणी मनापासून प्रार्थना  ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Sunday, 23 August 2020

कृतज्ञता शिक्षकांप्रतीची...!


माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो मग शिक्षकाची भूमिका महत्वपूर्ण ठरतेच आणि ती देखील आयुष्यभरासाठी... म्हणूनच आपण त्यांच्याप्रती कायम कृतज्ञ असणे हेच खऱ्या अर्थाने माणूसपणाचे लक्षण आहे. पहिले गुरु माता-पिता, तदनंतर शालेय शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षण, व्यावसायिक शिक्षण देणारे वरिष्ठ सहकारी, आध्यात्मिक जीवनाची दिशा दर्शन करणारे अशा एका व्यक्ती सोबतच आपला जीवनप्रवास सुरु असतो. हा प्रवास जेव्हढा समृद्ध तेव्हढा माणूस अधिक प्रगल्भ ! हि प्रगल्भताच माणसाला एक संवेदनशील व जागरुक नागरिक बनवितो. माणसाची हि जडणघडण करणाऱ्या शिक्षकांप्रती आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० च्या कृतज्ञता उत्सवात आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत. 

विषय शिक्षणाबरोबरच जीवन विषयक दृष्टिकोन देणारे, व्यावहारिक जगाची ओळख करुन देणारे, आपल्यातील कला कौशल्याला विकसित करीत सर्वांगीण विकास साधणाऱ्या शिक्षकांनी आयुष्यभराची जी शिदोरी दिली आहे त्याबद्दल हि कृतज्ञता ! केवळ व्यक्तीच नव्हे तर अनुभव हाही शिक्षकच. व्यावहारिक शिक्षणाबरोबरच समाज जीवन समृद्ध करणारे समाजशिक्षकही या कृतज्ञतेचे हक्कदार ठरतात. अर्थात हि कोणत्याही शिक्षकाची मागणी नव्हे तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या हृदयात आपल्या कृतीने निर्माण केलेली ती जागा आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे मिळविलेला तो सन्मान आहे. 

मुळात शाळा या विषयाची भीती घालविणारे प्राथमिक शाळेतील शिक्षक, विषयांची व खेळाची गोडी लावणारे शिक्षक, आपल्यातील उपजत गुणांना ओळखून त्याद्वारे व्यावसायिक जगतात आपली जागा निर्माण करणारे महाविद्यालयीन शिक्षक या सर्वांचेच जीवनात एक वेगळे स्थान आहे. चांगले वळण लावण्यासोबतच प्रेरणा, जिद्द, नवीन काहीतरी करण्याचे बळ, कर्तव्याची जाणीव, दातृत्व व नैतिकता देणारे हे सारे शिक्षक. कधिक कौतुक करुन तर कधी रागावून सारासार विवेकाने जीवन जगण्याची गुरुकिल्ली देणारे शिक्षक. आपुलकी व आत्मीयतेने शिस्त, क्षमा व करुणा उत्पन्न करणारे शिक्षक. कर्तव्य पलीकडे व चाकोरीबाहेर जाऊन एक माणूस घडविण्यासाठी, राष्ट्रप्रेमी नागरिक घडविण्यासाठी  चाललेली हि धडपड अविरत, अविश्रांत आणि निश्चयाने ! 

कुणाला मातीच्या गोळ्याला दिलेला आकार तर कोणाला सुरवंटाचे फुलपाखरातील परिवर्तन वाटते. एका बाजूला नव्या जगाची ओळख करुन देणारे तर दुसऱ्या बाजूला त्याला सामोरे जाण्यासाठीची सिद्धता करणारे हे शिक्षक. वयाच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर तटस्थपणाने सिंहावलोकन केले तर त्यांच्यातील या सर्वांमध्ये एक सामान धागा दिसतो तो म्हणजे आपला विद्यार्थी घडविण्यासाठी त्याच्यातील गुणग्राहकता शोधण्याचे सर्वात अवघड काम... विद्यार्थ्याने आपल्या यशाचे दिलेले संपूर्ण श्रेय हिच त्याची कर्तव्य परायणता ! शिक्षकाला विद्यार्थ्यांची आई तर आईला बाळाची शिक्षिका होता आले पाहिजे असे म्हणत असतांनाच शिक्षकाला विद्यार्थ्यांतील शिक्षक जागा करता आला पाहिले तर वसा आणि वारसाची हि संस्कृती चिरकाल टिकून राहील आणि त्याप्रतीची कृतज्ञताही ! शिक्षक हेच राष्ट्रजीवनाचे बलस्थान असून विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता अशीच संक्रमित होत राहो हिच त्या बा गणराया चरणी विनम्र प्रार्थना  ! गणपती बाप्पा मोरया ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 


Saturday, 22 August 2020

कृतज्ञता पालकांप्रतीची...!

कृतज्ञता पालकांप्रतीची...! 


बा गणराया ! आजच्या पहिल्या दिवशी आम्ही तुझे आभार मानत आहोत तू आम्हास हे सुंदर जग दाखविणारे, आम्हास घडविणारे, आमचे पालनपोषण करणारे. आम्हाला माणूस बनविणारे पालक दिलेत. ते आज आमच्यात आहेत किंवा नाहीत... पण ते आमच्या हृदयात आहेत. आम्ही त्यांच्यारुपाने आहोत. आमच्यात त्यांना शोधतो आहोत. त्यांचा आनंद आणि समाधान हिच आमची श्रीमंती अन त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यताही ! आम्ही कृतज्ञ आहोत त्या सर्व पालकांचे कारण आम्हीच त्यांचे आधुनिक काळातील रुपे आहोत...

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० च्या कृतज्ञता उत्सवाच्या निमित्ताने आज पालकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करतांना आनंद होत आहे. जन्मदात्या आई-वडिलांसह आपल्याला घडविणाऱ्या इतरही पालकांसाठी हि कृतज्ञता आहे. आजच्या या पहिल्या भागात ऐंशीच्या घरात असलेल्या श्रीमती शशिकला खाडिलकर यांचेसह सौ. वैदेही नाखरे, ऍड. प्रदीप कुळकर्णी, श्री. अतुल तांदळीकर, श्री. दिलीप तिवारी, रेवती ठिपसे,, सुजाता बोरकर, संध्या किशोर व प्रा. बी. एन. चौधरी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्री. प्रदीप रस्से यांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी यासाठी दररोज सुंदर असे समर्पक चित्र काढून द्यायचे मान्य केले आहे. आपल्या सर्वांच्याच भावना या मंडळींनी व्यक्त केल्या आहेत. आशा फौंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल या सर्वांचा शतश:ऋणी  आहे. 

पालक शिक्षित असो वा अशिक्षित आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे हिच त्यांची इच्छा आणि त्यासाठीच त्यांची धडपड व कष्ट ! जन्मदात्या पित्याला जन्मदात्या मातेचीही तेव्हढीच सक्षम साथ... संस्कार देण्याचे काम आईचे तर मूल्ये रुजविण्याचे काम पित्याचे ! सर्वतोपरी सहकार्य करणे हे काम नैतिक जबाबदारी स्वीकारलेल्या पालकांचे... पाढे, श्लोक, स्तोत्र पाठांतरापासून, अभ्यास, गोष्टी सांगणे, चांगल्या गोष्टींची सवय लावण्यापर्यंत पालकत्वाचे बाह्य रुप. मात्र घरादारापासून व्यवसायापर्यंतच्या त्यांच्या कृतीतून आदर्शांचा वस्तुपाठ मुलांना होणे हा त्यांच्या अंतरिक स्वभावाचा बाह्य परिणाम ! चांगल्या - वाईटाची प्रचिती येतांना ठामपणे योग्य निर्णय घेण्याची ताकद पालकांच्या शिकवणीतूनच  मिळते. उच्च ध्येय, त्याला कर्तव्य कठोरपणाची जोड, परिस्थितीशी दोन हात करण्याची सिद्धता यांचे बाळकडू घरातूनच आणि पालकांकडूनच मिळते. कष्ट, प्रामाणिकपणा, स्वाभिमान हि पित्याची देन तर सोशिकता, काटकसर, समाधानी व आनंदी वृत्ती हि आईची... सहजीवन, परस्परपूरकता, प्रथम जे काही ते मुलांसाठी व नंतर स्वतःसाठी हि दोघांची ! 

संवेदनशीलता, माणुसकी, परोपकारी वृत्ती, भावना आणि व्यवहार यातील समतोल, सामाजिक जाण व कर्तव्याची नीव रचणारे पालक आपल्या पाल्याच्या कृतीतून एक वेगळा अविष्कार ज्यावेळेस अनुभवतात त्यावेळेस त्यांना "पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा !" या युक्तीची सार्थकता वाटते. शिक्षित, समंजस व प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या आपल्या पाल्यांकडे पाहिल्यावर त्यांना होणारे आत्मिक समाधान लाख मोलाचे ठरते. पिढीमधील अंतर कितीही मोठे असले तरी वैचारिक समानता पालक-पाल्य नात्याला मैत्रीचे कोंदण देते. भारतीय संस्कृतीत वसा आणि वारसा यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. पालकांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करतांना त्यांनी दिलेला वसा आणि वारसा आपले जीवन समृद्ध करणारा ठरतो. पालक हे कुटुंबव्यवस्थेची बलस्थाने असून वसुधैव कुटुंबकम समाजात हि भूमिका निभावणारे अनेक आहेत. आधुनिक पालकांनी आपल्या पालकांप्रतीची व्यक्त केलेली कृतज्ञता पुढे संक्रमित होत राहो हिच बा गणराया चरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

9823334084 

Tuesday, 18 August 2020

पोळा : मना मनातला...!


कर्माने नसलो तरी जन्माने शेतकरी आहे... हाडाचा असलो तरी सध्या बांधावरचा शेतकरी आहे... त्यामुळे शेती, शेतकरी, सालदार, शेतमजूर, गाई-म्हशी, गुरे-ढोरे, बैलजोडी, बैलगाडी, नांगर, वखर, पास, पांभर, दुस्सर, मुक्षे , रुम्हणे, उडीद, मूग, कपाशी, ज्वारी, मका, केळी, गहू, पयखाटी, तुरखाटी, टोचणी, निंदणी, सरा, कापणी, काढणी, मळणी, सरकी, ढेप, दान या सर्व गोष्टी विशेष आवडीच्या ! लहानपणी दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे राहिलेलो असल्याने आणि सर्व कामे मनापासून व आनंदाने केल्याने या सर्वांबद्दल विशेष प्रेम वाटते. निसर्ग आणि परमेश्वराचे नाते तेथेच उमगले. गाव, गावातील माणसे, त्यांचे ऋणानुबंध, चालीरीती, अहिराणीतील खास संवाद, नातेसंबंध, माणुसकी यामुळं गावाचे आजही आकर्षण वाटते. गोठा, जनावरे, चारा, शेण, सडा सारवण या गोष्टींची कधी किळस वाटली नाही. व्यायलेल्या म्हशीला पाणी पाजायला नेणे, तिला धुणे, चारा घालणे या गोष्टी आपलेपणाने करीत असे. चोपडा तालुक्यातील धानोरा हे आमचे गाव ! आज पुन्हा एकदा हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आजचा खास दिवस बैलपोळ्याचा ! यावर्षी गावाकडे जाता आले नाही याची खंत आहे मात्र मनातला पोळा आजही जिवंत आहे.   


दिनेश चव्हाण यांनी जलरंगात साकारलेली दोनही चित्रे
गेल्या पाच महिन्याचा कालखंड आठवला कि वरील सर्व गोष्टींबद्दल आपण किती कृतज्ञ असावे हे लक्षात येते. तंत्रज्ञानाने कितीही विकास केला तरी माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्नधान्य पिकविणारा तो शेतकरी आणि त्याचे सर्व सोबती यांचे महत्व अधोरेखित होते. कृषिप्रधान असलेल्या भारत देशात सर्वात जास्त वाताहत झालेला, दुर्लक्षित असलेला व उपेक्षित घटक म्हणजे शेती, शेतकरी, शेतीमाल  आणि जनावरे ! माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी जागतिक महासत्ता होण्यासाठी शेती या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन करुनही आज त्याची अवस्था फारशी चांगली नाही. तरीही परिस्थितीशी दोन हात करीत त्याचे लढणे अव्याहतपणे सुरु आहे. त्याच्या करिता ना वेतन आयोग ना त्याच्या मालाला हमी भाव ! कॉर्पोरेट जगतात प्रोजेक्ट कॉस्ट ठरविताना त्यावर खर्च केलेला मिनिटांचा हिशेब मांडणारा माणूस मात्र प्रामाणिकपणे अंगमेहनतीचे, कष्टाची परिसीमा गाठणाऱ्या शेतकऱ्याच्या कामाचे दाम देत नाही हे वास्तव नाकारता येत नाही. त्यांची ना युनियन, ना असोसिएशन... जमले तर त्याला नाडणारे आणि नागवणारेच अधिक ! कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, कधी लाल्या तर कधी करपा, कधी लोड शेडींग तर कधी मालाला मातीमोल भाव... तरी तो लढतोय, जगतोय आणि जगवतोयही... स्वतःला, कुटुंबाला, त्याच्या जनावरांना आणि समस्त प्राणिमात्राला ! त्याच्यासोबत त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच राबणारा त्याचा सखा म्हणजे सर्जा - राजाची जोडी... त्यांच्या सणाच्या निमित्ताने हा लेख...

आज सकाळपासूनच समाज माध्यमांमध्ये याबद्दलच्या अतिशय संवेदनशील अनेक पोस्ट वाचण्यात आल्या. त्यांचा सारांश थोडक्यात वरच्या परिच्छेदात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी ते मांडणारे व लिहिणारे मूळ या काळ्या आईची लेकरचं ! जरी गावाकडे जाता आले नाही तरी त्यांच्या सर्वांच्या सोबतीने हा मना मनातला पोळा अनुभवला... त्याचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा हाच यामागील खरा उद्देश...खान्देशातील पोळा म्हटला कि कवयित्री बहिणाबाई चौधरींची कविता आलीच पाहिजे... 

पोया (पोळा)

आला आला शेतकर्‍या, पोयाचा रे सन मोठा

हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा

आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार

करा आंघोयी बैलाच्या, लावा शिंगाले शेंदुर

लावा शेंदूर शिंगाले, शेंव्या घुंगराच्या लावा

गयामधीं बांधा जीला, घंट्या घुंगरू मिरवा

बांधा कवड्याचा गेठा, आंगावर्‍हे झूल छान

माथां रेसमाचे गोंडे, चारी पायांत पैंजन

उठा उठा बह्यनाई,, चुल्हे पेटवा पेटवा

आज बैलाले नीवद, पुरनाच्या पोया ठेवा

वढे नागर वखर, नहीं कष्टाले गनती

पीक शेतकर्‍या हातीं, याच्या जीवावर शेतीं

उभे कामाचे ढिगारे, बैल कामदार बंदा

याले कहीनाथे झूल, दानचार्‍याचाज मिंधा

चुल्हा पेटवा पेटवा, उठा उठा आयाबाया

आज बैलाले खुराक, रांधा पुरनाच्या पोया

खाऊं द्या रे पोटभरी, होऊं द्यारे मगदूल

बशीसनी यायभरी, आज करूं या बागूल

आतां ऐक मनांतलं, माझं येळीचं सांगन

आज पोयाच्या सनाले, माझं येवढं मांगन

कसे बैल कुदाळता, आदाबादीची आवड

वझं शिंगाले बांधतां, बाशिंगाचं डोईजड

नका हेंडालूं बैलाले, माझं ऐका रे जरासं

व्हते आपली हाऊस, आन बैलाले तरास

आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं

बैला, खरा तुझा सन, शेतकर्‍या तुझं रीन !

कवयित्री बहिणाबाई चौधरी

बळीराजाच्या या साथीदाराच्या सणाची तयारी कशी करावी हे सांगतांना, हौशी उत्साही मंडळींना आपल्या हौसेसाठी बैलांना त्रास देऊ नका असंही अक्षिशित कवयित्री बहिणाबाई सांगतात... दिवसाची सुरुवात श्री. मनोहर पाटील यांच्या शब्द प्रवासाने झाला. कष्टाशिवाय मातीला आणि बैला शिवाय शेतीला पर्याय नाही... प्रा. डॉ. किसन पाटील यांनी त्यांची २०१७ मध्ये लिहिलेली व आकर्षक पद्धतीने सजविलेली कविता पाठविली. सौ. विशाखा देशमुख यांनी मातृदिनासोबतच बैलपोळ्याच्या आठवणी सांगितल्या. मो. का. भामरे यांनी बळीचे राज्य कुठे आहे ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला आहे. चाळीसगाव येथील कवी मनोहर आंधळे आपल्या कवितेत ढवळ्या-पवळ्याच्या जोडीला जिवलग सखे म्हणतात...


जिवलग सखे||

अन्न-धान्याच्या या राशी

ढवळ्या-पवळ्या वाहती

उन्हा पावसात नित्य

शेती मातीत राबती

                                 शिंग बाकदार उंच

                                 रंग पांढरा दुधाळ

                                 हंबरता कानी येई

                                 नाद मधाळ,मधाळ

घरादाराला सदैव

त्यांच्या घुंगरांचा लळा

माझ्या उंबऱ्याला कधी

नाही आली अवकळा

                                 करती वैरण चर्वण

                                 औत पांभर ओढती...

                                 माझ्या शेता-मळ्यामध्ये

                                 कित्ती केल्या मशागती!

शेता शिवाराला माझ्या

त्यांचा सार्थ अभिमान

हाक देता साथ देती

जगा शिकवी इमान

                                  त्यांच्या श्रमानं घामानं

                                  मी होतो  कृतकृत्त्य....

                                  ढवळ्या-पवळ्यामुळे

                                  सुखी-समाधानी चित्त..!

येवो यंत्र तंत्र युग

सारे वाटे मला फिके

ढवळ्या-पवळ्याच माझे

खरे जिवलग सखे!

                                  सण वर्षातून एक....   

                                  लोकं म्हणती बैलपोळा

                                  शेतकरी मैतराचा...

                                  हाच सन्मान सोहळा!

              मनोहर ना.आंधळे,  चाळीसगाव-९४२१५१२५७०.


बैल पोळा

बैलजोडी एक मनातील स्वप्न असते

मनात बसते तीच शेतकरी विकत घेतो

घरी आणली की लक्ष्मी पुजा करते

घरात आई बाबा सर्व जण तीच चर्चा

दुसऱ्या दिवशी चांगली केवढी महाग

कामात पाहिजे अशी चर्चा सुरू होते

शेतकामात मालक जुंपतो कामे करतो

बैलांचे चारापाणी ढेप,दाळ खाऊ घालतो

मुलांना सारखं सर्जा राजावर लक्ष ठेवतो

मुलीकडे गावाला जावून मुक्काम नाही

बैलजोडीला चारापाणी नाही केले तर 

मुलां मुलींना बोलतो,कधी मारतो पण...

बैलजोडीचा पोळा सण हौसीने करतो

तो आपला अन्न दाता म्हणजे शेतकरी असतो..

@. गोविंद पाटील सर, पाथरी जळगाव.


नंदी पुजावा पोळ्याला....... 

लागे सोन्याचं कणीस 

काळ्या मातीच्या गोळ्याला  ! 

खरा रानाचा मैतर , 

नंदी पूजावा पोळ्याला ....!! 

त्याच्या घामानेच येते

दाण्या, दाण्याला चकाकी  ! 

त्याच्या पुरणपोळीची, 

आज चूकवारे बाकी ...!! 

नांगरतो,,वखरतो,,

देतो वावर पेरून   ! 

नाही फिटणार कधी ,

त्याच्या राबण्याचं रूण  !! 

बैला शिवाय शेताचं 

रूप म्हसनासमान, ! 

सजवून मिरवावा

बैल पोळ्याला डौलानं  !! 

नंदी राजाला सजवा 

हिंगोळीने शिंग चोळा, ! 

अरे वर्षाकाठी येतो

एकदाच बैलपोळा    !! 

करा करा त्याची सेवा

त्याला चढवा रे साज  ! 

गोडधोड खाऊ घाला 

पण जूंपु  नका आज   !! 

-- गो.शि.म्हसकर, नगरदेवळा जिल्हा जळगाव


ढवळ्या-पवळ्या

हिरवी श्यामल 

माय धरित्री 

उचंबळोनी आली..

मातीमधले 

तृप्त शहारे 

मिरवत आहे गाली..

कलून गेली 

मावळतीला 

एकल तेजल ज्योती..

क्षितिजावरती 

साय पसरली 

सावल्यांतुनी वरती..

सांजकोवळ्या 

मधु किरणांचा 

सडा शिंपला भवती..

आणिक आहे 

ओसरलेली 

पाण्यामधली भरती..

ढवळ्या पवळ्या 

चला घराला 

उद्या नांगरू शेती..

सांज वितळली 

पाण्यामध्ये 

लहरी झोका देती

अशोक बागवे 


गेल्या परक्या गावाला...

कोण आपलं परकं

नाती उरली नावाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला

दुःख उतू आल्यावर

कसं झेलावं मनाला

सावलीनं द्यावा आता

थोडा विसावा उन्हाला

जत्रा स्वप्नांची भरे

गर्दी उसनी शिवाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला...

गोठा सोडून निघाल्या

गाई चुकल्या रानात

खोटया मातीच्या बैलाला

माय पूजते सणात

माझं माझं म्हणताना

द्यावा रक्ताचा हवाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला...

कळा सोसल्या मातीनं

झळा उन्हाच्या सोसून

किती गिरवावे तरी

पाढे जातात पुसून

कवितेच्या ओळीतला

थोडा गारवा जीवाला

साऱ्या ओळखीच्या वाटा

गेल्या परक्या गावाला...

-विष्णू थोरे,चांदवड.


माटीचे बैल

 मीनं पुसलं बोयले

   पोया तं बैलांचा सन

 मंग माटीच्या बैलांले

   काब्र पुजतो आपन ?ll

  धुरकरीबी माटीचा

    नही रंग दोन्हींलेबी 

  बैलांपह्यले निवद

     मान मिये दोन्हींलेबी ll

  बोय सांगे मंग माले

     बैलाकन व्हये शेती

  शेतमजूर रंघत

     गाये ,पीक येये हाती ll

  शेतमजूर नं बैल

     दोन्ही माटीत राबता

  आटीयीसन रंघत

      माटीमधी माटी व्हता ll

   सालदार नं मजूर

      घाम शेतात गायती

   त्याच घामाच्या थेंबांनं

      वलावते शेतमाटी ll

   माटीमधी माटी व्हयी

      माटीमधी जो मियला

   त्याच माटीतून बैल

      आनं धुरकरी बनवला ll

   अंग त्यांचे त्या माटीचे

       रंग माटीचाच त्यांचा

    मिये माटीत म्हनून

        मान माटीच्या बैलांचा ll

    बैलांसंग बैल झाले

        बैलासंग माटी झाले

    माटीच्या मजुरालेबी

        मान पोयाच्या सनाले ll

     पुरनपोयी बैलांले

         ढोरक्यांलेबी जेवन

     झूल बैलांले ,मजूर

         नया सद्र्यात मिरनं ll

 प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे,जळगाव,  ९७३०२२११५५


पोया

सन वर्साचा आला आला रे आज पोया

पोरंसोरं पहा सर्वी झाली रे आज गोया

धव्व्यापव्वया जोडीले तू खावाडं रे पुरनपोया

जोडी राबते रे तुही सालभर वावरात

हिरवं सोनं पिकोयते तुह्यासंग शिवारात

एक दिस पोयाले रे त्याची दृष्ट काढ तू दारात

न्हाऊमाखू त्याह्यले घालं टाक पाठीवर झुलां

शिंग रंगवून गयातं बांध घुंगरायच्या माला

काढ ढोल वाजवत मिरनूक घालूनिया पुष्पमाला

सखा सोबती जीवाचा तुह्या जल्माचा मैतर

फोड नारय पायाशी अन् वाट तू साखर

वर मांगा आबादानीचा मंग सारं घरदारं

झाला शांत नंदी आता गो-हा होता जो अवखड

नको जुपू आज गाडी नको घालू रे जोखड

एक दिस हा मानाचा त्याले फिरवं निखड

खिर,वडा,पुरनपोयीच त्याले वाहाड रे पान

घरोघरी निवदाचा त्याले घिऊ दे रे मान

मंग सालभरी कष्टुनिया तो तुही वाढविन शान

आला आला बैल पोया जमल्या सर्व्या बाया

पुजा नंदीची करून त्या सांगती माऊल्या

नंदीदेवा आम्हावरी ठेवा कृपेच्या सावल्या

प्रा.संध्या महाजन


कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा .!

आमच्यासाठी ज्यानं बनवलाय हा पोळा 

त्याच्याच आयुष्याचा झालाय चोळामोळा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा 


शिंगांना रंग आहे पाठीवरती झुल आहे 

साजरा करतोय सण कसाबसा 

सगळं सगळं कबूल आहे 

तरी वाटत नाही पाहिजे तसा पुर्वीसारखा सोहळा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा 


महागाईनं आभाळ पेटलं, अवघं जग जागेवरच गोठलं 

काम नाही धंदा नाही खिशात रुपया बंधा नाही 

घालून ठेवलाय सर्वत्र कोरोनानं वेढा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा 


वैर्याची ही वेळ आहे नियतीचा हा खेळ आहे 

कुणीच कुणाचं राहिलं नाही 

लेकरानंही मरताना मायचं तोंड पाहिलं नाही 

परस्पर दफन केला जातोय एकुलता एक पोटचा गोळा 

मग कसा काय गोड लागेल यंदा हा पुरणाचा गोळा..?

रत्नाकर खंडू कोळी मु पो खामखेडा ता शिरपूर, जि धुळे ह मु जळगाव मो ८३२९६४६५०५


बैल....आणि बाजार

बाजार भरला आहे

खचाखच....

व्यापाऱ्याची गर्दीच गर्दी

विकणारे उभे आहेत

जशी भर बाजारात 

काढलेली हक्काची वर्दी 

विक्रीच्या बैलांच्या डोळ्यात

मात्र,काळाच्या लाटाच लाटा

जंगली, पाळीव,घरसदस्य,अन

मालकाचा दोस्त होत

गेलेल्या वाटा...

मालक.. हतबल उभा..

दुबार,तिबार पेरणी करून

अकाली करपलेल्या धांड्यासारखा..

बैल.. डोळ्यात कणव घेऊन

ऐन युद्धसमई गोळ्या लागून

धारातीर्थी पडणाऱ्या जवानासारखा....

गिऱ्हाईक मात्र उभे आहेत

व्यापाऱ्याच्या वेशात...

लचके तोडायला...

मालकाच्या अन बैलांच्या जीवाचे

हिशोब काढायला...

मालक आणि बैल

मूकपणे बोलताहेत

राज्या.. धन्या....!

कधीतरी पुन्हा एकत्र येऊ

अन ही धरणी पुन्हा

सुपीक उत्कर्षाला नेऊ...

बाजार संपला...

दोघेही रिकामे रिकामे....

डॉ विशाल इंगोले, लोणार(*सरोवर), ९९२२२८४०५५ 


बैल

बैल श्रमाचे गा देव

बैल सुगीची आरती

बैल शेतीचा जिव्हाळा 

बैल गुंतलेली नाती !

बैल मृगाचा संदेश

बैल पावशाचे बोल

बैल आषाढ लाडका

बैल ढगांचेही ढोल !

बैल पीक मोतीयांचे

बैल पिकांचा सोहळा 

बैल तरारले रान

बैल शिवाराचा डोळा.

बैल धन्याची पुण्याई

बैल मातीचेच पुण्य

बैल उभा वनवास

बैल दुःखाचे अरण्य !

बैल शोषीत-पीडीत 

बैल मौनातला शब्द

बैल जन्माचा उन्हाळा

बैल फाटके प्रारब्ध !

बैल शिवाराची वाट

बैल परतीचा रस्ता

बैल कनवाळू मित्र

बैल श्रमाचा शिरस्ता.

बैल पायासाठी जोडा

बैल वाघाची हिंमत 

बैल जगणेच न्यारे

बैल मृत्यूची किंमत.

बैल रुसले आयुष्य

बैल चूकलेला ताळा

बैल एक प्रथापूजा

बैल कधीमधी पोळा !

रवींद्र जवादे


मागील वर्षी सातारा- सांगली -कोल्हापूर येथे पुराच्या पाण्याने मृत झालेल्या बैलांचा आक्रोश.. पोळ्याच्या पूर्वसंध्येला ..

काळजाचा पोळा.. 

मालक ..

तुम्हीं काळजाचा कासरा

करा जरा सैल..

पोरांप्रमाणे जीव लावला

जरी होतो आम्ही बैल..

आपल्या घरादाराच्या

सुखासाठी दिवसरात्र चालत

होतो मैलोनमैल..

पुराच्या पाण्यात आमचा

जीव गेला पण.. 

तोडून गेलो नाही दावण

अन सोडूनही गेलो नाही अंगण..

फक्त मालक तुमच्यासाठी.

तुम्ही आम्हांला कधीच समजले

नाही जनावर..

आज पोळा आहे म्हणून 

आमची खूप आठवण येईल

तेव्हा अश्रू होईल अनावर..

मालक स्वतःला अन घरातल्या

सर्वांना सावरा..

पडलेलं घर, गोठा हळूहळू आवरा..

मालक ,आज फक्त एकच मागणं आहे..

जेव्हा तुम्ही सर्व मातीच्या घरातून

सिमेंटच्या घरात जाल ना

तेव्हा फक्त आमची आठवण 

म्हणून जमलंच तर आपल्या तिघांचा मागच्या पोळ्याला काढलेला फोटो

फ्रेम करून भिंतीवर टांगा..

अन पुराच्या पाण्यात माझ्या सर्जा- राजाचा जीव गेला असं येणाऱ्या जाणाऱ्याला सांगा..

आता आम्ही खूप दूर निघून आलोय..

देवाला सोडून ..देवाच्या घरी..

तेवढी फक्त आमची आठवण ठेवा..

तुमच्या सिमेंटच्या किंवा काळजाच्या भिंतीवर सदैव टांगून..

बस्स एवढंच ...जमलं तर करा मालक...

 ©संदीप विकास गुजराथी, चांदवड जि. नासिक,  ९६० ४५० २७१५

वरील सर्वच कवितांमध्ये मांडलेले वास्तव, त्यातून कवीच्या मनातील आर्तता त्यांच्या मना मनातील पोळा आपल्याला सांगतोय. शेवटच्या कवितेत पुरात वाहून गेलेल्या व दोन जिवलगांमधील ताटातूट झालेल्या एकाने आपले मनोगत दुसऱ्याला अतिशय चपखल पद्धतीने सांगितले आहे. ब्लॉग वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात या लाखच्या पोशिंद्याबद्दल आणि त्याला तेव्हढीच तोलामोलाची साथ देणाऱ्या त्याच्या सर्वांबद्दल कृतज्ञतेचा भाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. साहित्यातून साजरा करण्यात आलेला हा पोळा या साहित्यिकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या कलाकृतीला मनापासून अभिवादन करतो व आजचा पोळा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे भाग्य मला दिले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. 

गिरीश कुळकर्णी 

Monday, 17 August 2020

भारतीय संगीताचे उपासक पंडित जसराज !


विठ्ठलं... विठ्ठलं... विठ्ठलं... जळगावच्या सागर पार्क मैदानावर एकाच वेळेस १५ हजार जळगावकर विठ्ठल नामात देहभान विसरुन तल्लीन होऊन अक्षरश: डोलत होते. दिवस होता... शनिवार, १३ डिसेंबर २००३ आणि वेळ होती रात्री साधारण १० वाजेची... हि किमया केली होती संगीत मार्तंड, पदमविभूषण, तपस्वी कलासाधक पंडित जसराज यांनी... जळगाव जनता सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्वर रजनी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आदरणीय डॉ. अविनाश आचार्य यांच्या संकल्पनेला वास्तवात आणण्याचे काम केले होते बँकेचे तात्कालिक संचालक श्री. रघुजी रारावीकर यांनी... एव्हढ्या मोठ्या संख्येने जळगावकरांना एकाच वेळी भारतीय संगीताचे वेड लावण्याचे काम पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद झाकीर हुसेन व वीणाताई सहस्रबुद्धे यांनी... असे स्वप्न पाहण्याची दूरदृष्टी होती आदरणीय दादांची ! 

पं. शिवकुमार शर्मा यांच्या अप्रतिम अशा संतूर वादनानंतर पंडित जसराजजींचे गायन होते. जागतिक किर्तीच्या या कलावंतांनी वयाच्या ७३ व्या वर्षी शास्त्रीय रागातील एक रचना सादर केल्यानंतर सुमधुर आवाजाची ईश्वरी देणगी लाभलेल्या या गानभास्कराने आपली सर्वोत्कृष्ट रचना गायला सुरवात केली. "ॐ नमो भागवत वासुदेवाय !..."  साधारण अर्ध्या तासाने संपूर्ण श्रोत्यांना आपल्या स्वर्गीय स्वरांनी पंडितजींनी अक्षरश: न्हाऊ घातले. संत कबीरांच्या भजनात चार ओळी येथे समर्पक ठरतात 

हरि सेती हरिजन बडे 

समझी देखु मन मांहि |

कह कबीर जग हरि विषे,

सो हरिजन मांहि |

जसे हे विश्व (जग) हरीमध्ये सामावले आहे. तसेच हरि हरीच्या भक्तांमध्ये सामावला आहे... याचीच ती अनुभूती होती. बँकेचा जनसंपर्क अधिकारी म्हणून या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करण्याचे भाग्य लाभले आणि या महान विभूतीला अतिशय जवळून पाहता आले. तेव्हापासून त्यांच्या या गाण्याने विशेष वेड लावले. सोबत मधुराष्टकम, गोविंद दामोदर माधवेति, राधाकृष्ण स्तुती, शिवाष्टकम , माता कालिका भजन, शिव स्तुती यासारखे अनेक भजन नियमितपणे ऐकत असतो. भारतीय संगीत समजण्यासाठी आवश्यक असलेले शुद्ध मन आणि निरागसता पंडितजींकडे होती. त्यामुळे त्यांना ऐकणारा नास्तिक माणूसही आस्तिक झाल्याशिवाय राहणार नाही अशी ताकद त्यांच्या या साधनेमध्ये होती. त्यांचे कोणतेही भजन डोळे बंद करुन ऐकत राहावे आपल्याला वेगळी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. 

आता हा आवाज प्रत्यक्ष ऐकायला मिळाला नाही तरी त्यांच्या या रचना नक्कीच भारतीयांचे मने रिझवल्याशिवाय राहणार नाही. अशा या महान कलावंताच्या अविरत साधनेला विनम्र अभिवादन ! ज्यांनी अनेकांना परमेश्वराची भेट घालून दिली त्यांना परमेश्वर सद्गती देईलच... पंडित जसराजजींना  भावपूर्ण आदरांजली ॐ शांती शांती शांती. 

गिरीश कुळकर्णी 

Sunday, 16 August 2020

देश आणि आपण स्वतंत्र झालोत पण आत्मनिर्भर व स्वावलंबी कधी ?


भारताचा ७४ वा स्वातंत्र्य दिन आपण काल साजरा केला. अनेक वर्षांच्या आक्रमकांच्या जुलमी राजवटीतून व परकीयांच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला. त्यासाठी देशातील अनेक थोर विभूतींनी   आपल्या जीवनाची आहुती दिली. यातील देशभक्त, क्रांतिकारक व स्वातंत्र्यवीरांची गणना करणे केवळ अशक्य ! त्यानंतरही अनेक सैनिकांनी, पोलिसांनी, शिक्षकांनी, डॉक्टरांनी, समाजसुधारकांनी, आपल्या पूर्वजांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी आपले आयुष्य / जीवन वेचले. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा आजचा हा दिवस... अतिशय अभिमानाचा, आनंदाचा , उत्साहाचा आणि कृतिशील संकल्पाचाही ! २६ जानेवारी १९५० ला देशाने आपली स्वतंत्र राज्यघटना स्वीकारली आणि देश सार्वभौम / प्रजासत्ताक राष्ट्र बनले अर्थात स्वतंत्र देशाला व देशातील नागरिकांना घटनेच्या चौकटीचे बंधन आले. अशा पद्धतीने परम पवित्र भारत माता व भारतीय नागरिक स्वतंत्र झालेत. 

देश स्वतंत्र झाला याचा अर्थच देशातील जनता स्वतंत्र झाली. खरंय ते... पण देश स्वतंत्र झाला म्हणजे आत्मनिर्भर झाला का ? आपण व्यक्तिगत पातळीवर खरोखर स्वतंत्र झालो पण स्वावलंबी झालोत का ? असा प्रश्न मला वारंवार भेडसावतोय आणि त्यासाठीच हा लेख ! आपण जीवनात स्वतंत्रपणे आचार, विचार आणि कृती करतो का ? आपली मानसिकता स्वतंत्रपणे विचार करणारी आहे का ? का आपण कोणावर तरी अवलंबून आहोत ? कोरोनाच्या या काळात अशा प्रकारचा विचार करण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि वेळही... लॉक डाऊनमध्ये आपण बऱ्यापैकी स्वावलंबी व्हायला शिकलो अर्थात स्वतंत्र व्हायला सुरवात केली आहे. मला व्यक्तिगत पातळीवर जे स्वातंत्र्य अपेक्षित आहे त्याकडे वळतो.  

आपण सकाळी जाग आल्यावर उठतो का ? कि आपल्याला कोणी तरी उठवावे लागते ? उठल्यावर आपण आपल्या अंथरुण व पांघरुणाची घडी घालतो का ? सकाळी आपले आन्हिक आटोपल्यावर किमान आपले अंतर्वस्त्र आपण धुतो का ? जेवण झाल्यावर किमान आपले ताट वाटी उचलून ठेवतो का ? समृद्ध जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी महत्वाच्या आहेतच पण आपण पूर्णतः त्यावरच निर्भर राहतोय का ? मग ते वाहन असो, तंत्रज्ञान असो, मशीन असो, माध्यम असो वा काहीही... आपण त्यांचे तर गुलाम झालो नाहीत ना ? आपण आपल्या सवयीचे, परिस्थितीचे गुलाम तर झालो नाहीत ना ? म्हणजे आपण आपल्या आनंदासाठीही कोणावर तरी अवलंबून आहोत. मग तो टीव्ही असो, इंटरनेट असो वा मोबाईल ! 

थोडा चाकोरीबाहेर जाऊन विचार करतो का ? तात्कालिक परिस्थितीत निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या आपण किती लवकर अधीन होतो आणि काही काळात त्याचे गुलामही ! उत्पादक व ग्राहक यांच्यातील दुवा सांधणारी यंत्रणा तात्कालिक परिस्थितीत स्वीकारण्यात आली आणि आज आपण तिचे गुलाम झाल्यासारखेच वागतो आहोत. त्या गोष्टीकडे स्वतंत्रपणाने पाहण्याची आमची तयारी नाही. तसे कोणी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपल्याला तो परग्रहावरील वाटायला लागतो इतके आपण गुलाम झालो आहोत. बघा पटतंय का ? अलीकडच्या काळात लोकं विचार करायला लागलीत असे प्रकर्षाने जाणवतंय आणि ते चांगलेही आहे. मात्र विचार आतून येतोय का ? प्रतिभेतून ? अनुभवातून ? विवेकी ? पूर्वग्रह विरहित ? आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींना नानाविध पर्याय उपलब्ध असतांना आपण केवळ सवयीमुळे वा अंगवळणी पडल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करतो ? 

आपला देश स्वतंत्र आहेच पण आत्मनिर्भर आहे का ? किती गोष्टींसाठी आपण इतरांवर अवलंबून आहोत. आत्मनिर्भर होण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता आपण निर्माण करतोय का ? त्यासाठी आवश्यक असलेले पूरक वातावरण, परिस्थिती, शिक्षण, संशोधन  होतेय का ? अशा प्रकारच्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती वा संस्था यांना प्रोत्साहित करण्यासाठी काही विशेष प्रयत्न होतांना दिसताय का ? समाजाची आत्मकेंद्रित भोगवादी वृत्ती, हव्यास, भौतिकता यामुळे तर देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी बाधा येत नसेल ना ? स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मनात आलेले विचार आपल्या समोर मांडलेत. यापुढील भागात वैयक्तिक पातळीवर आपण काय करु शकतो याचा विचार करणार आहोत. भारतीयांनी स्वावलंबी व्हावे व देशाने आत्मनिर्भर यासाठीच... आपणास काय वाटते ? जरुर व्यक्त व्हा ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४

 

Sunday, 2 August 2020

मैत्रीचे रक्षासूत्र !

मित्रांनो, आज रक्षाबंधन ! बहीण भावाच्या अतूट व उत्कट प्रेमाची साक्ष देणारा सण ! भावाला दीर्घायुष्य लाभावे, त्याने आपले रक्षण करावे यासाठी बहीण भावाला राखीच्या बंधनात बांधते. हा पौराणिक संदर्भ लक्षात घेतला तरी ज्यांनी आपले रक्षण करावे असे वाटते त्यांनाही रक्षासूत्राने बद्ध केले जाते मग त्या दोन व्यक्ती कोणीही असो. जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवाला, बस ड्रायव्हर, शिक्षक अगदी कोणीही... ज्याच्यामुळे आपले रक्षण होणार आहे त्याला आपण या बंधनात राखीच्या पवित्र धाग्याने बांधतो. अगदी आपण ज्या घरात राहतो त्या घराच्या दरवाजाला, आपण जे वाहन चालवतो त्यालाही...! अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. 

काल आपण मैत्री दिवसही साजरा केला. प्रत्येकाच्या जीवनात अशा काही व्यक्ती असतात ज्यांच्याशी बोलतांना कोणत्याही प्रकारचा किंतु, परंतु वा संदेह नसतो. विषयाचे बंधन नसते. मित्रत्वाचे नाते हे  निखळ मैत्रीचे असले तर तेथे जी सहजता असते ती इतर कोणत्याही नात्यात सहज अनुभवास येत नाही. आपल्या तोंडावर आपल्यातील त्रुटी, दोष, चुका सांगणारा व आपल्या पश्चात आपल्या हिताचाच विचार करणारा मित्र लाभणे हि खरोखर भाग्याची गोष्ट आहे. अलीकडच्या यांत्रिक युगात अशा प्रकारच्या मैत्री निर्माण होणे महत्वाचे ठरते. माणसाच्या जीवनातील आव्हानात्मक प्रसंगात खऱ्या अर्थाने सर्वात जवळ कोण असेल तर तो आपला जिवाभावाचा मित्र ! 

एकूणच सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व अनलॉकच्या काळात मैत्रीच्या धाग्याचे शब्दरूपी रक्षासूत्र बांधण्याचे ठरविले आहे. कोरोना या आजाराने माणसाला माणसापासून दूर नेले हे वास्तव असले तरी याच महामारीने माणसांना अधिक जवळ आणले असे मला वाटते आणि त्यासाठीच हा लेख... गेल्या चार महिन्यात आपण बहुतांश लोकांनी जो अनुभव घेतला असेल तो नकारात्मक अधिक आहे. मात्र त्यामुळे आपण नाउमेद होण्याची अजिबात आवश्यकता नाही. उलट परिस्थिती समजून घेऊन आपल्यात अपेक्षित बदल घडवून आणण्याची नितांत गरज आहे. हाच बदल इतरांपर्यंत संक्रमित करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीवर, क्षेत्रावर, परिस्थितीवर कोरोनाचा दूरगामी परिणाम झालेला आपल्याला दिसत आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना पश्चातच्या प्रभावित जीवनाचा अंदाज मांडणारी एक लेखमाला ब्लॉग स्वरुपात लिहिली आणि आज त्यामधील अनेक मुद्दे स्पष्टपणे समोर येतांना दिसत आहे. परस्परांना समजून घेत एक मित्र म्हणून काही रक्षासूत्र आपल्यासमोर मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. 

सूत्र १ - कोणतीही परिस्थिती आली तरी आपण आपली मूल्ये, तत्वे वा विचारधारा यापासून विचलित न होता आपले जीवनक्रमण करणार या पहिल्या सूत्राने आपणास बद्ध करीत आहे. यापूर्वीच्या जीवनात आपण अशी अनेक आव्हाने स्वीकारुन त्यावर मात करुन विजय मिळविला आहे. तो मार्ग यापुढेही आपण अनुसरणार आहोत.

सूत्र २ - "मानवता" हा सर्वश्रेष्ठ धर्म असून त्याद्वारेच आपल्या जीवनाचे सार्थक करणार या दुसऱ्या सूत्राने आपणास बद्ध करीत आहे. अनेक प्रसंगात निर्णय घेतांना भावनिक व व्यावहारिक निर्णयांचे द्वंद्व मनात सुरु राहील. आपला प्राधान्यक्रम निश्चितच व्यवहाराला असला पाहिजे मात्र त्यामुळे कोणाचेही व्यक्तिगत नुकसान आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यक आहे तो खुला संवाद ! तोच आपल्याला भावनिक व व्यावहारिक यांच्या समन्वयी निर्णयाकडे नेणार आहे. 

सूत्र ३ - आपल्या समस्यांपेक्षा इतरांच्या समस्यांचा प्रथम विचार करेल या तिसऱ्या मुख्य सूत्राने आपण बद्ध आहात. नोकरी करीत असेल तर व्यवसाय क्षेत्रासमोरील व प्रमुखासमोरील आव्हानांचा, संकटांचा, समस्यांचा प्रथम विचार करेल. प्रामाणिकपणा, सचोटी व निष्ठा दाखविण्याची आपल्याला हि संधी आहे असाच आपण विचार केला पाहिजे. त्यासाठी आर्थिक पातळीवर चार पाऊले मागे जाण्याची स्वतःहून तयारी दाखविली पाहिजे. प्रमुख वा मालक असेल तर सहकाऱ्याच्या गत काळातील समर्पणाचा, वचनबद्धतेचा प्रथम विचार करेल. व्यवसायाची सद्यस्थिती त्याला मोकळेपणाने सांगून आपण परस्पर सहकार्याने यावर एकनिष्ठेने मात करु, त्यासाठी लागणारी पराकोटीची शर्थ लढण्याची आपली तयारी आहे त्यासाठीचे विविध समर्थ व आश्वासक मार्ग त्याला सांगा. वैयक्तिक स्वार्थाच्या चार गोष्टीला बाजूला ठेवून त्याच्यासाठी दोन पाऊले पुढे जाण्याची तयारी ठेवा. 

सूत्र ४ - नैसर्गिक जीवनशैलीचा अंगीकार करुन निसर्गदत्त देणगीच्या चौथ्या बंधनात आपणास बांधत आहे. जगण्यासाठी गरजेइतके निर्माण करण्याची क्षमता आपल्यात निसर्गतः आहे. लोभ, लालसा वा हाव यामुळे गरजेचा बिघडलेला समतोल पुनर्स्थापित करण्याची आवश्यकता आहे. कर्तृत्वाने गरजेपेक्षा अधिक निर्माण करण्याची क्षमता ठेवत असतांना त्यातील अधिकचे इतरांना सहज देण्याचे औदार्य ठेवू या. येणारे उत्पन्न शून्य झाले तर जगायचे कसे याचा विचार केला तर गरजेचे उत्तर मिळेल आणि ते कमविणे हे कोणासाठीही अवघड नाही. थोडक्यात समाधानी वृत्ती बाळगण्याचे आवाहन करणारे हे सूत्र आहे. 

सूत्र ५ - मिळेल ते व पडेल ते काम करण्याच्या पाचव्या सूत्राने जगण्याची लढाई जिंकण्याचे सामर्थ्य संपादित करु या ! स्वतःबद्दलच्या अवास्तव, खुळ्या व भंपक कल्पनांना तिलांजली देऊन जीवनाचे वास्तव स्वीकारा. तेच तुम्हाला जगण्याचे हजारो मार्ग दाखवतील. आपल्या आजूबाजूला पाहिले तरी त्यातील अनेक मार्ग आपल्याला दिसतील मात्र तेथे अडचण असेल ती स्वप्रतिमेची ! या सूत्राने ती अडचण संपून जाईल व पडेल ते काम माझेच आहे हा विश्वास अनेक संधी आपल्याकडे घेऊन येईल. या संधीच जिंकण्याचे सामर्थ्य बहाल करतील. 

सूत्र ६ - जीवनात सर्व गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही, हे वास्तव स्वीकारण्याचे सूत्र जीवनातील नैराश्य, उदासीनता, हतबलता दूर केल्याशिवाय राहणार नाही. कायम काही ना काही अपेक्षांनी जगणारा माणूस अपेक्षाभंगाच्या दुःखाने अनेकदा नाउमेद होतो. तेथेच वैफल्याचा जन्म होतो. चहूबाजूंनी घडणाऱ्या अपेक्षाभंगाच्या घटनांनी वैफल्यग्रस्त होतो. तात्कालिक मलमपट्टीने ते दुरुस्त होतंच नाही आणि जीवनातील आनंद संपून जाण्याचा धोका निर्माण होतो. यासाठीच " मा फलेषु कदाचन !" सांगितले आहे. 
 
सूत्र ७ - संवेदनशीलता, कार्यप्रवणता व सकारात्मक वैचारिक दृष्टिकोनाचे सूत्र जीवनाची कृतार्थता बहाल करेल. परिस्थितीचे गांभीर्य, ते बदलण्याची दृष्टी व आवश्यक कृतिशीलता वरील सर्व सूत्रांची महत्ता अधोरेखित करेल असा मला विश्वास आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीने आपल्याला दिलेली हि सूत्रे, त्यांची शाश्वतता पटवून देईल. त्यातच जीवनातील आनंद व समाधान आहे.  तेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. 

सूत्र ८ - आपल्यातील मैत्रीचे हे अंतिम रक्षासूत्र सृजनशील, नाविन्यपूर्ण संवादासाठी बांधत आहे. या संवादात समज असेल, प्रगल्भता असेल, हेतूची शुद्धता असेल. परस्पर सहकार्य असेल. हि सर्व रक्षासूत्रे आपले सर्वार्थाने संरक्षण करेल. प्राप्त परिस्थिती हेच खरे मैत्रीचे रक्षाबंधन ! 

गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४