Tuesday, 1 September 2020

मी कृतज्ञ पुण्यभू भारत मातेचा !


आशा फौंडेशनच्या गणेशोत्सवांतर्गत "कृतज्ञता उत्सवा"चा आजचा शेवटचा दिवस ! आम्हास सांगतांना विशेष आनंद होतो कि आपल्या परम पवित्र भारत मातेबद्दल सुमारे ६० जणांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. जळगावच्या प्रथम नागरिकापासून ७ हजार कोटींचा उद्योग समूहाच्या प्रमुखापर्यंत, कुलगुरुंपासून शिक्षण तज्ज्ञांपर्यंत, बंगलोरपासून चोपड्यापर्यंत, ज्येष्ठांपासून ते अलीकडच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांपर्यंत, संस्कृतपासून इंग्रजीपर्यंत म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्या या पुण्यभू भारतमातेच्या विविधतेचा परिचय देणाऱ्या सुपुत्रांचा यात सहभाग आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, विचारांनी व आचरणाने या पवित्र देशाचे मांगल्य सांगितले आहे. सोबत तीचे उतराई होण्यासाठी काय करत आहे आणि काय केला पाहिजे याचा सुंदर उहापोह केला आहे. धर्म, जाती, पंथ, संप्रदाय, भाषा, प्रांत या विविधतेची आपणास अनुभूती होईल. देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराबद्दल येथील इतिहासाबद्दल, क्रांतिकारकांबद्दल, लोकशाहीबद्दल, स्वातंत्र्याबद्दल, ऋषी मुनी, योगा, आयुर्वेद, थोर विचारवंत, उद्योजक, समाज सुधारक आदींबद्दल आपल्या मर्यादेत सर्वांनी व्यक्त होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या देशबांधवांच्या मनोभूमिका साकारणाऱ्या या परमपवित्र भारत मातेला कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. 

मला आपल्या देशाचा अभिमान आहे. कारण हा माझा देश आहे. हि माझी जन्मभूमी आहे. मी तिला माता मानतो. तीचे पावित्र्य आणि महत्व जाणतो. मला ती सजीव वाटते व वंदनीय वाटते. मोठ्या अभिमानाने मला माझ्या या मातेला वंदन करतांना वंदे मातरम ! म्हणायला आवडते. आपल्या देशाचा जो इतिहास आहे. तो वाचतांना, ऐकतांना व जाणून घेतांना माझ्या अंगावर रोमांच उठतात. हा इतिहास मला आपला वाटतो. येथील संस्कृती मला माझी संस्कृती वाटते. येथील थोर माहात्म्यांना मी माझे आदर्श मानतो. येथील चांगल्या गोष्टींचा मला अभिमान वाटतो. यासाठीच हि कृतज्ञता ! 

शालेय जीवनात दररोज भारत मातेचे महन्मंगल स्तोत्र ऐकले. कालांतराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यार्थी परिषद यांच्या तत्त्वज्ञानाने राष्ट्राबद्दलचे प्रेम, भक्ती शिकलो. सामाजिक जीवनातील आपले आचरण त्याअनुरुप करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून या साऱ्या गोष्टी करता येतात याचा अनुभव घेतो. प्रामाणिकपणाला कष्टाची जोड देत आपल्यामुळे कोणालाही आपली मान खाली घालावी लागणार नाही याची काळजी घेतो. आज पर्यंत या उत्सवात त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली त्या सर्वांच्या संस्कारातून देशाचा एक चांगला नागरिक म्हणून आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडीत आहे. याची रुजुवात मात्र "जयोस्तुते.." या स्तोत्रातूनच झाली. "तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण" हे कायमस्वरुपी हृदयात कोरलं गेलं. ९० च्या दशकाच्या सुरवातीला संगणकशास्त्र विषयाची पदवी घेऊन सुद्धा आपल्या देशाबाहेर जायचे नाही हे ठरविले. ऐन उमेदीच्या काळात कायमस्वरुपाची बँकेतील नोकरी सोडून सामाजिक कामाची एक वेगळी वाट चोखाळू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याद्वारे या देशाची, देशातील जनतेची सेवा करु शकतोय याचा मला विशेष आनंद आहे. अनैतिक गोष्टी कधीही करायच्या नाही असे ठरविले आणि त्यासाठी कटिबद्ध आहे. 

हुंडा व भ्रष्टाचारासारख्या अनिष्ट रुढी थांबविण्यासाठी स्वतःपासून सुरवात केली. आपण सारे या भारत मातेची लेकरे असल्याने प्रत्येकाला कायम मदतीचा हात देतो. माझ्या सर्व बांधवांमध्ये असलेल्या सद्गुणांकडे पाहतो. त्याच्या प्रगतीत आपला सहभाग असावा यासाठी प्रयत्न करतो. प्रकृती, विकृती व संस्कृतीचा अर्थ समजून घेत त्या प्रमाणे आचरण ठेवतो. "Life is for one generation but Good Name is forever " या उक्तीनुसार आपल्या देशासाठी जे जे काही चांगलं करता येईल याचाच कायम विचार करतो. मला या देशाने जे भारतीय तत्वज्ञान दिलं आहे त्याचा अभ्यास करतो. जीवनात भारतीय जीवनशैली अंगिकारण्याचा प्रयत्न करतो. 

मला समज आल्यापासून कधीही १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचे झेंडावंदन चुकविलेले नाही. सकाळ थोडी गडबडीची, कुठे भारत माता पूजन, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम कधीतरी मित्र परिवारासह सहल असा काहीसा दिवस जात असे, वर्तमानपत्रात जाहिरातदारांनी या दिवसाला कसे महत्व दिले वा वृत्तपत्रांनी काय वेगळे वाचकांना दिले हे पाहणे हि एक आवडीची गोष्ट असे. सायंकाळी देशाच्या पंतप्रधानांनी देशाला कोणत्या मार्गावर नेण्याचे ठरविले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत असे. कधी तरी आपल्या तिरंग्याचा सन्मान वाढावा यासाठी प्लास्टिक वा अन्य स्वरुपातील प्रतीकात्मक झेंड्याच्या विक्रीवर बंदीची मागणी, कधी तरी लोकांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याच्या बाजूला, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अगदी गटारीत पडलेले झेंडे गोळा करुन ते प्रशासनाला नेऊन देणे यासारखे उपद्व्यापही केले. विद्यार्थी दशेत न चुकता स्वातंत्र्य दिवस १४ ऑगस्टच्या रात्री मशाल यात्रा काढून १२ वाजता राष्ट्रगीत म्हणून साजरा केला आहे. 

भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित ठेवणारा, आपणास स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनामवीरांना , क्रांतीकारकांना आणि ते अबाधित ठेवणाऱ्या भारतीय सशस्त्रदलांच्या जवानांना, आपल्या देशाच्या तिरंग्याला अभिमानाने अभिवादन करतांना मला प्रचंड अभिमान आणि आनंद होतो. आपल्या देशाची महान संस्कृती व येथील अस्मितांबद्दल स्वाभिमान बाळगण्याचा प्रयत्न करतो. देशातील बलाढ्य लोकशाही असलेल्या या देशाचा कारभार पाहून सर्व जग अनेकदा स्तंभित व अचंबित होते हेच माझ्या भारत मातेचे वैशिष्ट्य आहे. "हे विश्वची माझे घर !" आणि "जो जे वांछील तो ते लाहो !" अशी संकसृती असलेल्या देशाला परमवैभवाला नेण्यासाठी कटिबद्ध होऊ या ! भारतीय चिंतनातून विश्वकल्याण होऊ हिच त्या बा गणरायाचरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Monday, 31 August 2020

कृतज्ञता निसर्गाची !


आशा फौंडेशनच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित "कृतज्ञता उत्सवा"ने आपल्या सर्वांना भावना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. आपल्या जीवनात अनेक गोष्टी सहज मिळालेल्या असतात जसे पहा न , निसर्ग किती भरभरुन देतो निरपेक्षपणे आणि निरागसतेने ! आज सर्वांनी आपल्या भावना व्यक्त करीत असतांना आपण कसा नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिरेकी वापर करुन त्याचा ऱ्हास करुन घेत आहोत याविषयीची खंत व्यक्त केली आह. सोबत त्याची किती मोठी किमंत अनेकदा मोजावी लागली आहे त्याचेही उदाहरण दिले आहे. आसूच जास्त आणि हसू कमी यामागची कारणमीमांसा अतिशय छान पद्धतीने केली आहे. "कोरोना" आणि " त्सुनामी" यासारख्या नैसर्गिक आघातांचा उल्लेख अनेकांच्या भावनांमध्ये आला आहे. निसर्गाचा सकारात्मक व नकारात्मक आविष्काराची अनेक उदाहरणेही दिली आहेत. अनेकांनी आपल्या भावनांना व्यक्त करतांना काव्यपंक्तींचा चपखलपणाने केलेला वापर त्यांचा व्यक्त होण्याचा परीघ रुंदावतात. सर्वांनीच निसर्गाची महती सांगितली आहे व ती जाणीव जागृतीची पावती आहे. मला व्यक्तिगत निसर्ग फार भावतो आणि त्याचा मनमुराद आनंद घ्यायला आवडते अर्थात त्याला कुठल्याही प्रकारची इजा न करता. आपल्या सर्वांच्या विचारांचा मागोवा घेत माझी निसर्गाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करीत आहे. 

लहानपणापासून "साधी राहणी व उच्च विचारसरणी" ही उक्ती ऐकत आलो आहे आणि त्याचा सर्वात निकटचा संबंध नैसर्गिक जीवनशैलीशीच आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा जन्मच मुळी देण्यासाठी झालेला आपण पाहतो. सावली देणारे झाड त्याचा उपभोग घेणारा तोडतो. त्याच्या विविध घटकांचा फायदा त्यालाच होत असते. पाणी प्रदूषण करणाऱ्यालाच नदी स्वच्छ, चांगले व मुबलक पाणी देते. निसर्गातून ऑक्सिजन घेणाराच त्याचे प्रदूषण करतो. या सर्व गोष्टींमुळेच मानवी जीवनासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे याचे कारणच दातृत्वाचा वसा घेतलेल्या या निसर्गाप्रती आपण कायम कृतज्ञ असले पाहिजे. निसर्गातील जैव विविधता हे त्या निसर्ग  साखळीचे घटक आहेत. जंगल, जमीन आणि पाणी हे मूलभूत घटकावरच निसर्गातील जीवसृष्टी अवलंबून आहे. यात झालेले कोणतेही असंतुलन जीवसृष्टीच्या मुळावर उठणारे व आपल्या अस्तित्वाचा प्रसन्न निर्माण करणारे आहे एव्हढेच लक्षात घेतले तर आपली वृत्ती व कृतीत बदल होऊन ती निसर्गानुकूल होण्याची शक्यता वाढणार आहे. गरज, हव्यास आणि लोभ यांचे अर्थ समजून घेतले तर अपेक्षित कृती अधिक जाणीवपूर्वक होईल. बालकाच्या जीवनातील निरागसता समजून घेतली तर आपण आपल्या या निसर्गाला निश्चितच जपू शकू त्यासाठीच वैयक्तिक जीवनात प्रयत्न करीत असतो. 

मुळात भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टींचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून न घेतल्याने आपण तिला नावे ठेवू लागलो किंवा दुर्दैवाने ते प्रतिष्ठेचे ठरताना दिसते आहे. ग्रामीण भागात शेती आधारित कुटुंबात जन्म झालेला असल्याने निसर्गाची कायम ओढ असते. निसर्ग आपल्याला अनेक गोष्टींची पूर्वसूचना देत असतो. निसर्गाची ही भाषा आपण ऐकायला व समजून घ्यायला शिकले पाहिजे. निसर्गाशी संवाद साधायला शिकले पाहिजे. कोणत्या ऋतू व हवामानात कोणती पिके येतात, कोणते पक्षी स्थलांतरित होतात, कोणते खाद्य पदार्थ खाल्ले पाहिजे यासह अनेक गोष्टी आपल्याला निसर्गतः माहिती असतात नव्हे त्या आपल्याला त्या ज्ञात करुन दिल्या जातात. चातुर्मासात वातड पदार्थ वर्ज्य असतात, अपचन झालं तर लंघन करावे यासारख्या अनेक गोष्टी घरातील ज्येष्ठ आपल्याला सांगत असतात. आपण डोळसपणाने त्याचा अंमल आपल्या जीवनात केला पाहिजे.  

या सर्व गोष्टींचा आधार मला भगवद्गीतेत सापडतो. भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे, गीतेच्या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष आचार सृष्टीत दिसतो तो मानवाने शिकून घेतला पाहिजे. "मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः" याचा अर्थ सर्व मानवांनी ईश्वराच्या मार्गाचे अनुसरण करावे. या मार्गाचे दर्शन आपणास प्रत्यक्ष सृष्टीत दिसते. सूर्य उगवतो, त्यामुळे कमळे उमलतात, लोक आपापल्या कार्याला लागत. सृष्टी जागी होऊन कार्यरत होते, या सर्व सृष्टिकार्याची ऊर्जा सूर्यापासून मिळते. सूर्य उगवला नाही तर ही कार्ये थंडावलेले असतील. एवढी कार्ये करतो मात्र त्याचा अहंकार नाही. सूर्यापासून मिळालेल्या ऊर्जेचे कोणी काय करावे हे तो ठरवीत नाही. तो ऊर्जा देण्याचे त्याचे काम करतो, त्या बदल्यात काही प्राप्त व्हावे अशी अपेक्षा नाही. 

वृक्ष वाढतात, त्याला फळे, फुले येतात. पक्षी त्यावर घरटी बांधतात. सावलीत जीव विश्रांती घेतात. काही मुले दगड मारतात तर काही त्याला झोपला बांधतात. याचा वृक्षाला अहंकार नाही. यासाठीच भगवान कृष्ण सृष्टीकडून जीवनाचे धडे घ्या असे म्हणतात. सृष्टीमध्ये एक सहज जीवन व्यवहार दिसतो. मानवाखेरीज सारी सृष्टी एकात्मतेवर उभी आहे. सृष्टीतील प्रत्येक व्यवहार एक दुसर्याशी जोडलेला व पूरक आहे. घरामधील सर्वांचा व्यवहार यावर आधारित असल्याने कुटुंबातच त्याचे बाळकडू मिळाले आणि ते दीर्घकाळ आचरणात राहील असेच आहे. आपण सर्वांनीही हेच तत्व आपल्या कृतज्ञतेच्या भावनेतून व्यक्त केलेले दिसते. जीवनात निसर्गानुकूल जीवनशैलीचा पुरस्कर्ता राहिलो आणि त्यासाठी आमच्या कार्यातून कायम त्यासाठी प्रयत्नशील आहे. यावर्षीची आशा फौंडेशनची मध्यवर्ती संकल्पना ही "रुप पालटू वसुंधरेचे... नैसर्गिक जीवनशैलीने" त्यासाठीच आहे. 

निसर्गातील पंच तत्वांनी निर्माण झालेल्या व त्याच पंच तत्वात विलीन होणाऱ्या मानवाचे निसर्गाशी अतूट असे नाते आहे. जगण्यासाठीचा सर्व गोष्टी देणाऱ्या या निसर्गाप्रती आपण कृतज्ञ आहोत. निसर्ग जतन व संवर्धन करण्याचा वसा आणि वारसा अधिक जोमाने पुढे नेऊ या ! गुरु, सखा व सोबती असलेल्या निसर्गाचे वैभव टिकविण्यासाठीचे सामर्थ्य आम्हास दे... हिच बा गणरायाचरणी प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Sunday, 30 August 2020

कृतज्ञता गावाविषयीची !

माझे जळगाव १७ मजलीवरुन...

आशा फौंडेशनच्या "कृतज्ञता उत्सवा"च्या निमित्ताने दररोज दोन-तीन जण नवीन सहभागी होतात एखादा थांबतो. यानिमित्ताने एक गोष्ट नक्की जाणवते आहे आपण त्या जगनियंत्याजवळ काही तरी मागत असतांना आपल्याला त्याने किती भरभरुन दिलं आहे आणि त्याचा आपण फारसा विचार करीत नाही आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा विषय दूरच... खरोखर या उत्सवाच्या अंतिम टप्प्यात आलो असतांना असे जाणवते आहे कि आपण अजून खूप साऱ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आठव्या दिवशी आपण आपल्या जीवनातील हृदयस्थ असलेली गोष्ट म्हणजे आपले गाव... त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. वेळ आणि लेखनाचे बंधन असतांनाही प्रत्येकाने व्यक्त केलेल्या भावना खूप काही सांगणाऱ्या आहेत. शब्द अपुरे पडले असे वाटत असतांनाही वाचणाऱ्याला आपण म्हणतात ते सर्व पोहोचतोय असे मला व्यक्त करणाऱ्या सर्वांना सांगावेसे वाटते. प्रत्येकालाच आपल्या गावाने सर्व काही दिले आहे विशेषतः आपली ओळख ! आपल्या गावाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत असतांना मला तीन गावांबद्दल प्रामुख्याने कर्तृज्ञता व्यक्त करावयाची आहे अर्थात या सर्व मंडळींनी जे सांगितले तेच  एकत्रितरित्या मांडणार आहे.

गाव म्हटलं कि येते ती तेथील वस्ती, माणसे, संस्कृती, तेथील अभिमानास्पद वारसा व निर्मित स्थळे... माणूस घराबाहेर असतो तेव्हा त्याला सर्वात जवळची वाटणारी जागा म्हणजे आपले गाव. कारण माणूस हा समूहप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याला कायम माणसे हवी असतात. ती आपल्या परिवारातील असली तर अधिक दिलासा देणारे वाटते. मात्र त्यापासून दूर गेल्यावर असतात ती आपली गावातील माणसे, नंतर राज्य आणि देशातील... कारण ही सर्व आपली माणसे असतात. पाडा, तांडा, वस्ती, गाव, शहर, महानगर ही सारी त्या गावाची रुपे ! हे लिहीत असतांनाच मला जाणवले कि पाड्यापासून महानगरापर्यंत जात असतांना आपलेपणा तीव्रतेपासून सौम्यपणाकडे जात आहे. असे असले तरी व्यक्तिगत कृतज्ञता कुठेही कमी होत नाही कारण त्यात असलेले "आपले"पण मग ते तीव्र असो वा सौम्य. महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतील विविध गावांना भेटी देत असतांना मला हे नेहमीच जाणवत आले आहे. ही त्या त्या गावाची आणि भारतीय संस्कृतीची विशेषताच ! 

गावाची महत्ता सांगणाऱ्या आमच्या गावातील वाडा आणि कुटुंबीय...

माझं जन्म धानोरा, ता. चोपडा, जि. जळगाव येथील... आयुष्याची सुरवात जेथे झाली तेथेच आयुष्याचा अंतिम कालखंड व्यतीत करावा असे मनोमन ठरविले आहे. कारण या गावाने जे दिलं ते जगात कुठेही मिळणार नाही याची खात्री आहे. स्वा. सावरकरांच्या "ने ने मजसी ने परत मातृभूमीला..." या गीताप्रमाणेच. त्यांनी आपल्या मातृभूमीप्रती कवितेतून व्यक्त केलेली आर्तता आपल्या गावाच्या बाबतीत  प्रत्येकाला अनुभवता येईल. "बालपणीचा काळ सुखाचा" असे म्हणून तर म्हटले जात असेल ना ! कायम स्मरणात राहणाऱ्या व गावाबद्दलची ओढ निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी येथे केल्या आहेत आणि या गोष्टींनी आयुष्यभरासाठीचा आनंद आणि समाधान दिले आहे. गावांमधील नकारात्मकतेची चर्चा करीत असतांना सुद्धा ते आपले गाव आहे म्हणूनच ! त्यातूनच सापडणारे उत्तर आणि पुन्हा वृद्धिंगत होणारी आपल्या गावाबद्दलची आपुलकी अशी ही साखळी... उन्हाळ्याच्या दिवसात गावातील शेकोटी, देवबाबांची यात्रा, लग्नाच्या वेळेस रात्री निघणारी मिरवणूक अर्थात फुनकं, रामलीला, थंडीत रात्री शेतात गव्हाला दिलेले पाणी, तेथेच प्यायलेला गुळाचा चहा, शेतात काम करतांना सोबतच्या मंडळींच्या भाकरीचा तुकडा, गुळाची जिलबी, बाजाराच्या दिवशी आजोबांनी आणलेला शेव चिवडा, उन्हाळ्यात आंब्याच्या रसाची रेलचेल, उन्हाळ्यात खळ्यात धान्याची केलेली राखोळी, तीन बैलजोडीच्या साहाय्याने लोखंडी नांगराने केलेली नांगरटी,  रात्री अपरात्री ट्रॅक्टर बसून शेतात केलेली नांगरटी, म्हशीला पाणी पाजायला नेताना तिच्यावर बसणे,  तिच्या शिंगांना अडकवलेल्या टमरेलने ती उधळणे अशा किती तरी गोष्टी या गावाने दिल्यात. वाड्याच्या दारात उभे असतांना रस्त्याने जाणारा येणारा प्रेमाने करणारा "राम राम..." इथलाच. असा माझा गाव जवळच असलेले उनपदेव, मनुदेवी आणि शिरागड ही बैलगाडीवरील सहलीची ठिकाणे. चिंचोलीच्या लक्ष्मीनारायण मंदिराचा उत्सव. गावातील व्याख्यानमाला, कीर्तन यासह अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. जीवनाचा अस्सल तत्वज्ञान या गावातच  मिळते. 

वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने व आमचे शिक्षण झाले धुळ्यात ! हे माझे दुसरे गाव.. जीवन घडविणारे हे गाव येथील शाळा, महाविद्यालय, शिक्षक, सामाजिक संस्था यांनीच खरे तर विचारांची दिशा दिली. राजवाडे संशोधन मंडळ, समर्थ वाग्देवता मंदिर, शिवाजी व्यायाम शाळा, नकाणे  तलाव, एकविरा देवी मंदिर, पांझरा नदी, ५वी गल्ली, मनोहर, स्वस्तिक, ज्योती, प्रभाकर, राजकमल टॉकीज, लहान पूल, मोठा पूल, जुने धुळे, देवपूर, भांग्या मारोती, मिरच्या मारोती, पाच कंदील, जवाहर सूत गिरणी, लळींगचा किल्ला, सोनगीर काय नाही या माझ्या गावात... आदिवासी भागात मोडत असले तरी हे शिक्षण आणि खाद्य पदार्थांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर ठरले आहे. ढाबा संस्कृती येथीलच. येथील गल्ली बोळ आजही मला तेथे जाण्यासाठी बाध्य करतो. येथील माणसांचा बोलतांना टोन जरी रफ वाटला तरी ती प्रेमळ आहेत. रा. स्व. संघ, अभाविप, विद्यार्थी प्रबोधिनी या सारख्या संस्थांनी सामाजिक  जडणघडण  केली. अनेक चांगली व मोठी माणसे या शहराने  दिली आणि तिचं आमच्या गावाची  श्रीमंती ! आयुष्यातील तारुण्याच्या काळात विचारांची बैठक तयार करणाऱ्या, आव्हानांना न डगमगता सामोरे जाण्याचा संस्कार देणाऱ्या ,तडजोड कुठे, कशी आणि कोणत्या मर्यादेपर्यंत करावी याची शिकवण देणाऱ्या, अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देणाऱ्या, वैयक्तिक जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा आणि श्रम मूल्य देणाऱ्या या गावाबद्दल आयुष्यात कृतज्ञच राहील. 

अंतिम टप्प्यात सध्या वास्तव्यास असणाऱ्या माझ्या जळगावबद्दल... मला नेहमी आकर्षण वाटणारे येथील ग्रामदैवत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर ! येथील विविध उत्सव कायम आकर्षित करतात. अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या या मंदिराचं सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने असलेले महत्व मोठे आहे. या गावाने वैचारिक प्रगल्भता व अध्यात्मिकतेची ओढ निर्माण केली यासाठी विशेष कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. हभप दादा महाराज जोशी व हभप मंगेश महाराज जोशी हे मानसिक स्वास्थ्यासाठीची शक्ती स्थाने वाटतात. डॉ. अविनाश आचार्यांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा सुमारे दोन दशकांचा दीर्घ असा सहवास मिळाला, पद्मश्री भवरलाल जैनांच्या उद्योग समूहाच्या सामाजिक कृतज्ञतेची अनुभूती, ऍड. अच्युतराव अत्रे अर्थात बाबांची कौतुकाची थाप या गोष्टींनी माझ्या मनात गावाबद्दलची नाळ दृढ केली. व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने या गावात आलेल्या गावाने मला येथील आदर्शांनी व व्यवस्थेने सामाजिक कामाची दिशा व प्रेरणा दिली. अनेक सामान्य माणसे सामाजिक कार्यांत कृतज्ञतेनं सहभाग देतात ही आनंदाची व समाधानाची गोष्ट आहे. कर्तृत्वाने ओळख निर्माण होते हे जरी खरे असले तरी येथील समाजाने तुम्हाला स्वीकारणे, कार्यात सहभाग देणे, पाठीशी राहणे या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात. प्रसंगी अपेक्षित सहकार्य मिळाले नाही तरी आपल्यातील क्षमतांची जाणीव करुन देण्यासाठी ते आवश्यक ठरते. लौकिक अर्थाने मोठं करणाऱ्या या गावाप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. 

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जळगावातील सर्व गावांमध्ये माझा प्रवास झाला. कालांतराने प्रशिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये गेलो, तेथे राहिलो, त्यांनी मला जे आयुष्यभरासाठीचे अनुभव दिले त्या सर्व गावांप्रती कृतज्ञ आहे. आमची कुलस्वामिनी माहूरगडावरची श्री रेणुका माता ! अध्यात्मिक दृष्टिकोनातून सद्गुरु संत श्री सखाराम महाराजांची भूमी असलेले अमळनेर, पंढरपूर, संत गजानन महाराजांची भूमी असलेले शेगाव या गावांनी जीवनातील आवश्यक असलेली शांती दिली. अहमदनगरने मला आयुष्याची साथ देणारी जोडीदार व डॉ. गिरीश कुलकर्णींसारखे मित्र दिले. या गावांचाही मी ऋणी आहे. अन्य काही गावांचा मला विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो. यात सामाजिक जाणीव प्रगल्भ करणारे बारीपाडा, राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, कोल्हापूर, हेमलकसा, अकोला, सर्वात जास्त शहीद झालेल्या जवानांचे गाव असलेलं गडहिंग्लज, प्रशिक्षणाच्या दृष्टीने समृद्ध करणारे धडगाव, , अचलपूर,  चिखलदरा, मेळघाट, तोरणमाळ, गारगोटी, माथेरान, पाट पारोळे, अक्कलकुवा, मोलगी, तळोदा, पाटण, मेढा, सातारा, चांदुर बाजार आपल्या गावाचे महत्व अधोरेखित करणारी व अनेक विचार प्रवृत्त करणारी मंडळी देणारे पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर ही महानगरे... यासर्वांप्रती विनम्रतापूर्वक कृतज्ञता ! 

जीवनाच्या समृद्ध वाटचालीत कुटुंब या एककाचा देशाशी ऋणानुबंध जोडणाऱ्या गावाचे महत्व नदीवर बांधलेल्या पुलासारखेच आहे. भूमीबद्दलच्या अभिमानाची बीजे रोवणाऱ्या गाव संस्कृतीला मनाचा मुजरा !  या गावाचे ग्रामस्थ म्हणून गावाच्या संस्कृती व परंपरांचा समृद्ध वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी सामाजिक कृतज्ञतेने आपण कार्यरत राहू या ! जागतिकीकरणाच्या युगातही "आपुलकी" आणि "माणुसकी" ही बलस्थाने असलेली गावसंस्कृती अबाधित राहो... हिच त्या बा गणरायाचरणी मनापासून प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Saturday, 29 August 2020

कृतज्ञता शेजाऱ्यांविषयीची !

कन्येच्या वाढदिवसाला शेजारची मंडळी...


आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० " कृतज्ञता उत्सव " अंतर्गत सातव्या दिवशी आपण आपल्या जीवनात सर्वात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या आपल्या शेजाऱ्यांविषयी व्यक्त करीत आहोत. आज व्यक्त झालेल्या मनोगतांमध्ये प्रत्येकाने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या शेजारांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केले तेथील शेजाऱ्यांची आठवण सांगितली आहे. अनेकांनी आपल्या सर्वात जवळचे नातेवाईक असा उल्लेख केला आहे. परस्परांवरील विश्वास, एकमेकांना केलेली मदत, कार्यक्रमांमधला सहभाग या सर्वांबद्दलची कृतज्ञता ! चाळ वा वाडा संस्कृतीपासून अलीकडच्या फ्लॅट संस्कृतीतील शेजारी या सर्वांचा उल्लेख यात आलेला आहे. हा उल्लेख करीत असतांना काळानुरुप अनुभवलेला बदल प्रत्येकाने अधोरेखित केला आहे. अपवादात्मक स्थितीत नकारात्मकतेची झालरही दिसून येते. निमित्ताने आमच्या शेजाऱ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. 

रुढ अर्थाने "शेजारी" म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला राहणारी मंडळी असली तरी आपले जेथे जेथ अस्तित्व असते आणि तेथे आपल्या आजूबाजूला जो असतो तो शेजारी ! म्हणजे शाळेत आपला बेंच पार्टनर, कार्यालयात आपल्या सोबत व शेजारी बसणारा सहकारी, कुठेतरी प्रवासाला निघाल्या नंतर आपला सहप्रवासी, एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या बाजूला बसलेला शेजारी, अगदी पंगतीत जेवायला बसल्या नंतर आपल्या बाजूला बसलेला शेजारी, चित्रपटगृहात आपल्या बाजूला बसलेला शेजारी हि यादी आपल्याला आणखी मोठी करता येईल. माझा उद्देश या सर्व शेजाऱ्यांची भूमिका बहुतांश वेळेस लाभदायक ठरलेली असते आणि ती लक्षातही राहते त्यामुळेच आजपर्यंत जीवनात ज्यांनी शेजाऱ्याची भूमिका पार पाडली त्या सर्व शेजाऱ्यांविषयीची हि कृतज्ञता ! काही आठवतील काही नाही पण... काही अनुभव चांगले असतील वा काही अनपेक्षितपण... अशा सर्व ! 

लहान असतांना आम्ही धुळ्याच्या पंचवटी भागात चाळीसारख्या ठिकाणी राहायचो अर्थात इतरांप्रमाणे माझेही ते एक विस्तारित कुटुंबच होते. येथे कुणीही कोणाच्या घरात सहज जाऊ शकायचे, ज्येष्ठ मंडळी कोणाला रागावू शकत होते प्रसंगी एखादा धपाटाही देऊ शकत होते. एकमेकांकडे जेवण तर सामान्य गोष्ट होती. या सर्वांमुळे आजच्यासारखी कोणाचीही प्रायव्हसी डिस्टर्ब् होत नसे. आमचे शुक्ल/कुळकर्णी म्हणून शेजारी होते. तसे चार घर सोडून राहणारे चंद्रात्रे व पाठकही शेजारीच होते. यातूनच मानलेले भाऊ, बहीण, मामा, काका, मावशी असे नाते दृढ होत गेले जे आजही तसेच आहे.  मी जवळपास ७ वर्षांचा होईपर्यंत शेजारच्या कुळकर्ण्यांकडे जेवणखाण करीत असे. आईला कुठेही बाहेर जायचे असल्यास ती आम्हा मुलांना शेजारच्यांवर सोपवून जात असे. घर उघडेच असे. एकमेकांच्या मदतीला, कार्याला सर्वजण आपल्या घरचा कार्यक्रम समजून काम करीत असत. 

नंतर आम्ही काही काल नेहरुनगरमध्ये व त्यानंतर आमच्या स्वतःच्या वास्तूत राहायला गेलो. येथेही आम्हाला खूप शेजारी मिळाले. त्यातील अमृत देशपांडे हे आमच्या वडिलांचे जिगरी दोस्त होते. नवरात्रात सोबत एकविरा देवीला जायचे. रोज संध्याकाळी आमच्या घरी यायचे आणि दोन दोन तास अंगणात आराम खुर्ची टाकून बसत असत. वडील गेल्यानंतरही त्यांनी त्याचा हा शिरस्ता कधीही सोडला नाही. त्यांची पत्नी म्हणजे आमच्या देशपांडे काकू ह्या आईच्या मोठ्या जाऊबाईच होत्या. त्या काही वेळेस  आईला अगदी हक्काने रागवायच्याही आणि त्यात कोणी बोलण्याचे कारण नसे. आजही या परिवाराशी आमचे ऋणानुबंध आहे. इतरही अनेक शेजारी होते. हरतालिका, गणेशोत्सव, संक्रांत, होळी, रंगपंचमी  आदी कार्यक्रम सर्वजण एकत्रित साजरे करीत असू. मला आठवते कोजागिरी पौर्णिमेला आम्ही सर्व मुले एकमेकांच्या घरी जात असू आणि तेथे ज्येष्ठ अपत्य पूजन अर्थात औक्षणाचा कार्यक्रम होत असे. सुट्टयांमध्ये तर धमाल असायची. खेळ, गमतीजमती, भांडणे हे होत असे तेव्हढ्यापुरतेच.


नोकरीच्या निमित्ताने जळगावला आलो. प्रथम नांदेडकर वाड्यात राहत असू.येथे शिवाजी पाटील, विजय लोढा, नंदलाल काबरा, हेमंत अलोने, किरण काळे, येवले, कुळकर्णी परिवार असे अनेकजण लाभले. येथेही आम्ही अनेक गोष्टी एकत्र करीत असू. स्वतः नांदेडकर परिवार सर्वांना घेऊन चालणार होता. या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील भाडेकरु स्वतःच्या घरातच राहायला गेले. सध्या आदर्श नगरमध्ये राहत असतांना अजय गुरव, सुहास कोल्हे, ऍड. हेमंत मेंडकी, अनिल चौधरी, लखोटिया ऑंटी, हेमंत पाटील.  प्रा. मोहरीर, जहागीरदार, विजयकुमार कोसोदे आदी राहतात. या सर्वांशी अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. मी अनेक वेळा बाहेरगावी असल्याने या सर्व शेजाऱ्यांचा नक्कीच आम्हाला आधार वाटतो. असे हे सर्व शेजारी म्हणजे आमचे विस्तारित कुटुंबच ! परिवाराच्या सुखदुःखात समरस होणारा शेजार मिळणे हि महत्वाची गोष्ट आहे आणि त्याबाबतीत आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. जीवनाच्या वाटचालीत शेजाऱ्यांचे स्थान महत्वपूर्ण आहे. परस्पर सहकार्य व सौहार्दाचा हा वसा आणि वारसा पुढील पिढीकडे संक्रमित करणे हि आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. या सर्व कायम व तात्कालिक शेजाऱ्यांच्या प्रेमाबद्दल, सहकार्याबद्दल जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करतांना आनंद व समाधान होत आहे. परस्पर सहकार्याची हि शृंखला अखंडपणे विस्तारित होत राहो व भारतीय संस्कृतीचा मूलाधार असलेली कुटूंब व्यवस्था अधिकाधिक बळकट होत राहो... हिच त्या बा  गणरायाचरणी मनापासून प्रार्थना ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Thursday, 27 August 2020

कृतज्ञता जीवनादर्शांप्रतीची !

आदर्शांचा आदर्श राम !

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० " कृतज्ञता उत्सव " अंतर्गत सहाव्या दिवशी आपण आपल्या जीवनातील आदर्शांप्रतीची कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आज व्यक्त झालेल्या मनोगतांमध्ये प्रत्येकाने अनेक आदर्शांचा उल्लेख केला आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्विता मिळवायची असेल तर त्या त्या क्षेत्रातील आदर्शांचा विचार करावा लागेल. आपण ज्याच्याकडून काही तरी शिकतो त्याला आदर्श म्हणू शकतो मात्र म्हटलेच पाहिजे असे बंधन नाही. त्यामुळे चांगलं कुणाकडूनही घ्यावे त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे मात्र तो आदर्श आहे असे नाही. कारण आजच्या युगात प्रभू रामचंद्रांप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम दिसत नाही. जीवन जगात असतांना समाजातील व्यक्तींना अपेक्षित असलेली उक्तीप्रमाणे कृती तसेच आचार, विचार आणि कृती यात योग्य मेळ दिसून येतं नाही. आई-वडील हेच सामान्यपणे प्रत्येकाचे आदर्श असल्याचे लक्षात येते. असो... माझ्या आदर्शांबद्दल यानिमित्ताने कृतज्ञता व्यक्त करतो. 

आपल्या विचारांबाबत ठाम मात्र इतरांच्या विचारांबाबत व भावनांचा आदर, काम करतांना अपेक्षित सर्वसमावेशकता, दूरदृष्टी, आधी केले मग सांगितले हि वृत्ती, द्रष्टेपणा, निःस्वार्थ भावनेने केलेली सेवा, वेळेचे भान, कामाचा दर्जा आदी गोष्टींबाबत आग्रही  हे आदर्शांचे परिमाण ठरु शकतात. अजूनही वाढविता येतील. या सर्व गुणांचा एकत्रित मिलाप जेथे सापडेल ती व्यक्ती आदर्श ठरु शकते. तरीही त्या व्यक्तीच्या स्वभावातील दोषांकडे आपल्याला दुर्लक्ष करावे लागेल. आपण प्रभू रामचंद्रांना आदर्शांचा आदर्श असे म्हणत असलो तरी त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो हे लक्षात घ्यावे लागेल. ज्या व्यक्तीच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल, कार्याबद्दल, जीवनातील समर्पित वृत्तीबद्दल अभिमान वाटतो अशा व्यक्ती आदर्श ठरतात. त्यांचे अनुसरण करणारे अनेक व्यक्ती असतात. अशा आदर्शांचा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वावर व जीवनावर प्रभाव दिसून येतो आणि त्याबाबत ते जाहीरपणे सांगतात. 

माझ्या जीवनावर अशा अनेक लोकांचा प्रभाव असल्याचे मला जाणवते. यात अग्रक्रमाने माझे वडीलच आहेत. पोस्टासारख्या विभागात व्यावसायिक जीवनाची वर्षे व्यतीत करतांना प्रामाणिकपणे कष्ट हि गोष्ट माझ्यावर प्रभाव करुन जाते व मी त्याचे अनुसरण करतो. जीवनाचे तत्व घेऊन जगणारे माझे वडील त्यादृष्टीने मला आदर्श वाटतात. आपल्या दाराशी कोणी माणूस त्याचे पैसे मागायला आला नाही पाहिजे. (याचाच अर्थ आपले अंथरुण पाहून पाय पसरवावे) दुसऱ्यामुळे आपल्याला त्रास झाला तरी चालेल मात्र आपल्यामुळे कोणाला त्रास व्हायला नको, कष्टाने माणूस मरत नाही, मर्यादित उत्पन्नातही चांगले, आनंदी व समाधानी आयुष्य जगता येते. आईनेही अशाच प्रकारे जीवनावश्यक काही मूलभूत तत्वज्ञान आपल्या जीवनातून सांगितले. घरात कायम चांगलेच बोलावे कारण वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो. स्वयंपाक करतांना प्रसन्न व आनंदी असावे कारण बनविणाऱ्याची वृत्ती त्या अन्नात येते आणि नंतर खाणाऱ्यातही ! साधे बाळबोध वाटत असले तरी तेच शाश्वत विचार आहे, असे मला वाटते. यासर्व गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो. ज्या मला आदर्श वाटतात. या माझ्या आदर्शांबद्दल कृतज्ञता ! 


व्यावसायिक, शैक्षणिक व सामाजिक जीवनात अनेकांचा प्रभाव मला जाणवला. तो जीवनात आणण्याचा कायम प्रयत्न असतो. आमचे प्राचार्य प्रा. एन. के. पाटील, प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, डॉ. अविनाश आचार्य, पद्मश्री भवरलाल जैन, ऍड. अच्युतराव अत्रे, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुळकर्णी, संजीव दहिवदकर, श्री. लक्ष्मणराव जोशी हि त्यातील काही नावे. या सर्वांसोबत संपर्क संवाद होता, आहे. जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असतांना या सर्वांच्या जीवनाचा, त्यांच्या विचारांचा, साधनशुचितेचा प्रभाव कायम राहिला. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, चाणक्य, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम , महाराष्ट्रातील विविध संत, क्रांतिकारक, परमवीरचक्र विजेते जवान यांच्या जीवनातून कायम प्रेरणा मिळते. या सर्वांप्रती आज कृतज्ञता व्यक्त करतांना मला विशेष आनंद होत आहे. माणसाच्या जीवनात आचार, विचार व कृतीचे दिशा दर्शन व मार्गदर्शन करणाऱ्या प्रेरणादायी आदर्शांचे महत्व आहे. कृतिशील विचारांचा वसा आणि वारसा अनेक पिढ्या घडवितात. त्यासाठीच हि जीवनादर्शांची कृतज्ञता ! पुण्यभूमी भारतमातेला परमवैभवाला नेणाऱ्या आदर्शांची हि शृखंला अखंडपणे सुरु राहो... हिच बा गणरायाचरणी प्रार्थना ! गणपती बाप्पा मोरया ! 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

Wednesday, 26 August 2020

श्रीमंतीचा अनुभव देणाऱ्या मित्रांप्रतीची कृतज्ञता !

लंगोटी यार 

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० अंतर्गत "कृतज्ञता उत्सवात" सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत एकाच गोष्टीकडे आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने, अर्थाने  पाहू शकतो याची जाणीव करुन देणारी आहे. प्रत्येक बाबतीत भरभरुन लिहायचे असते असे लक्षात येते. आपल्याला त्या नात्यातलं वेगळपण टिपण्यासाठी ओळींची मर्यादा घातली आहे. हा कृतज्ञता उत्सव रुजतो आहे. मंडळी लिहिते होत आहे आणि वैविध्यता गावते आहे, तीच या उपक्रमाची उपलब्धता. मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना सर्वात जास्त विशेषणे व आदर्श उदाहरणाचे संदर्भ मिळाले. जीवनातील मित्रांचे महत्व अधोरेखित करणारे सर्वांचे अनुभव होते. या सर्वांमध्ये जीवन समृद्ध आणि आयुष्याची श्रीमंती मला दिसली. अगदी मोजकेच वा भरपूर मित्र असले तरी त्यामुळे मिळणारी श्रीमंती मात्र सारखीच ! मंडळींनी व्यक्त केलेल्या भावना माझ्या मित्रांच्या नात्यातून मांडणार आहे. 

लहानपणी अधिक वेळ सोबत असणारा एव्हढा एकमेव निकष असतो. पुढे जाऊन हि मैत्री विचारांनी होते, सामान धाग्यांनी होते. वयाचा, विचारांचा, सोबतीचा कोणताही असो,  तो मित्र अशी एक भावना तयार होते. माणूस प्रगल्भ होत जातो आणि या सर्व गोष्टी पलीकडे जाऊन मैत्री अनुभवता येते. मग कौटुंबिक नात्यांमध्येही आपल्याला मैत्री सापडते. समाज माध्यमाच्या युगात तर एकमेकांना न पाहिलेले मित्र अनुभवतात. त्याला जोड असते निर्व्याज व निरपेक्षपणाची... मला खूप मित्र आहे आणि त्यात वादच होत आहे. या सर्वांबद्दल लिहायला मला आवडते. सहजतेतून आणि स्वभावातून झालेली हि मैत्री कायम हृदयात घर करते याचा आपल्या सर्वांप्रमाणे माझाही अनुभव आहे. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

माझा लहानपणापासूनचा मित्र म्हणजे प्रशांत मोराणकर ! हि मैत्री अशी आहे कि, कट्टी ने अबोला असला तरी मैत्री कायम होती. म्हणजे एखाद्या गोष्टीवरुन बिनसले असले तरी आम्ही सायकलवरच सोबत जाणार मात्र एकमेकांशी न बोलता कारण कट्टी आहे नं ! मग परत बोलायला कसे लागायचो ते आठवत नाही. पावसाळ्याच्या दिवसात ढग भरुन आले वातावरण मस्त असले आणि दोघांनी ठरवले कि आम्ही सायकलवरुन रोकडोबा हनुमान, नकाणे तलाव, डेडरगाव अशा ठिकाणी जायचो. डेडरगावला त्यांची शेती आहे.  तेथेच मुक्काम आणि मग दुसऱ्या दिवशी घरी. अनेकदा धुळ्याच्या गणपती रोडवरील पुलावर उशिरापर्यंत म्हणजे मध्यरात्रीपर्यंत गप्पा मारत असू. दिवसातला बहुतांश वेळ सोबतच. अनेकदा जेवण त्याच्याच घरी. खेळ, उत्सव, कार्यक्रम सर्व सोबतीने. हा आमचा मित्र लग्न झाल्यानंतर फिरायला गेला नाही. तीन वर्षानंतर आमचा एक मित्र चंद्रशेखर जोशी व माझे लग्न झाल्यानंतर आम्ही तिघे सोबत फिरायला गेलो अशी हि मैत्री जी आजही अबाधित आहे. आमच्या या मैत्रीत टेलीपथीचा (इंद्रियांच्या साहाय्यावाचून एकाच्या मनातील विचार त्याचवेळी दूरवर असलेल्या दुसर्‍या व्यक्तीच्याही मनात उमटणे) अनेकदा आम्ही अनुभव घेतो. 

धुळ्यात खूप सारे मित्र होते. प्राथमिक, माध्यमिक शाळेतील, महाविद्यालयातील, गल्लीतील असे सर्व. आम्ही महाविद्यालयात असतांना आमच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित होती ३० ! त्यामुळे या सर्वांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे भावबंध होते यात मैत्रिणीसुद्धा होत्या. सविता बागल हि त्यातील एक. सोबत शिकलो आणि सोबत ४ वर्षे कामही केले. नाटकं, खेळ, गॅदरिंग, सहली, अभ्यास अतिशय समृद्ध करणारा हा मित्रांचा गोतावळा. यासर्वांशी आजही संपर्क आहे. काय योगायोग असतो पहा, आजच्या दिवशीच सकाळी एक दुःखद घटना कानी पडली. आमचा एक मित्र आम्हास सोडून गेला. नरेंद्र कुळकर्णी ! फार लवकर एक्झिट झाली. दिवसभर अस्वस्थ होतो. आठवणी होत्या. एका मित्राने फोन करुन तो अक्षरश: फोनवरती रडला कारण अनपेक्षित व अनाकलनीय जाणे. आमचा महाविद्यालयीन जीवनापासूनचा मित्र नरेंद्र ऊर्फ जया ऊर्फ गुंड्याभाऊ ऊर्फ एनव्हीके सर आज आम्हाला सोडून गेला आणि सर्व कसं कालच घडलं असं आठवलं. खरं तर मी आणि प्रशांत यांनी त्याला भेटीला जायचं ठरवलं होत. लॉक डाऊनमुळे राहून गेलं... भेट होणे नाही हे वास्तव स्वीकारणे तसे जडच... ११ वीपासून आम्ही धुळ्याच्या जयहिंद महाविद्यालयात शिक्षणामुळे संपर्कात आलो. पुढे कॉलेज, अभ्यास आणि काही काळ सोबत नोकरीच्या निमित्ताने मैत्रीचे नाते वृद्धिंगत होत गेले. याचे आईवडील दोन्हीही शिक्षक होते. आम्ही एकत्रित अभ्यास करत असू तो नरेंद्रकडे ! दररोज संध्याकाळी सर्वजण नरेंद्रकडे एकत्र जमणार गप्पाटप्पा तेथून पुढे काय करायचे ते... मग जेवण करायला म्हणा किंवा अन्य काहीही. आजही आम्ही कधीतरी एकटे तर कधी कुटुंबियांसह फिरायला जातो. नरेंद्रच्या घरी रंगपंचमी साजरी करीत असू.  आमच्या मित्राच्या कुटुंबाशीही अतिशय सर्वांचेच जिव्हाळ्याचे संबंध होते. मुल-मुली रात्री उशिरापर्यंत नाटकांची प्रॅक्टिस करत असू सोबत. अनेकदा व्हीसीआर भाड्याने आणून चित्रपट सोबत पाहिलेत. सुवर्णकाळच तो ! असो 

नोकरीच्या निमित्ताने जळगावात आलो आणि येथेही अनेक मित्र झालेत. त्यांचे नियमित एकत्रीकरण होतात. कधी भिशीचे निमित्त तर कधी अथर्वशीर्ष आवर्तनाचे. नितीन चौधरी हा कार्यालयातील सर्वात जवळचा मित्र. सामाजिक कामात असल्याने अनेक मित्र. धागा एक परस्पर प्रेमाचा. व्यावसायिक जीवनात वेगळी वाट निवडल्यावर मला अनेक मित्र जोडता आले. संस्थेची उभारणी करत असतांना अनेकदा आपल्याला विचारांचे आदानप्रदान करण्याची गरज असते प्रदीप रस्से, चंद्रशेखर संत, शेखर नांदेडकर, बाळासाहेब पाटील कितीतरी नावे सांगता येतील. क्रिएटिव्ह ग्रुप हि संस्थाच वेगवेगळ्या क्षेत्रात  काम करणारे मात्र समविचारी व समवयस्क मित्रांनी एकत्र येऊन सुरु केलेली संस्था. विद्यार्थी परिषदेचे काम करीत असल्याने तेथेही अनेक मित्र मिळाले. माध्यम जगतानेही अनेक मित्र दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातूनही अनेक मैत्र जोडले गेले. विचारांपलीकडची व वयापलीकडच्या मैत्रीचा समृद्ध काळ सध्या अनुभवत आहे. अंतिम टप्प्यात नियमित संपर्कात असलेल्या मित्रांविषयी...

मैत्र जीवांचे... एका कार्यक्रमानंतर...


अनिल जोशी, दिलीप तिवारी, सुशील नवाल, सुनील याज्ञीक या चार मित्रांशी व त्यांच्या परिवाराशी नियमित संपर्क, संवाद असतो. अनेक गोष्टींवर चर्चा होते. प्रत्येकाचे विचार स्पष्ट आणि ते बोलण्यात येणार विरोधी असले तरी मागे भावना योग्य सल्ला आणि मित्राचं भले अन्य काहीही नाही. अनेकदा पलीकडे जाऊन काळजी घेणारी हि मैत्री. अनेक मित्रांचा उल्लेख मी टाळला आहे. कारण इतरांची मला नाराजी ओढून घ्यावयाची नाही. ज्यांचा उल्लेख केला आहे त्यांची जिवलगता सर्व जगाला माहिती आहे. माणसाने जीवनात उभे राहावे यासाठीची एकमेव अपरिहार्यता म्हणजे मित्र ! मैत्रीचा हा वसा आणि वारसा पुढील पिढीत संक्रमित होत आहे याचा विशेष आनंद आहे. त्यासाठीच हि मित्रांप्रतीची कृतज्ञता ... वसुधैव कुटुंबकमची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या विस्तारित कुटुंबाचा मैत्रीचा हा धागा अधिकाधिक विस्तारित जावो... हिच बा गणरायाचरणी प्रार्थना ! गणपती बाप्पा मोरया ! 


गिरीश कुळकर्णी

९८२३३३४०८४ 

Tuesday, 25 August 2020

कृतज्ञता "आपलं"पण रुजविणाऱ्या घराप्रतीची !

आशा फौंडेशनच्या सार्वजनिक गणेशोत्सव २०२० अंतर्गत साजरा करण्यात येणाऱ्या "कृतज्ञता उत्सवात" आज सर्वांनी आपल्या घराप्रतीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रत्येकानेच आपापल्या घराबद्दल जे लिहिलं आहे ते माझ्या घराबद्दलच लिहिलं आहे असं वाटत राहील. कधी अभिमान वाटलं, कधी भावुक झालो अगदी डोळ्यात पाणी देखील आलं. मी या सर्वांचे मनापासून कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो. आणखी जास्तीत जास्त मंडळींनी लिहीत व्हावं आणि जीवनाचा खरा आनंद घ्यावा हि अपेक्षा ! 

माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात कायम माझ्यासोबत आहे ते म्हणजे माझे घर ! माझ्या सर्व भावना समजून घेत कायम माझ्यासोबत असलेली एकमेव गोष्ट म्हणजे ती "वास्तू"... जीवनातील स्थित्यंतरांमध्ये सोबत देणारी वास्तू... भारतीय संस्कृतीची ओळख आणि त्याची कायम प्रचिती देणारं मंदिर... हक्क, जाणीव व कर्तव्याची जागा ! " हे विश्वची माझे घर " या उक्तीप्रमाणे घर आणि विश्व यातील सर्व भेद सोडून एकत्वाची प्रचिती म्हणजे माझे घर, माझे विश्व. म्हणून मला जन्मापासून आज पर्यंत रोज रात्री मी जेथे विसावलो ती माझी जागा म्हणजे मला माझे घर वाटते. कधी चार भिंतीत तर कधी खुल्या आकाशातही... कधी एखाद्या हॉटेलमधील रुम तर कधी खळंसुद्धा... जेथे जेथे राहिलो तो माझे, आपले घर आणि म्हणूनच लेखाच्या शिर्षकात "आपलं" पण रुजविणार म्हणतोय. नजरेसमोरुन पटापट इतक्या वास्तू जात आहेत आणि खरोखर मी त्या सर्व वास्तूंबद्दल / घरांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. 

 जन्मगावाकडंच घर, नियमित राहतो ते घर, मित्राचं घर, शेजाऱ्यांचे घर हे सर्व मला माझी वाटतात मी त्याचा अनुभव घेतलाय कारण या सर्व घरांशी भावनेने जुळलो आहे. स्वरुप कसंही असलं तरी ते माझं आहे आणि तेथील माणसे, वस्तू आणि तेथील वास्तुपुरुषाच्या वास्तव्याने ते पवित्र झालं आहे. ती एक खोली असू दे, वाडा असू दे, फ्लॅट असू दे, बंगला असू दे, इमला असू दे... त्याला नाव असू दे वा नसू दे, रंग असू दे वा नसू दे, त्यात सुख सुविधा असू दे वा नसू दे... तेथे सुख आहे, आनंद आहे, आशा आहे, विश्वास आहे, सुरक्षा आहे, शांतता आहे, प्रेम आहे, नातं आहे, ऋणानुबंध आहे म्हणून त्याची ओढ आहे. माझ्या आयुष्यातील काही घरांचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. आमच्या धानोऱ्याचे घर, वाडा... पूर्वी या वाड्यातच सर्वांची निवासाची सोय होती म्हणजे माणसं, प्राणी, अन्नधान्य आणि चक्क देवांचीही ! विहीर, गोठा, दत्ताची माडी, बंगला, स्वयंपाक घर, मधलं घर, ओटा, मोरी, धुण्याची माडी... सर्वच मातीच त्यामुळे त्याला शेणाने सारवण आलंच... कायम माणसांचा राबता त्यामुळे जिवंतपणा ! उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीत सर्वात पहिले येथे जाण्याचा आनंद... एकत्र कुटुंबामुळे येथे किमान ८-१० माणसे आणि सुट्ट्यामध्ये, सणावाराला हि संख्या ३५-४० आजही असते. या घराने मला माझी हक्काची माणसं दिली त्यामुळे सर्वच दिल त्याचे आजन्म ऋण आहे. 

 धुळ्याला लहान असतांना राहिलेलो चाळीतली एक खोली. या चाळीतली सर्व खोल्या मालकीची नव्हे पण प्रेमाने माझे घर होते. झोपायला आमच्या खोली बाकी वेळ सर्व इतर खोल्यात माझं गावासारखं विस्तारित कुटुंबाबातील माणसं ! सध्या आम्ही धुळ्याला जेथे राहतो ते घर... वडील आणि काकांनी जीवापाड मेहनत करुन आपल्या आयुष्यातील उमेदीचा काळ याला उभारण्यासाठी दिला. मोराणकरांचे घर... माझा मित्र प्रशांत मोराणकर यांचे घर मला कायम माझे घर वाटते. या घराने मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकारले. आजही धुळ्यात गेलो कि त्यांच्याकडे गेलो आणि बिना जेवणाचे आलो असे कधी झाले नाही आपल्या घरात जे मिळतं ते सर्व या घराने मला दिले. व्यवसायाच्या निमित्ताने जळगावात आलो आणि सुरवातीचे सात वर्षे नांदेडकरांच्या वाड्यात राहिलो. नुकतंच लग्न झालेले आणि दोन खोल्या चिमणा - चिमणीने सुरु केलेला संसार आणि त्याला जोडलेली प्रत्येक कृती. येथील प्रत्येक कुटुंब विशेषतः घरमालक आणि त्यांचा परिवार सर्वच प्रकारची काळजी घ्यायचे कारण ती आपली माणसं आणि त्यामुळे ते घर आपलेच. 

 सध्या माझ्या कुटुंबासह राहतो ते घर... स्वकमाईतून घेतलेलं... सद्गुरुंच्या आशिर्वादाने आणि वास्तव्याने पुनीत झालेलं... सामूहिक श्री गणेश अथर्वशीर्षाच्या आवर्तनांच्या स्पंदनांनी भारलेलं... अनेकांनी मन आणि पोट यांना तृप्तीचे ढेकर दिलेलं... सर्वार्थाने चढती कमान दिलेलं... गृहलक्ष्मीच्या अस्तित्वाची कायम जाणीव करुन देणारं... जीवनातील या सर्व घरांबद्दल मी कृतज्ञ आहे त्याने मला माझं सर्वस्व दिले जाता जाता आणखी एका घराचं उल्लेख केला पाहिजे ते आमचे मोठं घर अर्थात मोठ्या काकांचे घर ! जळगावातील या घराचेही मी आभार मानेल कारण तेथे बनलेलं काहीही विशेष कायम माझ्यासाठी येतं आजही माझे काका-काकू या जगात नसतांनाही...माझे पालक डॉ. किशन काबरा यांनी म्हटलंय "स्वर्ग हवाय कुणाला ?" कारण तो येथेच अनुभवतोय... तीच माझी मनस्थिती या सर्व घरांबाबत आहे आणि म्हणूनच हि कृतज्ञता ! माणसातील माणूसपण, नाते, ऋणानुबंध याद्वारे कुटुंब व परिवार व्यवस्थेचा अबाधितपणा टिकविणारा "घर" नावाची व्यवस्था ! भारतीय संस्कृतीला जगात मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या "घर" नावाच्या संकल्पनेचा वसा आणि वारसा पुढे नेऊ या ! त्यासाठीच घराप्रतीची कृतज्ञता... प्रत्येकाच्या मनातील घराबद्दलची हि कृतज्ञता विश्वबंधुत्वाची कल्पना टिकवून ठेवो ज्यामुळे हि संस्कृती व राष्ट्र परमवैभवाला जावो... हिच बा गणराया चरणी मनापासून प्रार्थना ! 

 गिरीश कुळकर्णी 
 ९८२३३३४०८४